अनेक मंदिरांमध्ये मूळ गर्भगृहाच्या दाराशी दोन्ही बाजूला हातात दंड घेतलेले द्वारपाल तुम्हाला पहायला मिळतील. या द्वारपालांचं नाव जय आणि विजय. यांची खूप वेगवेगळी शिल्प तुम्हाला विविधं मंदिरांमध्ये पहायला मिळतील; पण मुख्यतः हातात एक दंड तिरका धरलेला, अंगाने एकदम धष्टपुष्टं अशा स्वरूपात या द्वारपालांना शिल्पकारांनी घडवलेलं पहायला मिळेल. जय आणि विजय हे विष्णूच्या वैकुंठाचे द्वारपाल. आजच्या लेखात आपण या जय आणि विजयची एक लहानशी रोचक पौराणिक कथा पाहणार आहोत.
पण तत्पुर्वी जय - विजय मुळात कोण होते आणि ते भगवान विष्णूच्या वैकुंठाचे द्वारपाल कसे बनले ते जाणून घेऊया.
---
कर्दम ऋषींची पत्नी देवहुती. या दोघांचा एक पुत्र म्हणजे कपिल ऋषी. या कपिल ऋषींना आणखी दोन मोठी बंधू होते. ते दोघंही वेद शास्त्रामध्ये निपुण होते. एकदा एका राजाचा यज्ञ करण्यासाठी म्हणून ते गेले असता त्यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन राजाने त्यांना दक्षिणा स्वरूपात भरपूर धन दिलं. ते धन पाहून दोघांच्याही मनात लालसा उत्पन्न झाली आणि त्या धनाच्या वाटणीवरून त्यांच्यात वाद झाला. या भांडणात त्यांनी अविचाराने एकमेकांनाच शाप दिला आणि त्यापैकी एक महाकाय मगर बनला तर दुसरा अतिशय शक्तीशाली हत्ती. हे दोघंही भगवान विष्णूचे निस्सिम उपासक होते. त्यामुळे त्यांनी भगवान विष्णूची आराधना केली आणि त्यांना या अविचाराने घडलेल्या कृतीमधून मुक्त करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं की त्यांना त्यांचा शाप पूर्ण जगावा तर लागेलच. मात्र ते दोघं पुन्हा एकमेकांसमोर येतील; आणि त्यांच्या भांडणात स्वतः भगवान विष्णू त्यांची मुक्तता करतील.
रावणाची लंका निर्माण होण्याआधीपासून तो पर्वत आपल्या जागी अस्तित्वात होताच. त्या पर्वताचं नाव "त्रिकुट पर्वत". या पर्वताच्या पायथ्याशी एक मोठी नदी होती ज्यात शाप मिळालेला कपिल ऋषींचा एक भाऊ मगर बनून रहात होता आणि त्याच प्रदेशात त्यांचा दुसरा भाऊ हत्ती बनून रहात होता. एके दिवशी तो हत्ती नदीवर पाणी पिण्यासाठी म्हणून आलेला असताना त्या मगरीने त्याच्यावर हल्ला केला. त्यांचं जोरदार भांडण सुरू झालं. दोघंही एकमेकांवर घणाघाती वार करत होते; अखेर हत्तीला आपलं मरण जवळ येताना दिसताच त्याने विष्णूच्या नावाचा धावा केला. त्याबरोबर भगवान विष्णू तिथे अवतरले आणि त्यांनी सुदर्शन चक्राने त्या मगरीचा शिरच्छेद केला. दुसरीकडे मरणासन्न हत्तीनेही प्राण सोडले. दोन्ही भाऊ शापातून मुक्त झाले आणि विष्णूच्या आशीर्वादाने वैकुंठाला गेले. विष्णूने त्यांची भक्ती आणि शक्ती पाहून त्यांना वैकुंठाचे द्वारपाल म्हणून नियुक्त केलं. तेच हे आजच्या कथेचे जय आणि विजय.
चला, आता पाहूया जय - विजय यांची एक अतिशय रोचक आणि उद्बोधक कथा...
---
जय आणि विजय हे दोघंही ज्ञानी महापुरूष होते. खुद्द विष्णूचे द्वारपाल असल्याने जय आणि विजयच्या परवानगी शिवाय विष्णूचं दर्शन अशक्य होतं. तसे अधिकार स्वतः विष्णूने त्यांना दिलेले होते. मात्र या अधिकाराचा त्यांना गर्व झाला होता. भगवान विष्णूंनादेखील ही बाब कळली होती. आपलेच द्वारपाल आपल्या भक्तांच्या भेटीसाठी अडथळा ठरत आहेत हे त्यांनी ओळखलं होतं; मात्र त्यांना त्यांच्या कर्मानेच शिक्षा मिळावी अशी त्यांची इच्छा होती.
एकदा सनक, सनन्दन, सनातन आणि सनत्कुमार हे चार ऋषीबंधू भगवान विष्णूला भेटण्यासाठी म्हणून वैकुंठात आले. दाराशी येताच त्यांना जय आणि विजय या द्वारपालांनी अडवलं आणि अत्यंत उच्च स्वरात आरेरावीने त्यांना म्हणाले, "तिथेच थांबा. तुम्हाला आत जायची परवानगी नाही."
यावर ऋषीगण म्हणाले, "आम्ही भगवान विष्णूंचे भक्त आहोत; आणि भक्तांना आपल्या आराध्य देवाचं दर्शन घेण्यासाठी द्वारपालांची परवानगी लागत नाही. आमचा संवाद थेट आमच्या आराध्य देवाशी आहे. आमचा मार्ग अडवू नका; आम्हाला जाऊ दे."
हे ऋषी आपल्याला कवडीमोलही किंमत देत नाहीयेत हे पाहून जय विजयला राग आला आणि ते म्हणाले, "तुम्ही भक्त असालही. असं सगळेच म्हणतात. आम्ही द्वारपाल आहोत. आमच्या परवानगीशिवाय तुम्ही आत जाऊ शकत नाही; आणि आम्ही तुम्हाला आत जाण्याची परवानगी दिलेली नाही."
आता मात्र ऋषींनाही राग अनावर झाला, ते म्हणाले, "अज्ञानी द्वारपाल, तुम्हाला माहित आहे का आम्ही कोण आहोत ते? आम्ही ब्रह्माचे मानसपुत्र आहोत. आमची गती कधीही थांबत नाही. आम्ही नित्य विहार करणारे परम् ज्ञानी असे सनकादि मुनी आहोत. तुम्ही श्री विष्णूच्या सान्निध्यात असून तुमचं हे असं वर्तन? श्री विष्णू भगवंताकडे पहा. किती मधुर वाणी, किती प्रेमळ आचरण. तुम्ही आपल्या आराध्य देवतेकडून काहीच शिकला नाहीत? झोपताना डोक्याखाली दगड घेतला काय आणि सोन्याची वीट घेतली काय; तुम्ही दोघं निव्वळ डोळे बंद करून झोपलेले जीव आहात. तुम्हाला वैकुंठात राहण्याचा मुळीच अधिकार नाही. आम्ही तुम्हाला शाप देतो की तुम्ही इथून थेट पृथ्वीवरच्या मर्त्य जगात जाऊन पडाल आणि तुम्हाला मर्त्य जन्म घ्यावा लागेल. या जन्मात तुम्ही अशी काही कृत्य कराल की लोक तुमची घृणा करतील."
सनकादि मुनींची ख्याती माहित असूनही जय - विजय आपल्याच दुराग्रही स्वाभिमानाच्या नशेत वहावहत गेले होते. पण हा शाप ऐकून ते एकदम भानावर आले. त्यांनी मुनीश्वरांचे पाय धरले आणि त्यांची माफी मागू लागले; म्हणाले, "हे ऋषींनो, आम्ही तुम्हाला ओळखण्यात चूक केली. आम्हाला क्षमा करा. आम्हाला इतका मोठा शाप देऊ नका."
बाहेर दाराशी सुरू असलेला हा गोंधळ विष्णूंच्याही कानावर गेला. भगवान विष्णूंना कळलं की बाहेर सनकादि मुनी त्यांना भेटायला आले आहेत आणि जय - विजयने त्यांचा अपमान केल्यामुळे ते क्रोधित झाले आहेत. भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, "इतके थोर मुनी आपल्याला भेटायला आले आहेत आणि त्यांचा असा अपमान होतोय हे योग्य नाही. आपण दोघं स्वतः जाऊन त्यांचा राग शांत केला पाहिजे आणि त्यांचं आदरपूर्वक स्वागत केलं पाहिजे."
स्वतः श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी द्वारापाशी आले आणि त्यांनी सनकादि मुनींना आदरपूर्वक प्रणाम केला. जय - विजय यांनी भगवंताचे पाय धरले आणि म्हणाले, "भगवंत, आमच्याकडून चूक झाली. आम्ही मुनीश्रेष्ठांना ओळखू शकलो नाही. आमच्याकडून अनावधानाने त्यांचा अपमान झालाय. मुनीश्रेष्ठांनी आम्हाला मर्त्यलोकात जन्म घेण्याचा शाप दिला आहे. आता तुम्हीच तुमच्या या सेवकांना वाचवा. मुनीश्रेष्ठांना त्यांचा शाप मागे घ्यायला सांगा..."
भगवान विष्णू सनकादि मुनींना अतिशय विनम्र स्वरात म्हणाले, "हे मुनीश्वर, जय आणि विजय हे दोघंही माझे द्वारपाल आहेत; माझे सेवक आहेत. त्यांनी अहंकाराच्या आहारी जाऊन तुमचा खूप मोठा अपमान केला आहे. तुम्ही सर्व मला खूप प्रिय आहात. माझ्या अतिशय प्रिय भक्तांपैकी तुम्ही सर्वजण आहात. त्यामुळे तुमचा झालेला अपमान हा खरंतर माझाच अपमान आहे आणि या न्यायाने तुम्ही जय - विजयला शिक्षा दिली नसती तर मी नक्कीच दिली असती. तुम्ही त्यांना दिलेला शाप योग्यच आहे. माझ्या सेवकांची जबाबदारी माझी, तशीच त्यांच्याकडून झालेल्या चुकीचीही जबाबदारी माझीच. त्यामुळे मी जय - विजयने केलेल्या तुमच्या अपमानासाठी त्यांच्या वतीने तुमची माफी मागतो."
भगवान विष्णूंचे हे मधुर शब्द आणि त्या शब्दांमधला विनम्र भाव पाहून सनकादि मुनींचा राग शांत झाला. ते म्हणाले, "हे भगवंत, तुम्ही खरोखर महान आहात. ज्ञानवंतांचं तुम्हाला मोल कळतं आणि त्यांच्याप्रती तुमच्या मनात असलेला आदर पाहून आम्ही अतिशय प्रसन्न झालो आहोत. जय आणि विजयला त्यांच्या पदाचा गर्व झाला होता आणि त्या गर्वाच्या आहारी जाऊन ते हे असे भ्रष्ट वागले. आम्हीही रागाच्या भरात जरा जास्तंच कठोर शाप दिला आहे. दिलेला शाप आम्ही परत तर घेऊ शकत नाही; मात्र तुम्ही या समस्त सृष्टीचे पालनहार आहात. त्यामुळे तुम्हाला योग्य वाटल्यास तुम्ही आमच्या शापातून यांची जरूर मुक्तता करावी. तुम्ही असं केल्यास आम्हाला मुळीच राग येणार नाही."
यावर भगवान विष्णू म्हणाले, "तुम्ही सर्व मुनीश्वर खरोखर स्वभावाने अतिशय प्रेमळ आहात. मी तुमच्या शापातून यांना मुक्त करू शकत असलो तरी मी असं करणं उचित होणार नाही. मी असं करणं म्हणजे तुम्हा सारख्या मुनीश्वरांच्या शब्दाचा तो अपमान असेल. सनकादि मुनींचा शब्दच शेवटचा हा नियम मला बदलायाचा नाहीये; कारण सृष्टीच्या नियमनासाठी हा नियम अबाधित राहणं मला आवश्यक वाटतं. शिवाय भगवान विष्णू त्यांच्या सेवकांसाठी जास्तं उदार आहेत असा चुकीचा समजही पसरता कामा नये. मात्र जय - विजयही माझे भक्तच आहेत आणि माझ्या भक्तांच्या यातना कमी व्हाव्या म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हीच या शापातून मुक्त होण्याचा मार्ग सांगावा"
यावर अतिशय प्रसन्न चित्ताने सनकादि मुनी म्हणाले, "जय - विजय, तुमच्या हातून चूक झाली हे तुम्ही स्वतःदेखील मान्य केलं आहे. तेव्हा तुम्हाला आम्ही दिलेल्य शापाप्रमाणे मर्त्य लोकात तीन जन्म घ्यावे लागतील. तीन जन्म पूर्ण झाले की तुम्हाला मोक्ष मिळेल आणि तुम्ही पुन्हा वैकुंठात भगवान विष्णूच्या सेवेत हजर होऊ शकाल."
हे ऐकून जय विजयने त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला आणि त्यांना मिळालेली शिक्षा स्वीकारली. मात्र ते भगवान विष्णूला म्हणाले, "हे भगवंत, तुमच्यापासून दूर राहवं लागणं हीच एक मोठी शिक्षा असेल आमच्यासाठी. आम्ही तुमचे भक्त आहोत आणि एक भक्त म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमचा प्रत्येक जन्म तुमच्या हातून संपावा."
भगवान विष्णू यावर प्रसन्न स्मित करत म्हणाले, "माझ्या भक्तांची ही इच्छा मी नक्की पूर्ण करेन. किंबहुना हा सगळा प्रकार जो घडून येत आहे याचं भविष्यात एक मोठं प्रयोजन आहे. वाईटाच्या अस्तित्वावरच उत्तम आणि उदात्त आपलं अस्तित्व निर्माण करतं. तुमचा मर्त्यलोकीचा प्रत्येक जन्म संपवण्यासाठी मी स्वतः अवतार घेऊन पृथ्वीवर येईन आणि माझ्याच हातून तुम्हाला मोक्ष देईन."
हे ऐकून जय - विजयला अतिशय आनंद झाला. त्यांनी भगवान विष्णूला आणि सनकादि मुनींना सादर प्रणाम केला आणि त्यांना मिळालेल्या शापाचा फेरा पूर्ण करण्यासाठी ते मर्त्यलोकी पृथ्वीवर निघून गेले.
---
वाचकहो, ही कथा इथेच संपते. आजच्या आधुनिक मॅनेजमेण्टच्या अनुषंगाने, न्याय कसा करावा याच्या अनुषंगाने ही कथा अतिशय वाचण्यासारखी आणि विचार करण्यासारखी आहे. मी स्वतः इंजिनियरिंग कॉलेजेसमध्ये जेव्हा "व्यवसाय कसा करावा" याबाबत लेक्चर्स देत असे, तेव्हा ही कथा त्यात सांगत असे. या दृष्टीने या कथेबद्दल बोलण्यापूर्वी या कथेत आलेली काही तथ्य आधी तुमच्यासमोर मांडतो.
या कथेत चार ऋषींचा उल्लेख आला आहेः सनक, सनन्दन, सनातन आणि सनत्कुमार. हे चार ऋषी सख्खे भाऊ होते आणि ब्रह्माचे ते मानसपुत्र होते असा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. हे चार जण कायम एकत्र असत आणि म्हणूनच अनेक ठिकाणी त्यांचा "सनकादि मुनी" असा एकत्रपणे उल्लेख केलेला आढळेल. तुमच्यापैकी बहुतांश वाचकांना तुलसीदास रचित हनुमान चालिसा माहित असेल; त्यातही एक दोहा आहे...
सहस बदन तुम्हरो जस गावैं । अस कहि श्रीपति कंठ लगावैं ।।
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा । नारद सारद सहित अहीसा ।।
यात उल्लेख केलेले "सनकादिक मुनीसा" म्हणजे हे चार मुनीः सनक, सनन्दन, सनातन आणि सनत्कुमार. या प्रत्येकाचा विविधं उपनिषदांमध्ये अतिशय उत्तम असा संवाद आणि शिकवण आहे. छांदोग्योपनिषदात नारद आणि सनत्कुमार यांचा "ब्रह्म म्हणजे काय?" आणि "ओमकाराचं रहस्य" याबाबतचा एक अतिशय अर्थपूर्ण संवाद आहे.
या चार ऋषींबाबत आणखी एक प्रचलित धारणा अशी की हे कायमस्वरूपी बालरूपात राहतील असं ब्रह्माचं यांना वरदान होतं. इथे या रूपकांचा मला कळलेला अर्थ असाः थोडक्यात इतकंच की तुम्हाला ज्ञान मिळवत रहायचं असेल तर प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीकडे अगदी लहान मुलाच्या नजरेने आणि लहान मुलाच्या कुतुहलाने पहा. आपल्या पूर्वग्रहांची छाया मनातल्या कुतुहलावर पडू देऊ नका; अन्यथा तुम्ही निखळ ज्ञान प्राप्त करू शकत नाही. "कायम बालरूपात सनकादि मुनी" यातून हा किती सुंदर संदेश देण्यात आला आहे!
या कथेत आलेला आणखी एक उल्लेख म्हणजे जय - विजय यांना शापातून मुक्त होण्यासाठी एकूण तीन जन्म घ्यावे लागणार होते. ते तीन जन्म कुठले? यासाठी विविधं ग्रंथांच्या संदर्भातून समोर आलेलं इथे आपणासमोर मांडत आहे. जय - विजयचे तीन जन्म असे...
पहिला हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू (भक्त प्रल्हादाचा पिता). भगवान विष्णूने वराह अवतार घेऊन हिरण्याक्षचा वध केला आणि पाताळातून पृथ्वी वर आणली अशी कथा आहे; तर नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला ही कथा आपल्याला माहित आहेच.
त्यानंतर रावण आणि कुंभकर्ण. यांचा वध भगवान विष्णूच्या श्री राम अवताराने केला.
आणि अखेरचा तिसरा जन्म शिशुपाल आणि दंतवक्र. भगवान विष्णूच्या श्री कृष्ण अवताराने या दोघांचा वध केला. महाभारतातली शिशुपालाची कथा आपणा सर्वांना माहित आहेच. दंतवक्राची कथा फारशी माहित नसेल कदाचित. हा शाल्वबरोबर द्वारकेवर चाल करून गेला होता अशी कथा आहे. एकटाच हातात गदा घेऊन श्रीकृष्णावर चालून गेला. तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा आपल्या कौमुदिनी नावाच्या प्रसिध्द गदेच्या एकाच प्रहाराने वध केला अशी कथा प्रचलित आहे.
विविधं कालखंडात लिहिलेलं साहित्य एकमेकांशी इतकं उत्तम कसं काय विणलेलं असू शकतं हे खरोखर कळत नाही. भारतीय ग्रंथसंपदा खरोखर अभ्यास करण्यासारखी आहे... एक लेखक म्हणून, एक वाचक म्हणून आणि त्याचबरोबर एक विज्ञाननिष्ठ व्यक्ती म्हणूनही.
वर म्हंटल्याप्रमाणे ही कथा मी माझ्या लेक्चर्समध्ये अनेकदा वापरतो. इथे द्वारपाल म्हणून जय - विजय यांनी सनकादि मुनींना थांबवणं हे मुळीच चुकीचं नव्हतं. मात्र त्यांना आपल्या पदाचा झालेला गर्व मात्र पूर्णतः चुकीचा होता. असे कित्येक जय - विजय अनेक ऑफिससेमध्ये आजही आपल्याला पहायला मिळतील. यांच्यामुळे आपली कामं पूर्ण होत नाहीत, पण यांना डावलून पुढे जाता येणं अवघड अशा काहीशा सिस्टममध्ये आपण अडकून पडतो.
पण मुळात या अशा सिस्टम्स निर्माण कशा होतात याचंही उत्तर या कथेत आहे. भगवान विष्णूने जय - विजय यांना अनावश्यक अधिकार देऊन ठेवले होते का? मिळालेल्या कुठल्याही पदाचं वजन चिकटून एखादी व्यक्ती व्यक्तीश्रेष्ठत्वाच्या गर्वाच्या अधिन होणार नाही अशी कार्यप्रणाली निर्माण करणं हे व्यवसाय करत असताना एक मोठंच कौशल्याचं काम असतं. अशावेळी अधिकारांची वाटणी करत असतानाच कामाचं विभाजन सुयोग्य पध्दतीने होणं हे जितकं महत्वाचं तितकंच क्लायंटची आपल्याबरोबर काम करण्यातली सोयही फार महत्वाची. आपल्याशी व्यवसाय करताना इतरांना सहजता कशी वाटेल ही बाब व्यवसाय वृध्दीच्या अनुषंगाने फार महात्वाची असते आणि म्हणूनच आपल्या कंपनीत असे कुणी जय - विजय तयार होत असतील किंवा झालेले असतील तर वेळीच त्यांचा बंदोबस्त करणं हे खूप महत्वाचं असतं; अन्यथा अगदी दाराशी आलेले सनकादि मुनींसारखे प्रतिष्ठीत क्लायंट विनाकारण नाराज होऊन माघारी निघून जातील.
अशावेळी भगवान विष्णूंनी केलेली मध्यस्थी आणि प्रसंगी आपल्या सेवकांच्या वतीने मागितलेली माफी ही गोष्टंही शिकण्यासारखी आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे मालक असालही; पण वेळप्रसंगी हे सगळे मुकुट उतरवून ठेवण्याचा समंजसपणा परिस्थिती सावरायला फार उपयुक्त ठरू शकतो. शिवाय सनकादि मुनींनी भगवान विष्णूंना त्यांनी दिलेला शाप रद्द करण्याचा अधिकार देऊनही भगवन विष्णूंनी तसं न करण्यासाठी केलेला विचारदेखील लक्षात घेण्यासारखा आहे. इथे कथाकाराने आणखी एक खूप महत्वाचा संदेश दिला आहे, तो म्हणजे "कुठलाही न्यायिक निर्णय करत असताना त्याचे दूरगामी परिणाम काय होतील याचा विचार करावा". दुसऱ्या शब्दात बोलायचं तर "चुकीचा प्रिसिडन्स" निर्माण होणार नाही ना याचा नीट विचार करावा.
आधुनिक व्यावसायिक कार्यप्रणाली आणि त्याअनुषंगाने या कथेतून मिळणारी शिकवण हा अतिशय रोचक आणि विस्तृत विषय आहे; आणि मी यावर असाच बोलत राहिलो तर न जाणो आणखी कित्येक ओळी असाच लिहित जाईन! याबरोबरच मला आत्ता द्वारपालांशी निगडीत अनेक उदाहरणं आठवत आहेत... अक़बर - बीरबलाच्या पहिल्या भेटीच्या कथेतही एक भ्रष्ट द्वारपाल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचीही एक कथा आहे ज्यात वेशांतर करून द्वारपालाची परीक्षा पाहण्यासाठी आलेल्या शिवरायांना द्वारपालाने अडवलं, हटकलं आणि आपल्या कर्तव्यदक्षतेचं उत्तम उदाहरण सादर करत शिवरायांची वाहवाही मिळवली. इतिहासाची पानंच्या पानं अशा अनेक चांगल्या वाईट द्वारपालांच्या कथांनी सजलेली आहेत.
तुर्तास लेखाच्या लांबीचं भान ठेवत इथेच थांबतो.
तर वाचकहो अशी ही कथा जय - विजयची...
पुन्हा भेटूया, ग्रंथश्रुतिच्या पुढच्या भागात अशाच एका नवीन कथेसह...
ऋतुराज पतकी