पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मातृत्व

शॉपिझेन ट्रेनकथा स्पर्धेसाठी कथा

 

               मातृत्व

 

                     अचानक कंपनीने उद्याच हैद्राबादच्या पार्टीला भेटण्याची ऑर्डर काढली आणि शिल्पाला आश्चर्याचा धक्काच बसला. आपण शहराबाहेर गेलो की अजय खूपच चिडचिड करतो कारण आर्यला सांभाळण्यासाठी त्याला ऑफिसमधून सुटी टाकावी लागते. गेल्या वर्षभरात असे पाचसहा वेळा झाले होते. गेल्या महिन्यात ती बेंगलोरला गेली तेव्हा अजयने निक्षून सांगितले होते, " शिल्पा आता मात्र हे खूप झाले हां! तू बॉसना बाळ लहान आहे असे सांगून टाक. मला देखील ऑफिस आहे. मी किती सुट्ट्या काढणार?"  शिल्पाला तरी बाहेर जायची कुठे हौस होती पण नोकरी आणि बॉसचे ऐकल्यावाचून गत्यंतरच नसे. शिल्पा नवरा आणि बॉस या दोघांच्या कात्रीत चांगलीच सापडली होती. गेल्या महिन्यात तिला बेंगलोरला पाठवले तेव्हा ती रडकुंडीला आली होती. तिने अजिजीने बॉसला विनवले होते, " सर यावेळी मला बाहेर पाठवू नका. माझ्या संसाराची दुर्दशा होऊन जाते. कृपया माझं बाळ मोठं होईपर्यंत मला इथेच ऑफिसला राहू द्या"  परंतु बॉसने कडक शब्दांत सांगितले, " शिल्पा नोकरी करायची असेल तर बाहेर जावेच लागेल न पेक्षा नोकरी सोडलेली बरी" बॉसने असे धमकावल्यानंतर शिल्पाच्या डोळ्यांपुढे घरासाठी घेतलेल्या कर्जाचे आकडे व्याजासकट वर्तुळाकार होऊन नाचू लागले. कर्ज फेडण्यासाठी तिला नोकरी करणे अपरिहार्य होते. पण अशा या नोकरीच्या पायात आपल्या घराची, बाळाची होत असलेली फरफटदेखील तिला बघवली जात नव्हती. मंदीच्या काळात दुसरी नोकरी लागणे तर महाकठीण होऊन बसले होते. त्यामुळे आहे ती नोकरी टिकवणे महत्त्वाचे होते. बॉसदेखील माणूसच होता परंतु त्याला वरून ऑर्डर येतील तसे आपल्या हाताखालच्या लोकांकडून काम करून घ्यावेच लागत होते. आता घरी जाऊन अजयला काय सांगायचे आणि त्याचे किती ऐकून घ्यावे लागणार या कल्पनेने शिल्पाचे घरी जाण्यासाठी पाय अडखळू लागले. स्टेशनला उतरल्यानंतर तिने रिक्षाला हात दाखवला. परंतु घरी पोहोचल्यानंतर आपल्या घरात काय रामायण घडणार आहे याचे चित्रणच तिच्या डोळ्यांपुढे उभे राहिले होते.

                तरी अजयला बऱ्यापैकी 'वर्क फ्रॉम होम' होते त्यामुळे आर्यला सांभाळण्यासाठी तो नेहमीच तत्पर असायचा. पण कधी कधी आर्य खवळला की मात्र अजयची भंबेरी उडत असे. अशावेळी त्याला वाटायचे शिल्पा घरी असती तर तिने त्याला दूध पाजून शांत केले असते. आपल्या बाळाला आईची फार गरज आहे. या जर तरला काही अर्थ नाही असे समजून उमजून अजय आणि शिल्पाच्या संसाराचा रथ कसाबसा हाकला जात होता. तशी शिल्पाची आई दोन महिने आणि अजयची आई चार महिने राहून गेल्या होत्या. परंतु त्यांनाही त्यांचे घरदार आहे. त्या किती दिवस इथे राहणार? शेवटी शिल्पा आणि अजयलाच त्यांचा संसार चालवायचा होता. नोकऱ्यांचे वेळापत्रक ॲडजेस्ट करून बाळाची काळजी घ्यायची होती. शिल्पा घरी पोहोचली तर  बाळाच्या रडण्याचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होता. शिल्पाने आपल्या हातातील डुप्लिकेट 

चावीने घराचा दरवाजा उघडला आणि धावतच बाळाकडे गेली. बाळाला दूध पाजून तिने शांत केले. बाळ झोपी गेला आणि शिल्पा स्वयंपाकाकडे वळली. आज अजयदेखील वैतागला होता कारण त्याची  एक मीटिंग होती पण बाळाच्या रडण्यामुळे ती ओम फस्  झाली होती. त्याच्या मनाची चिडचिड पाहून शिल्पाने थंडपणे त्याला काय आणि कसे सांगायचे असा मनाशी विचार केला. रात्रीची जेवणे आटोपली. तोवर बाळाला भूक लागली होती म्हणून शिल्पाने पुन्हा त्याला वरण-भात गुरगुटे भरवले आणि बाळाला झोपवले. नॅपकिनला हात पुसत शिल्पा बेडरूममध्ये आली. अजय झोपण्याचीच तयारी करत होता. तिने सर्व बळ एकवटून जरा खाकरले आणि अजयकडे तोंड करून बसली. शिल्पाला काहीतरी बोलायचे आहे हे अजयने ओळखले आणि तोंडावर हसू ठेवून तो म्हणाला, "काय राणी सरकार, आपली काही आज्ञा आहे का?" त्याचा मूड ठीक असलेला पाहून शिल्पा म्हणाली," अजय बघ ना! बॉसने परत मला उद्या हैद्राबादला जाण्याची ऑर्डर दिली आहे. मी त्यांना खूपदा नाही म्हणून पाहिले, परंतु ते ऐकायलाच तयार नाहीत. जायचे नसेल तर नोकरी सोडा असे त्यांनी निर्वाणीचे सांगितले आहे" शांत होत असलेला अजय पुन्हा चिडून उठला आणि म्हणाला, "काय हे शिल्पा! दरवेळी तुझे असे बाहेरगावी टूरवर जाण्याचे तुणतुणे ऐकून मला आता खूप कंटाळा आला आहे.  असे वाटत आहे की दोघांपैकी एकाने नोकरी सोडून घरी राहिलेले बरे" परंतु शिल्पा म्हणाली, "अरे पण माझ्या हातात आहे का ते?  बॉसला मी जाते असे स्वत:च बोलले असेल असे तुला वाटते का?  मग मी काय करायला हवे? आणि नोकरी सोडून कसे चालेल? घराचे कर्ज कसे फिटणार?" शिल्पाचे बोलणे ऐकून अजय डोक्याला हात लावून बसला पुढील दोन-तीन दिवस आता त्याला रजा काढावी लागणार होती आणि बाळाला सांभाळताना त्याला नाकी नऊ येत असल्याने तो अजूनच चिडचिडा बनत चालला होता. पण शिल्पावर चिडून काही फायदा नव्हता. शिल्पा बाहेरगावी जायला तयार नाही हे त्यालाही माहीत होते. शेवटी शिल्पाच त्याला म्हणाली, "अजय मी तुला एक मार्ग सुचवू का? तू वर्क फ्रॉम होम घे. आपण दोघेही बाळाला घेऊन हैदराबादला जाऊ. दिवसभर तू हॉटेलमध्ये बसून बाळ सांभाळत ऑफिसचे काम कर. किमान सकाळ संध्याकाळ तरी मी बाळाला सांभाळू शकते तिथे!" अजयला तिची कल्पना आवडली परंतु एवढ्या लांबचा प्रवास बाळाला झेपेल का? प्रवासात त्याला काही इन्फेक्शन व्हायला नको ही देखील भीती वाटत होती. त्यामुळे अजय म्हणाला, " नको शिल्पा, यावेळी तरी नको!  बाळ थोडा मोठा होऊ दे मग पुन्हा आपण त्याला घेऊन जाऊ शकतो. अजून बाळ खूप लहान आहे, त्याला उगीच इन्फेक्शन व्हायला नको. तू जा यावेळेस , मी रजा काढतो आणि बाळाला सांभाळतो" अजय काय म्हणाला ते शिल्पालादेखील पटले. त्यामुळे ती एकटी जायला तयार झाली. उद्याच निघायचे असल्यामुळे तिला बॅग पॅक करणे गरजेचे होते. बाळ झोपलेला पाहून तिने आपली बॅग आवरून घेतली आणि बेडवर आडवी होत अजयच्या मिठीत विसावली. अजय तिच्या केसांतून हात फिरवत शांतपणे झोपी गेला. 

             सकाळ होताच शिल्पाला जाग आली. दहा वाजताची ट्रेन असल्यामुळे तिला घरातून आठ वाजता तरी निघावे लागणार होते. तोपर्यंत घरातील अजयचा दोन वेळचा स्वयंपाक, बाळाच्या खाऊची सर्व तयारी करून ठेवायची असल्यामुळे तिचे हात यंत्रवत चालू लागले. पावणे आठ वाजता सर्व तयारी करून शिल्पाने बाळाची पप्पी घेतली. तिला बाळाला सोडून जाताना हृदयात कालवाकालव होत होती. परंतु नाईलाज असल्यामुळे तिला जावेच लागत होते. अजयला "मी निघते रे, बाळाला जप" असे सांगून ती घरातून बाहेर पडली. इमारतीखाली दिसलेल्या टॅक्सीत ती बसली आणि टॅक्सीवाल्याला "ठाणे रेल्वेस्टेशनला चल" असे म्हणून तिने आपले डोळे बंद केले. मिटलेल्या डोळ्यांपुढे तिला आपल्या बाळाची छबी दिसत होती. आपले बाळ रडू लागले की अजय भांबावून जातो हे तिला माहीत होते, परंतु तिचा नाईलाज होता. घरात कामाला बाई ठेवून देखील आपल्या ऑफिसच्या वेळेनुसार तिचे येणे जाणे ठरत नसल्यामुळे त्यांनी  कामवाली ठेवण्याचा विचारही कधी केला नव्हता. दोघे मिळून जमेल तसे बाळाला सांभाळत होते. शिवाय कामवाल्यांचा काय भरोसा! आजकाल पेपरला, दूरदर्शनला अनेक बातम्या वाचायला, ऐकायला मिळतात. कामवाल्यांना बाळाचा त्रास झाला तर त्या बाळाला आपटून मारतात किंवा अफू खायला घालून झोपवतात. आपल्या बाळाला असे काही होऊ द्यायचे नाही त्यामुळे त्यांनी कामवाली ठेवण्याचा कधी विचारच केला नव्हता. "मॅडम उतरा, तुमचे स्टेशन आले आहे" असे म्हणणाऱ्या टॅक्सीवाल्याच्या आवाजाने तिने डोळे उघडले. विचारांच्या तंद्रीत कधी रेल्वेस्टेशन आले ते तिला कळालेदेखील नाही. टॅक्सीवाल्याला पैसे देऊन आपली बॅग आणि पर्स सांभाळत ती खाली उतरली आणि प्लॅटफॉर्मच्या दिशेने जाऊ लागली. गाडी यायला थोडा अवकाश होता हे तिने इंडिकेटरवरून आपली बोगी कुठे येईल याचा अंदाज घेतला आणि ती हाशऽ हुश्य ऽकरत प्लॅटफॉर्मवरील फॅनखालच्या बाकड्यावर जाऊन बसली. मनावर आलेला ताण आणि येतानाची त्रेधातिरपीट आठवून तिला स्वतःचीच कीव आली. आपण संसारासाठी, घरासाठी, बाळासाठी इतके करतो त्यातून चांगले काहीतरी साध्य व्हायला हवे. आपला संसार सुखाचा व्हायला हवा. आपले बाळ चांगले वाढावे,मोठे होऊन त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत हीच तिची त्यातून इच्छा होती. विचारांच्या गुंत्यात ती डुंबून गेली होती, इतक्यात तिच्या कानावर रेल्वेच्या माइकमधली अनाउन्समेंट पडली. पुढील पाचच मिनिटांत तिची ट्रेन प्लॅटफॉर्मला लागणार होती. 

                      ट्रेनमध्ये चढण्यासाठी ती उभी राहिली. फर्स्ट क्लासचे स्लीपिंग कोचचे बुकिंग असल्यामुळे किमान तिचा प्रवास सुखकर होणार होता. इतक्यात झुक झुक करत ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली. कुली आणि विक्रेत्यांची पळापळ सुरू झाली. प्रत्येक जणाला आपला धंदा करायचा असल्यामुळे पळापळ करत

 होते. शिल्पाने बोगीत प्रवेश केला आणि आपली सीट शोधून काढली. तिने आपली सुटकेस सीटच्या खाली ढकलली आणि घाम पुसत इतरांची पळापळ बघत निवांत बसून राहिली. गाडी सुरू झाली की अजयला फोन करून कळवू असा विचार करत ती बसून होती. इतक्यात लहान बाळाच्या रडण्याचा आवाज तिच्या कानावर पडला आणि तिला आपल्या बाळाची तीव्रतेने आठवण झाली. एका तान्हूल्या बाळाला घेऊन एक तरुण स्त्री आणि तिच्या मागोमाग सामान घेऊन तिचा नवरा रेल्वेत चढले आणि तिच्या समोरच्या सीटवर स्थानापन्न झाले. त्या बाळाला पाहून शिल्पाला आर्यची खूपच आठवण झाली आणि तिने अजयला फोन लावला. अजयने फोन उचलून "हॅलो हॅलो" असे करताच तिला आर्यच्या रडण्याचा आवाज ऐकायला आला आणि तिचे मातृहृदय कळवळले. तिकडून अजय बोलत होता "अगं शिल्पा तुला ट्रेन मिळाली का? तू बसलीस का व्यवस्थित? तुझा फोन आला नाही त्यामुळे खूप काळजी वाटत होती, परंतु मी आर्यला भरवत असल्यामुळे तुला फोन करू शकलो नाही". शिल्पाने त्याला "आपण व्यवस्थित सीटवर बसलो असल्याचे सांगून काही काळजी करू नकोस आर्यची काळजी घे" असे सांगून फोन खाली ठेवला. आता तिने पर्समधून वाचायला एक पुस्तक बाहेर काढले. रेल्वे प्रवासात ती कायम एक पुस्तक जवळ ठेवत असे कारण मनाला शांती देणारे पुस्तक नेहमी तिची सोबत करत असे. बालपणापासून तिला वाचनाचा छंद होता त्यामुळे कॉलेज जीवनात तरी तिने अनेक ठिकाणी कथा, कादंबऱ्या वाचून पूर्ण केलेल्या असायच्या. बसल्या बैठकीला ती एक कादंबरी पूर्ण करत असे. लग्नानंतर मात्र वाचण्यासाठी तितका वेळ मिळत जरी नसला तरी ती फावल्या वेळेत वाचन करत असे. डोळ्याच्या एका कोपऱ्यातून ती समोरच्या जोडप्याकडे आणि बाळाकडे नजर ठेवून होती.तिचे अर्धे लक्ष त्या जोडप्याकडे आणि अर्धे लक्ष  वाचनाकडे होते. ट्रेनने हलल्याचा सिग्नल दिला. जोडप्यातील तरूणाने आपले सर्व सामान सीटखाली ढकलले आणि हात झटकत बसून राहिला. बाळ जागा होता आणि टुकूटुकू इकडे तिकडे पाहत होता. त्यामुळे ते जोडपे जरासे सैलावले.    शिल्पाला त्या बाळाला आपल्याजवळ घ्यावेसे वाटत होते परंतु अनोळखी माणसे! उगाच काहीतरी गैरसमज व्हायला नको म्हणून ती आपले वाचन करत राहिली. इतक्यात बाळाने जोरात रडायला सुरूवात केली. ट्रेनमधल्या कोंदट हवेत बाळाला गरम होत असेल म्हणून बाळाचा बाबा आपल्या रुमालाने त्याला वारा घालू लागला आणि आई तोंडाची फुंकर त्याच्या अंगावर मारू लागली. बाळाला भूक लागली असेल म्हणून ती त्याला स्तनपान करण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु बाळाला भूक लागली नव्हती. ते दूध न पिता उगाचच किंचाळत होते. दोघे आपापल्या परीने बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते पण बाळ कोणाचेच ऐकायला तयार नव्हते. ना ते दूध पीत होते नाही शांत होत होते.

                आता मात्र बाळाची आई खूप अस्वस्थ झाली होती.  बाळाला शांत करण्यासाठी काय करावे हे तिला सुचतच नव्हते. पहिलटकरीण आणि वयाने लहान असणारी ती बाळाची आई बाळाच्या रडण्यामुळे हबकून गेली होती .ती वारंवार बाळाच्या बाबाला पाण्याची बॉटल दे, दुधाची बॉटल दे असे सांगून एकेक करत बाळाच्या तोंडाला बॉटल लावण्याचा प्रयत्न करत होती. परंतु बाळ कोणाचेच आणि काहीच ऐकायला तयार नव्हते. बाळ किंचाळायचे कमी होत नव्हते. आता शिल्पाचे देखील वाचनावरील लक्ष उडाले होते. ट्रेनमधील सर्वजण त्या बाळाच्या आई-बाबांकडे पहात होती परंतु जिथे बाळाच्या आईला ते बाळ ऐकत नव्हते तर आपण काय करणार? म्हणून सर्वजण फक्त पाहण्याचे काम करत होते. शिल्पाला मात्र आता राहवले नाही. तिने आपले पुस्तक मिटून पर्समध्ये टाकून दिले.  ती बाळाच्या आईला म्हणाली "बाळाचे दुपटे बाजूला करा. कदाचित बाळाने शु केली असेल आणि थंडी वाजून बाळ किंचाळत असेल". बाळाच्या आईने दुपटे दूर केले पण बाळाने शू शी असे काहीच केले नव्हते. मग बाळाला रडायला काय झाले असावे? शिल्पाला देखील आता प्रश्न पडला होता. ती मनाशी विचार करत होती बाळ का रडत असेल! बाळ दूधही प्यायला तयार नव्हते आणि शि शू देखील केली नव्हती मग बाळाच्या रडण्याचे काय कारण असावे?

             शिल्पाचे बाळ छोटे होते तसेच हे बाळही छोटे होते पण शिल्पाचे लग्न लेट झाल्याने बाळही उशीरा झालेले. ही समोरची मुलगी मात्र अवघी विशीतील होती. एवढ्या लहान वयात हिचे लग्न झालेय? बाळही लवकर झालेले दिसत होते. तिचा नवराही पोरसवदा होता. असेल फारतर २३/२४ वर्षांचा. बाळ जोरजोरात रडत असल्याने ट्रेनमधील सर्वचजण अस्वस्थ झाले होते.  आता शिल्पाला वाटू लागले काहीतरी उपाय करायला हवा. थंडीचा ऋतु असल्याने बाळाला गारठ्याने आकडी तरी आली नसेल! शिल्पाकडे विक्स वेपोरब होते. तिने ते बोटावर घेऊन बाळाच्या छातीला , पाठीला आणि कपाळावर हळूवारपणे चोळले आणि काय आश्चर्य! बाळ हळुहळू शांत होऊ लागले पण बराच वेळ रडत असल्याने मध्ये मध्ये हुंदके देत होते. बाळाच्या आईने त्याला छातीशी लावताच चुरुचुरू करत दुग्धपान करू लागले. आता ते दुध पितापिताच डोळे मिटू लागले. बाळाचा रडण्याचा आवाज बंद होताच ट्रेनमधल्या सगळ्याच प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. घाबरून गेलेले बाळाचे आईबाबाही बाळाच्या शांत होण्यामुळे थोडे स्वस्थ झाले. बाळ दूध पिऊन झोपताच तिने सीटवरील मऊ बिछान्यावर हळूवारपणे अलगदपणे झोपवले आणि शिल्पाचे अक्षरश: पाय धरले. तिच्या अश्रुंचा अभिषेक शिल्पाच्या पावलांवर होऊ लागला. अचानक तिच्या या कृत्याने शिल्पा भांबावली. ती बाळाच्या आईला म्हणाली," अगं तुझं नाव काय आहे? हे तू काय करतेस?" तशी ती मुलगी म्हणाली, " ताई आज तुम्ही आम्हाला मोठ्या अडचणीतून बाहेर काढलेत. बाळ का रडतेय ते मला काहीच कळत नव्हते. मी घाबरून गेले होते. माझे नाव अलका आणि हे माझे यजमान गौरव. आम्ही गौरवची आई सिरीयस असल्याचे कळाले म्हणून लहान बाळाला घेऊन त्यांना पहायला चाललो आहोत". गौरवने कृतज्ञतेने शिल्पापुढे हात जोडले. त्यालाही बाळाच्या रडण्याचे कारण न कळाल्याने असहाय झाले होते. छोट्या बाळाला घेऊन पहिल्यांदाच प्रवासासाठी बाहेर पडल्याने परिस्थिती कशी हाताळायची हेच त्यांना समजत नव्हते. ट्रेनमधले सगळेच अनोळखी! अशावेळी शिल्पाने मदतीचा हात दाखवून त्यांच्या बाळाला प्रवासात रडताना शांत केले. तिच्या अनुभवी स्वभावामुळे बाळ शांत झालेच पण अस्वस्थ झालेल्या बाळाच्या आईबाबांनाही स्वास्थ्य मिळवून दिले. 

             अलका शिल्पाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देत हात जोडत होती. तशी शिल्पाला घरात असणाऱ्या बाळाची काळजी वाटून वाईट वाटत होते. या सर्व घटनेमध्ये रात्रीचे दोन वाजून गेले होते. पहाटे पाच वाजता ट्रेन हैद्राबादला पोहोचणार होती. ट्रेनमधील बाळाच्या रडण्यामुळे रात्री शिल्पाने अजयला फोन करून बाळाविषयी काहीच विचारले नव्हते. शेवटी आपले बाळ अजयच्या कुशीत शांत झोपले असेल आपण उगाचच काळजी करतोय अशी मनाची

समजूत घालून शिल्पा रेल्वेच्या मऊ स्लीपर कोचवर आडवी झाली. मनावर आलेला ताण आणि या बाळाने केलेला गोंगाट यामुळे तिच्या डोळ्यांवरची झोप तशी उडालीच होती. ट्रेनमधील इतर प्रवासी शांतपणे झोपले होते. कोणी मस्त घोरत होते. बाळाचे आईबाबाही झोपण्याची तयारी करू लागले तशी शिल्पा अलकाला बोलली, " अलका बाळ झोपलेय तोवर तुम्हीही आराम करा" अलकाने " हो दिदी" म्हणत आपले डोळे मिटले. अलकाचे बाळ शांत झोपले होते. झोपेत मध्येच ते हसत होते तर कधी दचकत होते पण  आता ते गाढ झोपेत आहे हे अलकाने पाहिले आणि तीही शांतपणे झोपली. शिल्पा मात्र आपल्या बाळाच्या  आठवणीत निद्रेची प्रतिक्षा करू लागली. बऱ्याच वेळाने तिला झोप लागली ते पहाटे एका स्टेशनवर उतरणाऱ्या त्यांच्या बोगीतील प्रवाशांच्या आवाजानेच ती जागी झाली. तिला उठून बसणेच अपरिहार्य होते कारण पुढच्या स्टेशनवरच तिला उतरायचे होते. बाळाच्या आईबाबांना पुढच्या प्रवासाला जायचे होते. मनातल्या मनात बाळ आता रडू नये अशी ईश्वराला प्रार्थना करत ती ट्रेनच्या दरवाजाकडे सरकली. आता बाळ किंवा बाळाचे आईवडील तिला आयुष्यात कधीच भेटणार नव्हते पण तिच्या सतकर्मामुळे ते आईबाबा शिल्पाला कधीच विसरणार नव्हते.शिल्पा मनाशीच म्हणू लागली आपण दरवेळी ट्रेनने प्रवास करतो पण सहप्रवाशांसोबत कधीच बोलत नव्हतो.आता इवल्याशा बाळाने आपली चांगलीच परीक्ष घेतली. त्यामुळे प्रवासातील सुखद, दु: खद क्षण अनुभवायला मिळाले शिवाय बाळाला शांत करण्याचा एक सोपा उपायही मिळाला. स्टेशन आल्याने बाळाला आणि त्याच्या आईबाबांचा मनातच निरोप घेत ती ट्रेनमधून खाली उतरली. घड्याळात पहाताच पहाटेचे पाच वाजल्याचे दिसले. तिची झोप पूर्ण झाली नव्हती तरी एक हातून एक सत्कार्य झाल्याची तिला जाणीव झाली. विधात्याचे मनोमन धन्यवाद मानून ती पटपट हॉटेलकडे निघाली.

 

सौ. भारती दिलीप सावंत

खारघर, नवी मुंबई

 

9653445835

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू