रिंगा रिंगा रोझेस
'बाई कचरा ऽ ऽ',असे म्हणत बादलीचा कड्कड आवाज करत ती येते ,तेव्हा संध्याकाळचे पाच वाजत आलेले असतात. कचरा आतून आणेपर्यंत तिचा हाकरा सुरूच असतो .कुणीतरी दिलेला ड्रेस तसा तिला ढगळच होतो पण खुलुनही दिसतो .सरळ नाक ,कपाळावर गोंदण ,दोन वेण्या ,गोरापान वर्ण, वय साधारण दहा ते अकरा वर्ष .वाटतच नाही ही त्या झोपडीत राहणार्या कामकरी जोडप्याची मुलगी आहे म्हणून.
जिन्यावरून दुडूदुडू धावत ती आमच्या सगळ्या इमारतीचा तसेच समोरच्या दोन इमारतींच्या कचरा गोळा करते .बरोबर तिचा धाकटा भाऊ त्याच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी .कोणी काही खायला दिलं की ते ती प्लास्टिकच्या पिशवीत टाकते .त्या छोट्या भावाला हे खाऊ देत नाही .घर जाकर खाना ,बिल्डिंग गंदा हो जायेगा/ म्हणून अगदी हिंदीत बजावते. कचरा खाली पडला तरी निपटून घेते. एवढी स्वच्छ.
एव्हाना कॉलनीतल्या छोट्या मुली इमारतीच्या आवारात खेळण्यासाठी जमा झालेल्याअसतात .त्या रामीची वाट पाहत असतात .ती लवकर न आल्याने त्यांचा गलका वाढत जातो .'जल्दी आओ ना 'त्या ओरडतात ,तसे ती जिन्यातूनच ,अबी आता है, ' असं ओरडून सांगते .आपल्या हातातील प्लास्टिकची पिशवी भावाकडे देऊन त्याला झोपडीकडे पिटाळते. भरलेली कच-याची बादली दोन्ही हाताने उचलून दूर नेऊन नळावर स्वच्छ हात धुते. आणि स्कर्टला हात पुसून तशीच धावत येऊन मुलींच्या खेळात सामील होते. मुलीना खेळायला एक हक्काचा भिडू मिळतो .मुलींना बॅडमिंटनचा खेळ खेळताना शटल लांब पडलं की धावून आणायचं काम रामीच करते .
नवीन नवीन सायकल शिकणाऱ्या मुला-मुलींना पाठीमागून सायकल धरून आधार देते आणि लपाछपी खेळणाऱ्या मुलींचा भोज्या होते.
रामी शाळेला जाते .युनिफॉर्म कुणाचा तरी, कुणाचे दप्तर ,कुणाची पुस्तक ,तर कोणाची वॉटर बाॅटल.पण असं सगळं जुनं वापरलेलं ती नव्याने वापरते. तसेच शाळेच्या सगळ्या आवश्यक गोष्टी तिच्याकडे असतात .फक्त नसतो तो टिफिन .?असला तरी त्यात घालायला आईकडे काय असणार ?भाकरी ती सुध्दा तो सुद्धा कधीकधी नसते.मग मधल्या सुट्टीत मुली टिफिन खातात आणि ही नळाला तोंड लावून पाणी पिते आणि एकटीच ठिकरी खेळते .शाळा सुटली की धावत घरी येते आणि दुसरा कसला ड्रेस घालून आईने रांधले असेल तेच खाते. आई जेवढं खा म्हणेल तेवढच. कसला हट्ट न करता .आपली ताटली धूऊन जाग्यावर ठेवते .आई कामाला जाते ,तशी ती झोपडीचं दार लावून पायरीवर आपलं होमवर्क करत बसते एकाग्रपणे .इंग्लिश हिंदी कोकणी सगळ्या भाषा तिला उत्तम कळतात फक्त गणितातच तिची गाडी अडते .मग फ्ल्यटमधल्या एखाद्या बाईला ती गणित विचारते. ती बाई मूडमध्ये असेल तर सांगते नाहीतर बादमें आना अभी डिस्टर्ब मत करो,म्हणून सांगते. त्याचाही तिला दुःख नाही.
तिचा दिवस तसा आनंदात जातो पण रात्र तिला आवडत नाही .रात्री लवकरच तिची आई तिला आणि तिच्या भावाला असेल ते जेवायला देऊन लवकर झोपवते. रात्रीला बाप लडखडत येतो. ही आणि तिचा भाऊ वळचणीला आलेल्या भिजलेल्या पाखरासारखी थरथरत .कधी बाप जेवतो. जास्त झाली असेल तर तसाच झोपतो. दारू कमी पडली तर बडबडतो .आईला मारतो मग तीही गप्प बसत नाही त्याला शिव्या घालत राहते .मग मात्र घराचं रणांगण होतं .मध्येच बापाला मुलांचाही राग येतो .आई बरोबर या दोन्ही भावंडांना तो झोपडीबाहेर ढकलतो .मग आई बरोबर ती पोरं झोपडीच्या दारात पेंगुळलेली बसतात. नवऱ्याला झोप लागली की तिची आई मग त्या दोघांना हळूच आणून झोपवते.
दोन दिवस कचरा न्यायला आली नाही. आली ती तिची आई .कुतूहलाने मी विचारलं 'रामी क्यूं आयी नही?'
नही बाई ,वो तोरोते हुए बैठे है घरमें/' बिनधास्तपणे रामीच्या आईने सांगितलं .मी विचारलं, 'कशाला कशाला रडते?' त्यावर आपल्या मोडक्या तोडक्या मराठी भाषेत तिनं सांगितलं ,'शाळेत जाणार म्हणते'.
माझ्यातही शिक्षिका संचारलेली. मी सांगत राहते ,"अग मग शिकव तिला.तू नाही शिकलीस.आता तुला नाही वाटत मुलीला शिकाव म्हणून.'
त्यावर तिचे उत्तर ,'लई वाटतं .पण मलाबी शाळतं जायचं व्हतं. बापाला न्हाई आवडायचं शिकलेलं.त्यो कामाला गेला की आई चोरून शाळंत धाडायची. एकदा त्याच्या ध्यानात आलं ,तसेच शाळा बंद. आता लिवायला ईसरले म्या.
'अग मग शिकव तिला'.मी माझं घोडं पुढे दामटीत म्हटलं.
'परं आता तिचं लगीन करायचं म्हणतूया नवरा .तिचे उत्तर.
माझ्या तोंडाचा आ पसरलेला लवकर मिटतच नाही, मग डोक्यात बाल रोजगार प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा. मी बोलत राहते ,'अगं आता कसं करता येईल तुला तिचे लग्न ?पोलीस पकडून नेतील तुम्हाला .अठरा वर्षाच्या आत लग्न करायचं नाही. तुला माहित नाही?
'ठाव हाय मला. एकदा टीव्हीवर बघितलं म्या. तर असं बघा बाप तो ,मुलगी त्याची, आता तोच लगीन करणार त्याला मी काय करू ?'तिचा समर्थन.
'अग सांग तू नवऱ्याला ,मुलगी लहान आहे म्हणून .'माझी भूमिका अजूनही शिक्षिकेची .
'माजं कुठं ऐकतो जी नाहीतर दारू नसती का सोडली त्यानं? पैका पुरत नाही .त्यात पोरीची जात ऊफाड्याने वाढणारीपोरगी म्हणजे पदरात निखाराच की .आम्ही झोपडीत -हाणारी मान्सं. लोकांची नदर बरी नसते बाई .आणि दोन वरसान रामी ल्हान राहणार व्हय?मोठी व्हणारच न्हवं?ा मग तिला वंगाळ नजरेतून कशी वाचवू ?दारूड्या बापाचा काय भरवसा?लगीन केलं की,म्या सुटलो. पोरगा कसाही राहील, कुठं बी काम करील .पुरुष माणूस ,त्याला कोण नाव ठेवणार? तिच्यासाठी बघितला पोरगा तो बरा आहे वीस वर्षाचा हाय.आता रामी दोन वरसात हुईल शानी. आमी झोपडीत राहतो, त्याचं स्वतःचं घर आहे .कमावतो.बाईमाणूस घरात नाही म्हणून लगीन. रामी काय लहान लेकरू. तिला काय कळतं दोन दिवस रडलं ती आणि राहील गुमान. शिकून तरी काय? बाईचा जलम ,वळणाचं पाणी वळणात जायला होवं .तिच्या नशिबाची ती'.... सांगत सांगत तिनं बादली उचलली आणि ती पाठमोरी झाली.
खाली मुलींचा खेळ रंगात आला होता. गाण्याचा कोरस टिपेला पोहोचला होता. सहज म्हणून खिडकीतून पाहिलं, मुलीनी गोल फेर धरला होता त्यात रामीही सामील होती .मुलींबरोबर गोल फिरत ती तन्मयतेनं गात होती.
'रिंगा रिंगा रोजेस'....
त्या गाण्याच्या तालत ती सगळं विसरून गेली होती. तिला माहिती नव्हतं फुल होण्याआधीच एक कळी मिटणार होती.
रेखा मिरजकर खारघर नवी मुंबई