मुखवटे
आभाळात भरारी घेण्यापूर्वी पक्षिणीने तीक्ष्ण नजरेनं सभोवार पहावं ,तशी अनुन आपल्या घरकुलावरून नजर फिरवली.पेंगत असलेल्या नीतीचं गाठोडं खांद्यावर घेतलं.पर्स दुस-या खांद्यावर टांगली आणि दार ओढून घेत गडबडीनं पाय-या उतरून ती झपाट्याने चालत ती पाळणाघराशी आली.तिला पाहताच बाईनी हसून मान डोलावत नीतीला आपल्या कडेवर घेतलं आणि सोबत सामानाची बॅगही.काल नीतीला बिस्कीटं दिली गेली नव्हती.कोणी तिच्या गालांवर ओरखडलं होतं..या सगळ्याचा जाब विचारायचा सोडून ती अजीजीच्या स्वरात बाईंना म्हणाली,
"थोडी कणकण वाटतेय तिला .औषध दिलंय; पण ताप वाढला तर आणखीन एक चमचा क्रोसिन सिरप द्या,बॅगेत औषध ठेवलं आहे.आज माझी महत्त्वाची मिटींग आहे म्हणून..." तिला आणखी काही सांगायचं होतं; पण मध्येच तिचं वाक्य तोडीत आपल्या मधाळ स्वरात बाईनी सांगितलं," काही काळजी करू नका. मी बघते." आणि दुस-या मुलीला जवळ घेत तिला समजावत म्हणाल्या,
आता रडायचं नाही .टाटा करायचं मम्मीला .छोटीने मम्मीला ,टाटा करत मम्मी किस मी म्हणत गाल पुढे केला ,पण तिच्या मम्मीन आपले लीपस्टीक फिसकटेल, या भीतीने फक्त बाय म्हणून तिच्या गालावरून हात फिरवला आणि ती पुढे तिथून झपाट्याने निघून गेली एक उसासा टाकत अनुही तिथून निघाली आपले पंख पसरून.
स्टेशन च्या पायऱ्या चढता चढता तिने घड्याळात पाहिलं आठ त्रेपन्नची लोकल यायला तब्बल दहा मिनिटे होती.अजून ती पुलावर होती.'मुखवटे घ्या, मुखवटे' आवाजाच्या दिशेने तिने पाहिलं ,एक छोटी मुलगी डोक्यावर छोटी टोकरी घेऊन उभी होती .त्या टोकरीत मातीचे अर्धपुतळे होते. झाशीची राणी, सीता, लक्ष्मी शिवाय माधुरी दीक्षित पर्यंत सगळ्या टोकरीत अगदी गुण्यागोविंदाने नांदत होत्या. पोषाखा वरून त्यांची ओळख , चेहर्यावर भाव अबोध ,न कळणारे पुतळे . येताना घेऊ, शोपीस म्हणून छान दिसतील ,तिने विचार केला आणि ती घाईघाईत प्लॅटफॉर्मवर आली.
दादरचा तीन नंबरचा प्लॅटफॉर्म खचाखच भरला होता. आठ त्रेपन्नची लोकल आली तशी ती माणसांच्या लोंढ्याबरोबर वर ओढली गेली.सुमनन तिला पाहिलं आणि शेजारच्या बाईला बाजूला सारून तिने तिला जागा करून दिली .सुमाकडे बघून ती हसली आणि आपल्याच विचारात दंग झाली.आज कामाचं शेड्युल अगदी टाईट होतं.कॅज्युअल रजा संपल्या होत्या. आज महत्त्वाची मीटिंग अटेंड करायची होती. पूर्वीचा बॉस तिला आठवला ,कारण नसताना वारंवार केबिनमध्ये बोलावणारा. खाली मान घालून वावरणा-या तिला जाणवत राही त त्याची तिच्या अंगावरून फिरणारी नजर .फाईल हातात घेताना केलेला सहेतुक स्पर्श ,तिने कसलाही रिस्पॉन्स दिल्यामुळे तिच्याशी जरबेने बोलणं ,मुद्दाम पाणउतारा करणे, कामात उगाचच चुका काढणे .तिची त्याच्या सेक्शन मधून बदली झाली ,तेंव्हा तिने कुठे सुटकेचा निश्वास सोडला. आता तिची नवीन बॉस मिस् स्वाती, वर्कोहोलिक ,आपल्यासमोर सगळेच तुच्छ असल्याच्या अविर्भावात बोलणारी, जेमतेम पस्तिशीची ,विकृत .लवकर घरी जायची परवानगी मागितली की मुद्दाम उशिरा काम देऊन डांबून ठेवणारी.
अनु कॉम्प्युटवर काम करण्यास बसली,तरी नीतीचा विचार डोक्यातून जाता जात नव्हता. मन अस्वस्थ होत होतं. ड्राफ्ट मध्ये चुका निघाल्या ,मिस स्वातीची बोलणी खाल्ली ,तेंव्हा कुठे नीतीला मनातून बाजूला काढून ती कामात मग्न झाली .बघता बघता साडेपाच वाजले .ऑफिस सुटले ,भाजी संपलेली लक्षात आलं,तेव्हा तिन भाजी घेतली .मोगर्याचा गजरा घेऊन एक मुलगी पुढे आली .क्षणभर तिला मोह पडला त्या गज-याचा.पण मग अविनाश आठवला .मोगरा तिने माळला की ,तो भलताच लाडात यायचा .आज तरी त्याला
साद देणे तिला शक्य नव्हते.तिने मग निकराने गज-याला नाही म्हटलं.त्याचा तो रुसवा खरंच तिला जीवघेणा वाटायचा. मन मोगऱ्याच्या वासान क्षणभर मन धुंदावलं.
ती गर्दीतून झपाट्याने पुढे चालली. गज-याचा गंध तिच्याशी रेंगाळत नाहीसा झाला लोकल थांबताच माणसांच्या लोंढ्याबरोबर बरोबर ती डब्यात ओढली गेली हलणा-या शरीराबरोबर
तिचं मनही हेलकावे खात राहीलं . घराजवळ येतात नीतीच्या काळजीने तिचं मन भित्रा ससा झालं .तिला पाळणाघराशी पाहतात बाईने छोटीच गाठोडं तिला दिलं. तिच्या स्पर्श होताच छोटी तिच्याकडे पहात मलुल हसली .तिला ताप नव्हता .तिच्या गळ्यात वेळेस तिच्या गळ्यातील हात टाकून तिने डोळे मिटले ,तशी अनुनं समाधानाचा श्वास सोडला. तिला घेऊन घराची वाट चालताना तिला वाटलं असंच जाऊन घरी स्वस्थ छोटीला कुशीत घेऊन झोपावं
.आज कोणी नसावं.आपल्यामध्ये फक्त आपण आणि आपली छोटी.
अविनाश घरी आला नव्हता .दार उघडल्यावर लक्षात आलं घरातला सकाळी अर्धवट आवरलेला पसारा आपल्याला खुणावतो आहे.चहाचा मुंग्यांनी भरलेला कप,जमिनीवर पसरलेलं वर्तमानपत्र ,नाश्त्याच्या प्लेट्स सगळेच अस्ताव्यस्त.अनुने छोटीला बेडवर ठेवलं. तिच्या केसावरून हात फिरवताना लक्षात आलं ,ताप उतरला पण सकाळपासून काय खाल्ले कोणजाणे.
तिने तिला लापशी करून द्यायचंं ठरवलं. पाण्याची वेळ झाली होती .कामाची बाई आली होती .तिच्याकडून आजची उद्याची कामे उरकून घ्यायची होती. भाज्या निवडून फ्रीजमध्ये ठेवायला हव्या होत्या. आवरता आवरता साडेआठ वाजले. अविनाश आला होता .तिच्याभोवती काही बोलत घुटमळत होता .त्याने छोटीला तिची काम होईपर्यंत सांभाळले. तिने छोटीला भरवलं ,आपली जेवणा उरकली. छोटीची झोप झाली होती .तिचं पोट भरताच ती तरतरीत झाली.नव्या गोष्टीसाठी ,ममा गाणी ,ममा गोष्ट, तिची भुणभुण सुरु होती .,"झालं या बाई आता लवकर झोपणार नाहीत.अविनाश तिच्याकडे पाहत तक्रारीच्या सुरात म्हणाला
खरंतर अनु कितीतरी दमली होती .छोटीबरोबर छान पैकी डुलकी काढून अविनाश फ्रेश
झाला होता .एका बाजूला ती त्याला हवी होती तर दुसऱ्या बाजूला छोटीला. अनुचे हात एका बाजूला छोटीला थोपटत होते तर दुसऱ्या बाजूला अविनाश हेतुपुरस्कर केलेला स्पर्श तिला नकोसा वाटत होता. पण त्याला नाराज करणे तिच्या आवाक्याबाहेर होतं .नाहीतर मग अबोला, भांडण ,त्यातचत मग पुढचे चार दिवस तिने त्याच्याकडे संथ नजरेने पाहत समजुतीच्या सुरात म्हंटलं ,"आता शहाण्यासारखा गुपचूप झोपशील प्लीज. तिच्यावर तो नाराज झाला पण मग लाईट ऑफ करून झोपी गेला .छोटी अजूनही परीराज्यात जात नव्हती. तिची भुणभुण सुरू होती. तिला थोपटत थोपटत अनुला सकाळची विकणारी बाई आठवली आणि वाटून गेलं आपलाच मुखवटा झाला आहे. शोकेस मध्ये विकत घेऊन ठेवण्याची गरज काय ?"
,
रेखा मिरजकर खारघर
नवी मुंबई