" मायबाप विद्यापीठ " या कविता संग्रहातील कविता वाचतांना प्रत्येकाच्या डोळ्यापुढे त्यांचे आईबाप दिसतील. कविता खरोखरच डोक्यात प्रकाश टाकणाऱ्या आहेत. जिवंतपणी ज्यांना आईबाप समजले नसतील त्यांना या कविता वाचून नक्कीच त्यांचे आईबाप समजतील असे मला वाटते. ज्यांच्या हातून चूका घडल्या त्यांनाही पश्चात्तापाचे अश्रू आवरता येणार नाही. कवीने कवितांतून अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजण घातले आहे.
कवींनी आई व वडील दोघांवरही कविता रचल्या आहेत. विशेष म्हणजे या संग्रहातील कविता अष्टाक्षरी काव्य प्रकारातील आहेत. अचूक यमक, चपखल शब्द मांडणी आणि सोपे सहज समजणारे शब्द यामुळे हा काव्यसंग्रह वाचतांना सुटसुटीत वाटतो. खरे तर कवी सुभद्रासुत यांना अष्टाक्षरी काव्यलेखनाचा 'बादशहा' म्हणावे लागेल. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त सांगून जाण्याची कला त्यांना चांगलीच अवगत झालेली आहे.