एका विचित्र संभ्रमी मनोवस्थेत ‘स्पर्श’ या कथेचं बीज रुजलं गेलं. पुढे लिहता लिहता कथा कधी बहरत गेली आणि कधी माझ्या आयुष्याचा एक भाग बनली, माझं मलाच समजलं नाही; पण कथा जगण्याचा आनंद मिळाला. एकदा अशाच एका वात्र व्यक्तीने मला प्रश्न केला.
“आठवण कशाला होते. मनाला की शरीराला?”
या प्रश्नांने मी अगदी आतून हलले. खरंच स्पर्श इतका महत्वाचा? पण नेमका कोणता स्पर्श आपल्याला हवा असतो? या प्रश्नांनी मला भंडावून सोडलं होतं. उत्तर शोधण्यासाठी धडपडत होते. मग कथा सुचत गेली. मी लिहत गेले आणि स्पर्श नावाच्या कादंबरीचा उगम झाला. सारं स्वप्नवत वाटत आहे. मुद्दाम खोचकपणे विचारलेल्या एका प्रश्नामुळे, त्या एका वाक्यामुळे ‘स्पर्श’ या कथेने जन्म घेतला. ही कथा लिहताना वयाच्या प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या स्पर्शाची ओळख करून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला; मग तो स्पर्श लहानग्या शर्विलचा पाच वर्षाच्या मीराला होणारा असो वा वयात आल्यानंतर अनोळखी आवडते नावडते स्पर्श असो.. शर्विल आणि विराजच्या घट्ट मैत्रीच्या मिठीचा स्पर्श असो वा रखमाचा, देवकीचा मायेचा स्पर्श असो.. मीराच्या नवऱ्याचा वखवखलेला घाणेरडा स्पर्श असो वा शर्विल आणि सईच्या सहजीवनातील हळुवार स्पर्श असो.. सईने मीराला मारलेली मिठी असो किंवा मग कथेच्या अंतिम टप्यात शर्विलने मीराला मारलेली मैत्रीची घट्ट आश्वासक मिठी असो.. प्रत्येक स्पर्शाची जाणीव करून देण्याचा मी अल्पसा प्रयास केला आहे. एका विचित्र अवस्थेत सुरू झालेली ही कथा लोकांना इतकी आवडेल असं मला कधी वाटलंच नव्हतं. मी लिहत गेले आणि कथा प्रत्येक भागात नवनवीन वळणं घेत राहिली. स्पर्शाच्या परिभाषेचे अनेक पदर, कंगोरे उलगडत गेले आणि कथा रंगत गेली. ही कथा होती एका मीरेची.. तिच्या अधीर प्रेमाची त्याच्या स्पर्शासाठी आतुरलेल्या हळव्या तिच्या मनाची.. लौकिक प्रेमाच्या अलौकिक स्पर्शाची..