• 01 April 2021

    मन कस्तूरी

    अबोल संवादाची अव्यक्त भाषा

    5 301

    अबोल संवादाची अव्यक्त भाषा

    अहोरात्र कटकटीनंतर शेवटी विभक्त झाले दोन्ही भाऊ! तसेही आत्तापर्यन्तच्या संबंधात दाखवण्यापुरतेच नाते होते. वाटलं होतं, कि आता सुटकेचा नि:श्वास घेतील! पण वास्तव्यात दोघेही एकट्यात ढसाढसा रडले. स्वत:च या दिवसासाठी केलेले प्रयत्न, रोजच्या त्रासातून सुटका मिळवण्याच्या ध्यासाने झपाटलेले होते दोघेही... पण आज प्रयत्न यथार्थ स्वरुपात असूनही त्यांना काहीतरी गमावल्या सारखे वाटत होते. खोलवर मनात कुठेतरी एक आशा जिवंत होती, कि कधीतरी या विवादातून संवाद साधला जाईल. पण आज ती आशा संपली, खेळ संपला, आपले आपणंच उरलो.

    आपल्याला हवे होते स्वातंत्र्य पण मिळाले एकटेपण!

    असे अनेक प्रकार बघत असतो आपण! म्हणतात खूप रागीट मनुष्य प्रेमाचा भुकेला असतो, पण निरागस प्रेम मिळाले, तरीही त्याने आत्तापर्यन्त स्वत:भोवती रागीटपणाचे जे वलय तयार करुन ठेवले आहे, त्यातून बाहेर निघून त्या प्रेमाला प्रतिसाद देणे येतंच नाही. आणि अथांग जलराशीत, त्याचे मन कोरडेच राहाते.

    कधीतरी जिव्हाळ्याची असलेली मैत्रिण, आता गृहस्थाश्रमी झाल्यामुळे एकदम दुरावलेली वाटते. भेटणे टाळते किंवा वरवरचा संवादच उरतो. कुठे ताळा लागलेला असतो कोणालाच कळत नाही. कोणाची काहीच चूक नसतांना एक प्रवाह आटतो, मैत्रीच्या नात्याची पदावनति होता, खाली उतरुन फक्त ओळख राहून जाते.

    या परिस्थितिमध्ये संवाद सेतु उरत नाही, खरं तर काय झालं, कुठे चुकलो, हेच आपल्या मनाला कळत नाही. एक प्रकारे एका नवीन मनाची ओळख होण्याची सुद्धा शक्यता असते.

    एखाद्या वादानंतर कितीतरी वर्ष मित्राचे तोंड न पाहाण्याचे वचन निभावणारा मित्र, त्याच दोस्ताच्या अंतिम दर्शनाच्या वेळेस हळवा होऊन आपल्या भावना, आपले अश्रु आवरु शकत नाही, कोसळून पडतो. नंतर त्यालाच जाणीव होते कि या वेड्यासाठी आपल्या मनात खरं तर कितीतरी प्रेम होतं! पण मग जे आत्तापर्यन्त वागलो, तो काय प्रकार होता?

    लग्न झाल्यानंतर नवीन नात्यांसोबतचा नाजूक प्रवास करत असलेली मुलगी, तिला खरंतर या वेळी आपल्या आई वडिलांकडून आधार हवा असतो. त्याऎवजी, आता काय, तू आम्हाला विसरलीस बाई, गेली तिकडचीच झाली, आता तुला काय आमची आठवण येणार, यासारखं काहीतरी ऎकवण्यात येतं. वरवर म्हटलेले हे शब्द तिला किती खोलवर जखम देत असतील ही कल्पना कोणाच्याच मनाला नसते. तिचे शुभमंगल होण्यासाठीचे प्रयत्न हेच आई वडिल करत होते आणि आता तिला हा प्रकार बोलून दाखवतांना खरं काय सिद्ध करायचं असतं? आपल्या कुटुंबातून दूर जाण्याचे दुख तिलाही असते आणि त्यासोबत नवीन आव्हानही असतात समोर. आणि खरा प्रश्न हा आहे कि या प्रकारावर त्या मुलीने काय बोलावे? ती सुद्धा वेळ निभावून नेते काहीतरी बोलून पण नात्यात क्षणार्धासाठी आलेला हा बदल पुन्हा त्याला मनातून कधीच आधीसारखा होऊ देत नाही.

    आपण किती ओळखतो आपल्या मनाला? वळवायचा प्रयत्न केला तरीही सामाजिक रीत्या काही काळासाठी किंवा वैयक्तिक पातळीवर जन्मभर सुद्धा, आपण जे नाही, ते दाखवतो आणि निरर्थक प्रदर्शन करतो. या अबोल संवादांची अव्यक्त भाषा सोबत असते, आणि तिच्या मदतीने आपल्या विविध व्यवहारातून स्वत:ला यशस्वी असण्याचे खोटे आश्वासन देत आपण जीवन प्रवासाला निघालेले असतो. मग कुठेतरी माणुसकीचा जरा आधार मिळाला, कि काही काळासाठी, आपले ओझे त्यांच्या खांद्यावर टाकून मोकळे होण्याचा प्रयत्न करतो.

    माझ्या मते, नात्यात दुरावा येणे, काही गैरसमज होणे किंवा कसली गुंतागुंत होण्यामागे हा अव्यक्त व्यवहार असावा! खरा संवाद आपला आपल्या मनाशी झालेला नसतो, सामाजिक रीत्या होणारा एक व्यवहाराचा प्रकार असतो, आणि मनाला हवा असणारा दुसराच काहीतरी.... पण आपल्या सामाजिक बांधिलकीला जपतांना, वैयक्तिक छवि जपण्यासाठी झटत असतांना, आपण मनाचा आवाज हक्काने दाबून टाकतो. मग पुढ़े जाता, कुठेतरी हे अबोल भाव उमटतात! तरीही आपण त्याला भाषेनी अबोल राहू देतो. पण कुठेतरी बांध फुटतो आणि आपण स्वत: आपल्या मनासमोर उघड़े पड़तो.

    नातेसंबंधांची वीण ही प्रत्येकाच्या जीवनात वेगळीच असणार, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोण, निभावून नेण्याचे कौशल्य आणि शेवटी हातात आलेले रिकामेपण बघत, स्वत:ची कीव करण्याला आपण ’अनुभव’ हे गोड नाव दिलेले असते.

    यावेळी, अजिबात आग्रह करणार नाही कि आपल्या जवळपास असलेले काही अव्यक्त किंवा अबोल बघा. आपल्या मनाशी संवाद साधा, घृणा असेल कोणाबद्दल तर खरंच तपासून बघा कि ही व्यवहाराची आहे कि व्यक्तिची, संवाद असेल बोचरा कोणाचा तर नीट लक्ष द्या कि त्यामागील हेतु सुद्धा तेवढ़ाच नकारात्मक आहे का? कोणाची क्षमा मागणे किंवा नात्यांना सुरळीत करण्यासाठी पुढ़ाकार घेण्याची अपेक्षा नाही इथे! फक्त हे बघा, कि आपण जो स्वभाव दाखवतोय, तो खरा मनातून अभिव्यक्त होत आहे कि व्यवहारातून, आपल्या अहंकारातून कि एखाद्या स्वार्थातून.

    या अबोल संवादांची अव्यक्त भाषा समजून घेतली, तर कमीत कमी आपल्या मनासमोर आपल्याला अपराधी म्हणून उभे राहाण्याची वेळ येणार नाही.

    - अंतरा करवड़े



    अंतरा करवड़े


Your Rating
blank-star-rating
Sunita Dagaonkar - (02 April 2021) 5

0 0

Jyoti Ahire - (02 April 2021) 4

0 0

उज्वला कर्पे - (02 April 2021) 5

0 0

Varsha Sanjay - (01 April 2021) 5

0 0

Neha Khedkar - (01 April 2021) 5
सोप्या शब्दात वर्णन👌👌

0 0

Jaya Rode - (01 April 2021) 5
अव्यक्त भाषा समजुन घेतली तर आपल्या मना समोर अपराधी होण्या ची खरच वेळ येणार नाही

0 0

vasudha gadgil - (01 April 2021) 5
मनाच्या सच्चेपणाने आपण बाहेरचे जगभराचे नाते कायम टिकवूशकतो मात्र तुम्ही ही गुरुकिल्ली दिलीत की अबोल संवादांची अव्यक्त भाषा समजून घेणे आवश्यक आहे. अप्रतिम सदर! मनःपूर्वक अभिनंदन!

0 0

View More