पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

काळ आला होता

शॉपिझेन ट्रेन कथास्पर्धेसाठी कथा

 

            काळ आला होता.......           

 

          ट्रेन सुटायला पाचच मिनिटे बाकी असताना शांभवी घाईत आपली बॅग सांभाळीत ट्रेनमध्ये चढली आणि ट्रेनची सुटण्याची घंटी वाजली. जणुकाही शांभवी आत चढण्यासाठीच ती थांबली असावी. शांभवीने सुटकेचा निःश्वास टाकला आणि आपली सीट शोधण्यासाठी बॅग ढकलत ती आत वळली. बहूतेक लोकं झोपायच्या तयारीतच होती. मुंबईतील कल्याण स्टेशनवर ट्रेन फक्त पाचच मिनिटे थांबते.हे शांभवीला माहित होते पण घर,  संसार सोडताना सर्वसामान्य स्त्रीची किती पळापळ होते! तरी आठ दिवसांपूर्वीच तिने आपली बॅग भरून ठेवली होती. पुण्याच्या मैत्रिणीच्या आग्रहामूळे ऑफिसमध्ये चारपाच दिवसांची रजा टाकून ग्रुप ताडोबाला निघाला होता. वैशाली तिची खास मैत्रिण ! बाकीच्या सगळ्या दुपारच्या ट्रेनने पुढे गेल्या होत्या.वैशाली ऑफिसच्या कामासाठी औरंगाबादला गेली होती.त्यामुळे ती औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर चढणार होती. ती भेटेपर्यंत शांभवी ट्रेनच्या प्रवासात एकटीच होती. शांभवीला वाटले आपण वैशाली भेटेपर्यंत छान झोप काढू म्हणजे फ्रेश राहू,नाहीतर चेहऱ्यावर मरगळ राहील. तिचे फर्स्ट क्लास ए. सी. चे तिकीट होते. तिच्या कंपार्टमेंटमधील प्रवासी अजून चढले नव्हते म्हणून शांभवी कुपेमध्ये एकटीच होती. रेल्वेने दिलेली ब्लांकेट, बेडशीट अंथरून शांभवी मऊशार सीटवर आडवी होणार इतक्यात 

कुपेच्या बाहेर माणसांचा कोलाहल ऐकायला आला. तिला वाटले स्टेशन वगैरे आले असेल. थोडावेळ दंगा चालेल. प्रवासी जागेवर बसले की होईल शांतता पुन्हा! दहा मिनिटे झाली तरी बाहेरचा कोलाहल कानावर येतच होता. शांभवी मनाशीच म्हणाली, " लोकसंख्या फारच वाढलीय. या लोकांना समजायला हवे रात्रीची वेळ आहे इतरांना त्रास कशाला द्यायचा?" पण दंगा ऐकून तिला रहावले नाही. काय प्रकार आहे हे तरी पहावे आणि लोकांना शांत रहायला सांगावे या उद्देशाने तिने आपल्या कुपेच्या दरवाजाची कडी उघडली नि बाहेर वाकून पाहिले आणि काय आश्चर्य! हातात तळपता चाकू घेतलेली एक व्यक्ती

अचानक शांभवीच्या समोर आली. त्याच्या मागे अनेकजण " मॅडम आत जा आणि दरवाजा बंद करा"  असे ओरडताना शांभवीने ऐकले. एकूण काय प्रकार आहे हे कळेपर्यंत त्या व्यक्तीने  हातातील चाकू शांभवीच्या गळ्यावर ठेवला आणि लोकांकडे बघत दरडावू लागली, " मला पकडण्याचा प्रयत्न केला तर मी हा चाकू या बाईच्या गळ्यावरून फिरवीन, गपगुमान मागे हटा आणि स्टेशन आले की मला उतरून जावू द्या" 

आता मात्र कुपेचा दरवाजा उघडण्याची चूक केल्याचा शांभवीला पश्चात्ताप होऊ लागला. ती घाबरून गेल्याने थरथरत होती. ट्रेनमधील लोकांची गर्दी वाढत होती. इतक्यात कोणीतरी फोन केल्यामुळे रेल्वेपोलिस तिथे आले. परिस्थितीचा अंदाज येताच इन्स्पेक्टर बर्वे त्या चोराला उद्देशून बोलले, " हे बघ आम्ही तुला काही करणार नाही, तुला पकडणारही नाही पण तू त्या बाईंना काही इजा करू नकोस, गपगुमान त्यांना सोड आणि स्टेशन आले की तू उतरून जा" पण तो बुरखाधारी चोर बिलंदर होता. आपण या बाईला सोडले तर पोलिस आणि पब्लिक आपणाला सोडणार नाहीत. मारून हाडे खिळखिळी करतील हे तो जाणुन होता. त्यामुळे त्याने हातातील चाकू शांभवीच्या गळ्यावर ठेवला होता. तो हळुहळू दरवाजाकडे सरकत होता. शांभवी धाय मोकलून रडत होती. त्या बुरखेधारीला हात जोडून विनवत होती पण तिच्या आर्जवाचा किंवा पोलिसांच्या धमकीचा त्या गुन्हेगारावर काहीच परिणाम होत नव्हता. त्याने एका हाताने शांभवीला घट्ट धरले होते आणि दुसऱ्या हातातील तळपता चाकू तिच्या गळ्याजवळ होता. तो सहा फुट उंच आणि शरिराने बलदंड होता. त्याने घट्ट पकडल्याने शांभवीचा दंड खूप दुखत होता पण जीवावर बेतले असल्याने शांभवी काहीच हालचाल करू शकत नव्हती. तो सराईत चोर मोक्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसदेखील हतबल झाले होते. ट्रेनमध्ये मधली जागा खूपच अरूंद असल्याने दुसऱ्या बाजुने पण येता येत नव्हते. आपण काही हालचाल करायला गेलो तर ही बाई हकनाक मरेल हे ते जाणुन होते. सर्वजण कधी स्टेशन येते आणि तो गुंड गाडीतून उतरून जातो या प्रतिक्षेत होते. गाडीतील सर्व प्रवाशांना ताण आला होता. जो तो जीव मुठीत घेऊन आपल्या जागेवर बसला होता. न जाणो तो गुंड आपल्या गळ्यावरपण चाकू ठेवील. अशी प्रत्यैकाला भीती होती. ट्रेनमधील एकेक क्षण युगाप्रमाणे भासत होता. पोलिस एकमेकाला इशारा करत होते.  स्टेशन आले की तेदेखील गुंडासोबत स्टेशनवर उतरणार होते आणि त्याला पकडून जेलमध्ये पाठवणार होते. आता ते असहाय्य असल्याने गुंड बोलेल त्याच्यापुढे झुकत होते. गाडीचा हॉर्न वाजल्याचा आता आवाज ऐकू येए लागला. स्टेशन जवळ येऊ लागल्याचा तो सिग्नल होता. तो गुंड आता दरवाजात उभा राहिला. ट्रेन थांबली की या बाईला  आतील बाजूस उभ्या असणाऱ्या पोलिसांच्या अंगावर ढकलायचे आणि पळत सुटायचे असे त्याने ठरवले होते. स्टेशन जवळ येऊ लागताच रेल्वेचा वेग मंदावला तसे गुंडाने शांभवीला पकडलेला हात अजून ताकद लावून घट्ट केला आणि तिला जीव खाऊन आतल्या बाजुस ढकलले आणि ट्रेनमधून धाडकन् उडी मारून पळाला पण पोलिस तयारीतच होते. पोलिसांनी कंट्रोलरूमला आधीच फोन करून स्टेशनवर कुमक तयार ठेवायला सांगितले होते.  त्यामुळे स्टेशनवर पोलिस तयारीतच होते. तसेच ट्रेनमधील पोलिसांनी दुसऱ्या दरवाजातून  खाली उडी मारली आणि त्या गुंडाची गठडी वळली. भरपूर मार खाल्ल्यानंतर त्या गुंडाला पकडून घेऊन ते पोलिस स्टेशनला गेले आणि शांभवीने ट्रेनमध्ये सुटकेचा निःश्वास टाकला. त्या गुंडाने स्वसंरक्षणार्थ शांभवीचा ओलिस म्हणून वापर केला होता. जवळजवळ अर्धातास तिचा जीव टांगणीला लागला होता. या धक्क्यातून आता ती थोडीशी सावरली आणि आपल्या कुपेमध्ये जावून तिने आतून दरवाजाला खिट्टी लावून टाकली. तिच्या घशाला कोरड पडली होती. जवळच्या पाण्याच्या बाटलीतील पाणी तिने घटाघट पिऊन टाकले. गुंडाच्या या कोलाहलात तिच्या कुपेमध्ये कोणीच फिरकले नव्हते. आता औरंगाबाद स्टेशन येणार होते. तिची मैत्रिण वैशाली ट्रेनमध्ये चढणार होती. तिला आरामाची सक्त गरज होती.तिने मनाशी विचार केला वैशाली आली की आपल्यावर गुदरलेला प्रसंग तिला सांगण्यात वेळ जाणार.  तोपर्यंत आराम करून घ्यावा म्हणून तिने ब्लांकेट अंगावर ओढून घेतले आणि डोळे मिटून पडून राहिली. तिची झोप जणू गायब झाली होती. तिच्या डोळ्यांपुढे तो प्रसंग जसाचा तसा तरळत होता. आज आपला काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ती मनाशीच विचार करू लागली. आज त्या गुंडाने आपले काही बरेवाईट केले असते तर घरच्या लोकांना केवढा मोठा धक्का बसला असता. आज ताडोबाऐवजी आपले रामनाम सत्य झाले असते. आता कधीही एकटीने रात्रीचा प्रवास करायचा नाही. विचारांच्या अधीन होऊन कधी तिचा डोळा लागला ते तिलाही कळाले नाही. फेरीवाल्यांच्या आवाजाने तिला जाग आली. आता वैशाली ट्रेनमध्ये चढेल म्हणून शांभवी उठून बसली. ट्रेन चालू होताच तिच्या कुपेच्या दरवाजावर टकटक ऐकू आली. हरखून जावून शांभवीने कुपेचा दरवाजा उघडला. आपल्या प्रिय मैत्रिणीला समोर पाहताच तिने वैशालीला कडकडून मिठी मारली आणि इतका वेळ आवरलेला अश्रुंचा आवेग वैशालीच्या खांद्यावर बरसू लागला. शांभवीला काय झाले हे न कळण्यामुळे वैशाली बावरली आणि तिने विचारले, "अगं शांभवी, काय झाले तुला? का रडतेस तू? तुला काय त्रास झाला का? कोणी काही बोलले का?" परंतु शांभवी पुन्हा पुन्हा हुंदके देऊन रडत होती. ती काही सांगण्याच्या मन: स्थितीत नव्हती. वैशालीने तिला थोडा वेळ रडू दिले आणि पुन्हा विचारले, " शांभवी, काय झाले तुला? तू एकटी होतीस म्हणून घाबरलीस का?" तसे रात्रीच्या प्रसंगाची आठवण होऊन शांभवी नखशिखांत थरथरली आणि तिने तिच्यावर गुदरलेला प्रसंग जसाचा तसा वैशालीला कथन केला. ते ऐकताना वैशालीच्या अंगावर शहारा आला. आपल्या मैत्रिणीची खूप मोठ्या संकटातून सुटका केल्याबद्दल तिने विधात्याला मनोमन वंदन केले आणि ती शांभवीच्या पाठीवर हळूवारपणे हात फिरवत राहिली. वैशालीने शांभवीला सोबत आणलेला खाऊ खायला देऊन शांतपणे झोपायला सांगितले आणि स्वत: एक पुस्तक उघडून वाचत राहिली. उतरायचे स्टेशन येईपर्यंत शांभवीला आराम मिळावा ही तिची अपेक्षा होती. शेवटी मैत्रिणच होती ती तिची! 

 

सौ. भारती दिलीप सावंत

खारघर, नवी मुंबई

 

9653445835

       

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू