आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सीमांचे अहोरात्र संरक्षण करणाऱ्या
सैनिकांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असतो. प्रत्येक सैनिकाचा जीवन प्रवास
खडतर असतो. या खडतर जीवन प्रवासात सैनिकासोबत त्याची पत्नी सावलीप्रमाणे
असते. लेखिका उषा महाजन यांनी 'सॅल्यूट' या पुस्तकाद्वारे त्यांच्या सैनिक पतीचा
खडतर जीवनप्रवास मांडला आहे. एका गरीब, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात
जन्मलेल्या, सरळमार्गी सैनिकाची ही खरीखुरी कहाणी आहे म्हणून ती प्रत्येकासाठी
प्रेरणादायी आहे. माझी भगिनी उषा महाजन यांनी त्यांचे पती बापूराव महाजन यांचे
बालपण, शिक्षण, त्यांचा एअरफोर्समध्ये भरतीसाठीचा प्रवास, विविध प्रांतांतील
युनिटमध्ये ड्यूटी, तेथील चांगले-वाईट अनुभव, त्यानंतर निवृत्ती असा हा प्रवास
सहज, सोप्या भाषेत मांडला आहे.