आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण जरी चर्चा करणार असलो तरीही हा लेख वाचल्यानंतर आपल्या प्रत्येकासाठी मी एक होमवर्क देत आहे. हा लेख वाचल्यानंतर आपण प्रत्येकाने आआपल्या स्वत:ची चाचणी करावयाची आहे आणि त्यानुसार योग्य तो निर्णय देखील घ्यावयाचा आहे.
तुम्हाला निश्चितच प्रश्न पडला असेल की आज हे मी असं वेगळंच काहीतरी काय लिहिते आहे? त्याचे उत्तर मी आता सांगते. आज आपण मानसिक आरोग्य या गोष्टीवर बोलणार आहोत. मागच्या लेखामध्ये आपण स्त्रीच्या आरोग्य बद्दल बोलत होतो त्यात सुद्धा आपण मानसिक आरोग्य हा विषय हाताळला होता. आज आपण हे मानसिक आरोग्य म्हणजे काय हे समजून घेणार आहोत.
खरं तर जिथे रोग नाही ते आरोग्य. निरोगत्त्व म्हणजे आरोग्य असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच पहिल्यांदा रोग काय असतो हे समजून घ्यावे लागेल. ज्या वेळेला आपण मानसिक रोगांचा विचार करतो, त्यावेळेला शारीरिक रोगांसारख्या शरीरावर दिसणाऱ्या खुणा मनावर स्पष्टपणे दिसत नाहीत. त्या अनुभवाव्या लागतात. दुसरं महत्त्वाचं असं की शरीराला जर काही रोग झाला तर त्याच्या खुणा स्वतःला देखील दिसतात आणि दुसऱ्याला देखील दिसतात उदाहरणार्थ शरीरावर झालेली जखम ही आपणही पाहू शकतो आणि आपल्या घरची मंडळी देखील बघू शकतात. पण मनाच्या जखमांचा तसं नाही. त्या जखमा दुसऱ्यांना तर दिसतच नाही आणि आपण स्वतः नाही बरेचदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांची दखल न घेतल्याने त्या दिवसेंदिवस वाढत जातात. एखाद्या जखमेवर नीट लक्ष दिलं नाही तर ती चिघळते पसरते आणि प्रसंगी अवयव देखील कापावा लागतो.
मनाच्या जखमा सुद्धा चिघळतात मात्र तिथे इतर कोणाला कुठला अवयव कापावा लागत नाही, इथे अख्खा माणूसच खचून जातो. हे होऊ नये म्हणून अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असतं.
आता आपल्या मनाला जखम झाली आहे की नाही आणि झाली असल्यास ती दूर कसे करता येईल हे समजून घ्यावे लागेल. मनावरच्या जखमा ओळखता याव्या म्हणून मानसशास्त्रज्ञांनी काही लक्षणं अभ्यासपूर्ण रीतीने आपल्यासमोर ठेवली आहेत.अर्थात ही लक्षणे असणे म्हणजे संपूर्णपणे मनोरूग्ण असणे असे होत नाही तर या लक्षणांपैकी कुठलेही लक्षण असणे म्हणजे आपल्या मनाची काळजी घेण्याची वेळ आता आली आहे असे समजावयास हरकत नाही.
ही लक्षणे बघण्याआधी आपण थोडसं या आजारांबद्दल बोलूयात. मानसिक आजार म्हणजे नक्की काय? तर मानसिक आजार म्हणजे एखाद्याच्या मनाची अशी अवस्था ज्यामुळे त्या व्यक्तीच्या विचारप्रक्रियेवर, त्या व्यक्तीच्या भावनांवर, त्या व्यक्तीच्या मूडवर, त्या व्यक्तीच्या दुसऱ्या एखाद्या गोष्टीशी संबंध जोडण्या वर आणि त्या व्यक्तीच्या रोजच्या कार्यक्षमतेवर ज्या वेळेला नकारात्मक फरक पडतो ती अवस्था म्हणजे मानसिक आजार होय.
अगदी सिरियस आजारांचा विचार केला तर मानसिक आजारांमध्ये काही आजारांचा निश्चितपणे समावेश करता येईल. Depression, Schizophrenia, Bipolar disorder, Obsessive compulsive disorder (OCD), Panic disorder, Posttraumatic stress disorder (PTSD) व borderline personality disorder हे काही आजार निश्चितपणे मनाशी निगडीत आजार आहे.
आता आपण मानसिक आजारांची लक्षणे बघूयात.
१. जर आपल्याला कायम सतत उदास वाटत असेल, कुणातही मिसळण्याची इच्छा होत नसेल आणि मनाची ही अवस्था दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस टिकून असेल तर हे मानसिक आजाराचे लक्षण असू शकते
२. येन केन प्रकारेण स्वत:च्या आयुष्याचा कंटाळा येत असेल, आत्महत्येचा विचार येत असेल तर निश्चितपणे काळजी घेण्याची गरज आहे.
३. मागचा-पुढचा कुठलाही विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची प्रवृत्ती सातत्याने उफाळून येत असेल तरीदेखील हे मानसिक आजाराचे लक्षण आहे.
४. अचानक कुठलीतरी अनामिक भयंकर भीती वाटत असेल, अचानक कुठलेही कारण नसताना अस्वस्थता वाटत असेल, काळजी किंवा भीतीपोटी श्वास घेण्यास त्रास होत असेल तर निश्चितपणे हे मानसिक आजारामुळे आहे.
५.सातत्याने वजनात वाढ किंवा घट होत असेल व त्याची तशी कुठलीही कारण दिसत नसतील तर ते मानसिक आजारामुळे देखील होऊ शकते.
६. असत्य गोष्टींना सत्य समजणे, काल्पनिक गोष्टींना सत्य समजून त्याप्रमाणे वर्तन करणे, भास आणि सत्य यामधील फरक न ओळखता येणे व त्यामुळे विचलित होणे हेसुद्धा मानसिक आजाराचे लक्षण आहे.
७. अति मद्यपान करणे, अतिप्रमाणात सिगरेट किंवा ड्रग्स चे सेवन करणे, सत्य लपवण्यासाठी वायफळ बडबड करणे, आपण अतिशय आनंदात व उत्साहात आहोत असे सातत्याने दाखवत राहणे सुद्धा मानसिक आजाराची लक्षणे आहेत.
८. मूड, वागणूक, जेवणाच्या, झोपेच्या सवयींमध्ये अचानक पणे व विनाकारण होणारा बदल हेसुद्धा काळजीचे कारण आहे.
९. मनाची एकाग्रता नसणे, थोड्यावेळासाठी देखील एका ठिकाणी बसून राहणे अशक्य होणे, सातत्याने चिडचिड करणे याकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही कारण ही सुद्धा मानसिक आजारांची लक्षणे आहे.
१०. दैनंदिन गोष्टींमध्ये देखील अतिशय काळजी वाटणे जसे एकदा कुलूप लावले आहे हे तपासून पाहिल्यानंतर सुद्धा आपण कुलूप लावले आहे की नाही हे वारंवार तपासून पाहणे,गॅस बंद केला आहे का हे एकदा तपासून झाल्यानंतर खात्री करून झाल्यानंतरही विश्वास न वाटणे असे जर सातत्याने होत असेल तर ते मानसिक आजाराचे कारण आहे असे समजायला हरकत नाही.
आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. वर दिलेली सर्व लक्षणे आणि वर दिलेले सर्व आजार हे योग्य दखल घेतल्यास संपूर्णपणे बरें होऊ शकतात. मानसिक स्थैर्य, काळजी, भीती, व्यसनमुक्ती, एकाग्रता, सतत दुःखी राहण्याचा स्वभाव या सर्वांवर टिशू सॉल्ट थेरेपी मध्ये मानसिक संतुलन सांभाळणार्या सॉल्ट चे प्रमाण संतुलित करण्याची क्षमता आहे.
तेव्हा आपल्याला मानसिक आजारांवर काळजी करण्याची गरज नाही, गरज आहे तर योग्य वेळेला तज्ञांचा सल्ला घेण्याची.
आता मी तुम्हाला जे होमवर्क दिले आहे त्याबद्दल बोलूयात. तुमच्यामध्ये अमुक अमुक लक्षणे मला दिसली असं जर मी तुम्हाला सांगितलं तर माणसाच्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे तुम्ही माझ्या बोलण्याला नकार द्याल. मी अगदी कितीही खरं बोलत असले तरी हा माणसाचा गुणधर्म आहे. अगदी प्रथमदर्शनी तरी आपल्यात काही कमतरता आली आहे किंवा आपल्याला काहीतरी आजार झाला आहे ही स्वीकारण्याची माणसाची मानसिक तयारी नसते आणि मानसिक आजार स्वीकारण्याची तर अजिबातच नसते. मग होमवर्क काय?याची खात्री करून घेणे हेच आजचे होमवर्क आहे.
अगदी थोडं जरी काही जाणवलं, उदाहरणार्थ डिप्रेशन जे अतिशय सर्वसामान्य आहे, तरीही ताबडतोब तज्ञांना संपर्क करावा. आपल्या आजूबाजूला, आपल्या कुटुंबामध्ये जर कोणी वर दिलेल्या आजारांचा पैकी एखाद्या आजाराने ग्रस्त व्यक्ती दिसत असेल किंवा जर कोणी मानसिकरीत्या डिस्टर्ब वाटत असेल तरीही तज्ञांना संपर्क करू शकता.
पुन्हा एकदा महत्त्वाचा सांगते. मानसिक आजार ही कुठल्याही प्रकारची कमतरता नाही तर मनाला झालेल्या एका छोट्याशा जखमेचा हा प्रश्न आहे. ही जखम कुणालाही, कुठल्याही वयात व कधीही होऊ शकते. या जखमेमुळे आपल्यावर कुठल्याही प्रकारचा ठप्पा लागत नाही. मानसिक आजारांसाठी सायकॉलॉजिस्ट किंवा इतर तज्ञांचा सल्ला घेणे हे कुठल्याही दृष्टीने कमीपणाचं लक्षण नाही. ही एक तात्पुरती अवस्था आहे जी दूर केल्या जाऊ शकते हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.
तर मंडळी तुम्ही हे होमवर्क स्वतः आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी निश्चित कराल अशी मला खात्री आहे.
डॉ. सुरुचि नाईक