• 02 April 2021

    ग्रंथश्रुति

    कथा कन्याकुमारीची

    5 305

    आज आपण भारताचं दक्षिण टोक असलेल्या "कन्याकुमारी"ची एक पौराणिक कथा पाहणार आहोत. ही मूळ कथा शिवपुराणात आहे. मात्र ही कथा एकसलग नाही. विविधं संदर्भ आणि तुकडे एकत्र करून ही कथा एक सलग स्वरूपात तुम्हा सर्वांसमोर सादर करत असताना या लोककथांमधून लोकप्रिय झालेली विविधं प्रारूपांचाही (versions) विचार केलेला आहे.

    तर मग सुरूवात करूया, आजच्या कथेला... "कथा कन्याकुमारीची"

    ---

    ... तेव्हा भारतीय उपखंडावर भरत नामक राजाचा एकछत्री अंमल होता. या राजाला एकूण आठ पुत्र आणि एक मुलगी. या मुलीचं नाव "पुण्याक्षी". पुढे भरत राजाने तलवार ठेवण्याचा निर्णय घेतल्यावर त्याने आपल्या राज्याचे नऊ समसमान भाग केले आणि ते त्याचे आठ पुत्र आणि ही एक मुलगी यांच्यामध्ये वाटून दिले. पैकी हा दक्षिण टोकाचा भाग पुण्याक्षीच्या वाट्याला आला.

    दरम्यानच्या काळात बाणासूर नामक हिंस्र असुर वाढीला लागला होता. तो भगवान शंकराचा निस्सिम उपासक. एकदा भगवान शंकर तांडव करत असताना बाणासूराने त्यांना मृंदुंगावर अतिशय उत्तम साथ केल्याने भोलेनाथ त्याच्यावर प्रसन्न झाले! बाणासूरानेही मग संधी साधत थेट अमरत्वाचा वर मागितला; पण अर्थातच भगवान शंकराने त्याऐवजी त्याला वर दिला की तुझा वध केवळ एका कुमारिकेच्याच हातून शक्य होईल; इतर कुणीही तुला मारू शकणार नाही. तत्कालिन परिस्थितीत ज्यांचा राज्यकारभार एखाद्या कुमारिकेच्या हाती आहे अशी कुठलीही राज्य नव्हती. त्यामुळे बाणासूर उन्मत्त झाला. त्याच्या सत्तेच्या लालसेबरोबरच क्रौर्यही वाढत गेलं आणि एक उत्तम प्रशासक, संगीत उपासक बाणासूर त्याच्या कर्माने "असुर" बनला.

    या असुराचा वध करण्यासाठीच पुण्याक्षी या कन्येचा भरत राजाच्या वंशात जन्म झाला होता. लहानपणापासूनच पुण्याक्षी भगवान शंकराची उपासना करू लागली; या उपासनेत ती इतकी भगवान शंकराशी इतकी एकरूप झाली की ती त्यांच्या प्रेमातच पडली. तिच्या निस्पृह उपासनेला पाहून भगवान शंकरही तिच्यावर प्रसन्न होतेच. एक दिवस तिने भगवान शंकराला मागणं मागायची इच्छा दर्शवली आणि समोरून होकार येताच तिने शंभोला त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या निस्सिम भक्ताचं हे मागणं म्हणून त्यांनीही तिची मागणी मान्य केली आणि विवाहाचा मुहुर्त ठरला.

    तिकडे देवलोकांत मात्र शिवशंभोंच्या या निर्णयाने अस्वस्थता परसली. पुण्याक्षीचा जन्म बाणासूराचा वध करण्यासाठी झाला होता; पण तिचा विवाह झाल्यास ती कुमारी राहिली नसती आणि तिच्या हातून बाणासूराचा वध होऊ शकला नसता. भोलेनाथांना त्यांच्या निर्णयाबद्दल विपरित काही सांगण्याची कुणाची हिम्मत नव्हती. अखेर देवांनी नारदाचा मार्ग धरला आणि त्यांना ही परिस्थिती सांगितली. नारदाने देवांसह आणि पुण्याक्षीच्या भावांसह शंभोला हा विवाह करण्यापासून अडवण्यासाठी एक कट रचला.

    सुरूवातीला पुण्याक्षीच्या भावांनी शिवशंभोला त्यांच्या बहिणीशी विवाह करण्यासाठी काही अटी घातल्या. पण त्या अटी शंकराने सहज पार केल्या. अखेर त्यांनी अट घातली की दुसऱ्या दिवशीच्या सुर्योदयापुर्वी विवाह नाही केला तर हा विवाह संपन्न होणार नाही. हिमालयातून दक्षिणेकडे एका रात्रीत शिवशंभो येऊच शकणार नाहीत अशी त्यांना खात्री होती. शिवशंभोही आता हट्टाला पेटले होते.

    एव्हाना शिवशंभो विवाहस्थळापासून काहीच अंतर दूर येऊन ठेपले होते. आज हे ठिकाण सुचिंद्रम या नावाने प्रसिध्द आहे. इथे नारदाने शिवशंभोला अडवलं आणि बोलण्यात त्यांचा थोडा वेळ वाया घालवला. पण शंभोंना विवाहाची वेळ गाठायची होती, त्यांनी नारदाला तसं सांगितलंही. आपल्याच नादात चालण्याच्या भरात शिवशंभोंना प्रहरांचाही पुरता विसर पडला होता.

    इतक्यात आधी ठरल्याप्रमाणे पुण्याक्षीच्या भावांनी एका डोंगरामागे प्रचंड कापूर रचून एक विशाल अग्नि निर्माण केला. हा अग्नि इतका प्रचंड होता की वाटावं जणू डोंगरामागून सुर्योदय होण्याआधीची लाली आकाशात पसरायला सुरूवात झाली आहे. नारदाने शिवशंभोचं लक्ष त्याकडे वेधलं आणि त्यांना जाणिव करून दिली की तुम्ही वेळेत पोहोचू शकणार नाही. नारदाने सुचवलं, "अशा परिस्थितीत दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मान खाली घालावी लागण्यापेक्षा आपण परत फिरावं". शिवशंभो आपल्याच विचारात मग्न आणि आपण स्वतःचा शब्द पाळू शकलो नाही म्हणून स्वतःवरच प्रचंड रागावलेले. नारद सांगतोय सुर्योदय होण्यात आहे म्हणजे ते चूक कसं असेल असा विचार करून भगवान शंकर अर्ध्या वाटेतूनच मागे फिरले.

    इकडे पुण्याक्षी विवाहासाठी तयार होऊन बसली होती. विविधं पक्वान्न, फुलांची सजावट करून शंभोच्या स्वागतासाठी ती त्यांची वाट पहात बसली होती. पण पहाट होताच तिला कळलं की शिवशंभो येत नाहीयेत. हे ऐकून आपली फसवणूक, आणि तीही प्रत्यक्ष शिवशंभोकडून झाल्याच्या भावनेने तिला प्रचंड राग आला. तिने पक्वान्नांच्या मोठमोठ्या भांड्यांना पायाने रागाच्या भरात धुडकावलं आणि अविरत अश्रुंमध्ये तिचा चेहरा निस्तेज झाला.

    ... आता इथे या कथेत दोन वेगवेगळे शेवट वाचायला मिळतात. एक कथाकारांच्या परंपरेतून आलेला शेवट असा की तिने दक्षिण टोकाच्या एका पर्वतावर उभं राहून अघोरी साधना केली आणि तिथेच देह त्याग केला. पुण्याक्षी "कुमारी"च राहिली म्हणून या ठिकाणाचं नाव "कन्या कुमारी" झालं आणि जिथे तिने देह त्याग केला तिथेच आज तिचं मंदिर आहे.

    शिवपुराणात मात्र या कथेचा वेगळा शेवट आहे. ती शिवशंभोंवर रागावली आणि निश्चय केला की ती कधीही विवाह करणार नाही; आजन्म कुमारी राहिल. कालांतराने बाणासूराला तिच्या सौंदर्याबद्दल कळलं आणि तो तिला विवाहासाठी मागणी घालायला तिच्या राज्यात आला. तिच्या सौंदर्याचा मोह आणि अनेक वर्ष अजेय असल्याचा उन्माद यात त्याला "एका कुमारिकेच्या हातून वध" याचा विसर पडला. पुण्याक्षी अतिशय शूर आणि तपस्वी योगिनी होती. ती बाणासूराचा उत्पात जाणून होत; शिवाय तिचा अविवाहित राहण्याचा निश्चय माहित असूनही तिच्या इच्छेची पर्वा न करता बाणासूर तिच्यासमोर विवाह प्रस्ताव घेऊन उभा होता तिने त्याला विवाहासाठी अट घातली की त्याने तिच्याशी युध्द करावं आणि यात जर त्याने पुण्याक्षीला हरवलं तर ती बाणासूराशी विवाह करेल.

    ठरल्याप्रमाणे युध्दाला सुरूवात झाली. हे अगदीच खेळीमेळीचं युध्द असेल असं वाटून बाणासूराने युध्दाला सुरूवात केली खरी पण पुण्याक्षीचा एक एक लक्षवेधी घाव पाहता तो ताळ्यावर आला. त्याच्या ध्यानात आलं की समोर उभी असलेली पुण्याक्षी एक "कुमारी" आहे; पण आता त्याची सुटका नव्हती. समुद्रकिनाऱ्यावर घनघोर युध्द झालं आणि यात पुण्याक्षीने बाणासूराचा वध केला. पुढे, केलेल्या निश्चयाप्रमाणे पुण्याक्षी आजीवन अविवाहित राहिली... म्हणून या ठिकाणाचं नाव "कन्याकुमारी".

    ---

    वाचकहो, कथा इथेच संपते आणि विचार करण्यासाठी अनेक अनेक गोष्टी आपल्यासाठी मागे ठेवून जाते. या कथेत कथाकाराचा भरपूर कल्पना विलास आहे यात शंकाच नाही. पण एक नक्की, भौगोलिक परिस्थिती आणि बारकावे यांचा कथेत केलेला वापर केवळ अप्रतिम आहे! शिवाय इतर काही गोष्टीही खरोखर अधोरेखित करण्यासारख्या आहेत.

    शिवशंभोशी आता आपला विवाह होणार नाही हे ऐकून दुःख करणाऱ्या पुण्याक्षीचं वर्णन करताना कथाकाराने म्हंटलं आहे, "तिच्या अश्रुंमध्ये तिचे दागिनेही वाहून गेले; पक्वान्न मातीत मिसळली आणि मातीचा रंगच बदलला; तिच्या अश्रुंनी समुद्राच्या पाण्याचाही रंग बदलला". आजही तुम्ही कन्याकुमारीला जाल तर खरोखर तिथल्या समुद्रकिनाऱ्याची माती चमचमती वेगळीच आहे हे तुम्हाला जाणवेल! आणि अर्थातच महासागरांचा संगम असल्याने समुद्राच्या पाण्याचा रंगही वेगवेगळा आहे. त्यामुळे भौगोलिक सत्य आणि कल्पना यांची रंजक सांगड घालण्यात इथे कथाकार नक्कीच बाजी मारतो!

    आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्टं म्हणजे भरत राजाने आपल्या राज्याची समान वाटणी करताना मुलगा मुलगी असा कुठलाही भेद केलेला नाही हे या कथेत स्पष्ट आहे. वडिलांच्या प्रोपर्टीत मुलीला समान वारसा हक्क यासाठी आज आपल्याला कायद्यात सुधारणा करावी लागली असली तरी या प्राचीन काळी लिहिलेल्या कथेत मात्र हा अधिकार कथाकाराने सहज मान्य केलेला दिसतो.

    बाणासुराच्या रूपातूनही कथाकार आपल्याला एक खूप महत्वाची गोष्टं शिकवून जातो. इतर कुठल्याही भारतीय कथेप्रमाणेच या कथेतही "कुणी जन्माने असुर नसतो" ही बाब ठळकपणे समोर येते. मुळात देव, दानव/असुर, मानव या निव्वळ तीन "वृत्ती" किंवा "स्वभावधर्म" आहेत असा साधा हिशेब आपल्या साहित्यात वाचायला मिळतो. ज्याचं जे कर्म अधिक त्याला ते पद. कुठलाही असुर पूर्ण वाईट नव्हता. त्याच्या अंगीही अनेक चांगले गुण होतेच. बाणासूर तपस्वी होता, तसाच रावणही. या सगळ्या चांगल्या गुणांना झाकोळणारे वाईट गुण डोईजड झाल्याने त्यांची वर्णी असुर या गटात लावण्यात आली आहे, इतकंच. हीच बाब आपण आपल्या दैनंदिन आयुष्यातही एखाद्या व्यक्तीला सरसकट वाईट ठरवत असताना लागू करून पहायला हवी.

    आपल्या साहित्यातलं शिवशंभो हे पात्रही खूप विचारपूर्वक तयार केलेलं आहे. हे एक असं व्यक्तिमत्व आहे जे अतिशय सक्षम आहे, काहीही करण्याची क्षमता असलेलं, दिव्य ज्ञान आणि तंत्र - मंत्र ज्ञात असलेलं असं हे पात्रं आहे. पण ज्ञानाबरोबर येणारी जबाबदारी मात्र हे पात्र अनेकदा विसरतं. भोळेपणातून वहावहत जाण्यामुळे अनर्थ निर्माण होतात हे शिवशंभोंच्या अनेक कथांमधून समोर येणारी गोष्टं. क्रोध आणि प्रेम ... दोन्ही गोष्टी प्रमाणात आणि सत्पात्रीच द्याव्या ही गोष्ट विरोधाभासातून शिकवणारी शिवशंभो ही व्यक्तिरेखा अतिशय लोभस आणि लाघवी आहे; काहीही झालं तरी तुम्ही शिवशंभोचा तिरस्कार करत नाही; करूच शकत नाही अशीच ही एक वत्सल व्यक्तिरेखा आहे.

    आजच्या भागाचा समारोप करण्यापूर्वी आणखी एक अतिशय रोचक असा भौगोलिक संदर्भ मला तुम्हा सर्वांसमोर प्रस्तुत करायचा आहे. काही तमिळ साहित्यात भारत आणि श्रीलंका यांना जोडणारा एक प्रचंड मोठा भूभाग पृथ्वीच्या कधी काळी झालेल्या भौगोलिक हालचालींमध्ये नष्ट झाल्याचे दाखले आहेत.

    आज याचा अगदी पश्चिमेकडचा भाग शिल्लक आहे, ज्याला आपण "मादागास्कर" म्हणतो, मधला एक तुकडा श्रीलंका आणि अगदी पूर्वेला ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियापेक्षा साधारण १/३ आकाराचा हा एक संपूर्ण द्वीपखंडच होता, ज्याचं साहित्यात नमूद नाम आहेः "कुमारी खंडम". इथे पण कन्याकुमारीच्या कथेतली कुमारी, तीच या "कुमारी खंडम"मधली कुमारी असावी का? तत्वनिष्ठ विचार करता तरी हे असंच असावं असं वाटतं; पण सध्या तरी उपलब्ध साहित्यात याचा ठोस पुरावा समोर आल्याचं ज्ञात नाही.

    "कुमारी कंदम" किंवा "कुमारी खंडम" हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे; यावर इथे ग्रंथश्रुतिमध्ये आपण नंतर नक्कीच बोलूया. तुर्तास या लेखात इथेच थांबतो. पुन्हा भेटूया, एका नवीन कथेसह ग्रंथश्रुतिच्या पुढच्या भागात...

    ऋतुराज पतकी



    Ruturaaj Patki


Your Rating
blank-star-rating
आसावरी वाईकर - (04 April 2021) 5
ऋतुदादा, कथा आधी वाचनात आली होती पण इतक्या बरकाव्यांसहित नाही. शिवाय त्यावर तुझं जे विश्लेषण आहे ते खूपच जास्ती भावलं. इतक्या प्रचंड अभ्यासाबद्दल कौतुक वाटतं तुझं नेहमीच.

0 0

Veena Patki - (03 April 2021) 5
व्वा ऋतुराज ,तू दिलेले पुराणातले व विज्ञाननिष्ठ भौगोलिक दाखले पटणारेच आहेत.... पुढील लेखाची उत्सुकता आहे....!👍💐

1 1

Rekha Mirajkar - (03 April 2021) 5

1 0

Jeevan Talegaonkar - (03 April 2021) 5
माहितीपूर्ण

1 0

Pradnya Bagul - (02 April 2021) 5

1 0

Radhika Godbole - (02 April 2021) 5
नेहमीप्रमाणेच सुरेख 👌👌

1 0

मंदार कुलकर्णी - (02 April 2021) 5
नवनवीन कथा वाचताना (माझ्यासाठी नवीन) मला सुधा मूर्ती यांच्या The Serpent's Revenge या पुस्तकाची आठवण येते. लिहित रहा, आम्ही वाचत राहू...

2 1

View More