• 16 April 2021

    मन कस्तूरी

    नावीन्याचे दागिने

    5 335

    नावीन्याचे दागिने

    आपल्या ठसठशीत नथीला सांभाळत उमाबाईंनी औक्षण केले आणि न राहवून नात सुनेनी प्रश्न केलाच.

    "आज्जी, ही इतकी जड़ आणि मोठी नथ कशाला नेहेमी हवी असते! आता किती नवीन आणि नाजूक प्रकारच्या नथी येतात. तुमच्या साठी घेऊ एखादी. किती त्रास होतो तुम्हाला या जुन्या दागिन्यामुळे!"

    "आपल्या नवलाईचा कधीच कोणाला त्रास होत नसतो गं! तू सुद्धा अशीच कुरवाळशील आपल्या व्हैलेंटाईन्स डे ला मिळालेल्या डायमन्ड हार्ट नेकलेसला!"

    हा संवाद ऎकत असतांना उमाबाई, त्यांची सून आणि नातसूनच काय तर तिथे असलेले सगळेच आपोआप आपल्या भूतकाळात रमले. नवलाई, मग ती भेटवस्तूंची असो किंवा नवीन नात्याची, एक उत्साह, आनंद आणि सौन्दर्य त्यात आपसूकच असतो.

    आपल्या काही सुरेख नवलाईच्या दिवसांची साक्षी असलेली नथ ज्या प्रकारे उमाबाईंना त्रासिक वाटत नाही, तसेच आपल्यालाही काही गोष्टी मनापासून आवडत असतात. त्यात नावीन्याचा चिरतरुण भाव असतो. काही वस्त्र, सुगंध किंवा भेटवस्तू आपण फारसे किंवा अजिबात वापरत नाही, पण कोणाला देणे किंवा आपल्या पासून दूर करण्याचा विचार सुद्धा मनात येत नाही.

    या प्रकारात फक्त वस्तूच नाही, तर पुढ़े जाता काही घटनाक्रम, विचार, परिस्थिति किंवा आपले संघर्ष सुद्धा जमा होतात. उगाच नाही एक अनुभवी पीढ़ी आपल्या उमेदीच्या काळाबद्दल बोलत. नावीन्य खरं तर एखाद्या कालावधिसाठी असलेला काळ नाही. हा एक प्रकारचा भाव आहे आणि तो जर एखाद्या वस्तूला, संबंधाला किंवा मनाला चिकटला, कि कधीच त्यात जुनकटपणा येत नाही.

    नवीन वर्ष आले, मग जवळपास कितीही नकारात्मक परिस्थिति असेल, आपण उमेदीची गुढ़ी उभारतोच, कडुनिंब आणि श्रीखंडाचा पूर्णपणे विरोधाभासी प्रकार असतोच, पुढ़े जाता चैत्राचे वैभव, गौरीचे आगमन आणि कित्येक परंपरा आपण जपतो. कधीही आपली गुढ़ी जुनी होत नाही किंवा या परंपरा रटाळ वाटत नाही.

    खरं तर हा विरोधाभास म्हणायला हवा. दरवर्षी तेच सण, तेच खाण्या पिण्याचाचे पदार्थ, ठराविक परंपरा, तसाच नेवैद्य किंवा तेच आपले घरचे सदस्य! वरवर काहीही बदल दिसले जरी, तरी मुख्य तत्व कायम तेच असतात.

    त्याच प्रकारे, नवीन वर्षाला सोबत करत येणारी ही नवलाई जर आपल्याला उत्तम आरोग्य, उत्साह आणि आनंद या स्वरुपात वर्ष भर सोबत ठेवायची असेल, तर तिचे उत्तम दागिने करुन घातले पाहिजे, अर्थातच तिला आपुलकीने, प्रेमाने आणि भावनेने आपलेसे केले पाहिजे. आपल्या त्या वस्तू आणि आठवणींसारखेच, ज्या कधीही जुन्या होत नाही.

    एकट्यात आपल्या पेटीतून काढ़ून घेतलेला अत्तराच्या बाटलीचा गंध, आठवणी जाग्या करणारे काही वस्त्र आणि त्यांच्यावरच्या थरथरत्या बोटांना होणारा रेशमी स्पर्श, एखादे हातानी लिहिलेले पत्र किंवा संघर्ष, उमेद, यश, स्वप्नपूर्तिचा प्रतीक असलेले एखादे दागिने किंवा भेटवस्तू! निर्जीव असूनही या गोष्टींसोबत आपलं एक नातं जन्माला आलेलं असतं. या शाश्वत भावनांना जुने होणे माहीतच नसतं.

    कारण या सर्वांसोबत आपले नातेसंबंध नवलाईचे असतात. ती नवलाई कधीच संपणार नसते, त्यातील सौन्दर्य चिरतरुण असून आपली सोबत करत असणार आणि जग कितीही पुढ़े गेले, तरी आपली दृष्टि तीच असणार.

    सध्याच्या कठिण काळात आनंद आणि दुखाच्या अभिव्यक्तिला क्रियांचा साथ नसतांना प्रत्येकाची घुसमट आणि मनातील संघर्ष आता प्रत्यक्ष दिसतोय. स्वत: सोबत असलेल्या या संघर्षात, आपल्या सोबत आपणच असणार आहोत. त्यामुळे मनाला उभारी देण्याची सुरुवात सुद्धा आपणच करायची आहे.

    चैत्राच्या या शुभ मुहूर्तावर मनाला नवलाईचे दागिने घालून सजवूया! उत्साहाची मणिमाळा, आल्हादाचे पैंजण, आनंदाचे कंकण आणि सौन्दर्याचे तेज! मनाला उभारी देतांना, नवीन ऊर्जेचे आव्हान करुन, पुढ़ील संघर्षासाठी स्वत:ला सुदृढ़ करुया. फक्त नवीन वर्षाला नव्हे आज गरज आहे प्रत्येक नवीन सूर्योदयाला स्वत:ला प्रेरणा रुपी पोषण देण्याची. प्रत्येक नवीन श्वासाला उत्सव करुन घेण्याची आणि प्रत्येक क्षणाला, नात्याला, घटनाक्रमाला भरभरुन जीवन्त करुन घेण्याची.

    जीवनाला नावीन्याच्या दागिन्यांनी श्रृंगारित करुन आपल्याच व्यक्तिमत्वाला नवीन उभारी देण्याची गरज आहे. आपल्या समोर आलेल्या परिस्थितिसाठी, नवीन वर्षाच्या सूर्याकडून खूप काही मिळवण्याची गरज आहे, एक मनुष्य म्हणून या सत्वपरीक्षेत उच्चांक गाठण्याची गरज आहे, आज खरंच आपण सर्वांना एकमेकांची खूप खूप गरज आहे.

    मनाला नवीन उभारी आणि जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी या नववर्षाच्या सोनेरी क्षणांना नेहेमीसाठी नवलाईच्या डबीत जपून ठेवूया.

    नवीन वर्षाच्या ऊर्जामय शुभेच्छा!

    - अंतरा करवड़े



    अंतरा करवड़े


Your Rating
blank-star-rating
स्नेहमंजरी भागवत - (19 April 2021) 5
नवीन दागिन्यांची नावे फारच उत्तम ,अत्यंत उत्साह वाढवणारा लेख आणि ऊर्जा मय शुभेच्छा मनात घर करून गेल्या .तुमचे लेख नेहमीच खूप छान असतात पाच स्टार्स कमी वाटत आहेत

1 0

Varsha Sanjay - (19 April 2021) 5

0 0

Seema Puranik - (16 April 2021) 5
सुंदर ,'आल्हादा चे पैंजण' ही उपमा खूपच भावली मनाला,खरंच ह्या दागिन्यांनी नटलेलं नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी आणि आश्वस्त वातावरण देवो हीच शुभेच्छा

0 0

Anu Jagtap - (16 April 2021) 3
एका सणाने, परंपरेने, संस्कृतीने एक पीढी- दुसऱ्या पीढींशी जोडल्या जाते, तर किती लोक- एकमेकांशी जोडले जातात. रोजच्या व्यस्त कामातून तसेच घरचे सगळे काम सांभाळूनही, सण-उत्सवात उत्साहाने सहभागी होता येत. मुलांना परंपरा, संस्कृती कळावी, त्यांच्यावर संस्कार व्हावेत, या हेतूने धडपड सुरू असते. आपणही आनंदाची परंपरा आपल्या घरातूनही रुजू देवुया. यथार्थ तूझ्या या लेखनामधुन, शुभशकुनाची चाहूल घेऊन येणारा चैत्र उत्साहाने साजरा करू या. सरत्या वर्षाला निरोप देत, नववर्षाच्या स्वागताची तयारी पुन्हा एका नव्या उत्साहाने आणि उमेदीने करू या.

0 0

Satish Rathi - (16 April 2021) 5
प्रमाद वर्ष के समापन के साथ इस गुड़ी पड़वा पर आनंद वर्ष में प्रवेश हुआ है ।सभी सकारात्मक भाव से इस महामारी के खिलाफ उर्जा प्रेषित करें और इस नव वर्ष में सभी लोग स्वस्थ और आनंद से रहें यही मंगलकामनाएं प्रेषित की जाए। आपने जो लिखा है वह सकारात्मक सोच के साथ लिखा गया है ।आपको बधाई के साथ समस्त परिजनों को शुभकामनाएं।

0 0

vasudha gadgil - (16 April 2021) 5
नवलाईची डबी , जपून ठेवण्यासारखी मन कस्तूरी !हे सर्व दागिने , आठवणी , सोनेरी सूर्या सोबत नवीन ऊर्जा नक्कीच देतील ! नवीन वर्षात ह्या कस्तूरीचा सुवास दाही दिशेत दरवळो! अप्रतिम लिखाण!

0 0

ऋचा दीपक कर्पे - (16 April 2021) 5
सुंदर...... 🙏😇

0 0