पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एप्रिल फूल

एप्रिल फूल..

"अरे बाप रे..बघ ग मेघा,आपला अरुण गेला..." रोहित अक्षरशः ओरडतच बाल्कनीतून आत आला..
रोहितची नेहमीची सवय सकाळचा चहा, पेपर वाचत बाल्कनीमधे झुल्यावर बसून प्यायचा..तसा नेहमी सारखा आजपण गेला...पण एवढ्या लवकर परत येईल आणि तेपण अश्या बातमी बरोबर.. मेघाला पण शॉकच लागला.
"काय बरळतोयस?" ती जवळ जवळ ओरडलीच त्याच्यावर.
"हो ग हे खरे आहे बघ...वाच हे पेपरमधे आले आहे छापून..फोटो पण आहे आपल्या अरुणचा. आज संध्याकाळी ४ वाजता त्याच्या अंतिम संस्कार करणार आहेत..त्या आधी जाऊ आपण दर्शनाला तिथे."अगदी रडवेला झालेला रोहित मेघाला सांगत होता.
त्याची परिस्थिती बघून तिने त्याला सल्ला दिला,"बघ जमत असेल तर आज जाऊ नकोस ऑफिसला"
मेघाला माहीत होते,अरुण रोहितचा, रोहिताचाच नव्हे तर, तिचा पण खूप चांगला बालपणापासूनचा मित्र होता...लहानपणी तीघे एकाच चाळीत राहत होते..नंतर त्या चाळीचे फ्लॅट्स मधे रूपांतरण झाले तेव्हा पण ते दोघे भाड्याने एकच सोसायटी मधे रहायला गेले आणि नंतर पुन्हा त्या नवीन बनलेल्या फ्लॅटमध्ये.. 
हे तर आता, अरुणच्या मुलाचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते आणि आता सूनबाई गरोदर होत्या म्हणून अरुण आणि त्याची बायको ह्याच शहरात असलेल्या त्यांच्या मुलाच्या घरी काही दिवस रहायला गेले होते. आणि तिथे हे असे घडावे? तिलापण वाईट वाटत होते..कारण अरुणचा स्वभावच तसा होता.
रोहित तर आपल्या खोलीत जाऊन बसला...त्याला सारखा अरुण आठवत होता...
'किती खोडकर होता तो अगदी लहानपणापासून..पण त्याच्या बरोबर काढलेला वेळ कसा निघून जायचा ते कळायचेच नाही..इतका लाईव्ह होता तो...' रोहित आठवत होता.
त्याला रोहितच्या खोड्या खूप आठवत होत्या...
"आजोबा झुरळ.." त्याचा अडीच वर्षाचा नातू रोहितच्या जवळ येऊन ओरडला...रोहित एकदम उठला..तसा नातू,"एप्रिल फूल... एप्रिल फूल...आजोबा..."म्हणत हसत हसत टाळ्या वाजवत बाहेर निघून गेला.
नातवाच्या येण्याने रोहित, एक क्षणाला विसरला अरुणला, पण पुन्हा त्याला अरुणची आठवण यायला लागली...आणि आता तर त्याच्या एप्रिलफूलच्या खोड्या आठवू लागल्या. तो दरवर्षी काहीतरी वेगळीच आणि कोणी कल्पनापण नाही करणार अशी खोडी करायचा..अगदी गेल्या वर्षीपर्यंत....
रोहितला वाटले, 'बरे होईल जर आजपण ही एक खोडीच असेल!' एक निःश्वास निघाला...कारण त्याने अरुणच्या घरी लगेच फोन केला होता.
आठवणीत रमलेला रोहितला, अरुणने केलेली एप्रिल फूलची पहिली खोडी आठवली...
"ए तुझ्या डोक्यावर पाल आहे बघ" असे म्हणून त्याने वयाच्या अवघ्या चवथ्या वर्षी, चार वर्षाच्या रोहितला घाबरवून टाकलेले आणि रोहित.....रडायला सुरू केला....मग अरुणनेच त्याला,"अरे एप्रिल फूल बनवले तुला" म्हणत शांत केले..
त्यानंतर एकदा पाचवीत असताना, त्याचा शाळेचा डबा त्याने कधी दफ्तरातून काढून कधी त्यात त्याची आवडणारी मॅगी ठेवली त्याला माहीतच नाही..आणि तो जेव्हा आईचा दिलेला पराठा खायला गेला तर तिथे मॅगी....त्याने ती खाऊन घेतली आणि घरी येऊन आईला लाडीगोडीत धन्यवाद म्हणाला तर,"एप्रिल फूल...ती मॅगी मी ठेवली होती" करत खो खो करत हसू लागला..
त्यानंतर..त्याच्या खोड्या वाढतच चालल्या होत्या...पण रोहित अभ्यासात जास्त लक्ष घालू लागल्या मुळे त्याच येणे पण कमी झालेले...तरीही काही ठराविक दिवशी तो अगदी न चुकता यायचा..त्यातला एक दिवस म्हणजे तीस मार्च..रोहितचा वाढ दिवस.
रोहित कॉलेज पहिल्या वर्षात असताना तो त्याच्या वाढ दिवसाला आला,"तुला एक पत्र देतोय, नीट वाच...कोणीतरी स्पेशल आहे तिने दिले आहे, एकट्यातच वाच बरं."असे कानात कुजबुजत त्याने ते पत्र हळूच त्याच्या खिश्यात टाकले.
रोहित खूप उत्साहित झाला, लगेच स्वतःच्या खोलीत गेला पत्र वाचायला...सगळ्यात पहिले त्याने पत्र कोणी लिहिले आहे म्हणून खाली पहिले, तर तिथे त्याला त्यांच्या चाळीतल्या एका बालमैत्रिणीचे 'मेघाचे' नाव दिसलं.
मनातच रोहित खूप आनंदला कारण तशी त्याला ती आवडतच होती.....मग त्याने मजकूर वाचला..मेघाने त्याला एक दिवस विचार करून दुसऱ्या दिवशी सोसायटीच्या मागच्या सोसायटीतल्या पार्कमधे भेटायला बोलावले होते.....
खूप आनंदित झालेला रोहित खोलीतून बाहेर आला आणि खाली येऊन अरुणला मिठीच मारला.. अरुण मात्र...त्याला डोळा मारून "चल मग पुन्हा एकदा वाढदवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा"म्हणत निघून गेला.
रोहितला एक दिवस काढणे जड गेले..पण दुसऱ्या दिवशी म्हणजे एक एप्रिलला तो ठराविक वेळेस पार्क मधे गेला...तिथे मेघा आलेली नव्हती..त्याला वाटले...अरुण ने खोटेच सांगितले आहे माझी गंमत केली आहे असे समजून तो निघायला, पार्कच्या गेटकडे वळला आणि समोरून येणारी मेघा त्याला दिसली."सॉरी हं थोडा उशीरच झाला.." म्हणत तिने येता बरोबरच रोहितचे मन जिंकले. मग बऱ्याच वेळ दोघे बोलत राहिले...निघताना त्याने तिला म्हटले,"अग तू मला पत्र लिहिले नसतेस तर मला कळलेच नसते की तू मला प्रेम करते आहेस म्हणून..."
"काय...? मी लिहिले तुला पत्र? नाही रे...तूच लिहिले ना मला पत्र..हे बघ.." हे म्हणत तिने एक कागदाचा बोळा काढून दाखवला..
"एप्रिल फूल...एप्रिल फूल." म्हणत तेवढ्यात अरुण झाडाच्या मागून बाहेर आला...म्हणाला, "अरे मीच तुम्हाला दोघांना एप्रिल फूल बनवायला तुमच्या नावांनी पत्रे लिहून एकमेकांना पत्र दिली..मला वाटलेले की ही मेघा नाही येणार...मग तुला मी एप्रिल फूल बनवेन..पण ही आली आणि आता मीच मोठा फूल बनलो आहे" असे म्हणत जोर जोरात हसू लागला...
दोन वर्षापूर्वी, "मला कॅन्सर झालाय ..मी काही दिवसांचा पाहुणा आहे, मला भेटायला या सगळे" असा मेसेज केला मित्रांच्या व्हॉट्स ॲप समूहावर. भेटायला गेलो तर हा आपला ठणठणीत... पार्टीची सगळी व्यवस्था करून तयार...नंतर सगळ्यांना पार्टी करूनच परत येता आले.
अश्या एक ना अनेक आठवणी....रोहित सारखा सारखा हाच विचार करत होता की 'देव करो आणि आज पण ही त्याची एक खोडीचं असो.'
मेघा पण मनातल्या मनात तीच प्रार्थना करत होती...गोळ्या घ्यायच्या म्हणून कसेबसे दोघे दोन घास गिळले...जेवण जात नव्हते...जाणे शक्यच नव्हते..
दोन वाजताच्या सुमारास दोघांनी निघायचे ठरवले...
दोघांना एकमेकांच्या भावना चांगल्याच कळत होत्या...अरुण दोघांचाही मित्र होता...!
जवळ जवळ चारच्या सुमारास ते अरुणच्या घरी पोहचले, तिथले दृश्य पाहून त्याला तर चक्करच आली...अरुणच्या शरीराला, हो आता ते शरीरच उरले होते..खाली जमिनीवर एका पांढऱ्या चादरी वर एक पांढऱ्या चादरीने झाकून ठेवले होते.....
तो दोघे इतर लोकांसारखी जाऊन बाजूला उभी राहिली..काय बोलावे ते त्याला सुचतच नव्हते..ती पण विचारातच होती...
पंधरा वीस मिनिटे तशीच मौन पण फार वेदनादायक गेली..मग घरच्यांना 'आता ह्यांना न्यावे लागेल' म्हणून सोसायटीचे काही तरुण मंडळी पुढे आली..
त्यांनी त्याला स्ट्रेचरवर चादरीसह घेतला, रोहितला राहवले नाही गेले...तो जवळ गेला अरूणच्या.
त्या तरुण मंडळी पैकी, चार जण अरुणला न्यायला खाली वाकली आणि आत्ता पर्यंत हळू हळू रडणारा रोहित खूप जोरात हुंदके देऊन रडायला लागला....
आणि त्याक्षणी अरुण उठून बसला..."एप्रिल फूल...एप्रिल फूल".
जोर जोरात टाळ्या वाजवून अरुण त्याला एप्रिल फुल म्हणाला आणि रोहितचा ताबा गेला, त्याने अरुणला जोर जोरात मारायला सुरुवात केली,"नालायका, कोणी अशी गंमत करते का? माझा जीव गेला असता ना...मूर्ख माणसा किती लोकांचे जीव अद्धर केलेस..कळत नाही का तुला?.." रोहित एका बाजूला त्याला बडवत होता ,दुसऱ्या बाजूला त्याला खूप रडू येत होते.
"खरंतर तुला लहानपणीच मारायला हवे होते मी...पण नाही मारलो म्हणून तुझी मजल इथ पर्यंत गेली...पुन्हा अश्या खोड्या केलास तर..माझे मेलेले तोंडचं बघशील..."रोहित बरच काही बोलत होता. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर मेघाने हात ठेवला..त्याला बाजूला ओढत म्हणाली,"जाऊ दे त्यांना..आता शांत झालाय रे तो",म्हणत तिने आवंढा गिळला.
त्या तरुण मंडळीतून एक म्हणाला,"काका म्हणालेच होते आम्हला, सगळे विश्वास करतील माझ्या मृत्यूचा पण माझा मित्र रोहित नाही करणार!"
अरुणच्या बॉडीला ते रोहितच्या समोरून नेत होते आणि रोहित....एकदम सुन्न झाला होता...'आमची मैत्री तुटली का? नाहीतर आज का नाही त्याने मला एप्रिल फूल बनवले?' हा विचार करत.
©सौ. अनला बापट
राजकोट
(माझ्या भाव पुष्प ह्या पुस्तकातील एक लघुकथा)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू