इलेक्शन इलेक्शन
अगदी चापून-चोपून नेसलेल्या साडीत पारू कामावर आली ,तेव्हा क्षणभर मी ओळखलंच नाही तिला .नेहमी पदरात दंड घातलेलं लुगडं आणि त्यातील लावलेली ठिगळं कशीबशी लपवीत खाली मानेन ती कामावर येई आणि निमूटपणे काम करून निघून जाई.
आज मात्र नव्या नवलाईन नेसलेल्या तिच्या लुगड्यातल्या या डौलदार रुपाकडे मी नव्या नवलाईने पाहतच राहिले .कोऱ्या लुगड्याचा वास तिच्या अवतीभवती रेंगाळत होता .नवीन चोळी दंडात रुतली होती आणि ओठाच्या कोपऱ्यातून खुशीच हासू ओसंडत होतं .मी न राहवून विचारलं,
"पारू नवीन घेतली साडी? छान दिसते हं". त्यावर गडबडीने पदर सावरीत ती बोलली,' कुठली घेतली जी,आता इलेक्श्यान की काय म्हणतात त्या आल्या नव्ह ,आमच्या गावात वार्डात हुबारलेल्या साहेबांन दिलं पघा ,घरटी एक लुगडं आणि घरधन्यास्नी नवा सदराआणि धोतार."
मग मी उद्गारले ,मग फायदा झाला की तुझा .माझी अशी पसंतीची पावती मिळताच - ती आनंदून सांगत सुटली, "तर वो पोराचं करता-करता जीव कसा'"" मेटाकुटीला येतो बघा .तरी आम्ही दोग राबतोया पर कुठं पुरं पडतया जी?महागाई अशी ,
जेमतेम हातातोंडाची गाठ पडते ,मग आम्हा गरीबास्नी कुठलं नव धडुतं भेटतया जी? पर परवा त्यो सायब आमच्या वस्तीवर आला. समद्यास्नी नव कापडं दिलं. म्हणाला," सायकलवर शिक्का मारा .मला निवडून द्या .मग बघा कल्याण करतो .तुमच्या वार्डात पाणी ,लाईट सगळ्यांनी रोजगार....."
तिची गाडी पुढे धावत होती पण मग मी तिला थोपवीत म्हटलं,
"पण पारू ,अगं मत मागताना सगळे जण असंच म्हणतात. ते लोक एकदा निवडून आल्यावर थोडेच तोंड दाखवणार दुसऱ्या निवडणुकीपर्यंत?
त्यावर खाली माझं मान घालीत ती म्हणाली ,"मला ठाव हाय जी.सध्या तर गरज भागली .या लुगड्यावर वरस निगल कसंतरी .वर नगद शंबर रुपये दिले त्यांनी. तेवढंच घरी गोड-धोड .मारला शिक्का सायकलवर. आम्हा गरीबास्नी काय जी, जो नड भागवतो त्योच आमचा देव .आता समदी दुवा देत्याल त्याला.
मी गप्पच राहिले .पारूच तत्वज्ञान कुठेतरी पटत होतं आणि कुठेतरी टोचत होत. चार दिवस इलेक्शन इलेक्शनने गावात नुसता धुमाकूळ घातला होता. वाजत जाणाऱ्या गाड्या ,कर्णे, त्यामागे पोरांचा हा एवढा लोंढा.शाळेला सुट्टी म्हणून पोरेही खुश .चार दिवस सगळीकडे तोच विषय.
निकालाचा जल्लोष झालाआणि सायकल निवडून आली अबीरगुलाल ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक निघाली. आणि गाव दणाणून उठला .दोन दिवस चर्चा झाली. आणि हळूहळू इलेक्शनचे वारे थंडावले. गावातले रुटीन नेहमीप्रमाणे सुरू झाले.
दुपारची निवांत वेळ. मी आणि आई अशाच दुपारच्या बसलो होतो माजघरात. घरात अभावितपणे माझी नजर घराच्या गेट कडे गेली. तिथे उभे राहून एक बाई बोलावत होती. काही सांगत होती .असेल भिकारी जाईल परत म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं पण ती हलायला तयार नव्हती.पाहूया तरी म्हणत आम्ही अंगणात गेलो आणि दृष्टीस पडली ती एक तरुण बाई गोणपाटात आपला देह कसाबसा गुंडाळून उभी होती. आम्हाला बघताच गयावया करत म्हणाली.,"
काही जुंनं धडुत असलं तर द्या बाई लाज राखा पुरतं .कायबी कसलबी धडुतं द्या .सगळी झोपडी जळाली,मालक कामावर आणि मी आंघोळीला गेली व्हते जी ,पातळ वाळत घातलं होतं .आगीत ते जळाल, आता काय करू? "
आम्हाला खरोखरच तिची दया आली. तिच्या देहाच्या तारुण्याच्या खुणा त्या गोणपाटात लपता लपत नव्हत्या .आईला पाहवेना थांब थोडी म्हणत ती घरात गेली. माझी उत्सुकता मला गप्प राहू दे ईना ,मी विचारलं ,"कसं जळलं तुझं झोपडं ?कशी आग लागली ?कोणी लावली ?ती सांगू लागली," काय सांगणार बाई आमच्या कर्माची कहाणी ,हे इलेक्शन झालं न्हवं, आम्ही गेलो नाही शिक्का मारायला .मुकादम आणि त्या माणसाचं धड नाही .त्यांन सांगितलं जायचं न्हाय म्हणून.आता तुम्ही सांगा पोटाला तो देणार जी.न ऐकून भागल व्हय आम्हास्नी?घरी बसलो सायकल निवडून आली.
कोणी चुगली केली त्याला. त्याची मान्सं सांगत आली ,"झोपडी खाली करा. आम्हासनी दुसऱ्याला द्यायची हाये ती झोपडी. त्यांच्या मालकीची झोपडी पर भाडं भरतो पाच रुपये जी.
धनी झोपडी खाली करत न्हाई सांगून कामावर गेलं,तर झोपडं जाळलं त्या मानसानी .देव कधी बरं करणार नाही त्या सायकल वाल्याचं."
तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते .कडेवरच पोर तिला चिकटलं होतं घोरपडीसारखं.आई लगबगीने आली आणि तिला जुनी साडी दिली, तशी घारी सारखी त्यावर झडप घालीत तीआईच्या पायाशी वाकत म्हणाली,"लय उपकार झालं जी .कवा बी कमी पडायचं नाही देव तुम्हाला.
आईन म्हटलं ,"अगं थांब थोडी खायला देते."
लगबगीने आईला अडवत ती म्हणाली., नगं ,अवं पोटाची आग कशीबी भागलं.घरधनी गेल्यात आणायला काई. तेच खाऊन राहू आम्ही पण किसना सारखी लाज राखलीत माझी .आता काई नगं.खरंच नगं. तोंडाने काहीबाही पुटपुटत जुनं लुगडं गच्च छातीशी धरत ती पाठमोरी झाली .मी आणि आई बघत राहिलो तिची दुरवर धावत जाणा-या आकृतीकडे अवाक् होऊन .... इलेक्शन आली आणि गेली होती .कुणा पुढे असं तर कुणा पुढे तसं ताट मांडून!
रेखा मिरजकर खारघर नवी मुंबई