पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निवडणुकीचा थाट, मोफतचा घाट!

  सकाळचे सहा वाजत होते. दादासाहेबांनी सकाळचा व्यायाम संपविला आणि ते स्नान करण्यासाठी स्वच्छतागृहाकडे निघाले. पन्नास वर्षे वय असलेले दादासाहेब मुलाकडे राहायला शहरातील घरी आले होते. गावकडचा प्रशस्त वाडा, मोकळे, हवेशीर वातावरण सोडून ते शहरातील फ्लॅट संस्कृतीत आले होते. चार वर्षांपूर्वी त्यांची पत्नी त्यांना सोडून देवाघरी गेली आणि दादांनी एकटे राहू नये, आमच्याकडे राहायला यावे असा हट्ट त्यांचा मुलगा शिवाजी आणि त्याच्या पत्नीने धरला त्यामुळे शेतीवाडीची व्यवस्था लावून, इतर कामे करून आणि अगदी मतदार यादीतील नाव शहरातील यादीमध्ये समाविष्ट करून दादासाहेब शहरात स्थलांतरित झाले होते. शहरातील वातावरणात जुळवून घ्यायला त्यांना वेळ लागला नाही कारण मुळातच दादासाहेबांचा स्वभाव पटकन जुळवून घेणारा होता. मनातल्या मनात असंख्य वेदना होत असल्या तरी ते भाव चेहऱ्यावर येऊ न देता सर्वांमध्ये मिसळून राहण्याचा त्यांचा स्वभाव वाखाणण्याजोगा होता.

   स्नानगृहातून दादा बाहेर आले. तोपर्यंत शिवाजी आणि त्याची पत्नी सीमा ऊठले होते. सीमाने तिघांचाही चहा केला. तोपर्यंत तयार झालेले दादा त्यांच्या शेजारी येऊन बसले. चहाचा पहिला घोट घेताच दररोजच्या सवयीप्रमाणे दादा म्हणाले,

"वा! सूनबाई, व्वा! फक्कड झालाय बरे, चहा."

दादांचा जणू तो ठरलेला अभिप्राय असल्यामुळे शिवाजी आणि सीमाला त्याचे काहीच वाटले नाही. कारण ती सवयच झाली होती. शिवाजीचे लग्न झाल्यावर ते दोघे गावाकडे सुरुवातीचे काही दिवस राहायला आले होते. लग्नाला दोन-तीन दिवसच झाले होते. सीमाने त्यादिवशी सकाळी चहा केला. चहाचा पहिला घोट घेतला आणि सीमाकडे प्रसन्न चेहऱ्याने बघत दादा म्हणाले,

"शिवा, बघ किती मस्त चहा केलाय. सूनबाई, चहा म्हणजे आमचा जीव की प्राण! तू एवढा सुरेख चहा करतेस म्हटल्यावर आमचा जीव भांड्यात पडला हो..." असे म्हणत पत्नीकडे बघून ते पुढे म्हणाले, "कारभारीनबाई, बघा. सूनबाईच्या हातचा चहा घेऊन तर बघा..."

"खरेच खूप चवदार चहा केलास गं. मी मात्र निवांत झाले."

दोन-तीन दिवसांनंतरची गोष्ट! सकाळी सकाळी सीमाने केलेल्या चहाचा पहिला घोट घेताच दादासाहेबांनी चहाची स्तुती केली. तसे शिवाजीने विचारले,

"बाबा, तुम्ही आत्ता चहा घेतला का?"

"तर मग? चहा घेऊनच बोलतोय. नुसता रंग पाहून सांगत नाही."

"बाबा अहो, चहामध्ये साखरच नाही हो."

"मग काय झाले? नसली एखाद्या दिवशी म्हणजे काय आभाळ कोसळले? अरे, सूनबाई असा काही चहा बनवते ना की, जीभेवरची चव कायम असते. त्यामुळे आज चहात साखर नाही हे समजलेच नाही..."

    "बाबा..." शिवाजीने आवाज दिला आणि दादा वास्तवात परतले. शिवाजी म्हणाला,

"आज मतदान आहे."

"होय! माहिती आहे मला. चला. सकाळी सकाळी मस्त चहा मिळाला. आता मतदानाला जायला हवे. अरे, तुम्ही मतदान करणार आहात ना?"

"बघूया. जमले तर दुपारी येऊ."

"पण का? आज सुट्टी नाही? काल तर टीव्हीवर सुट्टी आहे म्हणून बातमी होती."

"हो. पण सायंकाळी सुट्टी रद्द झाल्याची सूचना आली."

"हा अन्याय आहे. तुम्ही कर्मचाऱ्यांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. मतदानासारख्या पवित्र आणि हक्काच्या कामासाठी सुट्टी देत नाहीत म्हणजे काय?"

"बाबा, व्यवस्थापनाचेही बरोबर आहे. बहुतांश लोक मतदानाच्या दिवशी मतदान न करता, हक्काची सुट्टी असल्याप्रमाणे कुटुंबासह कुठे तरी फिरायला जातात."

"हेही चूक आहे. सुट्टी तर मिळालीच पाहिजे आणि त्याचबरोबरीने राष्ट्रीय कर्तव्य बजावले पाहिजे म्हणजे मतदान केले पाहिजे. यासाठी एक उपाय करायला पाहिजे तो म्हणजे मतदान केले असल्याची खूण म्हणजे बोटावरची शाई दाखवा तरच सुट्टी मान्य होईल अन्यथा त्या दिवसाचा पगार कपात करावा."

"बरोबर आहे, तुमचे. शेवटी दोन तासांची सुट्टी मिळाली आहे."

"चला. दोन तास तर दोन तास! भागते की लंगोटी सही! पण तुम्ही मात्र मतदान करण्याची सुवर्ण संधी गमावू नका बरे."

"नाही. बाबा, करतो आम्ही मतदान." शिवाजी म्हणाला.

      बरोबर सात वाजता सारे बाहेर पडत असताना सीमा म्हणाली, "दादा, बसा. तुम्हाला मतदान केंद्रावर सोडून आम्ही पुढे जातो."

"नको. नको. मतदान केंद्र इथेच तर आहे. तेवढेच वॉकिंग होईल. तुम्ही वोटरस्लीप घेतल्यात ना?"

"हो. घेतल्या आहेत. तुम्ही सारे सांभाळून करा. येतो आम्ही..." असे म्हणत शिवाजीने कार सुरू केली.

     फिरत-फिरत दादासाहेब मतदान केंद्रावर पोहोचले. तिथले वातावरण एकदम वेगळे होते. शाळेच्या मैदानावर तंबू उभारले होते. गालिचे टाकले होते. भलीमोठी सुंदर, मनमोहक रांगोळी काढली होती. अनेक मुली गुलाबपुष्प देऊन मतदारांचे स्वागत करीत होत्या. मोठ्या फलकावर सुंदर अक्षरात 'सुस्वागतम!' असे लिहिले होते. ते सारे पाहून दादासाहेब अचंबित झाले. शाळेत कुणाचे लग्न तर नाही ना असा एक विचार त्यांच्या डोक्यात आला. त्यांनी तिथे बसलेल्या एका तरुणाला विचारले,

"मतदान केंद्र इथेच आहे ना?"

"होय, काका." त्या तरुणाने उत्तर दिले.

'कमाल आहे. मतदान केंद्र आणि इतके प्रसन्न वातावरण?' असे बडबडणाऱ्या दादासाहेबांचे एका मुलीने गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. दादांनी इकडेतिकडे पाहिले. एका खोलीच्या बाहेर दोन पोलीस उभे होते. दारासमोर चार-पाच माणसे आणि सहा-सात बायकांची रांग होती. दादा त्या रांगेत उभे राहिले. काही क्षणातच त्यांना आत प्रवेश मिळाला. मतदान कर्मचारी म्हणून सर्व महिलाच दिसत होत्या. त्यांचा बोलण्याचा अंदाज, पोशाख, नटणे-मुरडणे पाहून दादासाहेब मनात म्हणाले,'या केंद्राची मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल.'

      मतदान करून दादासाहेब बाहेर आले. तितक्यात तिथे एक गाडी थांबली. त्यातून अत्यंत सुंदर अशा मुली उतरल्या. बहुतेक ती गाडी एखाद्या वाहिनीची होती. एक तरुणी सरळ दादांच्या जवळ येऊन म्हणाली,"काका, मतदान केले का?"

शाई लावलेली तर्जनी दाखवून दादासाहेब म्हणाले,"तर मग! मतदान हा माझा हक्क आहे. आणि तो मी मरेपर्यंत बजावणारच. आत्तापर्यंत वेगवेगळ्या तीसपेक्षा अधिकवेळा मी मतदान हक्क बजावला आहे..." तितक्यात पाच-सहा वर्षाचा एक मुलगा धावत- ओरडत म्हणाला,

"मी.. मी... मतदान केले. बघा शाईपण लावली..." ते ऐकून त्या मुलीने मोर्चा त्या मुलाकडे वळवला आणि म्हणाली,

"काय म्हणतोस तू मतदान केले?"

"मग सोडतो की काय? ही बघा शाई..." तो मुलगा मोठ्या आनंदाने सांगत असताना त्या तरुणीने मुलाचा हात पकडला आणि त्याला कॅमेऱ्याच्यासमोर आणून म्हणाली,

"हा बघा आपला मतदार. वय... जेमतेम सहा वर्षे आहे. तरीही याचे नाव मतदार यादीत आहे. ते कसे? का? त्याची तर्जनी याची साक्ष देतेय की, या मुलाने मतदान केले आहे. केंद्रात दोन-तीन मतदार असताना या अल्पवयीन मतदाराने मतदान केले. अधिकाऱ्यांनी त्याला परवानगी दिलीच कशी? तिथे असलेले उमेदवारांचे प्रतिनिधी मूग गिळून का बसले? बाळा, मला सांग, तू मतदान केले कसे? तुला कुणी अडवले नाही?"

"नाही. मी आईसोबत आलो होतो. आई, आत गेली म्हणून मीही आत गेलो. तिथे त्या बाईने आईच्या बोटाला शाई लावली आणि आई पुढे गेली. तितक्यात त्या शाई लावणाऱ्या बाईला फोन आला. ती बाई मोबाईलवर बोलत-बोलत हसायला लागली. मी तिच्यापुढे माझा हात ठेवला. हसणाऱ्या त्या बाईंनी माझ्या बोटावरही शाई लावली. आणि मग मी माझ्या आईच्यासोबत बाहेर आलो..."

"म्हणजे तू मतदान केलेच नाही?" त्या मुलीने विचारले.

"ते काय असते?" त्या मुलाने निरागसपणे विचारले.

"मशीनचे बटण दाबले का?"

"नाही बुवा. मला वाटले, बोटाला शाई लावली की, झाले मतदान. मशीनचे बटण दाबायचे असते का? येऊ का दाबून?" तो मुलगा विचारत असताना त्याच्या आईने त्याच्या हाताला धरून ओढत नेले. ती घटना जवळून पाहणारे दादासाहेब मनात म्हणाले,

'लोकशाहीत काहीही होऊ शकते. हेच खरे...' तितक्यात त्यांच्या जवळ आलेला तरूण म्हणाला,

"काका, मतदान केले का?"

"ही बघ. शाई लावलेले बोट. आता मात्र मी मतदान कुणाला केले ते विचारु नकोस. ते काय म्हणतात ते एक्झिट पोलवाला तर नाहीस ना? तू कसेही फिरवून-फिरवून, या म्हाताऱ्याकडून वाटेल ते वदवून घेऊ शकतो या विचाराने प्रश्नांची सरबत्ती केली तरी मी मतदानाच्या बाबतीत ताकाला तूर लागू देणार नाही. मतदान गुप्तच राहिले पाहिजे."

"नाही. मी तसे काही विचारणार नाही. थोडे तिकडे चला ना..."

"तिकडे? ते कशाला? अरे, मी असा कफल्लक! अंगावर गुंजभरही सोने नाही. पाकिटात दोन- तीनशे रुपये असतील. तिकडे बाजूला नेऊन मला लुटण्याचा विचार करीत असशील तर लक्षात घे. म्हातारा दिसत असलो तरीही गावाकडचे शरीर आहे. पाच- सहा जणांना तर..."

"काका, तसे काही नाही. तुम्हाला काही गोष्टी फ्री द्यायच्या आहेत."

"फ्री?अरे, पण मी काहीच खरेदी केली नाही तर... बरे, चल..." असे म्हणत दादासाहेब त्या मुलासोबत निघाले. काही अंतरावर एक टेबल, दोन-चार खुर्च्या टाकून चार-पाच मुले-मुली बसले होते. दादाला पाहताच सारे उभे राहिले. एका तरुणाने दादाशी हस्तांदोलन केले आणि म्हणाला,

"काका, मतदान केल्याबद्दल अभिनंदन! आमची एक सामाजिक संस्था आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून काही व्यापारी आणि आमच्या संस्थेच्या सहकार्यातून मतदान करणाऱ्या मतदारांना आकर्षक भेट देण्याची योजना राबवत आहोत. त्या संदर्भातील कुपन असलेले हे पाकिट तुम्हाला भेट..."

"धन्यवाद! पण कुपन्स आहेत तरी कशाची?" दादासाहेबांनी विचारले. तशी त्यांच्यापैकी एक तरुणी पुढे आली. दादांच्या हातातील पाकिट घेऊन म्हणाली,

"काका, या. सांगते... आता या वयात तुमच्यासाठी आरोग्य महत्त्वाचे आहे की नाही? तेव्हा हे कुपन दाखवताच आरोग्यासाठी असलेल्या साऱ्या तपासण्या मोफत करण्यात येतील. आता हे कुपन हॉटेलमध्ये दाखवले की, तुम्हाला सकाळचा नाष्टा,चहा अगदी फ्री मिळेल. अनेकांना चहा झाला की, पान, घुटका, सिगारेट सारे काही फुकटात मिळेल..."

"अहो, पण मला कशाचीही सवय नाही परंतु एक करता येईल का? ज्या कुणाला हे चालत असेल त्याला हे कुपन देऊन पैसे घेता..."

"काय पण काका, विनोद करत आहात?"

"मी विनोद नाही करत हो. फ्री, कमी किमतीत म्हटले की, उड्या पडतात."

"तसे नाही. काका. नाश्ता झाला की, बाजूच्या चित्रपटगृहात तुम्ही सिनेमा पाहू शकता. सिनेमा संपल्यानंतर हे कुपन देऊन तुम्ही एका मोठ्या हॉटेलमध्ये भोजन करू शकता..." ती मुलगी सांगत असताना दादासाहेबांनी विचारले,

"तुम्ही मला चिमटा घेऊ शकाल का?"

अचानक विचारलेल्या गोंधळलेली मुलगी बाजूला सरकत असल्याचे पाहून दादा म्हणाले,

"असे घाबरू नका. अहो, मी स्वप्नात तर नाही ना याची खात्री करावी म्हटलं. काय आहे, आजकाल भलतीच स्वप्नं पडत आहेत."

"काका, व्वा! आवडला तुमचा स्वभाव!"

"माणसाने सतत आनंदी असावे. विनोदी व्यक्तिमत्त्व असावे, गमतीदार माणसांच्या सहवासात जावे. त्यामुळे काय म्हणतात ते हास्यक्लबात जायची गरज भासत नाही. तुम्ही अजून काय-काय फ्री देत आहात ते सांगा."

"दुपारच्या जेवणानंतर आपण मॉलमध्ये जाऊन घसघशीत सुट मिळवून खरेदी करू शकता. मॉलमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये तुम्ही सायंकाळचा चहा-कॉफी घेऊ शकता. नंतर हे शेवटचे कुपन रात्रीच्या जेवणाचे..."

"एक विचारतो, तुम्ही मतदान केले का?"

"नाही हो, काका."

"का? तुमचे वय तर वीसपेक्षा अधिक दिसतेय."

"हो. पण मतदार यादीत नाव नोंदवायचे राहून गेले."

"व्वा! तरीही तुम्ही मतदान करण्याचे आवाहन करता? खरे तर तुम्हाला तो अधिकार नाही. 'दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण!' अशी तुमची अवस्था..." दादासाहेब तावातावाने बोलत असताना बाजूने जाणाऱ्या बँडपथकाने त्यांचे लक्ष वेधले. पन्नास-साठ स्त्री-पुरुषांचा एक जत्था घोषणा देत मतदान केंद्राच्या दिशेने येत होता.

"हा कशाचा मोर्चा म्हणावा? यांची नावे मतदान यादीतून वगळली की काय?" दादा त्या मुलीला विचारत असताना त्यांचे लक्ष तो जत्था देत असलेल्या घोषणांनी वेधले...

'चला हो चला... मतदानाला चला...'

'आम्ही चाललो मतदानाला... तुम्हीही चला...'

त्या मिरवणुकीच्या समोर त्यांच्या वसाहतीच्या नावाचा फलक होता. एकाच वसाहतीतील सारे मतदार एकत्रितपणे वाजतगाजत मतदान करण्यासाठी निघाले होते. जाताना इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन करत होते...

'व्वा! हे असे जिवंत, अनुकरणीय उदाहरण असावे. मतदानाचा दिवस हा इतर सणांप्रमाणे राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा. मतदारांनी घरापुढे रांगोळ्या काढून गुढ्या उभारल्या पाहिजेत. तरच मतदानाचा टक्का वाढेल. चला. मतदान केले. आता 'फ्री'चा आनंद लुटूया...' असे पुटपुटत आणि तर्जनीवरील शाईकडे अभिमानाने बघत दादासाहेब तिथून निघाले...

      मतदान केंद्राच्या बाहेर येताच त्यांना समोरच एक मोठ्ठे हॉटेल दिसले. पोटात दडून बसलेल्या कावळ्यांची एकदम कावकाव सुरू केली. दादासाहेबांना वाटले,

'पोटातले कावळे एक मिनिटाचा उशीर सहन होत नाही आणि तिकडे गंगेवर असलेले कावळे तास न तास पिंडाला शिवत नाहीत.'

      जवळ असलेल्या हॉटेलमध्ये दादासाहेब शिरले. हॉटेल नुकतेच उघडले होते त्यामुळे धूप, उदबत्ती यांचा घमघमाट सर्वत्र पसरला होता. अगोदरच प्रसन्न असलेले दादासाहेब त्या सुवासाने अधिकच प्रसन्न झाले.

"या. काका, या..." हॉटेलच्या व्यवस्थापकाने त्यांचे आदराने स्वागत केले. तो दादांना खुर्चीपर्यंत घेऊन गेला. एक खुर्ची थोडी मागे ओढून दादासाहेबांना विनयाने बसण्याची विनंती केली. दादा स्थानापन्न होताच दुसऱ्या एका पोऱ्याने मेनूकार्ड त्यांच्यासमोर ठेवले. त्यावरील खाद्यपदार्थांची यादी पाहत वेटरची फिरकी घ्यावी या हेतूने त्यांनी विचारले,

"यह सब पदार्थ तैयार है ना?"

"जी सर! आप जो चाहे, माँग लीजिए। मै कुछ ही मिनिटों मे पेश करूंगा।"

"तुला मराठी येते का?" दादांनी विचारले.

"काका, मी महाराष्ट्रीयन आहे."

"अरे, मग हिंदी का बोलतोस? बरे, मी मतदान केले आहे. ही बघ शाई! सारे पदार्थ फ्री आहेत ना?"

"होय. एकदम फ्री आहेत."

"असे असते बघ, आपल्या मराठी लोकांचे! आपण आधी हिंदीतून बोलत होतो आणि आता इंग्रजी बोलतोय. 'फुकटात' हा शब्द वापरायची आपल्याला लाज वाटते. बरे, जा. नाष्ट्याचे जे जे पदार्थ तयार आहेत ते सारे एक-एक प्लेट आण.. अरे, असा पाहतोस काय? मी बकासूर नाही. फुक्कट म्हटले की, आपण कसे तुटून पडतो याचा नमुना पेश केला. एक इडली, एक वडा आणि नंतर एक कडक, फक्कड कॉफी आण."

"आणतो..." असे म्हणत तो वेटर हसत निघून गेला.

    काही वेळाने समाधानाचा, तृप्तीचा ढेकर देत दादासाहेब हॉटेलमधून बाहेर पडले. त्यांनी सारे कुपन्स काढून बघितले. पॅथॉलॉजीत जाऊन साऱ्या तपासण्या कराव्यात या हेतूने त्यांनी कुपनवरील पत्ता पाहिला. मिनिटभर विचार करताच त्यांच्या लक्षात आले की, तो दवाखाना तिथून अगदी जवळ आहे. एक वळण घेऊन दादासाहेब पॅथॉलॉजीत पोहोचले. तिथली स्वागतिका त्यांच्याकडे बघत असताना दादासाहेबांनी तिला करंगळी दाखवताच मनमोहक हसत तिने विचारले,

"युरीन टेस्ट करायची आहे का?"

"तसे नाही. मी मतदान करून आलोय. आज तुमच्याकडे साऱ्या तपासण्या फुकटात आहेत ना?"

"काका, मग शाई लावलेला तर्जनी दाखवा ना. करंगळी का दाखवता? तुम्हाला कोणता आजार आहे का? कशाची तपासणी करायची आहे?"

"कशाची तपासणी करु? तुम्ही कशाची तपासणी करता?"

"इथे सर्व आजाराच्या तपासण्या होतात. यापूर्वी तुम्ही कशाची तपासणी केली आहे?"

"नाही बुवा. मला कोणताही आजार नाही. साधे सर्दीचे जंतूही माझ्या अवतीभोवती पोहोचण्याचे धाडस करीत नाहीत..."

"व्वा! ग्रेट! अशी निरोगी व्यक्ती आजकाल सापडत नाही. ठीक आहे. आपण हा फॉर्म भरु. नंतर काही तपासण्या करुया..." म्हणत ती युवती एक-एक प्रश्न विचारत गेली. दादासाहेबांनी सांगितलेली माहिती फॉर्मवर भरत गेली. पंधरा-वीस मिनिटात वेगवेगळ्या तीन प्रकारच्या तपासण्या करून दादासाहेब बाहेर पडले. पावणे अकरा वाजत होते. 'चला आता सिनेमा पाहू..' असे पुटपुटत त्यांनी कुपनवरील टॉकीजचे नाव पाहिले. ऑटोने जावे का टॅक्सीने जावे हा विचार करीत असताना त्यांना नाष्टा करीत असताना आलेल्या एका संदेशाची आठवण झाली. तसे ते मनाशी म्हणाले,

'आज तो टॅक्सीवाले मेहरबान है। कहते है, तर्जनीपर की स्याही दिखाव और शहर मे कही भी पचास रुपये देकर घुमो। अरे, वा! काय मस्त ऑफर आहे।...' असे म्हणत दादासाहेबांनी समोरून येणाऱ्या एका टॅक्सीने दाखवला. आरामात बसून ते म्हणाले,

"रिगल सिनेमा चलो " तसा चालकाने गिअर टाकला. काही वेळात रिगल सिनेमासमोर त्यांची टॅक्सी पोहोचली. अगोदरच काढून ठेवलेली पन्नासची नोट चालकाकडे देत असताना तो म्हणाला,

"ए काहे दे रहे हो, बबुआ! आप का तो तीन सौ पचास बनता है।"

"क्यों? आज पचास रुपया देकर कही भी घुमो ऐसा संदेश मोबाइलपर..."

"जर हम भी तो देखे..." तो चालक म्हणत असताना दादांनी तो संदेश दाखवला. तो संदेश वाचून तो म्हणाला,"आप को ऐसी गाडी मे जाना चाहिए था।"

"ऐसी बोले तो..."

"यह संदेशा भेजनेवाली सेना कि संघटना है। सेना और मनसे कि टॅक्सी संघटना है, जो पचास रुपिया लेकर धंदा कर रही है। रही बात राष्ट्रवादी और काँग्रेस संघटन कि तो उन मे अभी बहस चल रही है कि, छुट देवें या न दे। आखिर दोनों ने यह सवाल अपनी अपनी हायकमांडपर छोड रखा है। जब वहाँ से कोई..."

"और आप कि कौन सी संघटना है भाई?" दादांनी विचारले.

"हमारा तो 'परदेसी टैक्सी' संघटन है।' इसलिए हम यह छुट-बुट के झमेले मे नही पडते। इसलिए आप को पूरे साडे तीन सौ देना..."

"यह तो अन्याय है..." असे म्हणत दादांनी तणतणत साडेतीनशे रुपये दिले. नाराज झालेले दादा

टॉकीजमध्ये शिरले. इथे खरेच सुट आहे की नाही आणि टॉकीजवाला परदेशी आहे का अशा शंकेने दादांनी तिकीट फाडणाऱ्या पोराजवळ जाऊन विचारले,

"क्यों रे भाई, मैने मतदान किया है। ये देखो स्याही। क्या मै फ्री मे सिनेमा देख सकता हूँ?"

"चाचा,वहाँ खिडकी पर जाओ। आप को कुपन मिला है, उसपर सिट नंबर लिख कर लाओ।...त्या मुलाने सांगितल्याप्रमाणे दादासाहेब तिकीट विक्री खिडकीपाशी गेले. त्यांनी ते कुपन आतल्या मुलीजवळ देताच तिने मंजूळ आवाजात विचारले,

"काका, तर्जनी दाखवा आणि फोटो आय.डी. दाखवा ना..."

"ही तर्जनी, ही शाई आणि हे फोटो प्रूफ म्हणून मतदान कार्ड..." असे म्हणत दादांनी ते कार्ड मुलीजवळ दिले. त्यावरचा क्रमांक संगणकावर नोंदवून त्या मुलीने कुपनवर एक क्रमांक टाकला ते कुपन घेऊन पुन्हा त्या मुलाकडे जाऊन कुपन त्याला देताच तो म्हणाला,

"तर्जनी दिखाव..."

"अरे भाई, अब्बीच उस लडकी का दिखाया है। अच्छा! देख..." असे म्हणत दादांनी तर्जनी मुलाला दाखवली. तसे दादा म्हणाले

"क्यों भाई, हो गया समाधान?"

"कैसा है, अंकल। पर सो ही एक बडे साहब ने कहा है ना कि, शहर मे मतदान करो, स्याही पोछ डालो और फिर गाँव जाकर भी वोटींग करो। इसलिए मालिक ने कहा है कि, अंदर छोडते समय स्याही कि जाँच करो।.." असे म्हणत दादांच्या तर्जनीवरील शाई पक्की आहे ना अशी खात्री करून घेत त्या मुलाने दादांना आत सोडले तोपर्यंत सिनेमा सुरू झाला होता. धडपडत, ठेचाळत दादासाहेब खुर्चीवर जाऊन बसले. पडद्यावर बघताच ते दचकले. पडद्यावर एक इंग्रजी सिनेमा सुरू होता. अतिशय उत्तेजक, बिनधास्त दृश्य चालू होते. आयुष्यात दादासाहेबांनी तसा सिनेमा कधीच पाहिला नव्हता. दादासाहेबांना समोर पाहवेना, करमेना पण इलाज नव्हता. एका वेगळ्याच अवस्थेत ते डोळे लावून बसून राहिले. किती वेळ गेला ते त्यांना समजले नाही पण मध्यंतर झाले आणि आनंदाच्या भरात दादा लगबगीने टॉकीजच्या बाहेर पडले. सिनेमा अर्धवट सोडून...

     दुपारचे दोन वाजत होते. फ्लॅटवर जाऊन जेवणासाठी चार वाजतील. त्यांनी खिशातून उरलेले कुपन काढले. त्यातील एका पंचतारांकित हॉटेलचे कुपन पाहून त्यांना आनंद झाला. 'जय हो, लोकशाही! हमेशा लगाव मतदान कि स्याही! चलो. जिंदगी मे पहली बार फाईव्ह स्टार होटल मे खाना खाने का मोका मिला है। दोनों हाथों से खाऐंगे...' असे पुटपुटत त्यांनी हात दाखवून एक ऑटो थांबवला. ऑटो थांबताच त्यांनी त्या चालकास हॉटेलचे नाव सांगितले. तसे त्याने विचारले,

"काय काका, स्याही दिखावो, पेटभर खाना खावो, असे आहे का?"

"होय! पण तू कसे ओळखले?"

"मी तिकडेच चाललो आहे... जेवायला!..." असे म्हणत त्याने तर्जनीसह शाई दाखवली.

"तुम्ही मतदान केले. अभिनंदन! कुणाला केले मतदान?"

"जिसने ज्यादा माल दिया... उसी को!"

"म्हणजे तुम्ही मत विकले?" दादांनी विचारले.

"काका, गेला तो जमाना. आता कोण धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ आहे? पाच वर्षांनंतर लोकशाही नामक गंगेला पूर येतो. गंगा दारी येते. हात धुऊन घ्यावे झाले."

"ते जाऊ देत. पण तुमचे भाडे..."

"जाऊ द्या ना काका. आपण लोकशाही नामक एकाच नावेचे प्रवासी आहोत. लोकशाही महोत्सवाचा प्रसाद घेण्यासाठी एकाच हॉटेलमध्ये जात आहोत. तेव्हा ताटात पडले काय नि वाटीत पडले काय.. एकच..." असे म्हणत त्याने हसतच ऑटो दामटला...

   पंधरा-वीस मिनिटानंतर ऑटो त्या भव्य, सुशोभित हॉटेलमध्ये पोहोचला. आत शिरताना सुरक्षारक्षकाने मारलेल्या सॅल्यूटमुळे गहिवरलेल्या दादांनी त्याच्याशी हस्तांदोलन केले. आत शिरताच एका सुस्वरूप आणि साडी परिधान केलेल्या युवतीने दोन्ही हात जोडून त्यांचे स्वागत करून विचारले,

"मतदान केले का?"

"हो. केले की. हे पहा..." असे म्हणत दादासाहेबांनी तर्जनी पुढे केली.

"अभिनंदन! काका, आपण आपले बहुमोल कर्तव्य पार पाडले आहे त्यामुळे आपणास आज आमच्याकडून स्पेशल 'लोकशाही थाली' एकदम फ्री! या..." ती सौंदर्यवती म्हणाली.

"काका, तुम्ही शाकाहारी का?" ऑटोचालकाने विचारले.

"हो. शंभर टक्के शाकाहारी."

"ठीक आहे. मी जरा तांबड्या रश्श्यावर हात मारतो..." असे म्हणत ऑटोचालक दुसऱ्या दालनात निघून गेला. दादासाहेब जवळच्या एका खुर्चीवर बसले. एक वेटर अत्यंत अदबीने त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,

"सर, आमची लोकशाही थाली आणू का? स्पेशल आहे."

"असे म्हणतोस तर आण. नाही तरी आज लोकशाहीचा महोत्सव आहे तर मग प्रसाद म्हणून 'लोकशाही' थाली घेऊया!" दादासाहेब म्हणाले. थाली येईपर्यंत सूप, मसाला पापड यांची रेलचेल झाली. त्यानेच पोट भरले.

     सुमारे एक तासानंतर भरपेट जेवलेले दादासाहेब खुर्चीवरून उठले तितक्यात त्यांना काही तरी आठवले. त्यांनी जेवण आणून देणाऱ्या मुलाला जवळ बोलावले आणि त्याला म्हणाले,

"अरे, आज बील तर नाही पण ही तुला बक्षिसी. ठेव..." असे म्हणत तो मुलगा नाही म्हणत असतानाही वीस रुपयाची नोट त्याच्या खिशात टाकत दादासाहेब हॉटेलमधून बाहेर पडले. 'आता काय करावे. घरी जावे तर मुलं अजून आली नसतील...' तितक्यात त्यांना आवाज आला,

"ओ चाचाजी, वोट किया ना? पान नही खावोगे क्या?" ते ऐकून दादा पानटपरीकडे गेले. राहणीमान बघता तो परदेशी वाटत होता. दादांनी त्याला विचारले,

"भैया, परदेशीबाबू हो क्या?"

"काहे का परदेशी? चार पिढी तो यही जन्मी, पली, बढी... उधर जायेंगे तो कोई पहचानेगा नही। हमारा खून तो बस यही कि भाषा बोलता है। सांगा, कोणते पान लावू? मोफत आहे बरे."

त्या भैय्याने दिलेले पान खात दादासाहेब तिथेच रेंगाळले. त्यांनी खिशातून शेवटचे कुपन काढले परंतु करमत नसल्याचे त्यांना जाणवले. काय करावे या विचारात असताना त्यांचा भ्रमणध्वनी वाजला. मुलाचा फोन येत होता. फोन उचलून तो म्हणाला,

"हॅलो, बोल शिवा. आलात का घरी?"

"हो. आलोत. पण बाबा, तुम्ही कुठे आहात?"

"अरे, दिवसभर लोकशाहीच्या नावाखाली मजा लुटतोय. एका तासात येतो..." असे म्हणत त्यांनी एका टॅक्सीला हात दाखवला. टॅक्सी थांबताच आत बसताना दादासाहेबांनी विचारले,

"भैया, आप को कही देखा है?"

"बबुआ, अभी दोपहर तो मैने आप को रिगल टॉकीज छोडा था।"

"हां। याद आया। अरे, ये मिटर क्यों नाही डाला?"

"जाने दो, अंकल। आप को पचास रूपिया लेकर छोड दुँगा।"

"वो क्यों? आप की संघटना तो... हायकमांड का आदेश आया क्या?"

"काहे का हायकमांड? हमारी संघटना शामिल नही थी। लेकिन बाकी संघटन के जो ड्रायव्हर है ना, उन्होने हमारी जो गाडीयाँ चल रही थी उनपर पत्थर फेकना शुरु किए। और दुसरी बात..."

"वो कौनसी?"

"कैसा है अंकल, श्याम हो रही है, घर जा रहा हूँ। पचास तो पचास सही। वैसे भी आज धंदा अच्छा हो गया। पाणी मे रह कर मगरमच्छ से बैर क्यों? उनसे

दोस्ती अच्छी..." असे म्हणत त्याने गिअर बदलला...

                           ००००

 

            नागेश शेवाळकर, पुणे

 

               (९४२३१३९०७१)

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू