पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आणि सूर जुळले

           :-  आणि सूर जुळले -:

मी ऑफिस मधून दमून घरी आले होते. थोडं डोकं सुद्धा दुखत होतं. माझा उतरलेला चेहरा पाहून राधाने माझ्यासाठी कडक कॉफी बनवली. एकदम मला लागते तशी. कॉफीचे घोट घेता घेता माझा थकवा पळून गेला. डोकं पण दुखायचं थांबलं. आपल्यासाठी कुणी तरी काही तरी प्रेमाने करत आहे, ही भावनाच मुळी आपलं निम्मं दुखणं कमी करते. राधा तर माझी मुलगीच! तेव्हा नक्की बरं वाटणारचं ना! मी राधाला म्हणलं,

“ राधे अग अजून दोन महिन्याने तू सासरी गेल्यावर, माझ्यासाठी कोण ग असा आयता कॉफीचा कप हातात देणार?”  राधा म्हणाली,

“ झालं का तुझे इमोशनल होणे सुरू? आत्ताचा विचार कर. पुढचे पुढे. उद्या आपल्याला मुंबईला जायचं आहे. प्राजक्ता मावशीकडे तीन दिवस रहायचं आहे. माझ्या लग्नाची खरेदी करायची आहे. त्याचा काही विचार केला आहेस का?”

“ लग्न तुझं! खरेदी तुझ्या मनासारखी होणार. मी काय फक्त तुझ्याबरोबर येणार. तू ठरवलं आहेस ना, तुला काय घ्यायचं काय नाही ते! मग झालं तर!”

“ असं उडवून लावू नकोस, तू सुचवलेल्या प्रत्येक गोष्टी काही मी नाकारत नसते. आणि हो, प्राजक्ता मावशीचा फोन येऊन गेला. स्टेशनवर येते म्हणाली पिक अप करायला.”

मी आणि राधा आम्ही रात्री लवकर जेवण आटपलं आणि झोपलो. सकाळची डेक्कन क्वीन गाठायची होती. अभिजीतचे काय नेहमीप्रमाणे रात्री उशिरा पर्यंत ऑफिसचे कॉल चालूच होते. तेव्हा तो काही सकाळी लवकर उठून आम्हांला स्टेशनवर सोडायला कार घेऊन येणे शक्य नव्हते. म्हणजे पुन्हा रिक्षा शोधणे भाग होते. नशीब परत येताना तरी आम्हांला न्यायला कार घेऊन येतो म्हणाला. खरेदीचे सामान वाढणार होते म्हणून आणि प्राजक्ताने आम्हाला केळवण करण्याचे ठरविले होते ना! तो तिला कधीच नाही म्हणत नाही.

 सकाळी लवकर उठून सगळं काही एकदाच आटपलं आणि डेक्कन क्वीन गाठली. ट्रेन सुरु झाली, आणि तिने वेग घेतला तसा आम्हां दोघा मायलेकींच्या गप्पांनी सुद्धा वेग घेतला. हल्ली राधा सुद्धा माझ्याशी खुप मैत्रिणी सारख्या गप्पा मारत असते. तिला माझ्या गत आयुष्यातल्या घटना जाणून घेण्याची खुप उत्सुकता असते. लग्नाची तारीख फिक्स झाल्यापासून खुप हळवी बनली आहे. त्यातले त्यात ध्रुवला तीन वर्षासाठी कंपनी तर्फे जर्मनीला जाण्याची संधी मिळाली आणि लग्ना नंतर तिला सुद्धा आम्हांला सोडून, तिचा जॉब सोडून ध्रुव बरोबर जर्मनीला जावं लागणार त्यामुळे जास्तच वाईट वाटत आहे, तिला आणि आम्हालाही. मी तिला म्हणलं,

“ का ग राधा, ट्रेनने जावं लागत आहे म्हणून नाराज झालीस का?”  तेव्हा ती म्हणाली,  “ तसं काही नाही ग आई, ट्रेनचा प्रवास सुद्धा आवडतो मला. आपल्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वरून कारने जाण्यापेक्षा कधीतरी ट्रेनने मजा येते. आणि तसा माझा ध्रुवच्या प्रेमात पडण्यापासून हा लग्नापर्यंतचा प्रवास ट्रेन मधल्या ओळखीनेच तर सुरु झाला.” सारं काही माहित असून सुद्धा मी हसून म्हणलं, “ हो का ग राणी?”  तेव्हा ती लाजली. तिला तिची आणि ध्रुवची स्टोरी सांगायला आवडत म्हणून मी तिला उगाचच पुन्हा छेडलं. म्हणलं सांग ना राधे ध्रुवची कशी ओळख झाली ते! “ आई तू ना ....!” म्हणत तिने तिची रेकॉर्ड सुरू केली.

“ अग ऑफिस तर्फे नाही का मी बंगलोरला ट्रेनिंगसाठी गेले होते ?” मी म्हणलं,

“हो ना ! आणि अचानक तुझ ट्रेनिंग एक आठवडा जास्त लांबलं. आणि तुझ पाहिलं तिकिटाच आरक्षण तुला रद्द करावं लागलं. ते सुट्ट्यांचे दिवस होते तुला नंतर पुन्हा आरक्षण केलं तेव्हा वेटिंग लिस्टवर मिळालं. तुला जागा मिळते का नाही? का सगळा रात्रीचा प्रवास जागून करावा लागणार, ह्या चिंतेत आम्ही दोघ होतो.”

“ आणि तेच झालं, ऐनवेळी ते मिळालच नाही. तशीच ट्रेन मध्ये घुसले. म्हणलं, तिकीट चेकर कुठेतरी जागा मिळवून देतील. पण कसलं काय, जागा काही मिळाली नाही. तेव्हा एका आजीबाईच्या पायथ्याशी मी बसून राहिले. दिवसभर थकले होते. रात्री दहाच्या पुढे झोप आवरेना. पेंगत बसून राहिले होते. समोरच्या बेडवर एक तरुण पुस्तक वाचत पडलेला होता. त्याचं जेव्हा माझ्याकडे लक्ष गेलं तेव्हा तो म्हणाला,

“ ‘तुम्हांला झोप आवरत नाही असं दिसतयं आणि मला झोप येत नाहीये. तर तुम्ही खुशाल माझ्या सीटवर झोपा. मी बसतो.’ मी पडत्या फळाची आज्ञा मानली आणि लगेच हो म्हणलं. आणि त्याला म्हणलं, ‘जर तुम्हांला झोप आली तर मला दोन तासांनी उठवा बरका!’ त्याचा वरचा बेड होता. त्यामुळे मला शांत झोप लागली. आणि कुठलं काय मला पुणे यायच्या आधी एक तास जाग आली. तेही तिकीट चेकरने उठवले तेव्हा!” मी त्याला म्हणलं, तिकीट चेकर निघून गेल्या नंतर मी त्या तरुणाला विचारलं, ‘सॉरी तुमचे नाव काय?’ तो म्हणाला,

“ ध्रुव देशपांडे, मी पुण्यात कर्वेनगर इथे राहतो. बाय द वे तुमचं नाव काय?”

“ अय्या मी पण कर्वेनगरलाच राहते. राधा जोशी मी” अशी बोलण्याची सुरुवात झाली आणि आमच्या तासभर गप्पा गोष्टी झाल्या. पुणे स्टेशनवर ध्रुवचे बाबा त्याला न्यायला कार घेऊन आले होते. मग त्यांची आणि माझी पण ओळख झाली आणि ते मला म्हणाले, “ चल बेटा, तुझे घर तर आमच्या घराच्या रस्त्यावरच आहे आम्ही तुला घरी सोडू, म्हणत त्यांनी माझी सुटकेस माझ्या हातातून घेतली सुद्धा. आपलं घर आल्यावर मी दोघांना घरी चहासाठी घेऊन आले. तो रविवारचा दिवस असल्यामुळे बाबा पण घरात होते, ध्रुवच्या बाबांना पाहिल्यावर आपल्या बाबांनी अनिल तू इथे कुठे? म्हणून मिठीच मारली. दोघे जण एकमेकांना ओळखत होते. दोघे जण मुंबईला एका शाळेत एका वर्गात शिकत असणारे क्लासमेट निघाले. बाबा त्यांना म्हणाले,

“ अरे अनिल आपण सहावीला असताना तुझ्या वडीलांची वर्ध्याला बदली झाली आणि तुम्ही तिकडे शिफ्ट झाला आणि आपला संपर्क तुटला. तू इकडे केव्हा आलास?” ध्रुवचे बाबा म्हणाले,

“ अभिजित आम्ही दोन वर्षापूर्वीच पुण्याला शिफ्ट झालो. त्याचं असं झालं, आम्ही  वर्ध्याला शिफ्ट झालो. आणि आमच्या अण्णांची तिथून आठ वर्षे झाली तरी पुन्हा काही कुठे लवकर बदली झाली नाही. मग आम्ही वर्ध्यालाच बंगला बांधला. मी पण तिथल्याच कॉलेज मध्ये इंजिनिअरिंग साठी प्रवेश घेतला. इंजिनिअर झाल्यानंतर नागपूरच्या कॉलेज मध्ये मी पुढे एम. ई. केलं पुढे पी. एच. डी. करून तिथल्या नागपूरच्याच कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो. तिथेच सेटल झालो. त्यानंतर मुलाचं शिक्षण सुद्धा तिथच झालं. ध्रुवच एम. फॉर्म पूर्ण झाल्यावर त्याला इथे पुण्यात जॉब मिळाला. मुलीचं तीन वर्षा पूर्वी वर्षी लग्न झालं, ती नवऱ्या बरोबर यु. एस.ला गेली. आई अण्णा सुद्धा देवाघरी गेले. मग वर्धा आणि नागपूर सोडलं आणि पुण्याला आलो.” बाबा म्हणाले,

“ मला ही एकुलती एक कन्या, बी. ई. कॉम्पुटर होऊन कंपनीत सहा महिन्या पूर्वी नोकरीला लागली.” अशा गप्पा झाल्या. त्यांच्या गप्पा चालू असताना मी फ्रेश होऊन त्यांच्यासाठी चहा घेऊन आले. तू ऑफिसच्या मैत्रिणींच्या बरोबर ट्रीपला गेली होतीस. आठवत?”

“ हो ग मी संध्याकाळी घरी आल्यावर तुम्ही दोघांनी मला यातलं काही सुद्धा सांगीतलं नाही.”

“तुझ्या ट्रीपचे किस्से ऐकण्याच्या नादात आम्हांला ते महत्त्वाचे वाटले नाही. आणि दुसरे दिवशी आपण तिघंही आपल्या ऑफिसच्या व्यापात गुरफटलो.”

“ राधे तू पण ना भारीच! आणि तुझा तो हिरो त्याच्या आईवडीलांना घेऊन पुढच्या रविवारी दारात उभा राहिला. दार मीच उघडलं आणि मी त्यांना आपादमस्तक न्याहाळत राहिले. कोण हा परिवार म्हणून! तेवढ्यात अभिजीत आला आणि त्याने सर्वांना हसत हसत घरात घेतलं. पाठोपाठ तू पण हसत पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आलीस. मग मला सगळ्या गोष्टीचा उलगडा होत गेला.”

“नंतर बघ ना सगळ्या घटना भराभर आगगाडीच्या डब्या प्रमाणे वेगाने पुढे सरकत गेल्या. ध्रुवच्या आईंनी माझ्याशी गप्पा मारत मला माझ्या नवऱ्या बद्दलच्या काय अपेक्षा आहेत ते विचारलं. मी आपली सहज बोलून गेले. त्या मला आपल्या स्वत:च्या सुनेच्या भूमिकेतून पहात आहेत हे आपल्या कुणाच्या लक्षातच नाही आलं. त्यांनी माझी जन्म रास, जन्म साल बोलताना अगदी सहजपणे काढून घेतलं. आणि तूपण बोलताना म्हणून गेलीस की, आता वर्षभरात आम्ही राधाच्या लग्नाचं पहावयास सुरुवात करणार आहोत. कुणी मुलगा पाहण्यात असला तर सांगा. म्हणजे ध्रुवचा मित्र ! तर त्या हसत हसत म्हणाल्या, “ मग ध्रुवच का नको? आम्हांला पण सून आणायची घाई झाली आहे. आता तो २९ वर्षाचा झाला आहे. तेवढ्यात बाबांनी मला बाहेर बोलावलं. आणि मला ध्रुव बरोबर आईस्क्रीम आणायला पाठवलं. बाहेर आम्हां दोघांच्या तासभर गप्पा झाल्या. ध्रुवने मला प्रपोज केलं. मला पण तो पहिल्या भेटीतच आवडला होता. खुप सरळ साधा मोकळा, माणसांना समजून घेणारा. आणि इकडे तुमच्या पण चौघांच्या गप्पा छान रंगल्या होत्या. तुम्ही पार साखरपुड्या बद्दल ठरवून मोकळे झाला होतात. आपल्या दोन कुटुंबाचे एकमेकांशी असे नकळत सूर जुळत गेले.”

“ तुझ्या बाबाने तर एकदम गौप्य स्फोटच केला, अनिलचा आणि माझा हा बेत आधीच फोनवर ठरला होता म्हणून सांगून टाकलं.”

बोलता बोलता आम्ही दोघींनी नाश्ता केला वडा पाव आणि कॉफी घेतली. राधा म्हणाली, “ आई अग प्राजक्ता मावशी मध्ये मला म्हणत होती, तुमच्या दोघींची पण अशीच काहीतरी स्टोरी आहे. दोघींची म्हणे ट्रेन मध्येच ओळख झाली, असं काहीतरी ती म्हणत होती. मला सांग ना कशी झाली तुमची मैत्री ते!”

“ अग राधे , ह्या सगळ्या ऋणानुबंधाच्या गाठी असतात बघ! पण आपल्याला माहित नसतं. सगळ्या गोष्टी कशा नियतीने पूर्व नियोजित केलेल्या असतात. तुझ आणि ध्रुवच बघ ना! ट्रेन मध्ये भेट काय होते आणि पुढे लग्नाची गाठ काय बांधली जाते. तसचं आमचं झालं बघ! अग मला जॉन्सन कंपनीचा इंटरव्ह्यूचा कॉल आला होता, स्टेनो टायपिस्टच्या पोस्ट साठी. म्हणून मी नाशिकहून मुंबईला चालले होते. तुझे आजोबा म्हणजे माझे वडील खुप कडक स्वभावाचे. म्हणाले, “ तू नोकरीसाठी आता घराबाहेर पडणार तेव्हा तुझ्या मध्ये तेवढं एकटीने प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याचे धाडस हवे. तू एकटी जा इंटरव्ह्यू साठी. तीस वर्षा पूर्वीचा काळ ग तो, ट्रेन मध्ये एकटीच जाऊन बसले. भीती तर वाटत होती पण दाखवत नव्हते. नेमकी शेजारी प्राजक्ता येऊन बसली आणि नंतर तिनेच संवाद सुरू केला. तिचं माहेर पण नाशिकच, ती माहेरी आली होती आईला भेटायला. मग मी तिला माझ्या इंटरव्ह्यू बद्दल सांगीतलं. तेव्हा तिने विचारलं, “कुठे उतरणार आहेस?” मी म्हणलं,

“ इथे आमचे कोणी नातेवाईक नाहीत. तेव्हा इंटरव्ह्यू झाल्यावर रात्रीच्या गाडीने परत नाशिकला जाईन.” ती स्वभावाने अशीच पहिल्या पासून मोकळेपणाने बोलणारी. मला म्हणाली, “हे बघ, मी राहते दादरला आणि माझी बँक आहे चर्चगेटला. मी डायरेक्ट आता ऑफिसला जाणार आहे. तुझा इंटरव्ह्यू जिथे आहे तिथेच योगायोगाने शेजारी माझी बँक आहे. इंटरव्ह्यू झाल्यावर मला येऊन भेट. काही मदत लागली तर विना संकोच सांग. मी नक्की मदत करेन.” तिच्या शब्दांनी मला धीर आला बघ! नंतर तिने आम्ही स्टेशनवर उतरल्या नंतर मला माझ्या ऑफिस जवळ सोडले आणि ती बँकेत गेली.  माझा इंटरव्ह्यू चांगला झाला. मग मी तिला तिच्या ऑफिस मध्ये जाऊन भेटून सर्व वृतांत कथन केला. तिने मला नंतर जेवायला तिच्या ऑफिस जवळच्या हॉटेलात नेले. जर नोकरी लागली तर रूम पाहून देण्याचे आश्वासन दिले. केवढा दिलासा वाटला!”

“ आणि अस्मादिकांना पुढे नोकरी लागली तर!” राधा हसत हसत म्हणाली. मी म्हणलं, “ अग हो ना, तिने बोलल्या प्रमाणे मला दिलेला शब्द पाळला. तिच्या घरी तिचे सासू सासरे पण रहात होते. तिला तेव्हा आठ वर्षाची मुलगी पण होती. जी माझी पुढे लाडकी भाची झाली, सायली! तिच्या घरचे सगळे लोक स्वभावाने छान. त्या वेळी हे सर्वजण फक्त दोन खोल्यात रहात होते. तरी पण मला नोकरी लागल्यावर मला जागा मिळे पर्यंत सुरुवातीचे पंधरा दिवस मी प्राजक्ता कडे राहिले. सर्वांनी मला खुप सांभाळून घेतले बघ. प्राजक्ता तर मला म्हणाली, “ तू आता मला आपल्या मोठ्या बहिणी प्रमाणे समजत जा. मलाही बहीण नाही.” आणि ती माझी मोठी ताई झाली. आणि आजतागायत आहे बघ! तिचे आणि माझे असे सूर जुळले. मग माझे लग्न सुद्धा तिनेच पुढाकार घेऊन जुळवले. अभिजीत तिचा मावसभाऊ आहे”

“ हो ना ग आई! म्हणजे ती माझी तशी आत्या!  पण तुझ्या आधीच्या नात्या प्रमाणेच ती तुझी कायम बहीणच राहिली. आणि माझी मावशी!”

“ हो ग लग्न झालं तरी कायम माझ्या मागे बहिणी सारखी ठाम उभी राहिली. तुझी आजी थोडी कुरकुरी होती. तेव्हा माझी बाजू घेताना ती त्यांची लेक व्हायची. आणि त्यांना समजावून सांगायची. त्यांना म्हणायची,

“ हे बघ मावशी, मला जशी लेक मानतेस आणि सांभाळून घेतेस तसचं सरोजला समजत जायचं! ती नवीन आहे, तिला घरच्या पद्धती, रीतीरिवाज  शांतपणे समजावून सांगायच्या. ती आधी कुणाची तरी लेक आहे मग तुझी सून आहे. तिने आमच्या लग्नाचा खर्च सुद्धा निम्मा तुझ्या आजीला करायला लावला.”

“आणि म्हणे प्राजक्ता मावशीने तुमच्या दोघांना लग्नाच गिफ्ट म्हणून हनिमून साठी गोव्याच्या हॉटेलच बुकिंग करून दिल होत ना! ही गोष्ट मला बाबांनी सांगितली बरका! तू नाही कधी सांगितलीस.”

“ गप्प बसं राधे , सगळंच काही सांगत बसायचे असते का? आणि ना राधे, मी जरी नाशिकची असले तरी आम्ही आमच्या लग्नाची खरेदी मात्र मुंबई मध्येच केली बरका! माझ्या बरोबर खरेदीला प्राजक्ताच यायची. आम्ही दोघी मिळून सारख्या लोकलने खरेदीला जायचो. प्राजक्ताची निवड सुद्धा चांगली आहे.”

“ बघ ना योगायोग कसा, आता माझी खरेदी सुद्धा आपण मुंबई मध्येच करणार आहोत. आणि प्राजक्ता मावशीच बरोबर येणार आहे.”

“ आणि ना राधे, आपल्या कुटुंबामध्ये जीवनाचा पहिला प्रवास बघ ट्रेन पासूनच सुरू होत गेला आहे. आमच्या लग्नाच्या नंतर आम्ही पहिली  आठ वर्ष मंबई मध्ये होतो. अभिजीतला पुणे खुप आवडत. त्याने मला पहिल्यांदाच सांगीतलं होत, “ मला जर पुण्याला नोकरीची संधी मिळाली तर आपण तिकडे शिफ्ट व्हायचं. मग तू तुझ्या नोकरीचा राजीनामा द्यायचा. आणि पुण्यात नोकरी शोधायची. मी पण हो म्हणलं. अभिजीतला तुझ्या जन्मानंतर पुण्यातल्या केमिकल कंपनी मध्ये जी. एम. च्या पोस्ट साठी मुलाखतीला बोलावणं आलं. तो मुलाखतीला पुण्याला त्या वेळी ट्रेननेच गेला. मुलाखतीला त्याला त्याच्या बॉसच्या केबिनमध्ये बोलावलं गेलं. त्याने केबिनमध्ये प्रवेश केला. आणि तो चक्रावूनच गेला. कारण त्याला मुलाखतकार म्हणाला, “ तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही.” तेव्हा अभिजीत नाराज झाला. त्याने कारण विचारलं, तेव्हा त्याचं वेळी तिथे दुसरे एक मुलाखतकार केबिन मध्ये येत येत म्हणाले,

“ अहो जोशी आपला इंटरव्ह्यू तर ट्रेन मध्येच झाला. जोशी आपण दोघे तर एकाच ट्रेन मध्ये शेजारी बसलो होतो. तेव्हा आपली ओळख झाली आणि माझ्या लक्षात आलं की जो इंटरव्ह्यू घ्यायला मी पुण्याला जात आहे. त्यातला एक उमेदवार तू आहेस. मी ओळख न देता तुला प्रश्न विचारत राहिलो. आणि तिथेच मी तुझा इंटरव्ह्यू घेत गेलो. आम्हांला जसा होतकरू उमेदवार हवा आहे तसा तू आहेस. आम्हांला दोन पोस्ट भरायच्या आहेत. त्या पैकी तुझे एक नाव नक्की झाले आहे.” अशा रीतीने सध्याच्या कंपनी मध्ये अभिजीतला नोकरी लागली बघ. मग आम्ही पुण्यात शिफ्ट झालो. असेच आपले सर्वांचे एकमेकांशी ट्रेन प्रवासातून सूर जुळले गेले बघ! अग बाई दादर आलं वाटतयं. गप्पा मध्ये प्रवास कसा संपला ते कळलंचं नाही.”

मी आणि राधा स्टेशनवर उतरलो. प्राजक्ता आमची वाटच बघत होती. आयुष्याच्या प्रवासाचे एक एक टप्पे संपत होते. नवीन सुरू होत होते. जीवनाच्या ह्या प्रवासात अजून किती  प्रवासी भेटणार आहेत आणि कुणाशी कसे सूर जुळणार आहेत माहित नाही.   

     **************  समाप्त **************

 

जयश्री देशकुलकर्णी

कोथरूड , पुणे -३८

मोबाईल – ९४२३५६९१९९                                                                           

                            

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू