तू तर माऊलींची "माऊली"!
मानवी ज्ञानाची परिसीमा असलेली भगवदगीता ज्या मराठी संताने तितक्याच तोलामोलाने मराठीत आणली आणि जी आता मराठी भाषिकांच्या जीवनाची पार्श्वभूमी बनलेली आहे त्या माऊलींची तू धाकटी बहीण! पण त्या बालवयात तू “विश्व पट ब्रह्म दोरा " असा विचार करतेस तेव्हा योगिनी ही पदवी आपोआप तुझ्या पावलांशी येते. तुम्ही भावंडांनी वारंवार आम्हांला आश्चर्यचकीत केलेले आहे. आज सातशेहून अधिक वर्षे लोटली तरी हा आश्चर्याचा भर ओसरलेला नाहीए. तुझ्या शहाणिवेचा तळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे पण हातातील लोट्यात फारसे लागले नाही.
ज्ञानोबा माऊली आधी खूप दूरस्थ वाटायची.त्यांच्याबद्दल आणि मुळातच तुम्हां कुटुंबाबद्दल आदरयुक्त भीती मनात होती. मानवतेचे सर्वात शुद्ध, धवल रूप तुमच्या रूपाने आम्हांला दिसले. गीतेला अभिप्रेत असलेला अध्यात्मधर्म माउलींनी घराघरात नेला आणि आमची घरं कायमची मंदिरं झाली. तुझी दृष्टभेट जरी लहानपणापासून होत असली तरी त्या बालमूर्तीमधील चैतन्य कळालं तेव्हा खूप उशीर झाला होता. भावाला योगी संबोधताना तू नकळत त्याला योग्याचा धर्म स्मरण करून दिलास. त्याला अस्तित्व ओळख नव्याने दिलीस. तुझ्या अभंगाने तू साक्षात जगन्मातेचीही माऊली झालीस आणि त्यांना तुझ्या " अनादी मी, अनंत मी " रूपाची सावली दिलीस.
आमच्यासाठीही "ताटी" उघड!
डॉ. नितीन ह देशपांडे