पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अडगळ

    एखादी गोष्ट जुनी होते.तिची उपयोगिता संपते, तिच्या जागेवर नवीन करकरीत, पॉश वस्तू येते, तिला स्टोअररूममध्ये टाकले जाते तेव्हा ती अडगळ बनते.पुर्वीच्या काळी तांब्यापितळेची भांडी घरात असत. ती घराची शान समजली जायची. चिंच लावून ती भांडी घासूनपुसून चकाचक ठेवली जात असत. एवढी चकचकीत भांडी स्वयंपाकघरात पाहताना जणू लक्ष्मी पाणी भरतेय असे वाटायचे. त्या काळी स्वयंपाकघरातील वातावरण प्रसन्न असायचे. पाणी भरून ठेवायची, स्वयंपाकाची भांडीही तांब्यापितळेची असत. पुढे ॲल्यूमिनीयम, हिंडालियमची भांडी वापरात येऊ लागली तेव्हा घराची शान असणारी तांब्या पितळेची भांडी मोडीला गेली किंवा अडगळीच्या खोलीत जमा झाली. त्याच्याही पुढे जाऊन स्टेनलेस स्टील आणि नॉनस्टिकचा जमाना आला आणि तांब्या पितळेला क्षुल्लक समजले जाऊ लागले. ती भांडी घासणे म्हणजे फार जिकिरीचे वाटू लागले.

               कपडे ठेवायची कपाटेसुद्धा पूर्वी लोखंडी असायची. जमाना बदलला आणि आता लाकडाची चकाचक, रंगीबेरंगी सन्मायका लावलेली फर्निचरची कपाटे सर्व घरात आढळू लागली. लाकडाला गंज चढत नाही किंवा पुसण्याचा त्रासदेखील होत नाही आणि दिसायला सुंदर दिसतात. लोखंडी कपाटे अशाप्रकारे अडगळीच्या खोलीत किंवा मोडीत निघाली. कपड्यांच्या बाबतीत सांगायचे तर सुती नऊवारी साड्या, धोतर, सदरा, पायजमा, टोपी ही वेशभूषा देखील आता आऊटडेटेड झालेली दिसते. पाश्चात्त्य देशाचे वारे वाहू लागले आणि नऊवारी साड्या जाऊन क्वचित झुळझूळीत, अंगावर नेसायला हलक्याफुलक्या अशा सहावारी साड्या नेसणाऱ्या स्त्रियां सर्वत्र दिसू लागल्या. हल्ली तरी वन पीस, शॉर्टस्, जीन्स, टी-शर्ट अशाच कपड्यांची रेलचेल दिसून येते. नोकरी करणाऱ्या स्त्रियां साडी नेसायला वेळ लागतो या सबबीखाली कमीत कमी वस्त्रप्रावरणे अंगावर घालून ऑफिसात जाऊ लागल्या. मॉडर्न म्हणून घेऊ लागल्या. नऊवारी साड्या आणि धोतर वगैरे काळानुरूप जुन्या जमान्यातले म्हणून घेऊ लागले.

             हल्ली स्त्रियां पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षण घेऊ लागल्या. चरित्रासाठी घराबाहेर पडल्या आणि सर्व क्षेत्रात त्यांचे पदार्पण झाले. घरात पैशाची सुबत्ता आली.स्त्रीस्वातंत्र्य वाढले आणि पूर्वी असणारे पुरुषाचे वर्चस्व थोडेफार प्रमाणात कमी झाले. कमावणाऱ्या पत्नीच्या पैशापुढे तिचे वागणे पाठीशी टाकले जाऊ लागले. पूर्वी घरात बनणारा स्वयंपाक करण्यापेक्षा आता बदल होऊन हॉटेलमधून तसेच झोमॅटो, मॅकडोनाल्डमधून पार्सले मागवली जाऊ लागली. स्त्रियांना बराच फावला वेळ मिळू लागला. त्यामुळे शॉपिंग, सिनेमा, पिकनिक,किटीपार्टी अशा नवीन फॅशन्स प्रचलित होऊ लागल्या.

            मैत्रिणींच्यासंगे नवनवीन योजना आखल्या जाऊ लागल्या. जुन्या सर्व पद्धती, सणवार, परंपरा यांना फाटा देऊन नवीन पद्धती आकारास, उपयोगात येऊ लागल्या. नवीन पद्धतीमध्ये फक्त मजा, धमाल, गंमत, खेळ यांचाच सहभाग होऊ लागला. देवादिक, धार्मिक कार्ये, सुग्रास जेवण, पंचपक्वान्न सर्वकाही आउटडेटेड झाले. डाएटच्या नावाखाली तरूण पिढी तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळू लागली. सणासुदीला हॉटेलमधून सर्रास पार्सले मागवली जाऊ लागली. आपल्या हातांनी बनवलेले पदार्थ आपल्या कुटुंबाला, मुलांना खाऊ घालावे अशी भावना लुप्त पावली. मुलांनादेखील बाहेरच्या जंक फुडची चटक लागली आणि यातच नवनवीन हॉटेल्स, प्रॉडक्ट्स आणि फुड कंपन्यांचा उदय झाला.

दिवसभर नोकरी करून थकून आलेल्या स्त्रियां बाहेरचे पार्सल खाऊन फ्री राहू लागल्या. तो वेळ मग टीव्ही पाहणे, मोबाईल, लॅपटॉप, संगणक, फेसबुक, ट्विटर यातच व्यतित होऊ लागला. संवादच नाहीत त्यामुळे मुलांना घरातील आई-वडील किंवा कुटुंबाच्याविषयी आत्मियता वाटणे देखील बंद झाले. पूर्वी आजी समोर बसून रामायण, महाभारतातल्या कथा ऐकताना जशी मुले गुंतून पडत किंवा ओट्यावर बसून परवचा, रामरक्षा, स्तोत्र म्हणताना धार्मिक कार्ये मुलांकडून सहजच पार पाडली जात असत. आता नोकरीसाठी तरूण मुले शहरात राहू लागली आणि वृद्ध आईवडील गावाकडची घरे, शिवारे सांभाळू लागली. एकमेकांविषयी वाटणारी ओढ कमी होऊ लागली. आजीच्या संस्कारात, सहवासात मुले संस्कृतीचे पालन करत असत. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मुलांना मिळणारा आजी-आजोबांचा सहवास बंद झाला. मुले एकाकी झाली. घरात त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आई-बाबा नसायचे नोकरीकरता ते घराबाहेर असायचे. आजी-आजोबा जवळ रहात नाहीत त्यामुळे मुले बेफाम वागू लागली. त्यामुळे आता सकाळ, संध्याकाळ, दुपार फक्त मोबाईलच्या नादी लागून मुलांचा मैदानावर खेळण्याचा प्रकार बंद झालेला आहे. माणसांची हृदये जणू काही निर्जीव दगडाप्रमाणे झाली आहेत. आपल्या घरात काय घडते आहे हे पाहण्याऐवजी दुसऱ्यांच्या घरात काय घडतेय हे पाहण्याची उत्सुकता, जागरूकता निर्माण झाली. याही पुढे जाऊन वन बीएचके, टू बीएचके सारख्या घरात आजी आजोबांची गरज भासेनाशी झाली. उलट त्यांची अडचणच वाटू लागली. नवरा, बायको आणि एक किंवा दोन मुले एवढेच कुटुंब म्हणून मर्यादा आली. आई-वडिलांना मुलांशी बोलायला वेळ नाही आणि मुले घरात काय करत आहेत हे पहायला आईबाबांनादेखील उसंत नाही. असाच परिणाम म्हणून मुले दूरदर्शन आणि मोबाईलच्या अधिन झाली आहेत. आजी आजोबांचा पाठीवरून फिरणारा प्रेमळ, पाठिंब्याचा हात आता त्यांना मिळत नाही. कारण घरातल्या वस्तूंप्रमाणेच आजी आजोबादेखील आता अडगळीत जमा झाले आहेत. त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली गेली आणि मुलांच्यावर सुसंस्कार करणारे आजी आजोबा परस्वाधीन झाले. सहाजिकच कुणाचेही बंधन, नियंत्रण नसलेली मुले बेफिकीर, बेताल झाली. आई-वडिलांकडून वेळ मिळण्याऐवजी मुबलक पैसा मिळतो एवढेच फक्त मुलांना कळू लागले. काही मुले अबोल, मुकी किंवा बंड प्रवृत्तीची झाली. काही मुले व्यसनाधीन झाली तर काही मुले आत्मकेंद्री झाली. दिवसभर एकलकोंडे राहून मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा न रुंदावता त्या आकुंचितच होत गेल्या. आपले प्रॉब्लेम सांगायला आपला आनंद व्यक्त करायला आई-वडिलांना वेळ नसल्याची भावना मुलांच्या ठायी ठायी रुजली गेली.

                          जुन्या तांबे पितळेच्या भांड्यांप्रमाणे घरातल्या सजीव आजी-आजोबांनासुद्धा अडगळीत पडावे लागले. जुन्या जमान्याचे म्हणून त्यांचे सल्ले, विचार आऊटडेटेड होऊन मातीमोल होऊ लागले. अडगळीला किंमत नसते. तिला टाकून दिले जाते किंवा एखाद्या कोनाड्यात फेकून दिले जाते. बदललेल्या जमान्यात अडगळ घरात ठेवली जात नाही हेच खरे!

 

सौ. भारती सावंत

खारघर, नवी मुंबई

 

9653445835

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू