पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अयोध्येत वसले श्रीराम घराघरात रावण निष्काम

अयोध्येत वसले श्रीराम,घराघरात रावण निष्काम

        सुसंस्कार देती आई
        कन्येला घरात परोपरी
        रावणाच्यासंगे रहिवास
               लग्न होऊन सासरचा उंबरठा ओलांडून इवलीशी, फूल बनू पाहणारी कळी सासरच्या घरात नवीन स्वप्नं पहात पाऊल टाकते. नव्याचे नऊ दिवस भुर्रकन उडून जातात अन् अचानक तिला कळते नवरा तंबाखू आणि दारूच्या अधिन आहे.  आई-वडिलांपुढे मान वर करून आणि उलटून न बोलणारी ही कोवळी कळी उन्मळून पडते. अरे काय आले आपल्या नशिबी! "आपण किंवा आपल्या आई-वडिलांनी या व्यक्तीला काहीच प्रश्न न करता होकार कसा दिला?" ती कळी मनालाच विचारते आणि मनातच आक्रंदन करत रहाते. आपण लग्नापूर्वी मुलाची नोकरी, शिक्षण, घराणे, बाह्यरूप, आर्थिक परिस्थिती  पहिली. मग व्यसनी आहे किंवा नाही हे कसे पाहिले अवलोकिले नाही? आता या व्यसनी माणसाशी आपली आयुष्यभराशी गाठ आहे. जीवन कंठत जाते. व्यसनी माणूस मात्र त्याच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे आठवड्यातील तीन-चार दिवस व्यसन करत असतो. कधी मित्रांसोबत बाहेर पार्टी तर कधी मित्रांना घरी बोलवून पार्टी! ही निष्पाप कळी मात्र ज्या मुलीला आपला नवरा निर्व्यसनी हवा असतो, ती असहाय्य होऊन पाहतच राहते. काही बोलले तर नवऱ्याकडून मार मिळणार हे ठरलेलेच! त्यामुळे मूक आक्रंदन करत राहते. कुणाला सांगायचे! सासू-सासरे मुलाकडून पैसे मिळाले की खुश असायचे, मग मुलगा व्यसनी असो की नसो, त्यांना काय फरक पडणार!
                    तिचे आई-वडील हतबल! कारण त्यांच्या दुसऱ्या मुलींची लग्ने व्हायची असतात. त्यांच्या संसारातील कटकटी, अडचणी त्यांना सोडवायच्या असतात. भरपूर खर्च करून आपण मुलीचे लग्न करून तिला चांगल्या घरात दिले असताना त्यांची तिच्याविषयीची जबाबदारी संपलेली असते. "दिल्या घरी तू सुखी रहा" असा आशीर्वाद त्यांनी लग्नातच आपल्या मुलीला दिला होता ना! आता तू आणि तुझे नशीब! आम्ही काय करणार! अशी त्यांची नियत असते. जावयाच्या विरोधात गेले तर तो बंड करून उठणार आणि मुलीला अजून त्रास देणार .आता उभ्याने सासरी गेलेली लेक आडवी झाल्यानंतरच  घराबाहेर पडणार, अशा संस्कारात वाढलेले तिचे आई-वडील तिला आपल्या घरी थोडाच थारा देऊ शकणार! राम आहे मंदिरात रावण बसलाय घराघरात! मंदिरात देवाची प्रतिष्ठापना केली जाते लाखोंच्या संख्येने लोक गोळा होतात भजन, कीर्तन, टाळ, मृदंगाच्या तालावर गातात नाचतात. मग हा दगडाचा देव घराघरातील रावणाचा नि:पात करतो का? तर नाही! रावणाच्या कृष्णकृत्याचा सामना घराघरातील अबलांनाच करायचा असतो. खाली मान घालून घरातील कामे करत मूकपणे अश्रू ढाळत! कारण तिला कोणाचाच आधार नसतो. लग्न झाले की माहेर दुरावते, सासर तिला कधीच आपले मानत नसते. मग ती मनालाच प्रश्न विचारते, "माझे नेमके कोणते घर? मला हक्काचे घर आहे की नाही? की मी अशीच आयुष्यभर बेघर होऊन राहणार" वंश चालवण्यासाठी जन्माला घातलेली मुले तरी तिची असतात का? तर तेही काही खरे नाही. कारण त्यांना पैसा पुरवणारा बापच आपला वाटतो. आई आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असते, सक्षम नसते. तिला नवरा वाणसामानासाठी जे पैसे देतो, तेवढ्याच पैशांवर तिचा हक्क! या महागाईच्या दिवसात त्यातून काय वाचणार आणि ती लेकरांना काय पुरवणार? तिच्या हातात असते ते फक्त कष्ट! 'रांधा वाढा उष्टी काढा' घरातील ही सर्व कामे तिच्या जन्माला पुरून उरणारी असतात. त्याला संसारात, आर्थिक जगात काडीची ही किंमत नसते. बाई दिवसभर घरातील सर्वांची मुकाट्याने सेवा करत राहिली तरी तिचे जीवन काडीमोल असते कारण तिला या कामाचे पैसे कोणीही देत नाही. देशात अनेक कायदे झाले.
               कन्या जन्माला घालण्यासाठी, वाढवण्यासाठी योजना आखल्या गेल्या. नोकरीला जाणाऱ्यांच्या पगारात अमुलाग्र वाढ झाली पण दिवस-रात्र घरकाम करून आपला देह झिजवणाऱ्या त्या गृहिणीला तिच्या कामाचा मोबदला देण्याचा एकही कायदा अजूनही पास झाला नाही. मग ही नारी सबला कशी बनणार? या गृहिणीच्या कामाची यादी न संपणारी असते. पुरुष किमान साठ वर्षानंतर तरी निवृत्त होत असतो परंतु स्त्रीला निवृत्ती कधीच नसते. मेल्यानंतरच तिला मुक्ती मिळत असते. बिनामोबदला मुकाटपणे राबणाऱ्या स्त्रीला आजारी पडण्याचीदेखील अनुमती नाही कारण अष्टभुजाधारी ही गृहिणी आजारी पडली तरी घरातील सर्व कामे ठप्प होतात पण तिच्या कामाचा मोबदला द्यायचे कोणालाही सुचत नाही किंवा तिच्या कष्टाची पोच पावती देणे कुणाच्याही खिजगणतीतच नसते. ती घरात बसणारी, न कमावणारी असहाय्य अबला असते. तिने घरात राहून 'चूल आणि मूल' सांभाळायचे असते. तिच्या कष्टाकडे पहायला कोणाला वेळ आहे? सर्वांना तिच्याकडून फक्त सेवा हवी असते. तिच्या आकांक्षाचे, अपेक्षाचे पंख लग्न होऊन सासरी येताच कापून टाकलेले असतात. त्यामुळे गगनभरारी घेण्याची तिची स्वप्ने धुळीला मिळवत ती आपले आयुष्य जगत राहते.
                  साक्षर महिला घराबाहेर पडून अर्थार्जन करते. आर्थिक सक्षम होते. तरीही बऱ्याच कुटुंबात तिला आर्थिक स्वातंत्र्य नसते. तिची कमाई महिन्याच्या एक तारखेला नवऱ्याच्या हातात सोपवावी लागते. निरक्षर महिलांची अवस्था तरी याहून वाईट असते. त्या दिवसभर बाहेरची धुण्याभांड्याची कामे करून चार पैसे कमवतात. घरची कामे करतात वर प्रेमाचा शब्दही पदरी पडत नाही.  दारूडा नवरा रात्रभर नशेत असतो. स्वत:ची कमाई दारू पिण्यात उडवतो. घरसंसाराची, मुलाबाळांची जबाबदारी झटकून टाकतो.अशा वेळेस त्या बाईला कष्ट करून परिवाराचे पालनपोषण करावे लागते. हे कमी म्हणून की काय दारूड्या नवऱ्याच्या व्यसनासाठी पैसा पुरवावा लागतो. तिने पैसे दिले नाहीत शिव्या देऊन तिच्या मायबापाचा उद्धार होतो किंवा लाथाबुक्क्यांचा मार खावा लागतो. अशा रावणांचा नि: पात कोण करणार! आपली संस्कृती पितृप्रधान आहे. पुरूषाचे महत्व मानणारी असल्यामुळे असहाय्य महिला आपले दु: ख सांगु शकत नाही. स्वत: च्या नशिबाला दोष देत जीवन कंठत रहाते. कधीतरी आपणाला चांगले दिवस येतील अशी आशा मनाशी धरून कष्ट करत रहाते. फार थोड्या घरात महिलांना आर्थिक स्वातंत्र्य असते पण समाजातील सर्व स्तरातील महिला अबलाच असतात.

सौ. भारती सावंत
खारघर, नवी मुंबई

9653445835

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू