रांग
मंडळी नमस्कार !
तुम्ही मुंबईत कधी बेस्ट ने प्रवास केला असेल तर त्या बसवर दारापाशी मोठा Q काढून तिथे लिहिलेले पाहिले असेल ' *रांगेचा फायदा सर्वाना* ' . आज *रांग* हा विषय घेऊन मंगळवारची ही टूकारगिरी .
लहानपणापासून चा आपला प्रवास हा अनेक रांगेतून गेलेला आहे ( बाल्यावस्थेत अगदी रांगूनच प्रत्येक जण सुरुवात करतो ) पण जस जस आपण मोठे होत जातो तस तस ' *रांगेची चिडचिड सर्वाना* ' असं होऊन जात
आता आठवा बर तुम्ही रांगेत उभे आहात आणि तुमची चिडचिडीत केव्हा झालीय
१) लोकल तिकीटाची रांग - आपण ज्या रांगेत उभे तीच हळू जाणार
२) टोल नाका - इथे ही तसेच ( additionally बायको ने सांगितलेल्या रांगेत गाडी घेतली नसेल , एखादा वाहनचालक मध्येय घुसत असताना आपण त्याला जागा करून देणे - हाय चिडचिड )
३) मुंबई - पुणे रोडवरील - अमृतांजन पुलाजवळील जागा ( जिथे आपण ती रांग हळू )
४) शनिवारी रात्री ( मुख्यतः: पुण्य नगरीत ) हॉटेल मध्ये जाण्यासाठी करावे लागणारे वेटींग
५) मॉल मधे बिल करताना आपण ज्या रांगेत उभे आहोत ती रांग हळू ( आता यावर काढलेला उपाय - मी बायको, मुलगी तीन वेगवेगळ्या रांगेत उभे असतो , जो बिल देयकापाशी लवकर पोचेल तिथे आपली ट्रॉली घेऊन जायची कसरत करायची , दुस-या रांगेतील मागच्यांना समजवायचे हो ही आमची मुलगी रांगेत उभी आहे आमचाच नंबर आला आहे इ इ .)
रांगेत आहोत, पुढे जात आहोत पण रांग थांबावी असं कधी वाटलंय? -
मुबंईत बोरीबंदर स्टेशनाच्या बाहेर जो बसस्टाँप आहेत तिथे सकाळी आपापल्या ठिकाणी कामावर जाणारे एका रांगेतच बस मध्ये चढतात . एक बस गेली की लगेच दुसरी बस तयार असते . अशा वेळी काही वेळा *रांग थांबावी*असं चक्क वाटत कारण जी बस उभी आहे त्यात ऑलरेडी खूप गर्दी झाली आहे , आता आपण गेलो तर उभारावे लागेल आणि या बसच्या मागे एक मस्त डबलडेकर उभी आहे. *तेव्हा जाणारी रांग थाबू दे असे वाटण्याचा विरुध्द्व अनुभव इथे घेता येतो*
बाकी लहानपणी शाळेच्या मैदानात जाण्यासाठी, शाळेच्या सहलींमध्ये , ध्वजसंचलन करताना , पहिला पगार काढण्यासाठी , मुलाच्या शाळेतील प्रवेशासाठी लावलेल्या रांगेने चिडचिड झाली असे कुणालाच वाटणार नाही .
शेवटी कुठल्याही रांगेत उभारताना येणा-या रागाला एका अनुस्वारी टींबाने काबूत ठेवायचा प्रयत्न करायचा मग ती रांग प्रत्येक वेळेला वेगळी रागदारी सादर करेल आणि मग
*थाबूंनी रांगेत सा-या, राग शांत जाहला*