वर्षा पतके थोटे ह्या सर्जनशील लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. त्यांचा ललित गद्याचा' विश्रब्ध' नावाचा संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. चिंतनशीलता हा ललित लेखनाचा प्राण असला तरी,कविता ही गद्याची जीवनदायिनी असते. त्यामुळेच एका कवयित्रीचे अस्तित्व सतत जाणवत होते, त्याचा प्रत्यय तिच्या या कवितेतून येतो. ही कविता म्हणजे तिच्या मनातील डबडबलेला 'भावनांचा कल्लोळ' आहे. त्यात स्त्री जाणिवांची ओळख,स्वतःसह भोवतालातील आंदोलनांनी व्यापलेला परीघही आहे. आपल्यासह आपल्या परंपरा,असलेली-सुटलेली नाती,गाव बिरादरी,माया-प्रेम, रोजच्या जगण्या व्यवहारातील ताणतणावांचे बिंब या कवितेच्या माध्यमातून प्रतलावर येते.
" एक दाटून आलेला हुंदका गळ्यात अडकलेला असतो जो गिळताही येत नाही थुंकताही येत नाही " ही सगळी आंदोलने म्हणजे तिच्या मनात बरसणा-या पावसासारखी ओली आहेत,त्यातून सकारात्मकतेची शीळ ऐकू येते. हव्या असलेल्या,मिळालेल्या जगण्याच्या सांध्यावर तिच्यात असलेली उत्सुकता आणि उत्सव जागा आहे.
ती म्हणते," स्वप्न शोध मी रात्र होईल l वेदनांवरची फुंकर होईल".
आपल्या व्यथेवर कोणाची तरी कथा जगत असते असा तिचा विश्वास आहे. आपण, आपला सभोवताल परस्परांच्या सुखदु:खांनी व्यापत असतो. त्यातून मिळणारी ऊर्जा आपणा सर्वांना जगवत असते. त्या जगण्याशी असलेली बांधिलकी म्हणजे आपल्या सगळ्यांच्या असण्याची मूस आहे. ती कळत नकळत आपल्या अस्तित्वातून प्रकटत असते. एकंदरीत कलेशी तिचे नाते असतेच,तसेच या कवयित्रीचे कवितेशी नाते जोडलेले आहे. त्यातूनच भोवतालाशी जोडल्याचे भान तिला आहे." बाई आहेस तू...जगायचे सोड l जगवायला शीक. बघ ! हे तुला जमायलाच हवं." या शब्दांमधून परंपरेतून आलेली समज आणि तिच्या घडणीची कल्पना येते. एवढी व्यवस्थेमधील कळ सोसूनही ही कविता आपल्या असतेपणाला विसरत नाही. आतल्या बाईपणालाही..." हळूच उघड तुझ्या हृदयाचं कडी कोयंडा घातलेलं फाटक " हे तिच्या असण्याचे प्रत्यतंर आहे. त्यादृष्टीने ही कविता म्हणजे स्त्री भावनांचा तिच्या अस्तित्वाचा घेतलेला भावशोध आहे.
ज्येष्ठ समीक्षक दा. गो. काळे