" हे विश्वची माझे घर "
हे विश्वची माझे घर | ऐसी जयाची मती स्थिर |
किंबहुना चराचर | आपणची जाला ||
------- संत ज्ञानेश्वर
नवीन तंत्रज्ञानाने जग खूप जवळ आले आहे असे आपण म्हणतो पण प्रत्यक्षात किती जवळ आले आहे हे 'याची देही याची डोळा' आपण गेल्या वर्षी बघीतले आहे. निमित्य ही महामारी.
आज एक वर्ष होऊन गेल्यानंतरही अनेक ठिकाणी परिस्थिती परत "जैसे थे " होत आहे. या लहान विषाणूंनी अगदी थोड्या कालावधीत सगळीकडे झेप घेतली आणि
हे 'विश्वाचे' आंगण, आम्हा दिले आहे आंदण
उणे करु आपण सारेजण
जन विषयाचे किडे
या आविर्भावात त्यांनी सृष्टी हादरवून सोडली आहे
म्हणूनच आज वेळ आली आहे ती एकीने या विश्वशत्रूशी मुकाबला करायची. भाषा, जात, प्रांत, धर्म , या पलिकडे जाऊन एक होण्याची. इथला कुठल्याही एका व्यक्तीचा, समुदायाचा, राष्ट्राचा अहंकार सर्वांच्या नाशास कारणीभूत ठरणार आहे.
आपल्या घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तर सकाळी उठल्यावर आपण त्या आजारी व्यक्तीची अगदी आस्थेने सगळेजण चौकशी करतो. आज जग 'विश्वमहामारी' भोगत असताना गेले वर्षभर सकाळी उठल्यावर आपण ही अगदी हेच करत होतो/ आहोत.
गेल्या २४ तासात किती नवीन रुग्ण ? महाराष्ट्रात, राज्यात, भारतात, यूरोपात, अमेरिकेत काय परिस्थिती? हे आपण अगदी उतावीळ पणे बघत होतो/ आहोत.
त्यातही अमुक गावात गेल्या ४८ तासात एक ही नवीन रुग्ण नाही ही बातमी दिलासा देऊन जाते.
पण मंडळी हे गाव म्हणजे आपल्या घरातील एका खोलीतील एक कोपरा जणू. आता कुठं तो एक कोपरा स्वच्छ होतोय. त्या खोलीतील इतर कोपरे स्वच्छ व्हायचेत अजून, मग दुसरी खोली, मग व्हरांडा, मग हाॅल असे स्वच्छ / निर्जंतूक ( एक एक गाव, शहरं, राज्य, देश, खंड, विश्व) करत करत आपल्याला या संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत 'हे विश्वची माझे घर' संकल्पनेला प्रत्यक्षात आणायचे आहे. त्यासाठी आपण स्वत: आपणाकडून नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक. त्यासाठी ज्ञानेश्वरांच्याच दुस-या अभंगाची साद आज प्रत्येकाच्या मनात असणे जरूरी आहे.
"विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले | अवघेची झाले देह ब्रह्म ||
या प्रसंगी ज्ञानेश्वरांनी जी वैश्विक प्रार्थना "पसायदानाच्या" रुपात सांगितली आहे त्यातील काही ओळी आठवून या मनोगताला पूर्णविराम देऊ.
आता विश्वात्मके देवे | येणे वाग्यज्ञें तोषावे|
तोषोनि मज द्यावे | पसायदान हें ||
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रति वाढो| भूता परस्परे पडो | मैत्र जीवांचे ||
दुरितांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्ये पाहो |
जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||
आणि शेवटी
येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो | हा होईल दान पसावो | येणे वरे ज्ञानदेवो |
सुखिया जाला || सुखिया जाला ||
ॐ राम कृष्ण हरी
अमोल केळकर