मागच्या काही भागांमध्ये आपण वैदिक, उपनिषदातल्या काही कथा पाहिल्या. आजच्या भागात आपण एक लहानशी, रोचक पौराणिक कथा पाहणार आहोत. पौराणिक कथांकडे पाहताना वैदिक कथांपेक्षा थोडा वेगळा दृष्टिकोन ठेवला तर अधिक उत्तम रसग्रहण करता येतं असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. अनेक पौराणिक कथांमध्ये देव देवींच्या पात्रांची केलेली मांडणी किंवा इतर पात्रांचं प्रयोजन थोडं अतिरंजित वाटू शकतं. "हे असं कसं काय असू शकतं?" असं वाटावं इतका कल्पनाविलास त्यात केलेला असू शकतो; आणि खरं सांगायचं तर कथाकाराला हेच अपेक्षित आहे! आश्चर्य आणि चमत्कृतीपूर्ण विवेचनातून वाचकांना खिळवून ठेवायचं आणि जाता जाता हळूच आपला इप्सित संदेश देऊन जायचं हे पौराणिक कथांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. ही कथा वाचताना तुम्हाला हे नक्की जाणवेल. इथे पात्र किंवा त्यांचा वेश, आवेश यात आपण अडकून पडलो तर मात्र आपण कथाकाराच्या मूळ हेतूपर्यंत पोहोचू शकत नाही. आजची कथाही अशीच विशेष आहे, ज्यात शिव आणि पार्वतीच्या प्रतिकांमधून पुरूष आणि स्त्री या दोन शब्दांकडे पाहण्याचा एक उदात्त दृष्टिकोन देण्याचा कथाकाराने यथाशक्ती आणि यथायुक्ती प्रयत्न केला आहे.
---
पार्श्वभूमीः शिवशंभोचे दोन अविभाज्य घटक म्हणजे पार्वती आणि शिवगण. पैकी शिवगण हे ते होते जे मनुष्यांपेक्षा किंवा इतर कुठल्याही देवांपेक्षा वेगळे होते. त्यांचे गुणधर्म, स्वभाव, वागणं, सगळंच वेगळं. साधारणपणे सर्वमान्य नावं प्रमाण मानल्यास या गणांची नावंः भृंगी (भैरव), वीरभद्र, मणिभद्र, चंदिस, नंदी, जय, विजय आणि आदि. यातल्या भृंगीची ही कथा.
तर मग सुरूवात करूया आजच्या कथेला...
---
भृंगी नावाचा एक तपस्वी पृथ्वीवर रहात होता. तो शिवाचे निस्सिम भक्त. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्याला केवळ शिवशंभोच दिसत असत. शिवपूजा करत असताना खरंतर पार्वतीच्या पुजेशिवाय शिवाची पूजा अपूर्णच समजली जाते. पण भृंगीला मात्र हे मान्यच नव्हतं. शरीरांच्या बाह्यांगी रूपालाच प्रमाण मानणाऱ्या भृंगीच्या मनाला शिव आणि पार्वती हे एकरूप, एकचित्त आहेत हे मुळीच पटत नव्हतं. त्याच्यासाठी त्याचे शिवशंभो हेच सर्वव्यापी होते. भृंगीच्या लेखी शिवासमोर पार्वतीलाच काय, विश्वातल्या इतर कुठल्याही गोष्टीला काहीही स्थान नव्हतं.
एके दिवशी भृंगी शिवाच्या दर्शनासाठी कैलासावर आला. तिथे शिव आपल्या आराधनेत लीन होते आणि वामांगी पार्वतीदेवी बसलेली होती. शिव आपल्या आरधनेत मग्न असले तरी पार्वती मात्र जागृतावस्थेत होती. तिने भृंगीला आलेलं पाहिलं आणि त्याचं स्वागत केलं.
भृंगीला पार्वतीसह शिवाची पूजा मान्य नव्हती. म्हणून त्याने पार्वतीला विनंती केली की त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत तिने उठून बाजूला जावं. पार्वतीला त्याच्या या विनंतीचं हसूच आलं. भृंगी विद्वान असला तरी अजूनही त्यांची ज्ञानसाधना पूर्ण झालेली दिसत नाहीये असा विचार करून पार्वतीने भृंगीला शिव आणि ती कसे एकात्म आणि अविभाज्य आहेत ते समजावून सांगायचा प्रयत्न केला. मात्र भृंगीला ते काही केल्या पटेना.
शेवटी पार्वती आपलं म्हणणं ऐकत नाही हे पाहून त्याने सापाचं रूप धारण केलं आणि शिवाभोवती प्रदक्षिणा घालत असताना तो शिव आणि पार्वती यांच्या मधून सरपटत जाऊ लागला. पार्वतीला त्याच्या या वागण्याचा राग आला. भृंगीच्या या अशा प्रदक्षिणेने शिवाचीही आराधना भंग पावली. घडत असलेला प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने भृंगीला "पार्वतीशिवाय मी अपूर्ण आहे" हे सांगण्याचा प्रयत्न केला.
ज्या देवाला आपण इतकं शक्तिशाली मानतो तो एका स्त्रीशिवाय अपूर्ण??? शक्यच नाही. त्याने शिवाला नमन करून विचारलं, "हे शंभो, माझा हात माझ्या शरीराचा अविभाज्य भाग आहे, कारण तो माझ्या शरीराला जोडलेला आहे. माझे पायही माझ्या शरीराला जोडलेले असल्याने ते माझ्या शरीराचा अविभाज्य भाग मी मानू शकतो. पण तुम्ही दोघं तर दोन वेगवेगळी शरीरं आहात. तुम्ही आणि देवी पार्वती म्हणताय ते खरं असेल तर मग तुम्ही दोघं वेगवेगळ्या शरीरांमध्ये कसे?"
त्याचा हा प्रश्न ऐकताच शिवशंभोने त्याला सागितलं, "शरीर वेगळं असल्याने आत्मा वेगळा होत नाही. थांब तुला आमचं खरं आत्मरूप दाखवतो" आणि असं म्हणून शिवशंभोने पार्वतीला आपल्यामध्ये सामावून घेत "अर्धनारीश्वर" हे रूप धारण केलं. यात शरीराच्या डाव्या अर्ध्या बाजूला शिव आणि उजव्या अर्ध्या बाजूला पार्वती होती. शरीर आणि आत्मा, दोन्हीही एकजीव झालेलं ते रूप अतिशय लाघवी आणि मनोरम होतं. शिवाचा धगधगणारा अग्नि पार्वतीच्या पवित्र यज्ञकुंडात विलोभनिय भासत होता. पराक्रमाच्या तेजाला वात्सल्याचं कोंदण मिळालं होतं. ब्रह्मांड व्यापून उरेल असा अनंत प्रकाश अथांग अंतराळाने आपल्यात सहज सामावून घेतला होता. असं हे विलक्षण रूप पाहून समस्त ब्रह्मादी देवतांनी हात जोडून अर्धनारीश्वराचं दर्शन घेतलं.
पण शिवभक्तीमध्ये अंध झालेला भृंगी मात्र हे वैश्विक सत्यरूप पाहू शकला नाही. तो शिवाला म्हणाला, "हे शंभो, हे ते रूप नाही ज्यात मी माझा देव पाहतो. तुम्ही कदाचित माझ्या भक्तीची परीक्षा पाहताय? याही रूपाचं मी पृथक्करण करून दाखवू शकतो; माझा माझ्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे!"
असं म्हणून त्याने एका उंदराचं शरीर धारण केलं आणि त्याने शिव - पार्वतीच्या त्या अर्धनारीश्वराच्या शरीर मध्यभागातून कुरतडायला आणि विलग करायला सुरूवात केली. हे पाहताच पार्वतीला राग अनावर झाला. ती म्हणाली, "भृंगी, तुला पुरूष आणि स्त्री हे दोन भिन्न वाटतात ना? तर मग माझा शाप आहे तुला... आत्ताच्या आत्ता तुझ्या शरीरातून तुला तुझ्या मातेकडून मिळालेलं स्त्री-तत्व नष्ट होवो"!
तांत्रिक अभ्यासानुसार शरीराकडे पाहता शरीराचा हाडांचा सापळा हा पुरूषतत्वाकडून तर रक्त, मांस, रक्तवाहिन्या इत्यादी स्त्री-तत्वाकडून मिळतं असं मानलं जातं. पार्वतीच्या शापानुसार भृंगीच्या शरीरातून रक्त, मांस हळूहळू नष्ट होऊ लागली. त्याचं शरीर म्हणजे एक निव्वळ हाडांचा सापळा बनलं. तो इतका क्षीण झाला की त्याला त्याचा तोलही सावरता येईना; आणि अखेर तो प्रचंड वेदनेने तडफडत जमिनीवर कोसळला.
शिवाला आपल्या भक्ताला होत असलेल्या या वेदना पहावत नव्हत्या; पण तो पार्वतीने दिलेला शाप होता. त्यामुळे त्यात शिव काहीही करू शकत नव्हता. भृंगीला त्याची चूक कळली. त्याने पार्वतीची क्षमा मागितली आणि त्या वेदनांनी कळवळत त्याने शिवासह पार्वतीचीही पूजा केली. माफी मागून पार्वतीला म्हणाला, "मी चुकलो. ज्ञानोपासना करत असताना शब्द आणि भाव यातला फरक मी शिकत असतानाच दुसरीकडे शरीर आणि आत्मा यातला फरक समजायला कमी पडलो. माते, मला क्षमा कर. स्त्रीला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. मी माझ्या ईश्वराशी एकनिष्ठ होतो आणि त्यातूनच माझ्याकडून हा अविवेक घडला."
त्याचं हे बोलणं ऐकून पार्वतीला त्याची दया आली. ती म्हणाली, "तुला तुझी चूक कळली आहे. मी माझा शाप मागे घेते आणि तुला तुझं शरीर पूर्ववत करून देते".
यावर भृंगी तत्काळ उत्तरला, "नको माते. माझं शरीर हे असंच राहू दे जेणेकरून मला पाहून समस्त विश्वाला कळेल की पुरूष आणि स्त्री या दोन तत्वांना विलग करण्याचा प्रयत्न केल्यास काय परिणाम भोगायला लागू शकतो. त्यापेक्षा मला एक आशीर्वाद दे, मला कायम तुम्हा दोघांचं वास्तव्य घडू दे."
त्याचं हे बोलणं आणि विचार ऐकून ऐकून शिव - पार्वती यांना अतिशय समाधान वाटलं. शिवशंभो म्हणाले, "भृंगी, तू महान आहेस. तुझ्यासारखा भक्त विरळाच. आजपासून तुला आम्ही शिवगणांमध्ये समाविष्ट करून घेत आहोत. आता तू कायम आमच्याबरोबर राहशील."
पार्वतीच्या शापामुळे भृंगीला धड उभंही राहता येत नव्हतं. त्याला मदत व्हावी म्हणून पार्वतीने त्याला तिसरा पाय दिला. तेव्हापासून हा तीन पायांचा भृंगी इतर शिवगणांप्रमाणेच कैलासावर राहू लागला.
---
वाचकहो, प्रस्तावनेतच म्हणालो त्याप्रमाने या कथेत अशा अनेक चमत्कारिक गोष्टी आहेत ज्या वाचताना आपण त्या कल्पनारम्यतेत रमून जातो. भृंगींचा अप्रत्यक्ष उल्लेख तुलसीदास विरचित शिवमहात्म्यात आहे. शिवगणांचं वर्णन लिहित असताना तुलसीदास यांनी "बिनु पद होए कोई.. बहुपद बाहू" असा दोहा लिहिला आहे. अर्थ असा की "काही असे होते की ज्यांना पाय नव्हते; आणि असेही काही ज्यांना अनेक पाय होते."
भृंगीची अनेकविधं शिल्प आपल्या प्राचीन मंदिरांमध्ये तुम्हाला पहायला मिळतील; पैकी मी स्वतः विविधं ठिकाणी पाहिलेल्या भृंगीच्या शिल्पांपैकी कर्नाटकच्या बदामी येथील दुसऱ्या क्रमांच्या गुहेमधलं हे शिल्प माझं सर्वात आवडतं आहेः
यात नंदीच्या मागे डाव्या बाजूला हात जोडून उभा असलेला हाडांच्या सापळ्यासारखा दिसतोय तो भृंगी. पण तुम्हाला निव्वळ भृंगी पहायचा असेल तर त्यासाठी श्री रंगनाथस्वामी मंदिरातलं हे शिल्प पहाः
काही ठिकाणी भृंगीचा "उत्तम नर्तक" म्हणूनही उल्लेख केला गेला आहे आणि त्याला "समस्त देवतांचा नृत्यगुरू" असं संबोधण्यात आलं आहे. या संदर्भाने एका प्राचीन शिल्पकाराने भृंगीची अशीही एक प्रतिमा साकारली आहेः
अर्थात, आजच्या कथेचा विचार करता ही कथाही केवळ कल्पनाविलास नाहीच. या कथेतून घेण्यासारखी सर्वात मोठी गोष्टं म्हणजे, "पुरूष" आणि "स्त्री" या व्यक्ती नसून ती "तत्व" आहेत. भृंगीची दशा आणि त्याअनुषंगाने या कथेतल्या रूपकांचा वैद्यक दृष्टीने अभ्यास हा कदाचित एका स्वतंत्र लेखाचा आणि चर्चेचा विषय होईल. पण योग आणि शरीर - तंत्र याअनुषंगाने आपण या कथेचा एक धावता आढावा घेऊया.
माणसांचं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या घटकांचा योगशास्त्राच्या अनुषंगाने अभ्यास करताना तेज, वायु आणि आकाश यांना अनुक्रमे पित्त, वात आणि कफ अशा प्रकृती मानल्या आहेत; आणि उरलेली दोन तत्व म्हणजे पृथ्वी आणि आप हे अनुक्रमे पुरूष हार्मोन्स आणि स्त्री हार्मोन्स. प्रत्येक व्यक्तीमध्ये ही दोन्ही हार्मोन्स असतातच आणि म्हणूनच पुरूष असो वा स्त्री, शरीररचनेच्या बाह्यांगी रचनेमध्ये अनेक गोष्टी समान आहेत. निरोगी आयुष्याच्या अनुषंगाने हा हार्मोनल समतोल वात - पित्त - कफ यांच्या समतोलाइतकाच महत्वाचा. आपल्या वाचकांपैकी ज्यांना थायरॉईड किंवा तत्सम त्रास आहे त्यांना इथे म्हणत असलेला हार्मोनल समतोल म्हणजे काय आणि तो ढळला तर किती त्रास होतो ते चटकन कळेल. टेस्टेस्टेरॉन हे आधुनिक शास्त्रातलं असंच एक हार्मोन जे स्त्री आणि पुरूष दोहोंतही आढळतं आणि त्याचं प्रमाण नियंत्रणात न राहिल्यास आरोग्य निरोगी रहात नाही. शरीराची अंतर्गत व्यवस्था कोलमडून पडते आणि मग अशा शरीराला औषधयोजनेचा तिसरा पाय देण्याला पर्याय उरत नाही. कथेत शिवशंभोने अर्धनारेश्वराचं रूप धारण करणं म्हणजे खरं तर हा हार्मोनल समतोल दाखवून देणं म्हणता येईल, आणि त्याबरोबरच कुठल्याही शरीरातून हे पुरूष आणि स्त्री तत्व वेगळी काढता येत नाहीत हे सत्यही शिवाच्या त्या एकरूप अवतारातून स्पष्ट होत आहेच. पार्वती नेमकी हीच गोष्टं भृंगीला समजावून सांगत होती, पण अंध भक्तीने आंधळा झालेला भक्त हे असं सत्य पाहू शकला नाही.
वैद्यक किंवा योग या पलीकडे भावनिक पातळीवर विचार करतानाही "पुरूष" आणि "स्त्री" ही दोन अविभाज्य तत्व आहेत याची प्रचिती आल्याशिवाय रहात नाही. मुळात वात्सल्य ही भावना आपण स्त्री-तत्वाशी, तर शौर्य किंवा पराक्रम ही भावना आपण पुरूषतत्वाशी जोडतो. पण असे अनेक पुरूष आहेत जे अतिशय भावनाप्रधान असतात; आणि इतिहासात अशाही अनेक स्त्रिया होऊन गेल्या आहेत ज्यांनी गरज पडताच हाती तलवार उचलून मोठा पराक्रम गाजवला आहे. पराक्रमासारखीच वात्सल्य ही भावनादेखील लिंगभेदापलीकडची आहे. जाता जाता इथे मला मराठीमधल्या शब्दांची एक गंमत तुम्हाला सांगतो आणि आजच्या भागाची सांगता करतो.
वाचकहो, आपल्याकडे "आई" या शब्दाला समानार्थी असलेले शब्द म्हणजे "माता", "जननी", "माऊली". अनेकदा समानार्थी शब्द म्हणजे ढोबळपणे एकासाठी दुसरा वापरला तरी चालेल असे शब्द असा आपण विचार करतो. मात्र, तसं नक्कीच नाहीये. या प्रत्येक शब्दाची आपापली एक व्युत्पत्ती आहे आणि स्त्री-तत्वाशी निगडीत वात्सल्य या शब्दाच्या वेगवेगळ्या छटा दाखवणारे हे शब्द आहेत. कसे ते आपण एका उदाहरणातून पाहूया, जेणेकरून "शिव आणि पार्वती हे एकात्मच" या शिकवणीचाही एक सार्थ अर्थ आपल्यासमोर अधिक उत्तमपणे येऊ शकेल.
अशी कल्पना करा की एक आई आपलं लहान मूल घेऊन एका बागेत आली आहे. ती शांतपणे एका झाडाच्या सावलीत बसली आहे आणि तिचं मूल पलिकडेच तिच्या दृष्टिक्षेपात खेळतंय. ती तिच्याच विचारांमध्ये गुंगलेली असताना अचानक तिला मूल रडण्याचा आवाज ऐकू येतो.
... आता इथे, ते रडणारं मूल आपलंच आहे हे पाहून कळवळून उठणारी आई म्हणजे "माता". शब्दही पहा... इथे ममत्वाचा भाव अधोरेखित आहे.
रडणारं मूल आपलं नाही, कुणा दुसऱ्याचं आहे; अनोळखी आहे आणि तरीही जी आई तितकीच कळवळून उठते आणि त्या रडणाऱ्या मुलाला आपल्या कवेत घेते ती आहे, "जननी". इथेही शब्दातल्या अक्षरांची भाषिक योजना पहा. स्वतःच्या पलीकडे जनांसाठीही त्याच पातळीचं वात्सल्य असलेली ही आई.
आणि जिच्या मनात ही वात्सल्याची भावना केवळ लहानग्यांपुरतीच नव्हे, किंबहुना केवळ मनुष्यांपुरतीच नव्हे तर या समस्त विश्वातल्या सर्वांसाठी आहे अशी संतपदाला पोहोचलेली व्यक्ती म्हणजे "माऊली". म्हणूनच पसायदानातून "आता विश्वात्मके देवे" असं म्हणत समस्त विश्वासाठी "तोषोनि मज द्यावे, पसायदान हे" अशी ईश्वरचरणी मागणी करणाऱ्या ज्ञानेश्वरांना आपण "माऊली" म्हणतो. इथे खरं तर माऊली हा शब्द "आई" या रूढार्थाने स्त्री-दर्शक शब्दाचा समानार्थी शब्द; पण ज्ञानेश्वर एक पुरूष असूनही आपण त्यांना "माऊली" म्हणतो. कारण भाषादेखील हेच मानते की "पुरूष" किंवा "स्त्री" हे लिंगभेदापलीकडे असलेली निव्वळ विशुध्द तत्व आहेत. ती प्रत्येकात असतात; प्रमाण व्यक्तीसापेक्ष विषम असेल, पण असतात हे नक्की.
पुरूष आणि स्त्री... ही दोन्ही तत्व महत्वाची. यात श्रेष्ठ कनिष्ठ असा दुजाभाव नाहीच; आणि ज्या नात्यात अथवा समाजात असा दुजाभाव मूळ धरू लागतो ते नातं अथवा तो समाज निरस, सत्वहीन, संवेदनाहीन बनत जातो... भृंगीच्या शरीरासारखा.
या लेखात इथेच थांबतो; पुन्हा भेटूया ग्रंथश्रुतिच्या पुढच्या भागात, एका नवीन कथेसह...
ऋतुराज पतकी