*जत्रा*
नमस्कार
ओढ लागली अशी जीवाला ,गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ही रक्ताची नाती
'अगं बाई अरेच्चा' सिनेमातले हे गाणे . ... . हे गाणे पाहिले / ऐकले की नकळत आपण मनाने आपल्या गावात पोहोचतो. काय सुंदर चित्रित केलय हे गाणे.वाई जवळच्या बावधन जवळील पारंपारिक जत्रा आणि परंपरेचे अप्रतिम चित्रण.
गेल्या काही दिवसापासून बावधनची हीच जत्रा सोशल मिडिया/ न्यूज चँनेलच्या माध्यमातून चर्चेत आहे. कारण सध्या 'कोविड' महामारीच्या प्रार्श्वभूमीवर या जत्रेला प्रशासनाने बंदी आणली होती पण ती मोडून लोकांनी साजरी केली. अर्थात हा विषय आपला नाही. पण एकंदर गावच्या जत्रेशी गावक-यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते असते हे यातून लक्षात येते.
गावोगावच्या जत्रा हा आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा. गावातील एखादे मंदिर आणि त्या देवतेच्या अनुषंगाने होणारा उत्सव. या जत्रेच्या निमित्याने बाहेर गावी स्थाईक झालेले परत आपल्या मायभूमीत येतात, भेटी होतात, यानिमित्याने सांस्कृतिक देवाण घेवाण होते
म्हणूनच आजकाल अनेकजण ग्रामदेवता, कुलदेवतेच्या जत्रेला जातात.
भराडीदेवीची जत्रा , एकविरा देवीची जत्रा , मार्लेश्वर जत्रा , जुन्नरची जत्रा , चतुःश्रुंगीची जत्रा, श्रीरापूर - रामनवमीची जत्रा, मिरजेत अंबाबाईची जत्रा ( नवरात्रात) आणि मीरासाबच्या दर्ग्याचा उरुस या दोन मोठ्या जत्रा, केळशी - महालक्ष्मी जत्रा , मुरुडला ग्रामदैवत कोटेश्वरीची जत्रा, वाईचा कृष्णामाई उत्सव ही काही प्रमुख उदाहरणे . अशी असंख्य उदाहरणे महाराष्ट्राच्या पंचक्रोशीत आढळतील.
हाच धागा पकडून आज तुम्हाला मी आमच्या ' सांगली ' जवळच्या हरीपूरच्या जत्रेत फिरवून आणणार आहे. सांगली पासून साधारण ३ - ४ किमी अंतरावर असणारे हे हरिपूर गाव. कृष्णा -वारणेचा पवित्र *संगम* इथे आहे . म्हणूनच की काय इथल्या शंकराच्या मंदिराला *संगमेश्वराचे मंदिर* म्हणले जाते. इथे श्रावण महिन्यात दर सोमवारी मोठी जत्रा भरते. हे मंदिर हेमाडपंथी आहे.
*प्रभू श्रीराम* सीतामाईंच्या शोधात जाताना इथे आले होते आणि त्यांनी शंकराची पूजा केली असा उल्लेख आढळतो . *मार्कंडेय ऋषी* ही इथे आले होते आणि ८० च्या दशका नंतर शेवटच्या श्रावणी सोमवारी न चुकता अर्धी शाळा सुटल्यावर *मी* पण अनेक सांगलीकर, मित्र परिवार, नातेवाईक, सगे -सोयरे यांच्या बरोबर इथे येत होतो.जे सांगलीत आहेत ते अजूनही येतात.
अनेक जण सांगली पासून हरिपूर पर्यंत चालतच जाणे पसंत करतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी झाडी, हिरवागार निसर्ग आणि सोबत मित्र मग ३-४ फर्लांग लांब जायला किती वेळ लागणार?
वाटेत लागणा-या बागेतल्या *गणपतीचे दर्शन* हा या मार्गातला पहिला थांबा. त्यांनतर थोड्याच अंतरावर लागणारी वेशीवरची कमान तुम्ही हरिपूरला आलात याची जाणीव करून देते .
जत्रेच्या काळात खरं लक्ष लागलेलं असायचं ते वेशीपासूनच लागणाऱ्या जत्रेतील दुकानांकडे. कुठे काय आहे, कुठली नवीन खेळणी आली आहेत हे बघतच संगमेश्वराच्या मंदिरात पोहोचायचे.
महादेवाचे दर्शन घेऊन झाल्यावर सभा मंडपात असणारा एक जादूचा फोटो हे पण एक आकर्षण असायचे कारण त्या फोटोच्या समोरून ,थोडं डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने पाहिल्यास तीन वेगळ्या देवतांचे दर्शन घडायचे.
मंदिरातून बाहेर पडल्यावर असायची फुल धमाल. संगमावर नावेतून फेरी, उंच पाळण्यात बसणे, मग भेळ, साखरेची चित्रे, आईस्क्रीम खादाडी आणी मग *पिटपिट*, चष्मे, धनुष्य बाण, शिट्या सह एखाद नवीन खेळणे हे घेऊन परतीचा प्रवास सुरु करायचा.
लहानपणी जत्रेत घेतलेली ही खेळणी कालांतराने जुनी झाली पण त्यातील एक खेळणे जे आजही उपयोगी ठरते ते म्हणजे *मुखवटा*. प्रसंगानरुप वेगवगेळा, जीवन जगण्यासाठी आवश्यक ठरणारा.
हा मुखवटा update, reniew वगैरे करण्यासाठी तरी अधूनमधून ' जत्रा ' अनुभवावी म्हणतो.
अमोल केळकर