डाॅ.संतोष सेलूकर जि.प.परभणी मध्ये शिक्षक वाचन लेखन हे छंद दुरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित विविध वृत्तपत्रातून काव्यलेखन,लतिलेखन प्रसिद्ध
Book Summary
*समृद्ध विचारांची दिवाळी*
गावाकडची दिवाळी खूप छान असायची.वर्षभरातील मोठा सण म्हणून दिवाळी कधी येईल याची ओढ लागायची.दिवाळीची धमाल,सर्व जणांनी मिळून आनंद घेणं हे जरी चार पाच दिवसाचं असलं तरी तोच आमचा वर्षभराचा ठेवा होता.सतत आठवत राहते ती दिवाळी.पहाटे उठून कुडकुडत्या थंडीत..आई अंघोळ घालायची...
उठायला जर उशीर झाला तर अंगावर नरक पडतो हा बालपणीचा समज अजूनही
पहाटे फार काळ अंथरुणात झोपू देत नाही.ते दिवाळीचे दिवस यायचे आनंदाचा प्रकाश जीवनात घेऊन.
भल्या पहाटे सर्वत्र अंधार पसरलेला असायचा.आई हातात छोटी चिमणी घेऊन न्हाणीकडे जायची..हंड्या खाली पेटू घालायची मागे मागे आम्ही जायचो.. कुडकुडत वाट बघायचो.. चुलीतल्या शेणाच्या गौ-या कधी पेटतील याची?धूराचे लोट बाहेर पडायचे..फुंकणी घेऊन जोरात फुंकले की भडकन् जाळ लागायचा..काटक्या कुटक्या घालत बसायचे..जाळ विझू द्यायचा नाही यासाठी आटापिटा करायचा..मध्येच त्या जाळाच्या उजेडात फुंकणी हातात घेऊन एक डोळा बारीक करुन बघत रहायचे..सरपणातले बारीक किडे मुंग्या..आच लागून तडफड करायचे..मला मात्र पाहतांना गंमत वाटायची...! तसंच झालंय आजकाल पण जगाच्या जाळात सामान्यांचा जीव जातांना इतर लोकांना त्याची गंमत वाटते...
अर्ध्या अंघोळीत बहिणी औक्षण करुन ओवाळायच्या ...अन् थंडीने दातांवर दात वाजायचे.गरम पाणी ओतण्यासाठी घाई व्हायची..गरम पाणी अंगावर पडले की छान वाटे..आजू बाजूला दिवे लावलेले असायचे..सर्वात आधी अंघोळ करायची घाई असायची कारण आमच्या भावंडातलं एक गाणं होतं ,
पहिलम् पेढा,दुध मोगरा,दुधावरची साय, चाटून खाय..पुढंच काही आठवत नाही आता.. पण खूप मजा यायची ते म्हणतांना आपला अंघोळीचा पहिला नंबर लागला की छाती दोन इंच फुगायची...आमच्या वाड्यातील सर्व भाऊ- बहिणी असे दहा बारा जण गोळा व्हायचे.आनंदी आनंद सगळीकडे ..फटाके वाजवले जायचे..खूप मजा वाटायची..पाहतांना........भुईनळे,सुरसु-या,फुलबाज्या,भुईचक्र,राॅकेट पासून ते कावळा,लवंगी फटाका,लसून बाॅम्ब,सुतळी बाॅम्ब,लक्ष्मीबाॅम्ब सह किती वेगवेगळी नावे असलेले हे फटाके म्हणजे आमच्यासाठी आवाजाचे,गंमतीजंमतीचे आणि आनंदाचे दूत असायचे.बेडूक,रेल्वेगाडी,
टिकल्या किती विविध प्रकारचे हे फटाके असतात
याचे कुतूहल वाटायचे..
मला तर बंदुकीत रोल घालून.. आई-बाबांच्या कानाजवळ किंवा बहिणींच्या नाकासमोर नेम धरुन वाजवून पळून जाण्यातच आम्हाला खूप मजा वाटायची.जग जिंकल्याच्या आविर्भावात उखळीत गंधक घालून जोरात बार करायचा.छोटी नागगोळी सुध्दा एवढा आनंद देऊन जायची की काळा कुळकुळीत कोळशाचा नाग जसा जसा बाहेर पडायचा एवढ्याशा गोळीतून...तसे तसे आमच्यातून काळ्या दु:खाची जीवनाला भकास करणारी अस्तरे बाहेर पडत रहायची दिवाळीत.. आनंदाने उजळून निघायचे सर्वांचे चेहरे...हा सारा आनंद निखळ असायचा याला कुठल्याही पूर्वग्रहाचे अस्तर नव्हते..त्या आनंदाला पारावार नव्हती..ह्या आनंदामुळेच तर दिवाळीची ओढ लागलेली रहायची.नाही तर आमच्या घरात बारा महिने अठरा काळ गरीबी मुक्कामालाअसायची.
गरीबी माणसाला समृद्ध माणूस बनण्यासाठी खूप मोठी भूमिका निभावते. आपल्या घरातली गरीबी कधीच उघडी पडू द्यायची नाही...हे तत्त्व याच गरीबी ने आम्हाला शिकवले........ जे असेल ते गोड मानून खायचे,कामात आळस करायचा नाही, कष्ट करत सुखात रहायचे..इतरांशी प्रेमाने वागायचे ,सर्वांचा आदर करायचा,कोणत्या गोष्टीचा गर्व करायचा नाही..सर्वांची कामे करायची कोणतेच काम हलके नाही उलट कामे आपल्याला मोठी करत असतात..आहे त्यात समाधान मानायला ही याच गरीबीने शिकवले. दुस-याच्या मतांचा आदर करणे, स्वाभिमानी वृत्ती जोपासणे ह्या आमच्या धारणा पक्क्या व्हाव्या म्हणूनच दिवाळी यायची..खूप काही शिकवून जायची दिवाळी.नव्या कपड्यांपेक्षाही नवे विचार,नवे मार्ग,नव्या पद्धती आणि नवा आनंदच नव्हे तर नवे जीवनच देणारी ती दिवाळी असायची... भौतिक साधनांची समृद्धी फार नसायची आमच्या दिवाळीत पण भावनांना आणि विचारांना ख-या अर्थाने समृद्ध करणारी आमची दिवाळी होती.
*संतोष सेलूकर,परभणी*
*७७०९५१५११०*