कहाण्यांच्या शेवटी फलश्रुती सांगण्याची परंपरा असते. त्याच धर्तीवर सांगायचे झाले तर.... माळवी चित्रकलेचे हे "छनगा"तील रूप पाहिल्याने काय होते, तर ह्या प्रांतातील परंपरांशी, भावनांशी, विचारांशी, रितीभातींशी आणि चित्रमागील कथांशी परिचय होतो.
मिळतील ती साधने वापरून मालवी स्त्रिया घर कसे सुंदर प्रसन्न ठेवतात ते कळते. परंपरांच्या भक्कम पायावर विकासाचा महाल उभा असतो. भीमबेटकातल्या अज्ञात चित्रकारांनी चितारलेल्या शैलचित्रांची शैली मालवी स्त्रियांनी कशी जपली आहे आणि कशी विकसित केली आहे ते जाणवते. भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातील लोक चित्रकला आपल्याला आकर्षित करते. माग ती गौंड, अरिपना, मधुबनी, सौर, फड, पट्टचित्र, पिठोरा किंवा महाराष्ट्रातील वारली असो सर्वच मनभावन असतात. हल्ली या कलांची दखल सरकार घेत आहे. उज्जैन, इंदोर, भोपाळ आणि इतर गावी रस्त्याच्या कडेच्या संरक्षक भिंतीवर हे मांडणे दिसतात, ते सुशोभना पुरते असूनही पर्यटकांना आकर्षित करतात. मग मालवी घरा घरांतील अर्थपूर्ण चित्रे त्यांच्या मागच्या भावना, श्रद्धा, भक्ती आणि कथा कळल्यावर आपण भारावून जातो. तुम्हापर्यंत या कलेचा आनंद पोहोचविण्याचा प्रयत्न मी "छनगा" रूपात करते आहे. एक लहानसा तुरा सर्व कलाकृतीला सौंदर्य देतो, ते सुंदर रूप तुम्हीही बघावे आणि अनुभवावे ही अपेक्षा...