• 07 May 2021

    ग्रंथश्रुति

    कथा कलियुगाची (भाग १)

    5 258

    वाचकहो, आजच्या भागात आपण पाहणार आहोत कथा कलियुगाची. कृष्णाच्या मृत्यूनंतर कलियुगाची सुरूवात झाली. खरं तर कलियुग हे कालमापनातलं एक एकक आहे, पण कथाकाराने कलियुगात माणसाचं वर्तन कसं असेल आणि कलियुगातला समाज कुठल्या नीतीमूल्यांवर आधारलेला असेल याबाबतची भविष्यवाणी एका अतिशय रोचक कथेतून केली आहे. आज आपण कलियुगात प्रत्यक्ष जगत आहोत. ही कथा वाचताना या कथेतल्या विविधं रूपकांमधून केलेलं कलियुगातल्या माणसाच्या स्वभावाचं वर्णन किती तंतोतंत बरोबर आहे याची पदोपदी प्रचिती येत राहते!

    तर मग, सुरू करूया... कथा कलियुगाची.

    ---

    कलियुगाचं आगमन आणि श्रुंगीचा शाप

    महाभारताच्या युध्दानंतर पांडवांनी आपलं सगळं राज्य अभिमन्यूचा पुत्र परीक्षित याला सुपुर्द केलं आणि ते हिमालयात स्वर्गावरोहणासाठी निघून गेले. महाभारताच्या युध्दानंतर कृष्णानेही पृथ्वीवरचं आपलं अवतारकार्य संपवलं. कृष्णाच्या मृत्यूबरोबरच द्वापार युगाची सांगता झाली.

    एक दिवस राजा परीक्षित भ्रमंतीसाठी बाहेर पडला असताना त्याला एका नदीकाठी एक बैल आणि एक गाय एकमेकांशी मनुष्यवाणीमध्ये बोलताना दिसले. मात्र बैल आणि गाय सामान्य नव्हते. बैलाचे तीन पाय नव्हते. तो केवळ एका पायावर उभा होता. गायही अतिशय दुःखी दिसत होती. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते.

    बैल गायीला म्हणाला, "हे देवी, तुझ्या चेहऱ्यावर ही दुःखाची छाया कशामुळे? माझे तीन पाय मोडून पडले आहेत आणि मी आता केवळ एकाच पायावर उभा आहे हे पाहून तुला दुःख होत आहे का? की आता पांडव गेले, कृष्णही गेला. त्यामुळे आता तुझं पालन कोण करणार, ही चिंता आहे तुला?"

    गाय म्हणाली, "हे देव, खरं तर तू सगळंच जाणतोस. आणि तरीही मला विचारत आहेस की मी दुःखी का आहे? कृष्णाच्या अवतारसिध्दीनंतर आता कलियुग येणार आहे. केवळ तुझेच नाही, तर या कलियुगात संपूर्ण समाजाचे तीन पाय मोडून पडतील. केवळ एका पायावर हा समाज उभा राहू शकेल का याची मला चिंता आहे. देव, ऋषिगण, साधू, सन्यासि या सगळ्यांची मला फार काळजी वाटते. कलियुगात या सर्वांना फार त्रास आणि आपदा सहन कराव्या लागणार आहेत. कृष्णाच्या मृत्यूनंतर जणू माझं सौभाग्यच संपलं आहे असं मला वाटत आहे."

    या दोघांमध्ये हा संवाद सुरू असतानाच एक काळ्या रंगाचा मनुष्यरूपातला काळ तिथे आला. अंगाने एखाद्या पैलवानासारखा दिसत असलेला तो कालपुरुष तिथे येताच त्याने काहीही कारण नसताना गायीला लाथ मारली. जवळच असलेल्या एका झाडाची फांदी तोडून केवळ एका पायावर उभ्या असलेल्या त्या बैलाला फटके मारायला सुरूवात केली. तो बिचारा कुठे पळूही शकत नव्हता. त्याला फटके मारत असताना तो काळपुरुष मोठमोठ्याने हसत बैलाच्या विव्हळण्याची मजा पहात होता.

    तिथेच उपस्थित असलेल्या राजा परीक्षिताला हे पहावलं नाही. त्याला अतिशय राग आला आणि आपल्या धनुष्यावर बाण चढवत राजा परीक्षित त्या कालपुरुषासमोर येऊन उभा ठाकला आणि आपल्या गंभीर आवाजात त्याला म्हणाला, "हे दुष्ट, पापी, नराधमा, तू आहेस तरी कोण? लक्षात ठेव तू राजा परीक्षिताच्या राज्यात उभा आहेस. तू या गायीला लाथ का मारलीस? तिने तुझं काय वाईट केलं होतं? बैलालाही विनाकारण त्रास दिलास आणि याउपर या सगळ्याची मजा घेत तू त्यांच्याकडे पहात मोठमोठ्याने हसत असलेलं पाहिलंय मी. राजा परीक्षिताच्या राज्यात या अपराधासाठी एकच दंड आहे... तुझं मुंडकं तुझ्या धडापासून अलग केलं पाहिजे."

    ... आणि असं म्हणत राजा परीक्षिताने आपल्या धनुष्याची प्रत्यंचा ताणली. राजाचं हे उग्र रूप पाहून तो कालपुरुष घाबरला. त्याने परीक्षिताचे पाय धरले आणि मोठमोठ्याने रडत त्याची क्षमायाचना करू लागला. तो म्हणाला, "हे राजा, मी कलियुग आहे. मी एक कालपुरुष आहे. एका कालपुरुषाचाही वध करण्याइतकी सिध्दी तुमच्या धनुष्यात आहे हे मी जाणतो. श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर माझं पृथ्वीवर आगमन होणं ही नियती आहे. तुम्ही कतृत्ववान आहात; पण कृपया नियतीला बदलण्याचा प्रयत्न करू नये. मी तुमच्या राज्यात आश्रयासाठी आलो आहे. हे दयाळू राजा, मला आश्रय द्या."

    परीक्षित राजा म्हणाला, "माझ्या राज्यात तुला आश्रय देऊ? अशक्य! तुझ्यासारख्या अधर्मी नराधमाला माझ्या राज्यात काहीही स्थान नाही. किंबहुना तुला या पृथ्वीवरच काहीही स्थान नाही."

    यावर तो कलियुग नामक कालपुरुष म्हणाला, "हे राजा, तुझ्याकडे आश्रय मागत असलेल्याला आश्रय न देणं हा पांडवांच्या दैदिप्यमान राजपरंपरेचा अपमान आहे. एक आश्रित म्हणून तुम्ही मला तुमच्या राज्यात स्थान द्या. मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही मला नेमून दिलेल्या जागीच मी राहिन. इतरत्र कुठेही राहणार नाही. इतरत्र आढळल्यास तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या."

    हे ऐकून राजा परीक्षित म्हणाला, "एक आश्रित म्हणून मी तुला स्थान देण्यासाठीही तुझ्यात किमान एक तरी चांगला गुण हवा. मला तुझ्यात केवळ दुर्गूण दिसत आहेत. जर तुला मी आश्रय दिला तर तू तुझे हे दुर्गूण माझ्या राज्यातही पसरवशील. तू जर तुझ्यातला एक चांगला गुण मला सांगू शकलास तर मी तुला आश्रय देण्याचा नक्की विचार करेन."

    कलियुग म्हणाला, "हे राजा, तुम्हाला माझ्यात असंख्य दुर्गूण दिसत असले तरी माझ्यात एक फार उत्तम गुणदेखील आहे. आजपर्यंत ईश्वरप्राप्तीसाठी फार मोठी तपश्चर्या करावी लागत असे. ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी फार कष्ट करावे लागत असत. माझ्या काळात केवळ ईश्वर नामाचा जप करण्याने ईश्वरप्राप्ती होऊ शकेल असा आशीर्वाद आहे मला. त्यामुळे माझ्या काळाच्या सावलीत लोकांना ईश्वरप्राप्तीसाठी कुठलाही होम, यज्ञ करण्याची गरज पडणार नाही. ईश्वरप्राप्तीसाठी केवळ सत्य आणि सदाचाराचं अवलंबन करावं लागेल. असं केल्यास आणि मनापासून ईश्वरनामाचा जप केल्यास साक्षात परमेश्वर त्या व्यक्तीला उचित फळ देतील."

    हे ऐकून परीक्षित राजाचा राग कमी झाला. त्याने आपल्या धनुष्याची ताणलेली प्रत्यंचा शिथिल केली. धनुष्यावर चढवलेला बाण उतरवत तो कलियुगाला म्हणाला, "असं असेल तर ठीक. यामुळे माझ्या प्रजेचा फायदा होईल. मात्र तरीही मी तुला चार जागा ठरवून देईन. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला तिथून सुटका नाही. तुला तिथेच रहावं लागेल. तुला हे मान्य आहे का?"

    कलियुग आनंदाने म्हणाला, "महाराज, मी तुम्हाला हे वचन आधीच दिलं आहे. मला तुमची ही अट मान्य आहे."

    राजा परीक्षित म्हणाला, "ठीक आहे. मग तू केवळ तिथे रहा जिथे द्युत खेळलं जातं, मद्यपान केलं जातं, परस्त्रीशी संबंध प्रस्थापित केले जातात (वैश्यालय) आणि जिथे मुक्या जीवांवर हिंसा केली जाते (खाटिकखाना / कसाईखाना)."

    हे ऐकून कालपुरुष म्हणाला, "हे राजा, या जागा मला खूप लहान पडतील. तुम्ही मला याबरोबरच सोन्यामध्येही वास करण्याची परवानगी द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो."

    परीक्षित राजा म्हणाला, "साक्षात कृष्णाने असं सांगितलं आहे की सोन्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो. तिथे स्वतः भगवान विष्णूचं अस्तित्व आहे. तिथे तुझ्यासारख्या अधर्मीला राहण्याची मी परवानगी देऊ शकत नाही."

    यावर कलियुगाने अतिशय चातुर्याने युक्तिवाद केला; तो म्हणाला, "महाराज, जी संपत्ती योग्य मार्गाने मिळवलेली आहे केवळ त्या संपत्तीमध्ये लक्ष्मी-नारायण या दोघांचं अस्तित्व आहे. पण जी संपत्ती अन्यायकारक मार्गाने मिळवलेली आहे त्या सोन्यामध्ये मात्र लक्ष्मी-नारायण यांचं अस्तित्व नाही. तुम्ही मला तिथे राहण्याची परवानगी द्यावी."

    परीक्षित राजाला कलियुगाचा हा युक्तिवाद पटला. तो म्हणाला, "ठीक आहे. मी तुला अशा अन्यायकारक पध्दतीने मिळवलेल्या सोन्यामध्येही राहण्याची परवानगी देतो."

    असं बोलून राजा परीक्षित आपल्या राजमहालात परत गेला. का कुणास ठाऊक, पण त्याच्या मनात एक अस्वस्थता होती. तो आल्या आल्या त्याच्या राज्याच्या खजिनदाराला घेऊन आपल्या खजिन्याकडे गेला. तिथे त्याला एक चमचमता मुकुट दिसला. परीक्षिताच्या मुकुटापेक्षाही तो अधिक मौल्यवान दिसत होता. राजाला वाटलं, इतका सुंदर मुकुट असताना तो इथे पडून आहे? हा मुकुट नक्कीच पांडवांपैकी कुणाचातरी असणार. हा मुकुट माझ्या मस्तकी असायला हवा. त्याने लगेच खजिनदाराला सांगितलं की तो मुकुट मला आणून द्या; आजपासून मी हाच मुकुट परिधान करणार आहे.

    तो मुकुट होता जरासंधाचा. जरासंधाचा वध झाल्यानंतर पांडवांनी तो हिरेजडित मुकुट खजिन्यात जमा केला होता. जरासंध एक अधर्मी राजा होता. त्यामुळे पांडवांपैकी कुणीही तो मुकुट कधीही परिधान केला नव्हता. पण परीक्षिताने नेमकी हीच चूक केली आणि त्यानेच कलियुगाला दिलेल्या वरदानाचा तो बळी ठरला. तो मुकुट जरासंधाच्या अधर्मी कृत्यामधून मिळवलेल्या संपत्तीमधून बनवण्यात आला होता. त्यामुळे त्यात कलियुग रहात होता; आणि आता तोच मुकुट परीक्षिताने स्वतःच्या डोक्यावर धारण करायचं ठरवलं होतं.

    परीक्षिताने तो मुकुट धारण केला आणि त्याच्या स्वभावात कमालीचा बदल झाल्याचं दिसू लागलं. तो अधिक उन्मादाने वागू लागला. मुक्या प्राण्यांवर दया करणारा राजा परीक्षित कधीही शिकारीला जात नसे. मात्र तो मुकुट धारण करताच त्याने शिकारीला जायचं ठरवलं. शिकार करता करता तो जंगलात खूप दूर निघून गेला. त्याला तहान लागली होती. जवळच त्याला शमिक ऋषींचा आश्रम दिसला. पाणी मागण्यासाठी म्हणून तो आश्रमात गेला. तिथे ऋषी डोळे मिटून तपस्या करत बसले होते. आजूबाजूच्या विश्वाचा विसर पडावा इतके ते साधनेत तल्लिन झाले होते. त्यांचा मुलगा, श्रुंगी, आश्रमासाठी पाणी आणि लाकडं आणण्यासाठी म्हणून जंगलात गेला होता. त्यामुळे त्यावेळी आश्रमात इतर कुणीही नव्हतं.

    परीक्षिताने ऋषींना आदरपूर्वक नमस्कार केला आणि त्यांच्याकडे व्याकुळ आवाजात पाण्याची याचना केली. पण शमिक ऋषी आपल्या साधनेत तल्लिन असल्याने त्यांना परीक्षिताचा आवाज ऐकू आला नाही. अनेकदा याचना करूनही ऋषी आपल्याला प्रतिसाद देत नाहीत हे पाहून अतिशय शांत स्वभावाच्या परीक्षित राजाला प्रचंड राग आला. कदाचित हा क्रोध म्हणजे त्या मुकुटातल्या कलियुगाचा परिणाम होता. त्या मुकुटात बसलेल्या कलियुगाने परीक्षिताला डिवचलं, म्हणाला, "एका राजाचा अपमान? साक्षात परीक्षित राजाचा अपमान? कोण कुठला हा ऋषी. आजकाल कुणीही अशी समाधी अवस्था घेऊन बसतात आणि स्वतःला महान ऋषी म्हणवतात. मला तर वाटतं की हे ऋषी नाटक करत आहेत. तुम्ही तहानलेले असतानाही तुम्हाला पाणीही न देणाऱ्या या अधर्मीला शिक्षा करा महाराज!"

    परीक्षिताने कलियुगाच्या म्हणण्यानुसार शमिक ऋषींचा वध करायचं ठरवलं. पण त्याच्यावरच्या उत्तम संस्कारांनी त्याला वेळीच सावरलं. तरीही त्याच्या मनातला क्रोध काही शांत होईना. त्याला तिथेच एक साप मरून पडलेला दिसला. त्याने तो उचलला आणि शमिक ऋषींच्या गळ्यात टाकला. अशाप्रकारे एक मृत जीव साधना करणाऱ्या ऋषींच्या गळ्यात टाकणं म्हणजे त्यांची साधना प्रदुषित करण्याचा प्रकार होता. हे पाप होतं. पण कलियुगाच्या सांगण्यावरून परीक्षित राजाच्या हातून ते पाप घडलं.

    तिथेच दूर उभ्या असलेल्या श्रुंगीच्या इतर गुरू-बांधवांनी हा सगळा प्रकार पाहिला. ते धावत श्रुंगीकडे गेले. तेव्हा श्रुंगी नदीचं पाणी भरून घेत होता. सगळा प्रकार कळताच त्याला अतिशय राग आला. तो राजा कोण होता हेही न विचारता त्याने नदीचं पाणी हातात घेतलं आणि आपल्या वडिलांचा अपमान केल्याच्या बदल्यात परीक्षित राजाला शाप दिला - "आजपासून सात दिवसांनी तक्षक नावाचा साप तुला दंश करेल आणि त्याच्या भयानक विषाने तुझा मृत्यू होईल. माझ्या या शापातून तुला कुणीही मुक्त करू शकणार नाही."

    श्रुंगी त्याच्या गुरू - बांधवांबरोबर आश्रमात परतला. शमिक ऋषी तपस्येत लीन होते आणि त्यांच्या गळ्यात तो मेलेला सापही तसाच होता. थोड्यावेळाने आपल्या समाधी अवस्थेतून बाहेर आल्यावर त्यांनी त्यांच्या गळ्यात पडलेल्या त्या सापाबद्दल आपल्या मुलाला विचारलं. श्रुंगीने त्यांना सगळा प्रकार सांगितला. शमिक ऋषींनी त्याला विचारलं, "अरे बाळा, शाप देण्यापुर्वी आपण कुणाला शाप देतोय हेही तू तपासून पाहिलं नाहीस?". शमिक ऋषींनी त्यांच्या दिव्यदृष्टीने पाहिलं आणि ते शांतपणे त्यांच्या मुलाला म्हणाले, "तू मोठी चूक केली आहेस. ज्याला तू शाप दिलास तो राजा परीक्षित होता. तुझ्या शापामुळे आता त्याचा मृत्यू होणार. ऋषी मुनींचा शेवटचा पालनकर्ताही संपणार. पण हेही घडणारच होतं. तू केवळ निमित्त ठरला आहेस. कलियुग नावाच्या कालपुरुषाचं आगमन झालं आहे. हा त्याचाच परिणाम."

    श्रुंगीला पश्चाताप झाला. त्याला अतिशय वाईट वाटलं. तो त्याच्या वडिलांना म्हणाला, " साक्षात कृष्णाने ज्याला अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्रानंतर जीवनदान दिलं होतं तोच हा परीक्षित. मी त्याला दिलेला शाप माझ्यावर उलटला तरी चालेल. तुम्ही राजाला सांगा. मी तक्षक सापाला मला दंश करण्याची विनंती करेन."

    शमिक ऋषी म्हणाले, "ठीक आहे. आपल्या हातून घडलेल्या चुकीचं परिमार्जन करण्याची तुला संधी मिळायला हवीच. मात्र त्याचा किती उपयोग होईल हे मी सांगू शकत नाही. तरीही मी प्रयत्न करेन."

    शमिक ऋषी राजाला भेटायला राजमहालात गेले. इकडे परीक्षिताच्या शिरावर अजूनही तो जरासंधाचा मुकुट होता. "ही माझी विश्रामाची वेळ आहे." असं सांगून त्याने शमिक ऋषींना भेटायला नकार दिला. एरवी कुठलेही ऋषी येताच स्वतः उठून त्यांची सेवा करणारा परीक्षित त्यावेळी कलियुगाच्या सावलीत फार वेगळा वागला. शमिक ऋषींना याची कल्पना होतीच. त्यांनी राजासाठी सेवकाकडून निरोप पाठवला, "हे राजा, तुझ्या हातून झालेल्या माझ्या अवमानकारक कृत्यासाठी माझ्या मुलाने तुला शाप दिला आहे. आजपासून सात दिवसात तुझा मृत्यू होईल. तेव्हा कृपा करून तक्षक सापापासून स्वतःला वाचव."

    हा निरोप देऊन शमिक ऋषी तिथून निघून गेले.

    ---

    परीक्षित राजाला निरोप मिळताच त्याने स्वतःला वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले? कसा झाला परीक्षित राजाचा मृत्यू? त्यानंतर काय घडलं? कलियुगाचं साम्राज्य कसं प्रस्थापित झालं? हे प्रश्न आणि त्याबरोबरच वैदिक कालगणनेच्या संदर्भाने आपण "युग" या संकल्पनेवरही बोलणार आहोत, या कथेच्या पुढच्या भागात.

    ---

    कलियुगाच्या गुणवैशिष्ट्यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करण्यासाठी या कथेत कथाकाराने वापरलेली रूपकं आपल्याला एक वाचक म्हणून चकित करतात. सुरूवातीलाच एक बैल आणि एका गायीचा इथे संदर्भ आला आहे. इथे कथाकाराने दिलेला संवाद बैल आणि गाय यांच्यामधला असला तरी ही दोन्ही प्रतिकात्मक आहेत. या प्रतिकांचा मला समजलेला अर्थ मी इथे तुम्हा सर्वांसमोर प्रस्तुत करत आहे.

    माझ्या मते इथे बैल हे धर्माचं प्रतिक आहे तर गाय ही पृथ्वीचं प्रतिक आहे. याअनुषंगाने पाहता धर्म आणि पृथ्वी यांच्यातला संवाद या संदर्भाने तोच संवाद वाचताना आपल्याला अनेक गोष्टींचा उत्तम उलगडा होत जाईल.

    इथे बैलाचे तीन पाय मोडले आहेत आणि तो केवळ एकाच पायावर उभा आहे असाही उल्लेख आहे. द्वापार युगात श्रीकृष्णाने धर्माची चतुश्पदी सांगितलेली आहे - दया, तप, पावित्र्य आणि सत्य. यापैकी या कथेनुसार द्वापारयुगाच्या समाप्तीपर्यंत दया, तप आणि पावित्र्य हे तीन पाय मोडून पडले आणि एकमेव पाय शिल्लक राहिला तो म्हणजे 'सत्य'. याची प्रचिती आपल्याला महाभारतातल्या विविधं घटनांमधूनही येईल. धृतराष्ट्राच्या आणि कौरवांच्या ठायी "दया" या गुणाचा अभाव होता. "द्रौपदी वस्त्रहरण", "अभिमन्यू वध" हे प्रसंग युध्दात मारल्या गेलेल्या अनेक तपस्वींबरोबरच तप आणि पावित्र्य या दोन्ही गोष्टीही मारल्या गेल्या हे दाखवून देतात. मात्र कृष्णाच्या सारथ्यामध्ये एका गुणाने विजय मिळवला, तो म्हणजे सत्य. सत्याने असत्यावर विजय मिळवला होता. त्याच एका पायावर तो धर्मरूपी बैल उभा होता.

    कलियुग नामक कालपुरुष येताच सर्वप्रथम त्याने गायीला, म्हणजेच पृथ्वीला लाथ मारली. आजही आपण या प्रतिकाचा अर्थ आपल्या आजूबाजूला पाहतोय. कलियुगात निसर्गाचा झालेला ऱ्हास, पृथ्वीचा झालेला ऱ्हास या गोष्टी "कलियुगाने गायीला लाथ मारणं" अधोरेखित करतात. याचा परिणाम म्हणजे माणसाचं घटलेलं आयुष्यमान आणि मनुष्य कृतींमुळे वातावरणातून पसरणाऱ्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव. कलियुगाने बैलाला ही विनाकारण त्रास दिला आणि त्याच्या विव्हळण्याचा तो आनंद घेत उभा राहिला. ही बाबदेखील आपण कलियुगात राहणारे असंख्य वेळा आपल्या आजूबाजूला पाहतोय. धर्मपरायणता, सत्यवादी असणं या सगळ्या गोष्टी आज असत्याविरूध्द निकराचा लढा देऊन सिध्द कराव्या लागतात. "अखेर सत्याचाच विजय होतो" हे मान्यच. मात्र, तो विजय "अखेरीस" होतो; सुरूवातीलाच होत नाही. तोपर्यंत सत्याच्या एकाच पायावर उभ्या असलेल्या त्या बैलाला कलियुगाचा हा मार नाहक खावाच लागतो.

    कलियुग इतकं वाईट असलं तरी कलियुगाच्या या वाईट गुणांपासून स्वतःला वाचवण्याची युक्तीही कथाकाराने या कथेत सांगितली आहे. परीक्षित राजाने "तुझ्यात चांगला गुण कुठला" असं विचारताच स्वतः कलियुगाने सांगितलं आहे की, जो कुणी सत्य आणि सदाचार या दोहोंचा अवलंब करेल त्याला ईश्वरप्राप्ती होईल. इथे ईश्वरप्राप्ती म्हणजेच त्याला कलियुगाचे अवगुण स्पर्शही करणार नाहीत आणि अशी व्यक्ती कलियुगातही उत्तम आयुष्य जगू शकेल. सत्य आणि सदाचार याचा अवलंब करायचा म्हणजे नेमकं काय करायचं या प्रश्नाचं उत्तरही कथाकाराने या कथेत अप्रत्यक्षपणे दिलं आहे. परीक्षित राजाने ज्या चार ठिकाणी कलियुगाला राहण्याची परवानगी दिली आहे त्या केवळ चार जागा नसून चार अवगुणांना दर्शवणारी ती प्रतिकं आहेत. "जुगार" म्हणजे अविचाराने धन खर्च करणे. "मद्यपान" म्हणजे ऐहिक प्रलोभनांमध्ये स्वतःची विचारक्षमता गमावून बसणे. "वैश्यालय" म्हणजे आपल्या इच्छांवर आणि मनाच्या आवेगावर नियंत्रण नसणे. "खाटिकखाना" म्हणजे स्वार्थासाठी दुर्बलांविरूध्द आपलं बल वापरणे. आणि याबरोबरच कलियुगाने मागून घेतलेली आणखी एक जागा म्हणजे "अन्यायकारक मार्गाने मिळवलेली संपत्ती". कलियुगात सत्य आणि सदाचाराचा अवलंब करणे म्हणजे या पाच गोष्टींचा त्याग करणे. कथाकाराच्या म्हणण्यानुसार, जो कोणी या पाच गोष्टींच्या आहारी जाणार नाही, कलियुगात अशी व्यक्ती ईश्वर अनुकंपेला पात्र असेल. स्वतः परीक्षित राजा अशाच आचरणाचा होता आणि म्हणूनच या कथेत कथाकाराने स्पष्टपणे नमुद केलं आहे की कलियुग परिक्षिताच्या राज्यात स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकला नाही. म्हणजेच कलियुगाच्या अवगुणांपासून स्वतःला दूर ठेवता येणं शक्य आहे, मात्र त्यासाठी तुम्हाला परीक्षित राजासारखं आचरण ठेवावं लागेल असं कथाकाराने या कथेतून अगदी सहजपणे सुचवलं आहे.

    संपत्ती मिळवताना 'साधन शुचिता' किती महत्वाची आहे हेही कथाकाराने या कथेत अतिशय प्रभावीपणे सांगितलं आहे. याबरोबरच जरासंधाचा मुकुट मस्तकी धारण करताच सदाचारी परीक्षिताच्या वागण्यात झालेला बदल हे रूपकही विचार करण्यासारखं आहे. माझ्या मते "जरासंधाचा मुकुट मस्तकी धारण करणं" म्हणजे इतरांच्या बुध्दीने स्वतःचे निर्णय घेणं. कलियुगात असं वागणं किती धोकादायक ठरू शकेल याचं उदाहरण देताना कथाकाराने परीक्षित राजाच्या हाताने शमिक ऋषींचा अपमान होण्याचा प्रसंग फार सुचकपणे रेखाटला आहे. त्यामुळेच कदाचित कलियुगासाठी मराठीमध्ये एक म्हण प्रचलित झाली असावी - 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे'. याचा अर्थ इतरांचं म्हणणं अजिबातच ऐकायचं नाही असं नाहीच. मात्र जसं 'दान सत्पात्री असावं', तसंच कलियुगात सल्लाही सत्पात्री व्यक्तीकडूनच घ्यावा. ज्या व्यक्तींबाबत आपल्याला विश्वास वाटत नाही, अथवा ज्यांच्या आचरणाचा आपल्या चांगला अनुभव नाही, अशा व्यक्तींचे कुठलेही बोल मनावर घेऊ नये. प्रत्येकाच एक स्वतंत्र विचार असणारच. आणि प्रत्येकाचे विचार ऐकून घेण्यात काहीच वाईट नाही. मात्र निर्णय आपण स्वतः विचार करूनच घ्यावा. कथाकाराने कलियुगात जगण्याचा हा एक मूलमंत्र या कथेतून आपल्याला दिला आहे.

    ---

    परीक्षित राजाचा मृत्यू, त्यानंतरच्या घटना आणि या रंजक कथेच्या अनुषंगाने असलेले अनेकविधं संदर्भ यावर आपण बोलणार आहोत या कथेच्या पुढच्या भागात.

    पुन्हा भेटूया ग्रंथश्रुतिच्या पुढच्या लेखात...

    ऋतुराज पतकी.



    Ruturaaj Patki


Your Rating
blank-star-rating
Kishori Dange - (31 March 2023) 5
पुन्हा वाचतेय,पुराणातील प्रतिकात्मक कथांचे कितीछान तर्कपूर्ण विवेचन करता तुम्ही!

0 0

जया गाडगे - (21 May 2021) 5
जरासंधाचा मुकुट मस्तकी धारण करणे....वा ! एक नवीन संकल्पना गवसली. लेख नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट .

0 0

Pradnya Bagul - (11 May 2021) 5

0 0

Smita Bhalme - (09 May 2021) 5

1 0

ऋचा दीपक कर्पे - (07 May 2021) 5
जेथे राजा परिक्षित ची बुद्धी फिरली, तेथे आपली काय बिशाद...... खूप खूप धन्यवाद, आजच्या सदर साठी....

1 2

Seema Puranik - (07 May 2021) 5
🙏🙏 अप्रतिम

1 1

Vasant Sarmalkar - (07 May 2021) 5
आपण धार्मिक आणि पौराणिक साहित्यापासून बोध घेऊन जे विचार मांडत आहात ते खूप मौलिक आहे. ह्यामुळे नवीन पिढी जरी माईथोलॉजी म्हणत असली, तरी त्या गोष्टीतून आपण मांडत असलेले विचार आणि नैतिक मूल्ये अंगी बाणवली तर पुढचा समाज खूप सुंदर असेल. आपले साहित्यातील योगदान अमूल्य आहे.

1 1

View More