**त्सुनामी**
कित्येक वर्षांची माझी सलगी आहे त्या जलधीशी!... चंदेरी, चमचमतं रुपडं घेऊन मी माझ्या कमाल आवाक्यानं सदैव पसरलेल्या स्थितीत सज्ज असतो, ह्या महासागराचं थैमान आवरण्या-सावरण्यासाठी... त्याच्या राक्षसी लाटांना थोपवत... त्यांचं उधाण पेलत...! मात्र काहीवेळा तो अती खवळला कि माझ्या उरात दाटलेला धडकी भरवणारा काळाकुट्ट अंधार कसा दाखवू मी कुणाला...??... थोटकं शरीर घेऊन जिवाच्या आकांतानं त्याला कह्यात ठेवायचा माझा तोकडा प्रयत्न संपला कि मग रागारागाने तो अख्ख्या मलाच गिळतो... अगदी पाशवीपणे.... आणि ....भरतीच्या गोष्टी करत राहातात लोक !!
त्याच्या त्या तशा वागण्यानं माझी गट्टी फू होते त्याच्याशी.... कि पुन्हा काहीकाळाने अतीच लाडात येणारा तो, 'तोच का हा?' असं वाटण्याइतक्या बदललेल्या रूपात गोंजारत राहातो मला.... मी पुन्हा मैत्री करावी म्हणून ....तरीही माझ्याकडून अगदीच दाद मिळाली नाही कि मी त्याच्यात सामावून जावं म्हणून अतीच ओढीनं खेचत राहातो मला आत-आत त्याच्या अंतरंगात.... आणि ....ओहोटीच्या गोष्टी करत राहातात लोक !!
त्यादिवशी मात्र चित्तच थाऱ्यावर नव्हतं त्याचं...! कित्येक वर्षांपासून त्याच्या उरात साठलेलं काहीतरी प्रचंड ठुसठुसत असावं...! कसलातरी दाटलेला राग उफाळून येत होता अगदी अनावरपणे....!! युगायुगांच्या सोबतीमुळं त्याचा कणनकण जाणून असणाऱ्या मला त्याचं वेगळेपण चांगलंच जाणवत होतं...! खूप प्रयत्न करत होतो मी त्याला आवाक्यात ठेवण्याचा.... पण काहीकेल्या अजिबात आवरतच नव्हता तो मलाही.... आणि असा अस्वस्थपणी बेभानलेला चिडलेला तो, मलासुद्धा काही न सांगता अख्ख्या जगाला पादाक्रांत करण्यासाठी निघाला होता....!!
कदाचित निसर्गाला समजून न घेणाऱ्यांवर, निसर्गाची कदर नसणाऱ्यांवर कसलातरी सूड उगवू पाहात होता तो.... कदाचित त्याला निसर्गावर कुरघोडी करू पाहाणाऱ्या मानवाला चांगलीच समज द्यायची असावी...!! त्याच्या मनात नेमकं काय आणि कसं घोंघावत होतं ते मी तरी कसं सांगू??.... मीच सावरू शकत नव्हतो स्वत:ला त्यातून.... पुरता विस्कटून गेलो होतो त्याच्या त्या अकल्पित रौद्ररूपानं!!... त्याचा उरातल्या वादळाचं कारण, त्याची तीव्रता खरं तर फक्त तोच जाणे.... मात्र त्याचे परिणाम त्याच्या-माझ्यापुरतेच मर्यादित नव्हते हे खचित.... कारण अजून, अजूनही लोक गोष्टी करत राहिलेत.... त्सुनामीच्या!!!
© आसावरी केळकर–वाईकर, चेन्नई