वाचकहो, आजच्या लेखामध्ये आपण एका कथेचा संक्षिप्त भाग तर पाहणार आहोतच, पण ग्रंथश्रुतिचा आजचा भाग हा मुख्यत्वे चिंतनाचा विषय आहे असं म्हंटल्यास ते वावगं ठरू नये. वैदिक, पौराणिक साहित्यातल्या स्त्रीच्या स्थानाबाबत अनेकदा फार चुकीच्या कल्पना ऐकायला मिळतात. वैदिक साहित्याविरूध्द नाहकच आरोळी उठवण्यासाठी कायमच ‘वैदिक आणि पौराणिक साहित्यात उल्लेखित स्त्रियांवरचे अन्याय’ या विषयाचा वापर केला जात असल्याचं दिसून येतं. याच अनुषंगाने वैदिक, पौराणिक साहित्यातून आपल्या समोर येणाऱ्या तत्कालिन स्त्रीचं सामाजिक स्थान यावर चिंतनात्मक लेखन करण्याचा मानस होता, जो आजच्या लेखाच्या निमित्ताने काही अंशी का होईना, फलद्रुप होतोय.
---
स्त्री ही भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, अविभाज्य सन्मानीय घटक आहे. तिच्यामध्ये देवीरूप उपयोजून प्रसंगी तिच्या हाती दैत्यांचा विनाशही झालेला आहे. स्त्री ही कुटूंबाचा मुख्य आधारस्तंभ. जागतिक महिला दिन असो किंवा अहिल्यादेवींसारख्या एका पुण्यश्लोक, कर्तृत्ववान स्त्रीच्या स्मृतींचा जागर असो; या ना त्या “निमित्ताने” आज स्त्री-स्वातंत्र्याबद्दल बोललं जात असताना आवर्जून सांगावसं वाटतं की प्राचीन भारतीय भूमीत स्त्रीला फार मोठा सन्मान होता; दुर्दैवाने परकीय आक्रमणांमध्ये अंधानुकरणात आपण आपल्याच संस्कृतीचे अपभ्रंश निर्माण केले. या पार्श्वभूमीवर वेद आणि पौराणिक काळातली स्त्री आणि सामाजिक दृष्टिकोन जाणून घेणं नक्कीच फायद्याचं ठरेल.
उपलब्ध साहित्यावरून हे स्पष्टच दिसून येतं की वैदिक काळात संस्कार आणि शिक्षण याबाबतीत मुलगा मुलगी असा फारसा भेद नव्हता. आजच्या काळात फक्त मुलांवर उपनयन संस्कार होतात. पण वैदिक काळात मुलींचेही गायत्री मंत्राने उपनयन संस्कार केले जात असत. याचे दोन प्रकारः आयुष्यभर ज्ञानोपासना करू इच्छित असेल तर "ब्रम्हवादिनी" आणि विवाह, संसार अशा प्रकारे जीवन व्यतीत करू इच्छित असेल तर "साध्योवधू". इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपलं आयुष्य कसं जगायचं हे ठरवण्याची तत्कालिन स्त्रीला संपूर्ण मुभा होती.
वैदिक काळात ज्ञानोपासनेचा स्त्रीला संपूर्ण अधिकार मान्य केल्याचे अनेक ग्रंथोक्त दाखले आढळतील. याबरोबरच, आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे स्त्री विवाहित होऊनही ब्रम्हचर्य पालन करू शकत होती. विवाह केलाय म्हणून तिने पतीबरोबर शारीरिक संबंध ठेवलेच पाहिजेत, मुलं जन्माला घातलीच पाहिजेत अशी कुठलीही बळजबरी तिच्यावर नव्हती. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कात्यायनि आणि मैत्रेयी या याज्ञवल्क ऋषींच्या दोन पत्नी.
कात्यायनीला संसारी आयुष्यात रस होता; पण मैत्रेयीला मात्र ज्ञानोपासनेत रस होता. त्यानुसार कात्यायनीने सांसारिक बाजू सांभाळली तर मैत्रेयी याज्ञवल्क ऋषींची शिष्या बनली. मैत्रेयी आपल्या पांडित्यपूर्ण अभ्यास, विवेचनासाठी तत्कालिन समाजात खूप प्रसिध्द होती. इथे मैत्रेयी ही "ब्रम्हवादिनी" होती, तर कात्यायनी "साध्योवधू". ज्याप्रमाणे पुरुष ब्रह्मचारी राहून तप, स्वाध्याय, योग इत्यादी द्वारे ब्रह्मपद प्राप्त करीत असत त्याप्रमाणे स्त्रियाही परमार्थाची वाटचाल करीत असत. याच परंपरेत आणखी एक नाव आवर्जून घ्यावं ते म्हणजे गार्गी.
बृहदारण्यक उपनिषदात "गार्गी" या विद्वान स्त्रीची कथा वाचायला मिळते.
गार्गी ही "गर्ग" ऋषींच्या वंशात जन्मलेली वचक्नू ऋषिंची मुलगी. लहानपणापासूनच तिला वैदिक ज्ञान संपादनात रस होता. तिच्या वडिलांनी तिला आपली शिष्या करून घेतलं आणि तिच्याकडून उत्तम वेदाभ्यास करून घेतला. गार्गीने तिच्या वेदनिपूण व वाक्चचातुर्याने ज्ञानी वेदाभ्यासकांमध्ये आपलं असं एक मानाचं स्थान निर्माण केलं होतं.
एकदा विदेह देशाच्या राजा जनकाने बहुदक्षिण यज्ञ केला आणि समस्त वैदिक शास्त्र संपन्न ज्ञानींना आवाहन केलं की जो कुणी सर्वोत्तम शास्त्रोपासक असेल त्याला मी शिंगाना सोने बांधलेल्या एक हजार गायी देईन. राजाच्या या आवाहनाच्या उत्तरादाखल याज्ञवल्क्य नामक तेजस्वी ऋषि पुढे आले. ते आपल्या शिष्याला म्हणाले, "माझ्याप्रमाणे ब्रम्हज्ञानी भूतलावर इतर कुणी नाही; तेव्हा या गायी आपल्या आश्रमाकडे घेऊन चल. जर कुणाचं याबाबत काही म्हणणे असेल तर त्यांनी पुढे यावे; मी त्यांना शास्त्रचर्चेसाठी सादर आवाहन करतो".
हे पाहता तत्कालिन इतर शास्त्रपारंगत ऋषी पुढे सरसावले आणि त्यांनी याज्ञवल्क्य ऋषिंशी शास्त्रचर्चा केली, मात्र याज्ञवल्कांनी सर्वांनाच निरूत्तर केलं. याच शास्त्रचर्चेत गार्गीही उपस्थित होती. तिने याज्ञवल्क्यांना नमन करून शास्त्रचर्चेची अनुमती मागितली. मोठ्या कौतूकाने त्यांनी गार्गीला आपल्या समक्ष स्थानापन्न केलं आणि गार्गी - याज्ञवल्क्य या दोहोत शास्त्रचर्चेला प्रारंभ झाला.
या शास्त्रचर्चेचा थोडक्यात अनुवादित तपशील असा...
गार्गीः जर अचेतन वस्तूचं मूलतत्व त्याची जल अवस्था असेल तर अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्या चराचरात जल सामावू शकेल?
याज्ञवल्क्यः वायू.
गार्गीः आणि वायूला सामावून घेईल असं काय आहे?
याज्ञवल्क्यः आकाश.
गार्गीः या समस्त अंतराळाला सामावून घेणारं काय आहे?
याज्ञवल्क्यः गंधर्वलोक.
गार्गीः आणि गंधर्वलोक कशात सामावलेले आहे?
याज्ञवल्क्यः आदित्यलोक.
गार्गीः पण अशी कुठली गोष्ट आहे जी हे आदित्यलोकही आपल्यात सामावून घेऊ शकते?
याज्ञवल्क्यः चंद्रलोक.
गार्गीः आणि चंद्रलोक ... ?
याज्ञवल्क्यः नक्षत्रलोक.
गार्गीः नक्षत्रलोक कशाचा भाग मानावा?
याज्ञवल्क्यः देवलोक.
गार्गीः आणि देवलोक हे सर्वव्यापी आहे का?
याज्ञवल्क्यः नाही. प्रजापतिलोक देवलोकाचा कारक आहे.
गार्गीः आणि प्रजापतिलोक ... ?
याज्ञवल्क्यः ब्रम्हलोक या प्रजापतिलोक व्यापून उरले आहे.
गार्गीः मग, ब्रम्हलोक सर्वव्यापी म्हणावं का?
याज्ञवल्क्यः हे गार्गी, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर म्हणजे समस्त वेदांचं तत्व आहे, जे समस्त वेदज्ञानाचं सत्व आहे.
... आणि यानंतर याज्ञवल्क्य ऋषिंनी गार्गीला वेदांततत्वाची दिक्षा दिली. याज्ञवल्क्य ऋषिंचं हे परम् ज्ञान पाहून गार्गी तृप्त झाली. शास्त्रचर्चा अर्थातच याज्ञवल्क्य ऋषिंनी जिंकली, पण गार्गीने समस्त सभेबरोबरच याज्ञवल्क्य ऋषिंचंही मन जिंकलं. यानंतर गार्गी तिचं पूर्ण आयुष्य वेदाभ्यासिका आणि वेदअध्यापिका म्हणून जगली. तिने विवाह केला नाही, तिने आयुष्यभर ब्रम्हचर्याचं पालन केलं.
वेदकाळातली स्त्री शिक्षणाची प्रथा परकीय आक्रमणांपर्यंत अविरत सुरू होती. “ब्रह्मचर्याचं पालन करून अध्ययन पूर्ण करणाऱ्या कन्येला सुयोग्य वराची प्राप्ती होते”, असा अथर्ववेदात उल्लेख आहे. म्हणजे सुयोग्य वर मिळण्यासाठी निव्वळ सौंदर्य नाही तर शिक्षणही महत्वाचं आहे अशी सरळ शिकवण इथे आहे. रामायणकाळात सीता, तारा, वेदवती, स्वयंप्रभा यांना वैदिक शिक्षण देण्यात आलं होतं. यातली तारा ही सुग्रीवाच्या मोठ्या भावाची,बालीची पत्नी. ती यज्ञशास्त्र निपुण होती. स्कंद पुराणात "सावित्री" या स्त्रीचा उल्लेख आहे, जी यज्ञाहुती देत असे असा उल्लेख आहे.
इथे एक उल्लेख आवर्जून करावासा वाटतो तो "पथ्यास्वस्ति" या स्त्रीचा. कौशितकी ब्राम्हण्य ग्रंथात हिचा उल्लेख आहे. ज्ञानसंपादनासाठी हिने एकटीने मोठा प्रवास केला आणि ज्ञानसंपन्न होऊन मोठा लौकिक मिळवला. अशीच आणखी एक स्त्री, पुण्याक्षी, जी "कन्याकुमारी" यावाने प्रसिध्द आहे आणि जिच्या नावे भारताचं दक्षिण टोक प्रसिध्द आहे. आपण आपल्या देशात "वडिलोपार्जित संपत्तीत मुलांबरोबरच मुलींना समान हक्कं मिळाला पाहिजे" असा कायदा केलाय; पण भरत राजाने त्याला आठ पुत्र आणि ही एक पुत्री अशा नऊ जणांमध्ये आपल्या राज्याची समान विभागणी केल्याचा दाखला आहे. त्याने त्याच्या मुलीलाही त्याच्या संपत्तीत समान वाटा दिला होता. तिने या प्रभागावर अनेक वर्ष उत्तम राज्य केलं आणि तिच्या हातून बाणासूराचा वध झाला. स्त्री राज्यकर्ता ही प्रथा भारतात नवीन नाहीच आणि दक्षिण भारतात आजही मातृसत्ताक समाजरचना टिकून आहे.
भविष्यपुराणात प्रामुख्याने व्रतवैकल्य, दानधर्म, नीतीशास्त्र, ज्योतिष, आयुर्वेद इत्यादी बाबत तपशिलाने विवेचन केलेलं आहे. त्यातला एक उल्लेख तत्कालिन विचारसरणी स्त्रीच्या बाबतीत किती सहिष्णू होती हे सांगण्यासाठी मला इथे आवश्यक वाटतो. भविष्यपुराणातल्या धर्म सदाचार उपदेशात असं म्हंटलंय की, विधवा स्त्रियांनी आयुष्य निर्वहन होण्यासाठी वेदमंत्रांना ग्रहण करावं आणि अध्ययनासाठी आयुष्य वाहून घ्यावं. विधवा स्त्री यज्ञकर्म आणि यज्ञकर्म संचालन करू शकत असे.
हा सगळा काळ कधी आणि कसा मागे पडला हे कोडं इतिहासाने वर्तमानासाठी अनुत्तरित मागे ठेवलं आहे. भारतीय भूमीला परकीय आक्रमणांचा शाप नसता तर? आजचा भारतीय समाज कदाचित वेगळा असला असता… कदाचित.
या आणि अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी इतिहासाच्या अंधारत चाचपडून पाहताना मनाच्या पटलावर अनेकविधं कयासांचे फक्त आणि फक्त तरंग उठत राहतात… आणि वाटत राहतं, आजच्या पाश्चात्य संस्कृतीच्या सावलीत वावरणाऱ्या भारतीय समाजाने वैदिक काळातल्या स्वयंप्रकाशी ज्ञानोपासक समाजाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.
ऋतुराज पतकी