आजच्या भागात आपण एक अशी कथा पहणार आहोत ज्यात एका असुराने शिवशंभोला भयभीत केलं आणि अखेर विष्णूने हस्तक्षेप करून त्या असुराचा अंत केला. ही कथा आहे वृकासुर नामक एका असुराची, जी थोड्या फरकाने भस्मासुर नामक असुराच्या नावे आणि नंतर लोककथांच्या स्वरूपातही कशी वाचायला मिळते ते आपण आजच्या या भागात पाहणार आहोत. भारतीय ज्ञान परंपरेत "सत्पात्री दान" ही एक संकल्पना सांगितलेली आहे, ही शिकवण या कथेतून फार उत्तमपणे वाचकाकांपर्यंत पोहोचवण्यात कथाकार यशस्वी झाला आहे.
तर मग सुरूवात करूया वृकासुराच्या कथेने...
---
वृकासुर नावाचा एक मोठा शक्तिशाली सामर्थ्यवान असूर होता. रावणाच्या कुळात याचा जन्म झालेला. त्याला वाटलं की आपल्या पूर्वजांप्रमाणेच आपणही त्रिमुर्तींपैकी कुणाची तरी आराधना करावी आणि अजेय किंवा अमरत्वाचं वरदान मिळवावं. पण यासाठी उगीच वर्षानुवर्ष तपस्या करायची त्याची मानसिक तयारी नव्हती; त्याला झट की पट वरदान मिळवायचं होतं. त्रिमुर्तींपैकी असा कोण असेल जो लवकर प्रसन्न होऊ शकेल हे मात्र त्याला कळत नव्हतं. तो त्याचा हा प्रश्न घेऊन नारदाकडे गेला.
काय प्रसंग आहे पहा... समोर एक असुर साक्षात उभा आहे आणि तो अधिक शक्तिशाली होण्याचं वरदान कुणाला मागू असा प्रश्न विचारतोय. पण शेवटी नारदच तो. भगवान शंकराकडे विनाश करण्याची क्षमता आहे. तेच अशा असुराचा अंत करू श्कतील असा विचार करून नारदाने वृकासुराला भगवान शंकरांच्या दारी पाठवून देण्याची युक्ती लढवली. त्याने वृकासुराला सांगितलं... "ब्रम्हा आणि विष्णू काही थोडक्यात प्रसन्न होण्यातले नाहीत. कदाचित तुझं आयुष्य संपेल पण त्यांची परीक्षा काही संपायची नाही. त्यापेक्षा तू असं कर, भगवान शिवाची आराधना कर. तुझ्या पूर्वजांनीही त्यांचीच आराधना केली होती. कदाचित हे पाहता ते तुझ्यावर आणखी लवकर प्रसन्न होतील!"
वृकासुराला नारदाचं हे बोलणं मनापासून पटलं आणि त्याने हिमालयाजवळ केदार (आजचं केदारनाथ) इथे भगवान शिवाची आराधना करायला सुरूवात केली. यज्ञ प्रारंभ झाला, पण शिव काही प्रसन्न होईना. मग वृकासुराने ठरवलं कदाचित मी माझ्या शरीराचीच आहुती द्यायला सुरूवात केली तर भगवान शिव प्रसन्न होतील. ही अविचारी आणि अघोरी कल्पना त्याने अंमलात आणायला सुरूवात केली. त्याने त्याच्या शरीराचं मांस तोडून यज्ञात आहुती म्हणून टाकायला सुरूवात केली. तरीही भगवान शंकर प्रकट होत नाहीत म्हंटल्यावर अतिशय उद्विग्न होऊन त्याने ठरवलं, आता मी माझं मुंडकंच छाटून त्याचीच आहुती देतो; भगवान शंकर प्रसन्न झाले की ते मला जीवनदान देतीलच! हा अविवेकही करायला वृकासुर उठला आणि तो हातात तलवार घेऊन स्वतःवरच चालवणार इतक्यात... भगवान शंकर प्रकट झाले!
यावर वृकासुर म्हणाला, "नारद तर मला म्हणाला होता की तुम्ही लवकर प्रसन्न होता; पण तुम्ही माझी फार वेळ परीक्षा पाहिली. मला वाटतं नारदाने मला फसवलंय. पण आता इतक्या अघोरी तपस्येनंतर मी वरही तसाच अवघड मागणार आहे."
भगवान शंकर म्हणाले, "तू स्वत्वाच्या पलीकडे जाऊन माझी आराधना केली आहेस. माग, काय हवं ते माग!"
वृकासुर म्हणाला, "मला तुम्ही अमरत्वाचं वरदान द्या".
यावर भगवान शंकर म्हणाले, "हे असं वरदान देणं निसर्ग नियमाच्या विरूध्द आहे. हे खुद्द ब्रह्माजींच्या नियमाविरूध्द आहे. त्यामुळे मी तुलाच काय, पण कुणालाही अमरत्वाचं वरदान नाही देऊ शकत. तू दुसरा वर माग."
यावर वृकासुर म्हणाला, "मग मला तुम्ही अजेय होण्याचं वरदान द्या. पण अजेय होण्यासाठी मला कुणाशी युध्द करत बसायची वेळ कधीही येऊ नये. यासाठी तुम्ही मला असा वर द्या की मी ज्या कुणाच्या डोक्यावर हात ठेवेन तो गतप्राण होईल."
त्याचं हे भयंकर मागणं ऐकून भगवान शंकर अस्वस्थ झाले; पण त्यांना वृकासुराचं हे मागणं मान्य करावंच लागलं. त्यांनी वृकासुराला त्याच्या इच्छेनुसार वर दिला.
अर्थात हा असा वर मागताना वृकासुराची सुप्त इच्छा काही वेगळीच होती. त्याला पार्वतीचं हरण करायचं होतं. त्यासाठी भगवान शंकराचा अडसर दूर करण्याची आवश्यकता होती. त्याने शक्कल लढवली आणि म्हणाला, "तुम्ही मला हा वर दिलाय खरा; पण आधीच माझी नारदाकडून फसवणूक झालेली आहे. त्यामुळे तुमच्यासमोरच मला तुम्ही दिलेल्या या वराचा पडताळा घ्यायचा आहे. मी असं करतो, मी तुमच्याच माथ्यावर हात ठेवून पाहतो. बघूया तुमचा वर खरा आहे की तुम्हीही माझी फसवणूक केली आहे!"
आता मात्र भगवान शंकरांनी दिलेला वर त्यांच्यावरच उलटला होता. त्यामुळे ते वृकासुरापासून दूर पळू लागले. भोलेनाथांना पळताना पाहून वृकासुर आणखीच बिथरला. त्याला वाटलं भगवान शंकरही आपल्या फसवून पळ काढत आहेत. मग त्यानेही भगवान शंकराचा पाठलाग करायला सुरूवात केली. वृकासुराला मोठ्या शिताफीने चकवत घनदाट वनातून कशीबशी वाट काढत भगवान शंकर देवलोकी निसटले. वृकासुर अरण्यातच भोलेनाथाला शोधत बसला. भगवान शंकर विष्णूकडे गेले आणि त्यांनी भगवान विष्णूंना यातून सुटका करण्याची याचना केली. भगवान विष्णू म्हणाले, "तुम्हीच दिलेला वर आहे; तुमचा भक्त त्याची सिध्दी तपासून पाहू इच्छित आहे; आता कुणाचं तरी डोकं त्याच्यासमोर ठेवावंच लागेल. पण निव्वळ पडताळा घेण्यासाठी म्हणून असा कुणाचा बळी देणं योग्य नाही. यावर मला काहीतरी दुसरा उपाय करायला हवा."
असं म्हणून भगवान विष्णूने बाल - ब्रम्हचारी वेश धारण केला आणि ते त्या अरण्यात जाऊन पोहोचले जिथे वृकासूर भोलेनाथांना शोधत होता. वृकासुर समोर येताच बाल-ब्रम्हचारी वेशातले भगवान विष्णू त्याला म्हणाले, "बाप रे, किती धावताय? खूप दमलेले दिसताय. थांबा, जरा आराम करा. तुम्हाला तहान लागली असेल. थांबा, माझ्याजवळ असलेलं पाणी देतो."
तेजस्वी ब्रम्हचारी, बोलण्यात अमोघ गोडवा आणि चेहऱ्यावर एक मधुर मंदस्मित... हे रूप पाहून वृकासुरही थांबला आणि हतबल होत त्याने त्याची व्यथा त्या बाल ब्रम्हचारीला सांगितली. यावर तो वृकासुराच्या अवस्थेवर हसू लागला. त्याचं हसणं पाहून वृकासुराला त्याचा राग आला. त्याचा तो चिडलेला चेहरा पाहून बालब्रह्मचारी वेशातले भगवान विष्णू म्हणाले, "रागावू नका. पण आता मीही हसू नको तर काय करू? जो भगवान शंकर स्वतः दक्षाचा शाप भोगतोय त्याची आराधना केली?! अरे जो स्वतः दुसऱ्याच्या शापापासून स्वतःचं रक्षण करू शकला नाही तो इतरांना काय वर देणार?"
वृकासुराला हे बोलणं पटलं. नारद आणि भगवान शंकराने मिळून आपल्याला फसवलं आहे अशी भावना त्याच्या मनात दृढ होऊ लागली. उद्विग्न मनाने तो म्हणाला, "म्हणजे माझी तपस्या वाया? मला दिलेला वरही खोटा?"
तो बालब्रह्मचारी म्हणाला, "तेच तर म्हणतोय मी. त्याने दिलेला वरही खोटाच. माझं म्हणणं खरं वाटत नसेल तर ठेव स्वतःच्या डोक्यावर हात आणि पहा आजमावून; मग तर खात्री पटेल?"
आपली फसवणूक झालेली पाहून वृकासुर निराश झाला; आपली इतकी अघोरी तपश्चर्या वाया गेली हे पाहून तो हतबल झाला. तो बाल ब्रम्हचारी वेशातल्या विष्णूच्या मधुर वाणीला भुलला आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने खरोखरीच आपल्याच डोक्यावर हात ठेवला. मुळात भगवान शंकराने दिलेला वर सत्यच होता. त्यामुळे वृकासुराने आपल्या डोक्यावर हात ठेवताक्षणी त्याच्या शरीरात एक प्रचंड दाह उत्पन्न झाला आणि त्यात वृकासुर भस्म झाला.
... आणि अशाप्रकारे भगवान विष्णूने वृकासुरापासून समस्त ईश्वर आणि नश्वर जगताचं पुन्हा एकदा रक्षण केलं!
---
हीच कथा भस्मासुराच्या नावे गणेश पुराणात थोडी वेगळेपणाने वाचायला मिळते. भस्मासुराने भगवान शंकराकडे अमरत्वाचं वरदान मागितलं, मात्र भोलेनाथांनी ते वरदान देण्याचं नाकारल्यावर तो म्हणाला, "मग मला असा वर द्या की ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेन तो भस्म होऊन जाईल". भगवान शंकराने हे वरदान देण्याचं मान्य केलं. मात्र याच वरदानाचा वापर करून भोलेनाथाचा अडसर दूर करायचा आणि पार्वतीला हस्तगत करायचं हा भस्मासुराचा मनसुबा ओळखताच भोलेनाथाने विष्णूकडे मदतीची याचना केली. एका स्त्री-लोलुप व्यक्तीचा अंत एक स्त्री-रूपच सहज करू शकेल असा विचार करून भगवान विष्णूने "मोहिनी" रूप धारण केलं.
मोहिनीचं सौंदर्य पाहून भस्मासुरही तिच्या प्रेमात पडला. त्याने तिला लग्नाची मागणी घातली; मोहिनीने त्याला नकार देताच भस्मासुराने तिला कारण विचारलं; तर मोहिनी रूपातले भगवान विष्णू त्याला म्हणाले, "मी फक्त नृत्य निपुण पुरूषाशीच विवाह करायचा असं ठरवलं आहे." यावर भस्मासुर तिला म्हणाला, "मला नृत्य येत नसलं तरी मी तुझ्याकडून नृत्य शिकायला तयार आहे. तू शिकव... मी शिकेन. तुझ्याशी विवाह करण्यासाठी मी नृत्यनिपुण होईन."
मोहिनी नृत्याची एक एक मुद्रा करत गेली आणि भस्मासुर तशाच मुद्रा करत गेला. भस्मासुर नृत्यात आणि तिच्या सौंदर्यात भान हरपून बसला आहे हे पाहून एका क्षणी मोहिनीने तिचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. तिच्या पाठोपाठ ती जसं नृत्य करेल तसंच करणाऱ्या भस्मासुरानेही अगदी तसंच केलं. त्याला भगवान शंकराने दिलेल्या वरदानाचा विसर पडला होता. स्वतःच स्वतःच्या डोक्यावर हात ठेवल्याने तो क्षणात भस्म झाला. अशाप्रकारे भस्मासुराचा अंत झाला.
---
पौराणिक कथांची अनेक प्रारुपं आपल्याला लोककथांमध्येही पहायला मिळतात. या दोन्ही कथांकध्ये "भगवान शंकर घाबरून पळतात आणि भगवान विष्णू त्यांना वाचवतात" असा उल्लेख आहे. भगवान शंकरांच्या निस्सिम भक्तांना ही बाब खचितच न रूचणारी अशीच आहे. त्यामुळे (कदाचित) "शैव" (भगवान शंकराचे उपासक) आणि वैष्णव (भगवान विष्णूचे उपासक) यांच्यात नाहक मतभेद टाळण्यासाठीच लोककथांमध्ये या दोन्ही कथा एकमेकांना जोडून एक नवीन कथा पहायला मिळते. कथाकारांनी मोठ्या रंजक पध्दतीने आणि अतिशय हुशारीने या दोन्ही कथा एकमेकांना जोडल्या आहेत, आणि हे करत असताना त्यांनी भोलेनाथ आणि विष्णू या दोघांचाही अगदी यथोचित आदर राखला आहे!
या कथेत म्हंटलं आहे की वृकासुराला भगवान शिवशंभोकडून "डोक्यावर हात ठेवशील तो प्राणी भस्म होईल" असं वरदान मिळाल्यामुळे वृकासुराचंच नाव "भस्मासुर" झालं. भस्मासुराला हे वरदान दिल्यावर भोलेनाथ कैलासावर परत गेले आणि तपश्चर्येत लीन झाले. इकडे मिळालेल्या वरदानाचा पडताळा घ्यायचा म्हणून वृकासुराने एका गाईच्या डोक्यावर हात ठेवून पाहिला. हात ठेवताच ती भस्म झाली. भस्मासुराला (म्हणजे आधीचा वृकासुर, ज्याचं वरदान मिळाल्यानंतर नाव झालं भस्मासुर) अतिशय आनंद झाला. पण नारदाकडून फसवले गेल्याची भावना मात्र त्याच्या मनातून काही केल्या जात नव्हती, आणि म्हणूनच त्याला वाटलं की शंकराने दिलेलं हे वरदान गाईच्या बाबतीत तरी इप्सित फळ देऊन गेलं; पण हे वरदान फक्त प्राण्यांच्याच बाबतीत उपयुक्त आहे असं तर काही नसेल ना? भोलेनाथानेही मला फसवलं तर नसेल ना?
या शंकेला दूर करण्यासाठी तो हे वरदान आजमावून पाहण्यासाठी मनुष्य शोधू लागला. तो एका ऋषींच्या आश्रमात घुसला आणि तिथे उपस्थित एका शिष्याच्या डोक्यावर हात ठेवून पाहिला. हात ठेवताच तो शिष्यही भस्म झाला! आता त्याची खात्री पटली. पण लगेच त्याच्या मनात दुसरी शंका आली, "हा तर निव्वळ शिष्य होता. ज्यांच्याकडे ज्ञानाची शक्ती आहे, अशा तपस्वी ऋषींच्या बाबतीतही हे वरदान उपयुक्त ठरेल का? की भोलेनाथाने माझ्या मृत्यूसाठी इथे एक छुपा मार्ग करून ठेवला आहे?
याही शंकेचं निरसन करण्यासाठी म्हणून त्याने मोठ्या तपस्वी ऋषींचा पाठलाग करायला सुरूवात केली. सगळे ऋषीगण भयभीत झाले. डोक्यावर हात ठेवताच ते भस्म होत आहेत हे पाहून भस्मासुराचा आत्मविश्वास वाढत गेला. पण तरीही त्याच्या मनाने शंका उत्पन्न करायचं काही थांबवलं नव्हतं. त्याला वाटलं, "हे तर फक्त मनुष्य; देवांचं काय? इंद्राच्याच डोक्यावर हात ठेवून पाहूया..." असं ठरवून तो देवलोकी दाखल झाला. इंद्राला त्याच्याबद्दल आधीच कळलेलं असल्याने तो त्याच्या सेवकांसह आणि इतर देवगणांसह तिथून पळून गेला होता. भस्मासुराला इंद्रासन प्राप्त झालेलं पाहून देवगणांमध्ये अस्वस्थता पसरली. ते भगवान विष्णूकडे गेले.
इकडे इंद्रासनावर बसून भस्मासुर सर्वत्र नजर फिरवत असताना त्याला कैलासावरची पार्वती आणि तपश्चर्येमध्ये लीन शिवशंभो दिसले. पार्वतीला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. त्याला वाटलं की भोलेनाथ डोळे मिटून तप करत आहेत. मी हळूच तिथे गेलो आणि भोलेनाथाच्या डोक्यावर हात ठेवला तर तेही भस्म होतील आणि मग पार्वती माझीच! तो लगेच कैलासावर पोहोचला. भोलेनाथांची तपश्चर्या भंग पावणार नाही याची पूर्ण खबरदारी घेत तो त्यांच्या डोक्यावर हात ठेवणार इतक्यात ब्रह्माने काळाचं चक्र थांबवलं. यामुळे भस्मासुर थांबलेल्या क्षणाच्या चौकटीत बंदिस्त झाला. त्याने खूप प्रयत्न करूनही तो त्याच्या जागेवरून हलू शकत नव्हता; कारण ब्रह्माने "काळ" त्या एका क्षणात गोठवला होता.
ब्रह्माने काळाचं चक्र थांबवल्याने नश्वर जगात याचे वाईट परिणाम होतील हे पाहून भगवान विष्णूंनी स्वतः भस्मासुराचा वध करायचं ठरवलं. त्यांनी मोहिनीचं रूप धारण केलं आणि भस्मासुरासमोर प्रकट झाले. भगवान विष्णू तिथे आलेले पाहून ब्रह्माने काळाचं चक्र पुन्हा गतिमान केलं. मोहिनीला पाहताच भस्मासुराच्या मनातून पार्वतीबाबतचा विचार निघून गेला आणि तो मोहिनीच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकला. पण मोहिनीने त्याला विवाहासाठी नृत्य शिकण्याची अट घातल्याने तो मोहिनीकडूनच नृत्य शिकू लागला आणि मोहिनीने तिचा हात तिच्या डोक्यावर ठेवलेला पाहून तशीच मुद्रा करण्याच्या नादात एका बेसावध क्षणी त्यानेही त्याचा हात त्याच्या डोक्यावर ठेवला; आणि शिवशंभोच्या वरदानानुसार क्षणात भस्म झाला.
---
या कथेचं या तिन्हीपैकी कुठलंही रूप घ्या, कथाकाराने केलेला कल्पनाविलास वाचकाला खिळवून ठेवतो. लोककथांमधलं ब्रह्माने काळ गोठवणं आणि त्यामुळे भस्मासुर एका क्षणाच्या चौकटीत बंदिस्त होणं ही तर काय विलक्षण कल्पना केलेली आहे कथाकाराने! खरोखर, या पौराणिक कथा वाचत असताना त्या कथांमध्ये केलेला भाषिक खेळ, शब्दांची मजा आणि कल्पनांचा अथांग विस्तार मन मोहून टाकतो.
याही कथेत कथाकाराने रोचक कथेच्या माध्यमातून खूप छान शिकवण दिली आहे.
शिवशंभोने एका असुराला "हात ठेवताच समोरच्या प्राण्याला/व्यक्तीला भस्म करण्याचं वरदान" आणि त्याची नंतर झालेली परिणिती हा भाग इथे नक्कीच विचार करण्यासारखा आहे. आपल्याकडे "सत् पात्री दान" असा वाक्प्रचार आहे तो उगीच नाही. वेळ प्रसंग पाहून एखाद्या गोष्टीला "नाही" म्हणता यायला हवं, मग इथे तुमची आजवरची व्यक्तिगत ओळख आणि प्रतिष्ठा वगैरे गोष्टींच्या आहारी जाण्याची काहीच गरज नसते. चुकीच्या माणसांना दिलेलं वरदान आपल्यालाच मारक ठरू शकतं, त्यामुळे दान देताना गुरूनेही जे देतोय त्याचा विघातक वापर समोरच्या व्यक्तीकडून होऊ नये यासाठी त्या व्यक्तीचा स्वभाव, दृष्टिकोन आणि ज्ञान मिळवण्यामागचा हेतू तपासून पहावा आणि मगच आपल्याकडे असलेलं ज्ञान समोरच्या व्यक्तीला द्यावं असा जणू एक संकेत कथाकाराने या कथेतून अतिशय प्रभावीपणे दिला आहे.
वृकासुराने स्वतःच स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून त्याचा अंत होणं हे रूपक खूप बोलकं आहे. वृकासुरासारखे किंवा भस्मासुरासारखे दुसऱ्याच्या वाईटातून आनंद मिळवणारे आणि त्यातच सार्थक मानणारे स्वतःच स्वतःच्या अशा वृत्तीचे बळी ठरतात. अशा लोकांचा अंत करण्यासाठी इतर कुणालाही शस्त्र हातात घेण्याची गरज नसतेच. "अहंकार" हा अविवेक, अज्ञान आणि न्युनगंडाच्या पोकळीतून येणारा निव्वळ आवाज असतो. जसं रिकाम्या भांड्यात आवाज घुमतो तसा अहंकाराचा आवाजही अज्ञानाच्या पोकळीत घुमतो आणि म्हणून तो ध्वनी अतिशय तीव्र असतो. अहंकारी व्यक्तीच्या या पोकळीला हात घातला की ते स्वतः अविवेकाने वागू लागतात आणि त्यातच त्यांच्या असुरी वृत्तींचा नाश होतो.
या कथेतही भस्मासुराचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू आपलं सुदर्शन चक्र बाहेर काढले असा कथाविस्तार कथाकार करू शकत होताच. पण तसं न करता त्याने कथेत भस्मासुराचा स्वतःच्या हातून अंत घडवून आणला. अर्थातच वरच्या परिच्छेदात म्हंटल्याप्रमाणे यातून एक शिकवण देणं हा तर एक भाग आहेच; पण मला वाटतं इथे आणखी एक बाब विचार करण्यासारखी आहे. भारतीय राज्यशास्त्र आणि नीतीशास्त्रामध्ये "शिक्षापात्र गुन्हा कुठला मानावा" यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे. वाईट कृती हे कर्म तर गुन्हा आहेच, पण एखाद्या वाईट गोष्टीची लालसा निर्माण झाल्यावर त्या लालसेला प्राप्त करण्यासाठी कर्म करण्याची मनात निव्वळ इच्छा निर्माण होणं हे गुन्ह्याच्या दिशेने उचललं गेलेलं पहिलं पाऊल; आणि म्हणूनच "लालसा प्राप्त करण्यासाठी कृती करण्याची योजना मनात तयार करणं" याचाही "कर्म" म्हणून विचार केला गेला आहे. वृकासुर / भस्मासुराच्या कथेत वर्णन केलं आहे त्याप्रमाणे अशा व्यक्तींसाठी त्यांचं कर्म हेच त्यांच्या विनाशासाठी एक शस्त्र बनतं. हेच सांगण्यासाठी कथाकाराने विष्णूच्या सुदर्शनचक्राइतकंच (किंबहुना त्याहूनही जास्त) घातक अशा मोहिनीच्या सौंदर्याचं शस्त्र भस्मासुरावर चालवलं आहे! मला वाटतं इथे या अज्ञात कथाकाराने आपल्या नीतीशास्त्राच्या निपुण ज्ञानाची अतिशय उत्तम प्रचिती दिली आहे.
(हाळेबिडू (कर्नाटक) येथील होयसाळेश्वर मंदिरातील विष्णूच्या "मोहिनी" अवताराचं शिल्प.)
भगवान विष्णूंच्या मोहिनी अवताराचा आणखी एक संदर्भ समुद्रमंथनाच्या कथेत सापडतो. यात भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून देवांना अमृत दिलं आणि असुरांना अमृतापासून दूर ठेवलं. आजच्या लेखाचा समारोप करण्याआधी नावांच्या बाबतीतला आणखी एका संदर्भाचा खुलासा करणं मला आवश्यक वाटतंय. "वृकासुर" हे नाव तुम्हाला महाभारतातही वाचायला मिळेल. वृकासुर हा शकुनीचा पुत्र होता. शकुनीचा सर्वात मोठा मुलगा "उलूप". त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि रक्षणार्थ केलेल्या यज्ञाचं फळ म्हणून शकुनीची पत्नी अर्शीच्या पोटी वृकासुराचा जन्म झाला अशी एक आख्यायिका आहे. शकुनीची ही दोन्ही मुलं महाभारताच्या युध्दात मारले गेले. पण यांचा सर्वात लहान भाऊ, शकुनीचा तिसरा मुलगा "वृप्रचिट्टी" महाभारताच्या युध्दात जिवंत राहिला आणि नंतर गांधारचा राजा बनला. अर्थातच महाभारतातला हा वृकासुर आणि या पौराणिक कथेतला वृकासुर या दोन भिन्न व्यक्तिरेखा आहेत.
---
अनेक पौराणिक कथांचे भौगोलिक संदर्भ आणि त्यानुसार वर्षानुवर्ष जिवंत असलेल्या लोककथा हे भारतीय पौराणिक कथांचं वैशिष्ट्य आहे. ही कथादेखील याला अपवाद नाहीच. आजच्या बुंदेलखंडमधील बांदकपूर या लहानशा गावाजवळ एक "जोगेश्वर धाम" नामक शिवमंदिर आहे. लोककथांनुसार हीच ती जागा जिथे शिवशंभो वृकासुराला घाबरून पळून आले आणि लपुन बसले.
जोगेश्वर धाम मंदिर (Photo Source: Google Images)
इथे स्वयंभू शिवलिंग आहे आणि स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या शिवलिंगाचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे. भूगर्भशास्त्रातल्या अभ्यासकांनी याचा अभ्यास करून यातली सत्यासत्यता पडताळून पहायला हवी असं मला मनापासून वाटतं.
जोगेश्वर धाम शिवलिंग (Photo Source: Google Images)
असं म्हणतात की या मंदिराच्या मागच्या बाजूने सुमारे १५ किलोमीटर लांबीचा एक भुयारी मार्ग होता जो थेट बांदकपूरला जात असे. स्थानिक कथांनुसार वृकासुरापासून आपले प्राण वाचवण्यासाठी शिवशंभोने याच भुयारी मार्गाचा वापर केला होता. तिथल्या डोंगरांचे दगड कोसळून तो मार्ग बंद झाला आहे आणि आता तिथे मंदिराची भिंत बांधून काढण्यात आली आहे. हे सगळे संदर्भ किती खरे, किती खोटे हा भाग जरी चर्चेचा आणि व्यक्तिगत आस्थेचा विषय असला तरी या संदर्भाने तिथल्या भूगर्भशास्त्रीय लिखित तथ्यांवर मात्र नक्कीच अभ्यास व्हायला हवा.
तर अशी ही कथा वृकासुराची.
पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह ग्रंथश्रुतिच्या पुढच्या भागात...
ऋतुराज पतकी