नमस्कार, नर्मदे हर.
आज पासून आपण एका नव्या लेखन मालिकेला सुरुवात करत आहोत. मागे एका लेखामध्ये आपण मंत्र चिकित्सेने बद्दल जाणून घेतलं होतं. आज पासून पुढे आपण अजून एका चिकित्सापद्धती बद्दल जाणून घेणार आहोत. खरंतर ही लेखमालिका बरंच आधीपासून सुरू करायची होती मात्र लिखाणाला वेळ मिळत नव्हता. आपण आता ज्या चिकित्सापद्धती बद्दल बोलणार आहोत त्या चिकित्सापद्धती ला *नो साइड इफेक्ट ट्रीटमेंट* असं म्हणता येईल. मुळातच ही चिकित्सा पद्धती औषधांवर अवलंबून चिकित्सा पद्धती नाही. या चिकित्सा पद्धती ला क्षार चिकित्सा असही म्हणतात. आपल्या रक्तात असलेल्या अनेक पेशींमध्ये उपस्थित असलेल्या क्षारांचे प्रमाण ज्या वेळेला कमी किंवा जास्त होते त्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी घडल्याचे दिसून येते. ह्या क्षारांचे प्रमाण संतुलित करणे हे या चिकित्सेचे मुख्य निदान आहे.
ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची वाढ ही ते झाड जिथे लावलं आहे त्या जमिनीत असलेल्या जीवनसत्त्वावर, पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते त्याचप्रमाणे रक्ताचं संतुलित असणं हे शरीराच्या निरोगी अवस्थेसाठी अत्यंत महत्वाचं आहे. थोडक्यात म्हणायचं झालं तर रक्तामध्ये असलेल्या घटकांचा अभ्यास करून, त्यातील कुठले घटक कमी झाल्यामुळे कुठला रोग निर्माण होऊ शकतो याचा अभ्यास करून मग क्षार चिकित्सा या चिकित्सा पद्धतीचा जन्म झाला असं म्हणता येईल. खरंतर ही चिकित्सा पूर्वापार चालत आलेली चिकित्सा आहे. अथर्ववेदामध्ये आणि आयुर्वेदामध्ये या चिकित्सेचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. मात्र कदाचित सर्वसामान्यांच्या अल्प ज्ञानामुळे त्या वेळेला ही क्षार चिकित्सा सर्वश्रुत झाली नव्हती. आज मात्र बायोकेमिक थेरपी या नावाने क्षार चिकित्सा प्रसिद्ध आहे.
आता मी काही शब्दांचा उल्लेख करणार आहे तो वाचल्यावर तुम्हाला कदाचित या चिकित्सेत बद्दल अधिक चांगल्या पद्धतीने कल्पना येईल. टिशू सॉल्ट, बायोकेमिक सॉल्ट, मिनरल सॉल्ट , ही नावं आपल्याला काही अगदीच नवीन नाही. ही क्षार चिकित्सा पद्ध्तीचीच अन्य नावे आहेत. आता ही चिकित्सा पद्धती *नो साइड इफेक्ट* चिकित्सापद्धती का आहे याबद्दल सांगते. आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये बारा प्रकारचे मिनरल सॉल्ट आढळून येतात. गंमत म्हणजे ही चिकित्सा पद्धती फक्त 12 मिनरल सॉल्ट वर तयार झालेली आहे. हेसॉल्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचे अनैसर्गिक औषधं नसून आपल्या शरीरात सापडल्या जाणाऱ्या बारा वेगवेगळ्या प्रकारचे क्षारच आहेत. हे क्षार संपूर्ण नैसर्गिक असून एका विशिष्ट प्रक्रियेने तयार केले जातात. हे क्षार आपल्या रक्तात लवकरात लवकर मिसळल्या जावे यासाठी त्यांच्यावर होमिओपॅथिक मेडिसिन पद्धतीने प्रक्रिया केली जाते.
आजार या शब्दाला इंग्लिश पर्यायी शब्द Disease असा आहे. खरंतर याचा शब्दशः अर्थ Lack of ease असा होतो. स्वस्थतेची कमतरता म्हणजे आजार. हा आजार शरीरातल्या कुठल्या ना कुठल्या स्वस्थता प्रदान करण्या-या घटकाच्या कमतरतेमुळे होतो असे म्हणायाला हरकत नाही. पेशी हे आपल्या शरीराचे सगळ्यात छोटे स्वरूप आहे. आपल्या शरीराची स्वस्थता ही आपल्या पेशींच्या स्वस्थते वर अवलंबून आहे आणि आज आपण ज्या क्षारांबद्दल बोलतो आहोत ते बारा क्षार व त्यांचे प्रमाण यावर आपल्या पेशींची स्वस्थता अवलंबून आहे; म्हणूनच आपल्या शरीराची स्वस्थता ही या बारा क्षारांच्या संतुलित प्रमाणावर अवलंबून आहे.
या बारा क्षारांना आपल्या शरीराचे रक्षक असेही म्हणता येईल. सेल पॅथॉलॉजी चा अभ्यास करताना पेशी मध्ये असलेल्या द्रवपदार्थात अतिशय सूक्ष्म प्रमाणात असलेल्या या बारा क्षारांचा प्रगाढ अभ्यास डॉक्टर शुस्लर यांनी केला. या बारा क्षारां वर अवलंबून एक विशिष्ट अभ्यास पद्धती आणि औषध पद्धती सुद्धा डॉक्टर शुस्लर यांनी तयार केली आणि म्हणून या चिकित्सा पद्धतीला शुस्लरची बायोकेमिक चिकित्सापद्धती असेही म्हणतात. आज आपण या चिकित्सा पद्धतीची तोंड ओळख करून घेतली. पुढच्या काही भागामध्ये आपण या पद्धतीतले बारा क्षार, त्यांचे शरीरातील महत्त्व, त्यांचे पासून होणारे इलाज याबद्दल बघणार आहोत.
डॉ. सुरूची अग्निहोत्री नाईक
पीएचडी ह्यूमन न्यूट्रिशन
(लेखिका अनेक वर्षांपसून टिशू सॉल्ट थेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत)