गुढीपाडवा
शाॅपीझेन समुह आणि तमाम स्तंभ वाचकांना हिंदू नव संवत्सर ( प्लव नाम संवत्सर) तसेच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
साडे तीन मुहूर्तावर पैकी आजचा एक मुहूर्त. हा स्तंभ लेख वाचेपर्यत अनेकांनी आपल्या घरी प्रतिकात्मक गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले असेलच. मागील वर्षी प्रमाणे या वर्षी ही कोरोना महामारीचे संकट आहेच. मागील वर्षी हे संकट अचानक उद्भवलेलं होतं. यावर्षी परिस्थितीत तशीच असली तरी काही प्रमाणात धोका वाढण्याची कारणे, काय करावे काय करु नये याबाबत आपण थोडेसे का होईना माहितगार झालो आहोत. आजच्या दिवशीचे महत्व म्हणजे अनेकांकडे पंचांग पूजन आणि त्यातील संवत्सर वाचन केले जाते. काही पंचांगात दिलेल्या गणपतीची पूजा ही केली जाते. मागील वर्षी अनेकांना पंचांग आणणे ही शक्य झाले नाही. यावर्षी काही जणांनी तरी निदान काही दिवस आधी पंचांग आणून ठेवले. अनुभवातून शहाणे व्हायचे हे मानवी स्वभावात नकळत असते. त्याला व्यापक स्वरूप कसे देता येईल हे आपण आपलेच ठरवू या.
वर्षातील काही सण/ उत्सव हे असे असतात की एकप्रकारे आनंद,उत्साह वाटतो. सध्या त्या इंडियन आयडाॅल मधे ती परिक्षिका नेहा, एखादं सादर झालेलं गाणं आवडलं की जसं म्हणते
"आपने तो मौसम बदल दिया "
तसं मला हे येणारे सण/उत्सव वाटतात. गुढी पाडवा तर चैतन्य हा शब्द घेऊनच येतो. पण जागतिक संकट गेले दोन वर्ष सतत आपल्या भोवती आहे. किमान पुढल्या गुढीपाडव्या पर्यत तरी यासंकटातून मोठ्या प्रमाणात लस/ औषधे / उपचार याद्वारे संपूर्ण विश्वाची सुटका व्हावी ही प्रार्थना . त्यासाठी काही निश्चय करु
गुढी उभारु मदतीची
गुढी उभारु कर्तव्याची
गुढी उभारु जाणीवांची
गुढी उभारु नियमांची
गुढी उभारु सुदृढतेची
नियमीत पंचांग वाचनात बरोबरच हे पंच कर्म ही आचरणात आणून आपण आपल्या कडून विश्वाचे आरोग्य वाढवण्यास प्रयत्न करु या.
तेंव्हा
चला धरु रिंगण , चुडी गुढी उंचावून
आकाशीच्या अंगणात मंजुळ रुणझुण
नाचती चंद्र- तारे, वाजती पैंजण
छुमछुम झुमझुम , हा हा!
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया !!
परत नक्की अनुभवास येऊ दे
अमोल केळकर
चैत्र.शु. प्रतिपदा
१३/०४/२१