पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

काळरात्र




" काय रे! नक्की तू एकटा येशील?"


आई ने विचारलं आणि मी चिडलो,


" कितीदा तेच तेच विचारशील? एकदा शेवटचं सांगतो ,मी एकटा येणार म्हणजे येणार. आता तुम्ही सगळे निघा."


परत आई म्हणाली,


" बघ बाळा! रात्रीचा येऊ नकोस दिवसाच पोहोच हो."

आणि मी चिडलो,


" अगं मी काय कुक्कुलं बाळ आहे का? मी चांगला अकरावीत शिकणारा आहे. आता सूचना देणं थांबव. निघा तुम्ही."


हे सगळे संवाद आठवले मला कारण, बस त्या गावी थांबली. उतरणारा मी एकटाच होतो. बस मला सोडून पुढे निघून गेली. रात्रीचे नऊ वाजले होते आणि थोडी भीती वाटत होती.


" मी येतो आहे"


हे माहित  असूनही  कोणीच कसे घ्यायला आले नाही ह्याचं मला आश्चर्य वाटत होतं. गाव असल्याने काही साधन ही नव्हतं घरी जाण्यासाठी. बरं कोणाकडून मदत मागावी म्हटलं तर एक चिटपाखरूही दिसत नव्हतं. त्यामुळे थोडी भीती वाटत होती.


इतक्या अंधारात घरी जायचं ह्या विचाराने माझा थरकाप उडाला.बरं इथे थांबून रहावं तर ते ही शक्य नव्हतं. मी दोन तीनदा मामाकडे आलेलो होतो. नेहमी कोणी तरी घ्यायला यायचं म्हणून घराचा रस्ता ही अचूक म्हणता येईल असा माहित नव्हता.

तितक्यात दूरून एका गाडीवाल्याने हाक मारली,


" ए पोरा ! रात्रीचा गावात जायला निघालास. जरा जपून जा हो."


आता तर मी जास्तच घाबरलो पण त्याला खोट्या विश्वासाने म्हणालो,


" हो मामा! जपूनच जाईन. तसा मी अनेकदा आलो आहे.त्यामुळे काळजी करू नका."

ती गाडी विपरीत दिशेला जात असल्याने मदतीची आशा नव्हतीच.


 मनाचा हिय्या करून मी चालू लागलो. मला इतकं माहित होतं की घरी जायच्या रस्त्यावर काही अंतर  जंगलातून पार करावं लागतं. दिवसा काहीच वाटायचं नाही पण रात्री?


खरंतर मी दिवसाच येणार होतो पण मित्रां बरोबर पार्टी असल्याने मी उशीराची बस धरली होती. आमची अकरावीची  सहामाही परीक्षा संपली होती म्हणून थोडं सेलिब्रेशन. आई, वडील,बहीण आणि भाऊ अगोदरच गावात पोहोचले होते. यंदा दिवाळी गावीच साजरी करायची हे ठरलं होतं.


मी स्वतःवर आणि मामावर रागवत हळूहळू चालायला सुरुवात केली. हे शहर नव्हतं त्यामुळे साडे नऊलाच अंधार गुडुप होता. वाटेत रात किड्यांची किर्र  किर्र ऐकू येत होती. चालताना पाया खालची पानं चर्र चर्र वाजत होती. थोड्या वेळात मला सर्र सर्र असा आवाज ऐकू येऊ लागला आणि तो माझ्या बरोबर चालत येत आहे असं वाटू लागलं. आता माझी पाचावर धारण बसली. काय भूत वगैरे असेल नाहीतर साप असं वाटून धडधड सुरु झाली.  मधेच एखादी टिटवी किंचाळून निघून जायची. मी भराभर पाय उचलत काही खूणा आठवत चालत होतोआणि तो आवाज ही बरोबर चालत होता. मी भयग्रस्त झालो होतो.


काही वेळाने दूर खूप लोकांचे आवाज ऐकू आले. माझी भीती थोडी कमी झाली‌. मी आनंदाने धावणार इतक्या अंधारात खर.. खर.. असा आवाज ऐकू आला. कोणी तरी काही तरी ओढत  असल्या सारखा. लोकांचे आवाज ही बंद झाले होते.


मी झाडामगे लपलो. डोळे फाडून बघितलं आणि मला वाटलं माझं भान हरपेल.  मी भयाने गोठून गेलो. कारण जरा दूर एक वाघ,कोणातरी माणसाला तोंडाने धरून ओढत आणताना दिसला. तोंडावर हात ठेवून मी आपली किंकाळी दाबली. मला आठवलं की  म्हणतात वाघाला माणसाचा वास येतो‌.

" देवा! त्याला माझा वास नक्कीच आला असेल. म्हणजे आज माझा शेवट."


मी खूप वेळ श्वास दाबून ठेवला पण किती वेळ? वाघ आता माणसाला सोडून आपल्या जिभेने आपले ओठ गाल पुसत होता. माझं सगळं लक्ष त्या वाघाकडेच होतं. एक एक क्षण युगायुगाचा वाटत होता. वाघाने यथेच्छ ते शरीर खाल्लं आणि तो निघून गेला. मला सारखं असं वाटतं होतं की तो माझ्यावर दबा धरून बसला आहे.


मी आपला जीव मुठीत घेऊन बसून होतो. हळूहळू उजाडायला सुरुवात झाली. थोडं बळ आलं अंगात. मी चालायला सुरुवात केली.


काही अंतर चालून गेल्यावर मला काही माणसं दिसली. अत्यानंदाने मी त्यांच्या जवळ धावलो.


" काय रे पोरा! तू इतक्या पहाटे पहाटे कुठुन आलास?"त्यांनी मला विचारलं.


" अहो! मामा मी कोरणेवाडीला निघालोय."


" बरं ! अजून बरंच अंतर आहे. जपून जा. काल इथे जरा विपरीत घडलंय."


आणि रात्रीचा  प्रसंग डोळ्यासमोर आला. मी झपाझप पावलं टाकत पुढे चालत होतो. 


मनात  येत होते,


'कोण ती व्यक्ती असेल जिला तो वाघ घेऊन गेला होता.'


'त्याच्या घरी काय परिस्थिती ओढावली असेल'


' कसे असतील त्याच्या घरची लोक?'


हे विचार मनात घोळवतच मी कसा तरी धडपडत गावात पोहोचलो. सारं गाव एकत्र होतं पण स्मशान शांतता. कळलं की काल रात्री वाघ ज्या माणसाला घेऊन गेला होता तो माझा मामा होता.


म्हणजे मी रात्रभर मामा सोबत होतो आणि त्याचे लचके तोडून खाणाऱ्याला बघत होतो.


ती रात्र सर्वार्थाने काळ रात्र होती.


राधा गर्दे

कोल्हापूर 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू