पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आईचे माझ्या जीवनातील स्थान

       आईचे माझ्या जीवनातील स्थान!

        तीर्थरूप आई,

       शि.सा.नमस्कार.

     कै. हा शब्द लिहिताच आला नाही कारण तू केवळ शरीराने आमच्यापासून दूर निघून गेली आहेस. परंतु तुझे संस्कार, तुझे विचार, तुझा प्रामाणिकपणा, तुझा आत्मविश्वास, तुझे धाडस, तुझा धीटपणा, संकटाशी धैर्याने लढण्याची वृत्ती अशा अनेक गोष्टी आहेत ज्या समोर ठेवून आम्ही मार्गक्रमण करीत आहोत. आई हा पहिला गुरु आहे असे म्हणतात पण तू तर शेवटपर्यंत मार्गदर्शन करीत होतीस, चांगले वाईट समजावून सांगत होतीस त्यामुळे तू पहिली नव्हे तर कायम आमच्या गुरुस्थानी होतीस. ह्यामुळेच की काय तू सोडून गेलीस आणि आम्हाला गुरुची उणीव भासू लागली म्हणून आम्ही श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी लीन झालो.

       बाबा आपल्याला सोडून गेले तेव्हा मी नुकताच दहावीच्या वर्गात प्रवेश केला होता. तशात आपल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु माझे लहानपण, स्वतःची लग्नाची मुलगी याकडे बघून तू स्वतःचे दुःख पार दाबून टाकले. आम्हा बहीण- भावाच्या पाठीशी ठामपणे उभी तर राहिलीच परंतु आईबाबाची दुहेरी जबाबदारी पार पाडताना प्रेमही दिले, स्वावलंबनाचे, आत्मविश्वासाचे नकळत धडेही दिलेस. तू जर स्वतः कोलमडली असती तर कदाचित मी वेगळ्या मार्गाने गेलो असतो. ताईचे लग्न झाले नसते. अजून काय संकटे कोसळली असती ह्याची कल्पनाही करवत नाही. केवळ तुझ्या धीरोदात्त स्वभावामुळे फार मोठी संकटे फारशी आपल्या कुटुंबाकडे फिरकली नाहीत. जी आली ती तू आखलेली लक्ष्मणरेषा ओलांडून घरात येऊच शकली नाहीत. समाजाच्या दृष्टीने कुटुंबप्रमुख नसलेल्या कुटुंबात तरुण मुलगी असली की नाना संकटं चढाई करतात परंतु तू खंबीर असल्यामुळे त्या दृष्टीने पाहण्याची कुणाची हिंमत झाली नाही.

      तुझा धीरोदात्तपणा हा तत्कालिक नव्हता तर तो नैसर्गिक आणि अंगभूत असा होता. मी तिसऱ्या वर्गात शिकत असताना वडील डॉक्टर असलेल्या एका माझ्या मित्राने त्यांच्या दवाखान्यातील गोळ्या शाळेत आणल्या नि आम्हा काही मित्रांना खायला दिल्या. आमची विशेष मैत्री असल्यामुळे त्याने मला इतरांपेक्षा जास्त गोळ्या खायला दिल्या. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. मला शाळेतच उलट्या सुरु झाल्या. घरी येईपर्यंत मी बेशुध्द झालो. शिपायाने खांद्यावर उचलून घरी आणले. घरी तू एकटीच होतीस. बाबा नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावी शाळेत गेले होते. शिपाई सारे काही सांगत असताना तू मनोमन एक निर्णय घेतला. मला तातडीने दवाखान्यात घेऊन गेलीस. माझी स्थिती पाहून तू हातपाय गाळून, अश्रू ढाळीत बसली असतीस तर कदाचित मी या जगात नसतो परंतु तू धीराने वागून सारी सूत्रं हातात घेतलीस. तसाच प्रसंग बाबांच्या आजारपणात आपण अनुभवला. बाबा जवळपास दहा महिने अंथरुणावर पडून होते. त्यांचा पगार बंद होता. दुसरी कमाई किंवा शिल्लक शून्य असताना तू डगमगली नाहीस. बाबांच्या औषधोपचारासाठी काहीही कमी पडू दिले नाहीस. आपल्या दुर्दैवाने बाबा हे जग सोडून गेले परंतु तू खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी राहिल्यामुळे आम्ही सन्मार्गाला लागलो.

        देवावर तुझा प्रगाढ विश्वास होता. 'जे काही चांगले होते ते देव करतो व जे काही वाईट होते ते आपल्या कर्माचे फळ असते.' असे तू मानत असे. देवाची पूजा, जप, आरती तू अगदी मन लावून करीत असे. बाबा गेल्यानंतरही तू देवधर्माच्या बाबतीत मुळीच तडजोड केली नाहीस. पारंपरिक सारे सण तू त्या कठीण काळातही पूर्णत्वास नेले. तुला अनेक स्तोत्रे, पोथ्या तोंडपाठ होत्या. महत्त्वाचे म्हणजे तू कधीच शाळेत गेली नाहीस पण तरीही तुझे पाठांतर पक्के होते. एकदा ऐकले की तुझ्या सारे स्मरणात कायम राहत होते. किती आश्चर्याची गोष्ट होती ना ही! 

         'उपाशी राहू पण स्वकष्टाचे खाऊ, इज्जतीने राहू' हा तू तुझ्या वागण्यातून नकळतपणे आमच्यापुढे फार मोठा आदर्श ठेवला होता. 'कोंड्याचा मांडा करुन कसा खावा आणि दारिद्रयातही स्वत्व व सत्त्व न गमाविता कसे राहावे...' हे सानेगुरूजींच्या आईनेच  शिकविले... होते. अगदी तशीच तुझी शिकवण होती. किती उत्कृष्ट शिकवण आहे ना ही. मुलांनी स्वाभिमानाने जगावे यासाठी हा गुरुमंत्र ठरावा शिवाय त्रिकालाबाधित अशी ही शिकवण आहे. तू स्वतः इतर घरी कामे करण्याची तयारी चालवली होती परंतु कुणा पाहुण्यांकडे आश्रित म्हणून जायचा तू विचारही केला नाहीस. तुझा हा निश्चय आमच्यासाठी स्वावलंबनाचा मोठा आदर्श पाठ होता. त्यातून प्रेरणा घेऊन मी सुरवातीला एका वाचनालयात आणि नंतर अध्यापक विद्यालयात शिकताना टायपिंग इन्स्टिट्यूट आणि प्रिंटींग प्रेसमध्ये काम केले. ताईनेही एका शाळेत शिक्षिकेची नोकरी केली. त्यातून आपल्या तिघांचा घरखर्च जेमतेम भागत होता. लहानवयात कष्टाची कामे करताना तुझे शब्द नेहमी प्रेरणा देत असत. तू म्हणायची, 'हे दिवस निश्चित जातील. ह्यांची पेंशन एकदा सुरु झाली आणि त्यांच्या जागी (अनुकंपा) तुला नोकरी लागली की आपल्याला कशाचीही ददात भासणार नाही.' इतक्या वर्षांनी आज वाटते, तुझे समजावून सांगणे हे केवळ सांगणे नव्हते, धीर देणारे तर होतेच पण जणू भविष्य तुला स्पष्टपणे दिसून येत होते. दोन- तीन वर्षांचा तो काळ तसा कठीण होता. तो अत्यंत वेदनादायी काळखंड आपण केवळ तुझ्यामुळे यशस्वीपणे पार पाडला. मला शिक्षकाची नोकरी लागली आणि एक फार मोठी चिंता दूर झाली. तुलाही सेवानिवृत्ती वेतन सुरु झाले परंतु बँकेत जाऊन सही करुन घरी येताच पैसे आलमारीत ठेवून देणे एवढाच तुझा आणि सेवानिवृत्ती वेतनाचा संबंध असे. बाकी कधी कशासाठी तू हट्ट केला नाहीस. 

       तुझा स्वभाव तसा विनोदी. तशा संकटकाळातही तू स्वतःचे दुःख लपवून चेहऱ्यावर हसू आणत असे, प्रसंगी विनोद करुन हसे फुलवत असे. तू कधी हातपाय गाळून बसलेली, चिंताक्रांत झालेली आम्ही बघितले नाही. बाबा गेल्यानंतर प्रसंगोपात तुझ्या डोळ्यात आसवे यायची परंतु आम्ही कुणी समोर असताना तू आसवांना बाहेर येऊ दिले नाहीस. संकटाशी तू लढलीस, झगडलीस परंतु कधी हरली नाहीस. आलेल्या संकटांशी यशस्वी सामना करुन तू सतत ठामपणे उभी राहत होतीस. तुझा हाच गुण आमच्यासाठी अनुकरणीय होता.

       बाबा गेल्यानंतर जिथे दोन वेळच्या जेवणाची ददात होती तिथे घरभाडे कुठून देणार? परंतु तुझा आणि बाबांचा शांत स्वभाव, सर्वांसोबत मिळूनमिसळून राहण्याची वृत्ती, प्रामाणिकपणा आणि तुम्ही कमावलेला विश्वास यामुळे जिथे घरमालकांनी थकलेल्या घरभाड्यासाठी तगादा केला नाही तिथे दोन- तीन किराणा दुकानदारांनीही पैशासाठी लकडा लावला नाही. माझा डी.एड्. ला क्रमांक लागला तेव्हा ते गाव सोडताना कुणीही थकलेल्या रकमेसाठी आडकाठी आणली नाही. बाबांचे पैसे मिळताच तू सर्वांची रक्कम देऊन मला त्या गावी पाठवले. सारेजण आश्चर्यात पडले कारण प्रत्येकाने आता पैसे मिळणार नाहीत असेच गृहीत धरले होते. एक दुकानदार तर आपल्याकडे बाकी आहे हेही विसरुन गेला होता. तीन वर्षांनंतर पैसे मिळत आहेत याचे सर्वांना कौतुक वाटत होते. कुणाच्याही उपकाराच्या ओझ्याखाली राहायचे नाही. उशीर होईल परंतु देणी देऊन मान ताठ ठेवायची ही तू कृतीयुक्त शिकवण, संस्काराची फार मोठी शिदोरी आम्हाला दिली आहेस. त्याहीपेक्षा परिस्थितीशी कसा सामना करावा, मार्ग कसा काढावा, संयम कसा महत्त्वाचा असतो, अशा अनेक गोष्टी तू स्वतःच्या आचरणातून आमच्या मनावर कायम बिंबविल्या. मला नोकरी लागताच ताईचेही लग्न झाले. पाठोपाठ माझेही लग्न झाले. जावई आणि सून दोघेही चांगले मिळाल्यामुळे तू फार आनंदी होतीस, मधला कालखंड विसरण्याच्या प्रयत्नात असताना त्याच कालावधीमधील सततच्या काळजी, चिंता, दगदग अशा गोष्टींमुळे तुला अतिउच्च दाबाचा आजार घडला. तशातच जेव्हा माझ्या लग्नाचा विचार तू बोलून दाखवला तेव्हा 'नोकरीची पत्नी हवी' ही माझी इच्छा पाहून तू तत्काळ होकार दिला. 

      तुझे तुझ्या सुनेसोबत खूप छान धागे जुळले होते. दोघींनाही घरकामाची प्रचंड आवड असल्याने तुम्हा दोघींमध्ये घरकामासाठी वादविवाद झाला असल्याचे मला आठवत नाही. दोघी एकमेकींना समजून घेऊन, विचार विनिमय करुन सारे काही करीत असत. खाण्याचे विविध पदार्थ करणे आणि इतरांना खाऊ घालणे हा तुम्हा दोघींमध्ये एक समान धागा होता, त्यात तुम्हाला अतोनात समाधान मिळत असे. त्यामुळे मला घराची काही चिंता नव्हती. तू आम्हाला सोडून कायमची गेलीस आणि हिला फार मोठा धक्का बसला. त्यातून सावरायला हिला बराच कालावधी लागला. मुळात तुमच्या दोघींमध्ये 'सासू-सून' हे नाते नव्हतेच कधी. तुमच्या दोघींमध्ये असलेले प्रेमाचे, मायेचे संबंध इतर सासू- सुनांसाठी आदर्श होता. माय- लेकीमध्ये जो प्रेमाचा पदर असतो त्याहीपलीकडे तुमचे नाते होते. तू गेलीस त्या मध्यरात्री सारे झोपलेले असताना एक हंबरडा निनादला. तो हंबरडा होता तुझ्या सुनेचा! तुझ्या वर्षश्राद्धाला 'सासू नव्हे सावली सुखाची' ही पुस्तिका तुझ्या सुनेने लिहून प्रकाशित केली होती कदाचित ही दुर्मिळ घटना असावी यावरून तुमचे संबंध लक्षात यावेत. नातवांवर तुझे खूप प्रेम होते आम्ही दोघे नोकरीला गेल्यावर तू मोठ्या आनंदाने त्यांना सांभाळले, खेळवले, सुसंस्कारित केले. आज तुझ्या तिन्ही नातवांची लग्ने झाली आहेत, त्यांनाही मुले अर्थात तुला पणतु झाले आहेत. आज तू असतीस तर तुला फार आनंद झाला असता हे आम्ही जाणतो. असो. ईश्वरेच्छा! सोबत तुझे बोल आठवतात. तू म्हणायचीस, 'जेवढे आणि जसे देवाने दिले त्यात समाधान मानायचे. जास्ती मिळविण्याची हाव धरली की पदरी निराशा येते.'

         आहे त्या परिस्थितीला सामोरे कसे जायचे हे तुझ्याकडूनच शिकायला मिळालं, प्राप्त स्थितीत समाधान मानण्याची तुझी वृत्ती शिकण्यासारखी होती. तुझी निर्णय क्षमता आश्चर्यकारक होती. आमच्या वाचनात 'श्यामची आई' सातत्याने येते परंतु तिचे खरेखुरे दर्शन आम्हाला तुझ्या रुपाने नेहमीच होत होते. आमचीही आई श्यामच्या आईप्रमाणेच होती हे आम्ही आज आत्मविश्वासाने सांगू शकतो. कदाचित आम्ही तुला ओळखण्यात कमी पडलो. असो. 

     आई, तुझी क्षणोक्षणी, पदोपदी आठवण येते असे मी म्हणणार नाही कारण जे दूर जातात त्यांची आठवण येते. तू शरीराने दूर गेली असलीस तरी मनाने, तुझ्या आदर्श विचारांनी, तू केलेल्या संस्काराच्या रुपाने तू सदैव आमच्यासोबतच आहेस म्हणून तुला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून थांबतो...

                     ००००

 

          नागेश सू. शेवाळकर,

          पुणे 411057

         ????9423139071.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू