पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एक अविस्मरणीय ट्रेन प्रवास

एक अविस्मरणीय ट्रेन प्रवास

आज आमच्या सोसायटीत भिसी आहे. सगळ्या मैत्रिणी जमलो आहोत.

फेब्रुवारी महिना असल्याने पुढच्या येणाऱ्या सुट्ट्यांमधे कोण, कुठे फिरायला जाणार आहे, ह्या गोष्टीची चर्चा चालू झाली.  त्यातून एक मैत्रीण म्हणाली,"आपण सर्वच कोणत्या न कोणत्या प्रवासाला गेलो आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी एखादा रोमांचक, अविस्मरणीय असा प्रवास झाला असेलच. प्रत्येकाने आपला त्या प्रवासाचे वर्णन करावे."
मी खरंतर माझ्या सगळ्यात अविस्मरणीय प्रवासाबद्दल सांगावे कि नाही, असा विचार करत असतानाच माझा नंबर आला आणि मैत्रिणीच्या आग्रहाच्या दबावात मी बोलायला सुरुवात केली.

'धड-धड गाडी चालत होती आणि मी माझ्या आवडीच्या प्रवासाला आले ह्याचा आनंद घेत होते. कितीतरी वर्षांनी आम्ही दोघेच असे एकत्र प्रवासाला निघालो होतो. गेल्या वर्षी धाकट्याचे लग्न झाले, तेव्हाच मी ठरवले होते आता उरलेल्या आयुष्यात दर वर्षी एक जवळपासचा प्रवास आणि एक लांबचा प्रवास करून संपूर्ण भारत भ्रमण करायचे.

ठरवल्याप्रमाणे आम्ही त्यावेळी वैष्णोदेवी, जम्मू, धर्मशाला अशा उत्तर भारतातील जागा फिरायला जायचा विचार केला आणि एका टूर्स कंपनीला भेट दिली होती. त्यांनी आम्हाला एका समूह प्रवासाबद्दल सांगितले. त्यात मुंबईहुन गोल्डन टेम्पल नावाच्या गाडीने आम्ही न्यू दिल्लीपर्यंत आणि नंतर न्यू दिल्लीहुन उत्तर क्रांती नावाच्या गाडीने पुढे कटरापर्यंत जाणार असे नियोजन केले होते. आमच्यासारखे अजून पंचवीस लोक आमच्यासोबत असणार होते. आम्हाला पण एकटे जायचे नव्हते म्हणून आम्ही त्यांच्याच सोबत जायचे ठरवले.

ठरलेल्या दिवशी आम्ही संध्याकाळी चारलाच मुंबई स्टेशनवर पोहचलो, गाडी पाऊणे सातची होती. सगळ्या सहप्रवाश्यांनी एकमेकांशी भेटून ओळख करून घ्यावी म्हणून टूर्सवाल्यांनी सर्वांनाच लवकर बोलावले होते.

आम्ही तिथे पोहचलो तेव्हा तिथे काही लोक आधीच आले होते, त्यात अगदी अल्लड अशा दोन वीस बावीस वर्षाच्या तरुणी होत्या, सोनाली आणि मेहर. एक केळकर आजोबा-आजीचे जोडपे होते. अजून एक परचुरे म्हणून चौकोनी पण सुरेख कुटुंब होते. आणि हो, एक राज नावाचा पंजाबी मुलगा होता. एक सहा सात मुलामुलींचा समूहपण होता. तीन नवीन लग्न झालेली जोडपी आणि चार पन्नाशीतले पुरुष होते.

आमच्या कंपार्टमेंटमधे, एक खालची बर्थ सोनालीची आणि एक आजीची होती. मधल्या दोन्ही बर्थवर आम्ही दोघे आणि वरच्या दोन्ही पैकी, एक बर्थ त्या परचुर्यांची आणि एक राजची होती. आणि परचुर्यांच्या बाकी तीन बर्थ जवळच्या कंपार्टमेन्टमधे होत्या, एक खालची, एक मधली आणि एक वरची. आजोबांनी सोनालीला विनंती करून तिची खालची बर्थ स्वत:च्या वरच्या बर्थ बरोबर बदलून घेतली आहि त्यामुळे सोनाली नंतर तिकडच्या कंपार्टमेंट मधल्या वरच्या बर्थला गेली.

असो, प्रवास सुरु व्हायच्या जस्ट आधी एक अजून तिशीतले जोडपे आले. पण ते आमच्याहून तिसऱ्या कंपार्टमेन्टला गेले.

गाडी अगदी वेळेवर सूटली. थोड्यावेळातच आम्ही सगळे सेट झालो.

मग मात्र मी पहिल्यांदाच वैष्णोदेवीला जात असल्यामुळे थोडी माहिती काढावी ह्या हेतूने त्या लोकांना प्रश्न विचारला ,"तुमच्या पैकी कोणी आधी गेले आहे का देवीला?"

"हो मी गेलोय." राज शुद्ध मराठीत म्हणाला , मला आश्चर्य वाटले. पण मग त्याने सांगितले कि तो मुंबईतच मोठा झाला असल्यामुळे त्याला मराठी चांगले येते आणि म्हणूनच तो ह्या समूहात आला देवी दर्शनाला.

"आंटी, मी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या कॉलेजमधल्या रूममेटबरोबर आलो होतो दर्शनाला, तेव्हा नवस बोलला होता कि कॉलेज कॅम्पसमधे चांगली नोकरी मिळाली तर येईन पुन्हा. मग नोकरी मिळाल्यावर पुन्हा गेलो."

"बरं, मग आता काय छोकरी करता चालला आहेस ?" केळकर आजोबांनी त्याची गम्मत केली.

"हो आजोबा" त्याने लाजत म्हटले ," मला आमच्या ऑफिसमधली एक मुलगी फार आवडली आहे. आमच्याच जातीची आहे. तिला माझ्या आईकडून सांगुन पाठवले आहे. अजुन त्यांचे उत्तर आले नाही पण म्हटले उत्तर नकार नको यायला म्हणून देवीलाच साकडे घालून येऊ."

आम्ही सगळे त्याच्या सांगण्यावरून त्याची थट्टा करू लागलो. पण तेवढ्यात परचुरे म्हणाले,"होईल रे तुझे काम, माझे झालेच की."

"म्हणजे तुम्ही पण लग्नाचे सांकडे घालून आला होता कि काय ?" माझ्या मिस्टरांनी परचुर्यांना विचारले.

"नाही हो दादा. लग्न तर माझे कधीच झाले होते पण आम्हाला बाळ होत नव्हते म्हणून आम्ही गेलो होतो तिथे आणि खरं सांगतो आम्ही एकच मागितला पण देवींनी दोन दिलीत हो जुळी मुले."

"ते तू एक मागितले आणि एक तुझ्या बायकोने, असे दोन दिले देवीने तुला" केळकर काका पुन्हा सगळ्यांना हसवून गेले. मला पण त्यांच्या स्वभाव फार खोडकर वाटला. काकूंनी त्यांच्याकडे पाहून डोळे वटारत म्हटले,"काहीही काय बोलता हो?"

आमच्या ह्या असल्या गप्पा ऐकून बाजूच्या कंपार्ट्मेण्टमधून सोनाली आणि मेहरपण समोरच्या बर्थवर येऊन बसल्या.

त्यांना पाहताच, माझा प्रश्न मी त्यांना पण विचारला,"तुम्ही जाऊन आलाय का आधी?"

"हो मी माझ्या मावशीसोबत अनेक वेळा गेले आहे. माझी खूप श्रद्धा आहे देवीवर, म्हणूनच कुठलेही मोठे काम सुरु करण्यापूर्वी मी देवीला जाऊन येण्याचा आग्रह ठेवते."

"आणि ह्यावेळेस हिने मला पण लपेटले" हसत हसत सोनाली म्हणाली.

"ते तुझा रिजल्ट चांगला यावा आणि तुला ती तुझी आवडती नोकरी मिळावी म्हणून " मेहर म्हणाली.

"अच्छा म्हणजे तू कुठलीतरी परीक्षा देऊन निघाली आहेस तर देव दर्शनाला." गॉसिपिंगला फार हीन मोजणाऱ्या आमच्या ह्यांनापण मुलींच्या गप्पांमधे रस येऊ लागला होता. काय माहित काय होते लोकांना तरुण मुली बघितले कि, कारण आत्तापर्यंत अर्धवट झोपून असलेले आजोबापण उठून बसले आणि परचुर्यांनी पण आपल्या ढेरीमुळे वर चढलेला शर्ट हळूच खाली ओढायचा प्रयत्न केलेला मी नोटीस केला होता. असे करण्याचे कारण म्हणजे दोन्ही मुली सुंदर होत्या दिसायला, त्यात ही सोनाली तर अगदी मधुबाला सारखी दिसत होती.

असो, आत्तापर्यंत सगळ्यांचे बोलणे ऐकणाऱ्या आजी म्हणाल्या,"जसे तुम्हाला देवी दर्शनाचे फायदे झाले तसे आम्हालाही होवो, आणि आमच्या मुलीच्या मांडीत एक सुंदर गोंडस बाळ खेळों हीच देवीचरणी प्रार्थना." केळकर आजी-आजोबापण देवीच्या दर्शनाला आले होते ते देवीला साकडे घालायला कारण त्यांच्या दुसऱ्या मुलीला ह्या वेळेस चौथ्यांदा दिवस गेले होते, पहिल्या तीन वेळेस तिला दिवस राहिले पण शेवटच्या महिन्यातच बाळ पोटातच मरुन जात होते, तशात त्यांच्याकडे कामाला येणाऱ्या एका हिंदी बाईने त्यांना वैष्णोदेवीकडे साकडे घातले कि बाळ वाचेल असे सांगितले होते म्हणून ते दोघे मुलीच्या आणि तिच्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यकरता देवीच्या दर्शनाला जात होते.

"होईल नक्की" सगळ्यांच्याच मुखातून एकदम शब्द बाहेर पडले.

ह्या गप्पा रंगात आल्यामुळे सगळे झोपायचे विसरून गेले, तेवढ्यात एक मोठा बोगदा आला.

आमच्या गाडीने बोगद्यात प्रवेश केला आणि अचानक डब्यात पूर्णच अंधार झाला., गाडीला खूप मोठा दचका लागला. त्या दचक्याने गाडीने ट्रॅक बदलला असे वाटले. तसे आम्ही भीतीने एकमेकांचे हात धरले. तेवढ्यात सोनालीला कोणीतरी आपला रिकामा हात धरत आहे असे वाटले, ती चपापली कारण तिच्या एका हाताकडे तिची मैत्रीण होती. पण दुरसीकडे कोणीही नव्हते.

"कौन?" तिने जोरात विचारले, पण कोणी उत्तर नाही दिले.

पण त्याच क्षणाला तिला असे वाटले कि जसे शरीरामधून एक प्रकारचा विद्युतप्रवाह गेला असेल. आम्ही एकमेकांचे हात धरून असल्यामुळे त्या प्रवाहाची झळ आम्हालापण लागली. आम्ही सगळेच तो अनुभव करत होतो, पण ते काय आहे ते कळत नव्हते. सगळेच त्या अनुभवाने स्तब्ध झाले होते आणि कोणीही एक शब्दपण नाही बोलू शकले. एवढ्यात पुन्हा लाईट आले.

अचानक सगळ्यांच्या मोबाइलमधे मेसेजेस येऊ लागले, आम्हला वाटले बहुतेक बोगद्यात नेट नसल्यामुळे तेव्हा आलेले मेसेज आता डिलिव्हर होत आहेत.

अचानक सोनाली एकदम आनंदी स्वरात ओरडली, "माझा रिजल्ट लागला आणि मी माझ्या आवडत्या जॉबकरता सिलेक्ट झाले आहे " असे म्हणत तिने मेहरला गळाभेट दिली. आणि ती इतर लोकांना सांगायला आमच्या कंपार्टमेंटमधून पुढच्या कंपार्टमेंटकडे पळाली.

"अभिनंदन,अभिनंदन " आम्ही सगळे एकत्र म्हणतच होतो तेवढ्यात राज ओरडला "माझ्या आईचा मेसेज आलाय, तिने हो म्हटले आहे."

"अरे वा !" आम्ही सगळेच पुन्हा म्हणालो. तेवढ्यात माझे मिस्टर म्हणाले ," अरे आमच्याकडे पण गुड न्युज आहे."

"ह्या वयात?" आजोबांनी हसत विचारले. आणि आजींनी त्यांच्याकडे पाहून डोळे वटारलेले मी नोटीस केले.

"अहो माझ्या मुलीचे पीएचडी पूर्ण झाले. खरं सांगू तर माझी तीच इच्छा घेऊन मी देवीकडे जात होते पण मी ते कोणाला अजून सांगितले नव्हते." मी म्हणाले.

"अरे म्हणजे ह्या बोगद्यात आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होत आहेत नाही का? कारण मलापण एक भलं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे.", त्या पन्नाशीतल्या पुरुषांपैकी एक म्हणाला.

"हो, अगदी बरोबर म्हणालात काका तुम्ही, असेच होतंय" इति राज उवाच.

तेवढ्यात एका मुलीच्या जोरात किंचाळण्याचा आवाज कानी आला आणि बरोबरच अनेक लोकांच्या "ओ ये क्या हो रहा है?" आलेला आवाज मला तो आवाज सोनाली सारखा वाटलं म्हणून मी व राज तीव्र गतिने त्या आवाजाच्या दिशेने धावलो.

समोरचे दृश्य पाहून मी व राज एक क्षणाला आवाक झालो, कारण आमच्या समोर सोनाली संपूर्ण निर्वस्त्र उभी होती. मी लगेच जवळ असलेली एक चादर उचलून तिच्यावर टाकली राजने लगेच स्वतःचे जाकीट काढून तिला घालायला दिले.

"हे असे कसे झाले ?"

क्षणातच राजच्या तोंडून निघाले,"आंटी आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण झाल्या, तसे कोणीतरी हिला ह्या अवस्थेत पाहण्याची इच्छा तर ठेवली नसेल ना?"

"हो, हे असू शकते. पण कोण? कोण असेल अशी इच्छा करणारे?" मला प्रश्न पडला. मी मेहरला बोलावून सोनालीचे कपडे मागवून तिला पुन्हा तिच्या सीट पर्यंत जाण्यात मदत केली. पण मनात खूपच गोंधळ चालू होता.'कोण असावा?' हे असले विचार असणारा.

'शी! देवीदर्शनाला निघालाय आणि मनात हे असले विचार!' मला काही सुचतच नव्हते.

मी एक-एक करून सर्व पुरुषांना निरखून पहायला सुरुवात केली.

खरंतर माझ्याशिवाय इतर बायकापण हा विचार करतच होत्या, पण त्या फक्त आपापल्या नवऱ्याला आता मारूनच टाकेन अशा अविर्भावाने बघत होत्या कारण त्या सर्वांना त्यांच्या नवऱ्यानंवर शंका होती. मलापण थोडी होतीच, पण तरीही मी दुसऱ्या लोकांकडेपण बघत होते.

खोडकर आजोबांवर शंका येत होती थोडी कारण ते तसेही खूप खोडकर असल्याचा परिचय गेल्या दोन-तीन तासात आला होता, पण आजींची नजर पाहता आजींना त्यांच्यावर जराही शंका नसल्याचे वाटत होते. त्यात त्यांनी माझ्याकडे पाहून डोळ्यांनीच "हा म्हातारा नाही बरं" असे इशाऱ्यानेच सांगितले. मला थोडे लाजिरवाणे झाले कि आपण कसा विचार करतोय म्हणून.

दुसऱ्याच क्षणी लक्ष त्या पन्नाशीच्या पुरुषांकडे वळले, ते त्यांच्या बिझनेसच्या गप्पांमधे इतके रंगलेले होते कि समोर जरी मेनका आली असती तरी हे विचलित झाले नसते.

एवढ्यात पुन्हा एकदा गाडीला जोरात झटका लागल्या सारखे झाले, पूर्वी सारखाच एकदम अंधार झाला, गाडी ने पुन्हा ट्रॅक बदलला असा अनुभव झाला आणि शरीरातून कुठली तरी शक्ती निघून गेली असे जाणवले. आम्ही सगळे पुन्हा एका क्षणाकरता घाबरलो कि बहुतेक आपण आता गेलोच. पण क्षणार्धात पुन्हा लाईट आले आणि सर्व होते तसे झाले.

आम्ही आता आपापले मोबाइल बघू लागलो कि काही मेसेज येतात का. तेवढ्यात राज पुन्हा ओरडला,"अरे माझा तो मेसेज आता दिसत नाहीये मला. तुम्ही सर्व बघा तुमचे मेसेजेस."

आम्हीपण आमचे फोन बघितले, पण आता आमच्याही मोबाइलमधले ते मेसेज गायब होते जे आमच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत असे दाखवत होते.

आजोबा लगेच म्हणाले,"असे भुताटकी प्रकार घडतात कधी कधी. आपले थोडक्यात निभावले. भयानक स्वप्न होते ते.असे समजून विसरून जा सगळे."

"खरंतर ते क्षणिक सुख आम्हाला पाहिजे होते म्हणून आवडले होते आणि ते सत्यच राहावे असे वाटत असताना अचानक हे असे होणे फार कष्टकारी आहे." आजी बोलल्या.

"हो पण माझ्या करता तरी ते विसरणे अगदीच शक्य नाही." सोनाली रडत रडत म्हणाली.

"अगं आम्हाला तरी कुठे शक्य आहे असे ते विसरणे. " मी पण तेच म्हटले.

"विसर पडतो वेळ गेली की. " म्हणत आजोबांनी झोपायची तयारी केली, तसे आम्ही सर्व आपापल्या जागी जाऊन झोपलो.

मनात मात्र "तो कोण? हा शोध चालू होता.

दुसऱ्या दिवशी वैष्णोदेवीच्या मंदिरात गेलो. तिथे जाऊन सर्वांनी एकच प्रार्थना केली कि "देवा आमच्या सोबत जे झाले ते आणखीन कोणाही बरोबर नको होऊ देउस."

त्यानंतर दर्शन करून परत फिरलो आणि गाडीत बसलो पुढच्या प्रवासाला , पुढील स्टेशन यायला आता एखाद तास उरला होता तेव्हा आजींनी मला जवळ बोलावले. "मला माहित आहे तो विचार कोणी केला होता. मी तुला पुढच्या स्टेशनवर दाखवेन ती व्यक्ती."

मला फार आश्चर्य वाटले, पण अनुभवाने मोठ्या असल्याने त्यांना कळले असले तर नवल नाही, हे गृहीत धरून मी स्टेशन यायची वाट बघत बसले.

स्टेशन येताच मला त्यांनी बाथरूम जवळ जायला इशारा केला. मी गेले माझ्या मागोमाग आजी होत्या.

मला एकाबाजूला नेत, त्या म्हणाल्या," बेटा मला माहित आहे तुला माझ्या नवऱ्यावर शंका होती मग मी तुला नाही म्हटले तसे तू तुझ्या नवऱ्यावर पण शंका केली होती. पण खरं सांगू तुझा नवरा अशातला नाही ग. ते नाकाच्या सरळ रेषेवर चालणारे पुरुष आहेत."

"मग कोण होता तो?"

मी त्यांना मधेच थांबवून विचारले.

"तो 'तो' नव्हताच !"

"म्हणजे काय? कोणी मुलगी असे कसे विचार करू शकते?"

"का नाही करू शकत?"

"अहो मुलांना मुलींच्या देहयष्टीबद्दल आकर्षण वाटणे सहज आहे पण मुलीला का वाटावे?"

"कारण ती मधुबाला सारखी दिसत आहे !"

"तर?"

"तर माझ्याच मनात आले कि ही वर वर तर मधुबाला सारखी दिसते आहे आतून पण असेल का मधुबाला सारखी? बहुतेक असेलच, पण पाहता आले असते तर.."

"काय काकू म्हणजे तुम्ही?"

"हो ग तुझी घालमेल पाहवत नव्हती आणि घरी जाऊन तू तुझ्या मिस्टरांवर शंका केली असतीस म्हणून तुला सांगून टाकले."

"धन्य आहेत माउली आपण. या कधीतरी घरी " म्हणत मी हसत त्यांना हात जोडले आणि तिथून काढता पाय घेतला.

आम्ही सर्व एकमेकांना पुन्हा भेटायची वचने देऊन वेगळे झालो कारण आम्ही काही लोकांबरोबर पुढेपण प्रवास करणार होतो. बाकी आजी आजोबा, सोनाली मेहर राज वगैरे सर्व परत मुंबईला निघाले.

आम्ही पुढच्या गाडीत बसल्यावर ह्यांनी मला विचारले," काय म्हणत होत्या काकू?"

"मी त्यांना सर्व सांगितले. त्यावर ते हसून म्हणाले, "ओहो म्हणजे तिच्या असे विष करण्यामुळे झाला होता हा गोंधळ तर! काय खोडकर बाई आहे."

"हो बहुतेक"

"अरे बहुतेक काय ती म्हणते आहे त्तर तिनेच केले असेल हे." नवरा म्हणाला.

मी पण हसून होकारार्थी मान हलवली. "

"बापरे सॉलिड ग. असे काहीतरी आम्ही कल्पना पण नाही करू शकत." मैत्रिणींने झालेल्या अनुभवाला खरंच रोमांचक समजून मला प्रतिक्रिया दिली.

खरं सांगायचे तर, मी त्यांना सांगितलेला अनुभव तेवढाच नव्हता.

त्या शिवायपण बरेच काही झाले होते पण मी ते त्यांना सांगू शकत नव्हते.

तुम्हाला म्हणून सांगते, माझ्या नवऱ्याने "अरे बहुतेक काय ती म्हणते आहे तर तिनेच केले असेल हे." जेव्हा म्हटले तेव्हा मी नुसते हसून होकारार्थी मान हलवली पण मनात खूप राग येत होता कारण मला माझा नवरा माझ्याशी खोटे बोलत होता, हे कळत होते.

कारण मला त्या दुसऱ्या झटक्यानंतर, माझ्यात काहीतरी बदल झालेले जाणवले.  थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले कि जर कुणी माझ्याशी खोटे बोलत असेल तर मला त्याच्या चेहऱ्याच्या मागे एक काळे वर्तुळ दिसते होते.

जेव्हा त्याने, आजींबद्दल खोटे बोलले तेव्हा त्याच्या चेहऱ्यामागे तसेच काळे वर्तुळ दिसले होते. आजींनीपण जेव्हा माझ्या नवऱ्याचा अगदी सरळ पुरुष म्हणून उल्लेख केला तेव्हा त्यांच्याही चेहऱ्यामागे मला काळे वर्तुळ दिसले होते. खार सांगू तर म्हणूनच मला राजवर शंका नाही आली किंवा आजोबांवरपण नाही आली कारण माझ्यात झालेला तो बदल. पण हा बदल मी कोणालाही सांगू शकत नव्हते.

असा मला हा ट्रेन प्रवास बरेच काही देऊन गेला आणि बरेच काही घेऊन पण गेला !

सौ. अनला बापट
अहमदाबाद

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू