पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बीग बी एक : भूमिका अनेक

 *बिग बी एक : भूमिका अनेक!*
        एकदा एका सिनेमाचे चित्रीकरण सुरू असताना एका सुप्रसिद्ध अभिनेत्याला दुर्दैवाने अपघात झाला. जखम फार मोठी असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर होती. कुटुंबीय, नातेवाईक, परिचित, मित्रमंडळी, सहकारी आणि असंख्य रसिकांवर चिंतेचा डोंगर कोसळला होता. वैद्यकीय पथक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते परंतु परिस्थिती सुधारत नव्हती. ती सारी हवालदिल परिस्थिती पाहून एका जगविख्यात व्यंगचित्रकाराने सरळसरळ यम देवता आणि यमदूत यांना व्यंगचित्रातून आव्हान दिले. यमदूताचे चित्र काढून त्याखाली असे लिहिले होते, 'खबरदार! ब्रीच कॅंडी इस्पितळाच्या आसपासही फिरकायचे नाही. जर तिथे कुठे दिसलास तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत.'
       ब्रीच कॅंडी इस्पितळात मृत्यूशी झुंज देणारा नायक होता बिग बी. अर्थात करोडो रसिकांच्या हृदयावर राज्य करणारा अमिताभ बच्चन! कुली चित्रपटाचं शुटिंग करताना अमिताभ गंभीर जखमी झाला होता. अमिताभसाठी थेट यमदूताशी पंगा घेणारे व्यंगचित्रकार होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे!
      अमिताभ बच्चन हे चित्रपट सृष्टीतील एक अजरामर असे नाव! ११ ऑक्टोबर १९४२ रोजी प्रयागराज येथे सुप्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चन आणि तेजी बच्चन या दांपत्याचा पोटी जन्म घेतलल्या बालकांचे नाव अमिताभ ठेवण्यात आले. अमिताभ या शब्दाचा अर्थ शाश्वत प्रकाश असा होतो. एकूण अमिताभची कारकीर्द पाहता त्याने स्वतःच्या नावाची सार्थकता सिद्ध केली आहे. हे नाव सुप्रसिद्ध कवी सुमित्रानंदन पंत यांनी सुचविले होते.
       अमिताभ बच्चन यांचे शिक्षण एम.ए. (दोन वेळा), मास्टर ऑफ आर्ट्स झाले आहे. ज्ञान प्रबोधिनी,  बॉईज हायस्कूल इलाहाबाद, शेरवूड कॉलेज नैनीताल, किरोडीमल कॉलेज (दिल्ली विश्वविद्यालय) अशा नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये झाले.
      'सात हिंदुस्थानी' या चित्रपटात अमिताभला अभिनय दाखविण्याची संधी मिळाली. नवागत कलाकाराला मिळणारा सर्वश्रेष्ठ नवांगतुक पुरस्कार अमिताभला पहिल्याच भूमिकेसाठी मिळाला. अमिताभ पाहता पाहता चित्रपट नगरीचा बादशहा झाला. अर्थात त्याला मिळालेले हे यश सहजासहजी मिळाले नाही. अपरिमित कष्ट, साहस, संयम, धैर्य, धाडस, आत्मविश्वास, इच्छा शक्ती इत्यादी अनेक गोष्टींमुळे तो सध्याच्या अढळ पदावर विराजमान झाला आहे. पद्मभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय फिल्म पुरस्कार, सीएनएन-आयबीन इंडियन ऑफ द इयर इत्यादी अनेक गौरवाचा तो मानकरी ठरला आहे.
       अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांच्या लग्नाची गमतीदार गोष्ट स्वतः अमिताभ यांनी सांगितली. ते दोघे अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम करीत होते. नकळत प्रेमाचे धागे गुंफल्या गेले परंतु अमिताभ यांनी कधीच लग्नाचा प्रस्ताव मांडला नाही. मात्र 'जंजीर' सिनेमाचे चित्रीकरण सुरू असताना दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामागे एक कारण होते, दोघांनाही लंडन पाहायचे होते. जंजीर सिनेमा गाजला आणि अमिताभ यांनी सुट्टी घेऊन लंडनला जयासोबत जात आहे असे सांगितले तेव्हा वडिलांनी ठामपणे सांगितले की, दोघांनाही जायचे असेल तर लग्न करा आणि मग जा. त्याप्रमाणे दोघांचे विधिवत लग्न झाले आणि लंडनला गेले...
      चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून त्याची सर्वदूर ख्याती आहे. त्यासाठी  एकाच चित्रपटाचे नाव पुरेसे आहे ते म्हणजे शोले! जय-वीरू या अविस्मरणीय जोडगोळीतील त्याची जय ही भूमिका कायम लक्षात राहणारी आहे. विशेष म्हणजे १९७५ ला प्रदर्शित झालेल्या शोले या चित्रपटाने त्या काळात एक क्रांती केली होती. धर्मेंद्र, हेमामालिनी, संजीव कुमार, जया भादुरी आणि गब्बर सिंग अर्थात अमजद खान ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट दोनशेहून अधिक मिनिटांचा कालावधीचा होता. ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट २००२ सर्वेक्षणात शोलेला सर्वश्रेष्ठ दहा सिनेमांपैकी एक असा गौरव प्राप्त झाला.
     शोले चित्रपटात अमिताभने केवळ गब्बर सिंग आणि त्यांचे साथीदार यांच्याशीच मुकाबला केला नाही तर ठाकूरला प्रथम भेटायला जाताना बसंतीच्या घोडागाडीत बसून बसंतीच्या बडबडीला थांबविण्याचा प्रयत्न करणारा जय, ठाकूर इन्स्पेक्टर विधवा तरुण सून हिच्याशी मूक मैत्री केली. होळीच्या निमित्ताने वस्तीवर गब्बरने हल्ला केला तेव्हा जीवाची पर्वा न करता वीरूसह लढणारा जय, बसंतीला मंदिरातील मूर्तीच्या मागे लपून वीरू स्वतःची स्तुती ऐकवणाऱ्या वीरूजवळ बसंतीला नेणारा जय, वीरूसाठी बसंतीचा हात मागायला जाणारा जय एखाद्या निरागस बालकाप्रमाणे त्याच्या दुर्गुणांचा पाढा वाचणारा जय, वीरू आणि बसंतीला गब्बरने पकडल्याचे समजताच जीवाची पर्वा न‌ करता एकटाच वीजेच्या वेगाने गब्बरच्या अड्ड्यावर मित्राला वाचवायला पोहचलेला जय यासह त्याच्याजवळ असलेल्या नाण्याची दुसरी बाजू वीरूसमोर येते तेव्हा एकटा वीरू रडत नाही तर असंख्य रसिकांचे डोळे पाणावतात ही ताकद आहे अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची!
       ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे
       तोड़ेंगे दम मगर
       तेरा साथ ना छोडेंगे… असे म्हणत नाण्याच्या सहाय्याने, मित्राला वाचविण्यासाठी मरण ओढवून घेणारा जय रसिकांची मानवंदना मिळवून जातो. त्याच्या अंगभूत अभिनय कौशल्याचा परिचय रसिकांना होतो म्हणून तो आजही ब्याऐंशीव्या वर्षी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करीत आहे... अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या चित्रपटांची संख्या आणि रसिकांच्या ओठांवर घोळणाऱ्या गीतांची संख्या इतकी मोठी आहे की, तोच एक लेख होईल.
      सामाजिक कार्यातही बच्चन आघाडीवर असले तरीही त्याची फारशी चर्चा कुठे करीत नाहीत. संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कोच्ची येथील रेसुल पुकुट्टी संस्थेला मदतीचा हात, पोलीस कुटुंबीयांना मदत, हरिवंशराय बच्चन मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून सौर ऊर्जेचा स्रोत जवळपास तीन हजार घरांना लाभ, पोलिओ निर्मूलन, युनिसेफ आणि डब्ल्यूएचओ सद्भावना राजदूत, महाराष्ट्र पोलीस निधी, कोवीड काळात आर्थिक मदत इत्यादी माध्यमांतून सामाजिक कार्यातही सहभाग घेतला आहे.
       सहजसुंदर, विविधांगी भूमिका सशक्तपणे साकारणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांना यावर्षीचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा प्रतिष्ठेचा, सन्मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून २४ एप्रिल रोजी तो त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. बिग बी चे मनापासून अभिनंदन!    
                 ००००
          नागेश शेवाळकर, पुणे
         (९४२३१३९०७१)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू