पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अनुबंध रेशमाचे

शॉपिझेनसाठी ट्रेनकथा

अनुबंध रेशमाचे

ऑफिसचे काम संपवून निलेशने कोयना एक्स्प्रेसने गावी जाण्यासाठी ओला बुक केली. कालच आईचा फोन आला होता. "शास्त्रीबुवांनी दोन तीन स्थळे सुचवली आहेत ती इकडे येऊन बघून जा" आईचा फोन आल्यामुळे चार दिवसांची रजा काढून निलेश गावी निघाला होता. कपड्यांची बॅग सकाळी ऑफिससाठी निघतानाच तो घेऊन आला होता. दादर स्टेशनवर जाईपर्यंत रात्रीचे आठ वाजून गेलेले. स्टेशनबाहेरच्या हॉटेलातून रात्री खायला काहीतरी हवे म्हणून पार्सल घेतले. ट्रेन सुटायला फक्त दहा मिनिटे बाकी होती. घाईघाईत त्याने रिझर्व्हेशन केलेला डबा पकडला आणि आत शिरता शिरता एका सुंदर मुलीला धडकला. ती मुलगी पण घाईने ट्रेनमध्ये चढत होती. क्षणभर तिच्या कपाळावर आठ्या चढल्या पण तिची चूक लक्षात येताच ती वरमली. ट्रेनमध्ये चढताच ट्रेनने जोरात हॉर्न वाजवून निघाल्याचा इशारा केला. आपापली सीट शोधायची म्हणून दोघे एकमेकाला सॉरी म्हणून आतल्या कंपार्टमेंटकडे वळले.
तशी निलेशची एकच छोटी बॅग होती. तोंडाने शीळ घालत तो आपली सीट शोधू लागला तर त्याच सीटवर ती मुलगी बसलेली. आता आपण काही बोललो तर पाठलाग करतोय असे समजून मुलगी दंगा करायची असे निलेशला वाटले म्हणून तो उगाचच सीट शोधण्याचे ढोंग करू लागला. इतक्यात एक वयस्कर जोडपेही तिथेच आपली सीट शोधू लागले. जोडप्यातील महिलेने त्या मुलीला विचारले, " तुझा सीट नंबर काय आहे? " तेव्हा मुलीने मोबाईल उघडून आपला सीट नंबर पाहिला तर तो समोरच्या सीटवरचा होता. ती निलेशच्या सीटवर बसली होती. समोर निलेशला पाहून ती थोडी नाराजच झाली होती पण आपणच चुकीच्या सीटवर बसलेले लक्षात येताच निलेशकडे वळून ती म्हणाली, " तुमची सीट इथेच आहे का? " तसे निलेश उत्तरला, " हो तुम्ही चुकून माझ्याच सीटवर बसला आहात" दुसऱ्यांदा आपली चूक झाल्याचे वाटून ती मुलगी चांगलीच वरमली. " सॉरी अगेन" असे म्हणून ती उठून समोरच्या बाकावरील आपल्या सीटवर जाऊन बसली. निलेश जणू काही दुसरे कोणी आपली सीट बळकावेल अशा समजूतीत पटकन आपल्या सीटवर जाऊन बसला. ती मुलगी खिडकीतून बाहेर पहात बसली.
वयस्क जोडपेही निलेशच्या बाजूला बसले. बॅग्ज सीटखाली ढकलल्यावर जरा स्थिरस्थावर होताच निलेशच्या बाजूला बसलेल्या महिलेने मुलीकडे पाहून प्रश्न विचारला,
" तुझे नाव काय आहे? तू कुठून आलीस? कुठे चाललीस? एकापाठोपाठ प्रश्नांची सरबत्ती होताच मुलगी त्या महिलेला म्हणाली, " मी श्वेता, नोकरीनिमित्त पुण्याला रहाते. माझे आईबाबा मुंबईत रहातात. मला एक स्थळ सांगुन आले होते म्हणून मी ऑफिसला सुट्टी घेऊन दोन दिवसांपूर्वी मुंबईला आले होते" स्थळाचे नाव निघताच आता त्या महिलेला अजूनच उत्सुकता वाटू लागली. तिने विचारले,
" मग पसंत पडले का स्थळ?" तसे मुलगीही चांगली रंगात येऊन सांगू लागली, " अहो काकू, मुलाकडचे फार हुंडा मागत होते. मुलगा खूप श्रीमंत घरातला पण बोलण्याचे , वागण्याचे काही संस्कार नाहीत, आईवडील मुलाची किंमत म्हणून भरपूर हुंडा मागत होते. मी हुंडा देणे आणि घेणे याच्या विरोधात आहे. माझ्या आईबाबांनी मला वाढवले, इतके शिकवले आणि मी नोकरी करत असताना हुंडा काय म्हणून द्यायचा? तुम्हाला काय वाटते? " समोरच्या महिलेला आता तिच्या संभाषणात चांगलाच रस वाटू लागला. ती जोशात येऊन बोलू लागली, " अगं श्वेता आपण हुंडा देतो म्हणूनच ही नवऱ्याकडची माणसे मागण्या करतात. हुंडा मागणाऱ्यांना चांगले जेलमध्येच टाकायला हवे" निलेश मोबाईलमध्ये पहात त्या दोघींचे बोलणे कान देऊन ऐकत होता. त्या महिलेचा नवरा मात्र खिडकीतून बाहेर पहात निसर्गाची शोभा लूटत होता. निलेशलापण हुंडा मागणे किंवा देणे अजिबात पटत नव्हते. का कोण जाणे पण निलेशला ती मुलगी फार आवडली. तिची बोलण्याची ढब, मोठ्या माणसांशी बोलतानाचा मुरवतपणा त्याला विशेष भावला. आजकालच्या मुली अनोळखी लोकांनी काही विचारले तरी तोंड वेंगाडतात, बोलायला मागत नाहीत. आपल्याच धुंदीत त्या मोबाईलमध्येच तोंड खुपसून बसतात पण ही श्वेता त्या वयस्क महिलेशी व्यवस्थितपणे बोलत होती. तिने विचारलेल्या प्रश्नांना छान उत्तरे देत होती. प्रांजळपणे हासून आपली प्रतिक्रिया मांडत होती.
डोळ्यांच्या कोपऱ्यातून निलेश श्वेताकडे पहात होता. समोरच्याला वाटावे की तो खिडकीतून बाहेर सृष्टीसौंदर्य पाहण्यात गुंग आहे पण निलेशचे कान दोघींचे बोलणे बरोबर टिपून घेत होते. रात्रीचे जेवण करण्यासाठी श्वेता नि ती महिला तयारी करू लागल्या. तसे निलेशकडे वळून त्या महिलेने निलेशला विचारले,
" बाळ तुझे नाव काय? तू जेवणार आहेस ना? " तसे तत्परतेने निलेश उत्तरला, " मी निलेश, मी येतानाच जेवणाचे पार्सल आणले आहे. जेवूया मिळून" असे म्हणत त्याने हातातल्या बॅगेतून पार्सल बाहेर काढले. हॉटेलवाल्याने पार्सलसोबत एक प्लेट नि चमचाही दिला होता. निलेशने आणलेल्या पारृसलमधून थोडे थोडे प्लेटमध्ये वाढून घेतले नि डबा त्या काकू आणि श्वेतापुढे ठेवत म्हणाला, " तुम्हीपण या जेवणाची चव पहा" काकुंनी त्यातील थोडी भाजी प्लेटमध्ये घेतली नि श्वेतालाही घेण्यास सांगितले. तशी श्वेता म्हणाली, " नको काकू, खूप जेवण दिलेय आईने.तेच उरणार आहे" असे म्हणत तिने आपल्या डब्यातील भाजी निलेश आणि त्या काकाकाकुंना वाढली. श्वेताने आणलेली भाजी ताजी आणि फारच रूचकर होती. निलेश मनात विचार करू लागला, ही श्वेता किती चांगली आहे, आपणाशी चांगले बोलतेय. निलेशला श्वेतासाठी 'लव्ह ॲट वन साईट' अशी स्थिती झाली होती पण आजच पाहिलेल्या मुलीला तिचा विचार न कळता बोलण्याचे निलेशमध्ये धाडस नव्हते. कारण हल्ली मुलींना एखादी गोष्ट आवडली नाही तर गालावर थप्पड ठेवून देतात किंवा आरडाओरडा करतात. अशामुळे मुलाची बेअब्रू तरी होतेच आणि तो मुलगा छचोर समजला जातो. निलेशला असे काही होऊ द्यायचे नव्हते किंवा श्वेताला सोडायचेही नव्हते.
जेवण झाल्यावर जुजबी गप्पा करून श्वेता टॉयलेटकडे गेली तसे निलेशला एक कल्पना सुचली. गाडीतील या काकुंचाच फायदा का घेऊ नये. तसेपण श्वेताची त्यांच्याशी चांगली गट्टी जमलीय. श्वेता उठून गेल्यावर निलेश काकूंजवळ आला नि त्यांना म्हणाला, "काकू, या श्वेताचे स्थळ माझ्यासाठी तुम्हाला कसे वाटते? मला ती आवडली आहे .तुम्ही तिचे माझ्याविषयीचे मत जाणून घ्याल का? " आपणाला एक नवीन नाजुक नाते जुळविण्याचे काम मिळतेय या कल्पनेने काकूही हरखल्या. त्या निलेशला बोलल्या, " निलेश तू झोपण्याचे सोंग घेऊन पड मी श्वेताशी बोलते" तसे निलेशने वरच्या बर्थवर आपली पथारी पसरली आणि मस्त झोपून गेला. त्याला आता झोप कुठली लागायला! पण झोपेचे सोंग करून तो शांतपणे पडून राहिला. श्वेता हात धुवून आली नि आपल्या सीटवर बसत बोलली, काकू आता आपण झोपूया पहाटे उतरायचे आहे आपणाला" काकूंनीपण "हो हो " करत आपली बेडशीट सीटवर पसरली. दोघींचे खालचे समोरासमोरचे बर्थ असल्याने आडव्या पडल्यावर काकूंनी श्वेताला अचानक प्रश्न केला, "अगं श्वेता तुला एक गोष्ट विचारू का? तुला राग नाही ना येणार?" तसे श्वेता म्हणाली, " काकू विचारा नां! राग कशाला येईल? तुम्ही माझ्या आईसारख्याच आहात". तसे काकू हळू आवाजात बोलल्या, " श्वेता तुला हा निलेश कसा वाटतो? तुमच्या दोघांचेही लग्नाचे वय आहे. दोघेही चांगल्या कंपनीत नोकरीला आहात. तुला नवरा म्हणून निलेश आवडेल का? तुझा होकार असेल तर मी निलेशसोबत बोलते. मला तुम्हां दोघांची जोडी अगदी अनुरूप वाटते म्हणून विचारले हो" . तशी श्वेता लाजली. बराच वेळ तिने काहीच उत्तर न दिल्याने काकूंना वाटले तिला आपण विचारलेला प्रश्न आवडला नाही वाटतं म्हणून ती गप्प झाली आहे. त्या तिला म्हणाल्या, "माफ कर पोरी, पण माझ्या मनाला जे वाटलं ते मी विचारलं तुला. तुझा नकार असेल तर माझी काही हरकत नाही. हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा आणि आवडीचा प्रश्न आहे पण मी सहजच विचारले. आता तू विसरून जाऊ शकतेस" तसे श्वेता म्हणाली, "नाही काकू माझ्याही मनात ते होतं. मला निलेश पाहताक्षणीच खूप आवडला आहे. अतिशय सज्जन असा तो मुलगा वाटतो. पण मी तडकाफडकी काही निर्णय घेऊ शकत नाही. मी माझ्या आई-बाबांशी त्याविषयी बोलते आणि मग काय ते कळवते"
वरच्या बर्थवर झोपेचे सोंग घेतलेल्या निलेशला आनंदाने गुदगुल्या होत होत्या. त्याने मनातल्या मनात काकूंचे आणि देवाचे आभार मानले आणि डोक्यावर चादर ओढून घेऊन शांत झोपून राहिला. पहाटे स्टेशन यायच्या आधी श्वेता, निलेश, काकाकाकू उठून बसले. काकू आणि श्वेताने रात्रीच आपापला मोबाईल नंबर शेअर केला होता. उठल्यावर काकूंनी निलेशला त्याचा नंबर मागितला आणि त्याला श्वेताचा नंबरही दिला. श्वेता डोळ्यांच्या कोनातून आपणाकडेच पहात आहे असे निलेशला वाटले. तो मात्र श्वेताकडे पाहण्याचे कटाक्षाने टाळत होता. न जाणो तिला काहीतरी गैरसमज व्हायचा असे त्याला वाटले.
इप्सित स्टेशन आल्याची उद्घोषणा झाल्याबरोबर सर्वजण स्टेशनवर उतरले. आता सर्वांचे मार्ग निरनिराळे होते पण एका रात्रीच्या ट्रेनच्या प्रवासाने ते एका अनोख्या नात्यात बांधले जाणार होते आणि त्यांचा मध्यबिंदू प्रवासातील त्या काकू होत्या. त्यामुळे दोघेही एकत्रच काकूंकडे वळून बोलले,
" चला काकू, भेटू पुन्हा" दोघांनी एकत्रच बोलताना दोघांच्या चेहऱ्यावर हसू फुटले आणि काकूंनी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी हात वर केला. "तुम्हां दोघांची जोडी अशीच सुखी राहू दे" असे पुटपुटत काकू आपल्या घराच्या दिशेने निघाल्या. श्वेताने निलेशकडे वळून "टाटा, बाय-बाय सी यु" असे म्हणत निरोप घेतला. निलेश गालातल्या गालात हसत "ओके, बाय बाय" म्हणत आपल्या घरी जाण्यासाठी बसस्टॉपकडे निघाला. मध्यस्थ काकूंच्या प्रवासातील संभाषणामुळे त्या दोन तरूण मनातील आशाअपेक्षांची लवकरच फलश्रुती प्राप्त होणार होती. दोघेही घरी जावून आपापल्या पालकांना आपल्या निवडीविषयी बोलणार होते. फक्त घरी पोहोचायचाच अवकाश होता.
फलाटाबाहेर येताच निलेशने बस पकडली आणि एका तासातच घरी पोहोचला. निलेश येताच आईने त्याच्यावरून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकल्या आणि त्याला फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसण्यासाठी सूचना केल्या. निलेशने आपली बॅग आपल्या रूममध्ये ठेवली. तोंडाने मस्त शीळ घालत स्नानादी उरकून तो डायनिंग टेबलवर येऊन बसला. निलेश खुर्चीवर येऊन बसताच आधीच येऊन बसलेल्या आई-बाबांनी त्याच्याशी लग्नाचा विषय काढला. आईने तिच्या जवळील पत्रिका आणि फोटो निलेशच्या पुढ्यात ठेवले आणि "यातील एक मुलगी पसंत कर" म्हणून विचारले. निलेशने आल्या आल्या श्वेताचा विषय नको म्हणून मुलींचे फोटो पाहण्याचे नाटक केले.
नाश्ता वगैरे उरकून तो आपल्या रूममध्ये गेला आणि त्याने श्वेताला फोन लावला. श्वेताने लगेच फोन उचलला जणू काही ती निलेशच्या फोन येण्याची वाटच पाहत होती. श्वेताने आपल्या आई-वडिलांशी निलेशबाबत आत्ताच सांगितले होते. दोघांनी आता काकूंना फोन करून मध्यस्थी करण्याचे सुचवावे असे ठरले. त्याप्रमाणे निलेशने काकूंना फोन केला आणि त्यांना आईचा नंबर दिला. थोड्याच वेळात काकू आईशी बोलताना आईच्या तोंडावर फुललेले हसू निलेशला दिसून आले आणि निलेश आतल्या आत खुश झाला. आईकडून ग्रीन सिग्नल मिळताच आपणही त्या विषयावर बोलू आईशी बोलू असे ठरवून तो आईचा फोन संपण्याची वाट पाहू लागला. आईने फोन खाली ठेवताच निलेशकडे पहात विचारले, "काय म्हणतोस बेटा! एका रात्रीतच लग्न जमवलंस वाटतं!" तसा निलेश लाजला आणि आईकडे वळून म्हणाला, "आई तुझ्या परवानगीची मी वाट पाहत आहे. लवकरच त्या काकू श्वेताच्या आई-वडिलांना घेऊन आपल्या घरी येतील. तेव्हा तुम्ही काय ती बोलणी करा" निलेशने असे म्हणताच आई म्हणाली, "मिया बिवी राजी, तो क्या करेगा काजी? माझ्याकडून तुमच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा! आम्ही आता सर्व काही पुढचे बघून घेऊ तुम्ही निवांत रहा. भटजींना सांगून लवकरच लग्नाचा मूर्त ठरवते नाही तर 'उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग' म्हणून तू आधीच श्वेताबरोबर फिरणे सुरू करशील. तत्पूर्वी आम्हाला तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढून घ्यावा लागेल, म्हणजे खरेदी उरकायला बरी" निलेशच्या आईने निलेशच्या बाबांकडे वळून म्हटले, "पहा आपल्या चिरंजीवाने बाजी मारली आहे. आपली मदत न घेताच परस्पर लग्न ठरवले, तेही एका सुंदर, सुशील अशा मुलीसोबत. आता लवकरच बोलणी करून "शुभमंगल सावधान" उरकावे नाहीतर हे दोघे कोर्टात जाऊन लग्न करून येतील" असे म्हणत निलेशची आई खो-खो करून हसू लागली. निलेश या बाबांनी देखील निलेशला शुभेच्छा दिल्या आणि निलेशकडे वळून "आम्ही आता सर्व बोलणी करू, तू काही काळजी करू नकोस" असे सांगितले.
निलेशच्या मनात आनंदाने उकळ्या फुटत होत्या. आता लवकरच श्वेता आपली प्रिय पत्नी होणार या विचारातच निलेश शांतपणे झोपी गेला. पुढे लवकरच निलेश आणि श्वेताच्या आई-बाबांनी लग्नाविषयी चर्चा करून मुहूर्त काढला आणि पुढच्याच महिन्यात शुभमंगल होऊन श्वेता लक्ष्मीच्या पावलांनी निलेशच्या घरात प्रवेशली. ट्रेनच्या एका प्रवासाने दोघांच्या जीवनात नव्या आणि अनोख्या नात्यांचे अनुबंध जुळून आले होते. दोन तरूण जीवांचे मिलन झाले होते. 'लग्नाच्या गाठी
स्वर्गातच जुळवल्या जातात' हा नियतीचा नियम निलेश आणि श्वेताच्या बाबतीत खरा ठरला होता. लग्नानंतर पूजा, गोंधळ उरकल्यानंतर निलेश आणि श्वेताने हनिमूनचे पॅकेज बुक केले आणि विमानाने थायलंडला जाऊन पोहोचले. आता त्यांच्या प्रेमाला काहीच अटकाव नव्हता. कालपर्यंत अनोळखी असणारे ते प्रेमी लग्नाच्या बंधाने बांधले गेले होते. ट्रेनच्या फक्त एका रात्रीच्या प्रवासात दोघांचा वाड्.निश्चय सफल झाला होता. दोन मने जुळली होती, प्रेमाची सतार छेडली अन् त्याची परिणती विवाहसाफल्य होण्यात गेली होती. रेशीमबंधाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात असे म्हणतात पण ती नाती जुळण्यासाठी दोन हृदयांतील प्रेमभाव जागृत व्हावा लागतो तो पृथ्वीवरच! निलेश आणि श्वेताची मने जुळली ती ट्रेनच्या एका रात्रीच्या प्रवासातच.....

सौ. भारती दिलीप सावंत
खारघर, नवी मुंबई

9653445835

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू