**सुटका**
समोरच्या उचंबळत्या लाटांसारखं सुरंगीचं मन एकीकडं उचंबळून येत होतं, दुसरीकडं उद्यापासून लाभणाऱ्या स्वतंत्र आयुष्याच्या विचार करताना ‘सगळं ठीक होईल ना?’ ह्या विचारानं हेलकावतही होतं, तर क्षणार्धात नव्या उमेदीनं नवी स्वप्नं पाहाताना आनंदतही होतं आणि पुढच्याच क्षणी आत्ता आपण पकडले गेलो तर पुन्हा स्वप्नंही पाहाता येणार नाही ह्या भयावह विचारानं थरकापतही होतं. मनाचं असं वेगवेगळ्या भावभावनांच्या लाटांवर हिंदकळणं पेलत तिनं आत्ता अंगात घातलेलं विकीनं दिलेलं जर्कीन दोन्ही हातांनी गच्च धरून ठेवलं होतं... त्याच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमानंही आणि ह्या क्षणांमधे धैर्य गोळा करण्यासाठीही!
लहानग्या वनिताला मायाळू स्पर्श हा फक्त आजीचाच आठवत होता. तिचा जन्म होताक्षणी आई देवाघरी गेली. तिथून पुढं एकूणच सगळं बिनसतच गेलं असं तिची आजी म्हणायची. बाचं हळूहळू कामातलं लक्ष उडालं, तो कर्जबाजारी झाला आणि व्यसनातही बुडाला... शेतीचा अगदी बारकासा तुकडा आजीच्या खमकेपणानं शाबूत राहिला होता म्हणून मुखात दोन घास पडायचे इतकंच... आजी हाडाची काडं करून दोन पिकं घ्यायची आणि आपल्या शाळेची फी भरायची, तू शिक अणि शहाणी हो म्हणायची. मात्र ती पंधरा वर्षांची होताहोता आजी गेली आणि जवळच्याच गावात राहाणाऱ्या एका दूरच्या काकानं पटकन दावा साधला. कर्जबाजारी, व्यसनधीन बाला थोड्या पैशाचं आमिष दाखवून शेती, घर सगळं हडपलं आणि वनिताला मुंबईला मोठ्या कॉलेजात शिकायला घालतो असं म्हणून तिला घेऊन मुंबईला आला. मात्र त्यानं ज्या विश्वात वनिताला आणून टाकलं ते तिच्या कल्पनेपलीकडचं जग होतं आणि तिच्याजवळ तिथून बाहेर पडायचा काही मार्ग नव्हता.
असे सगळेच अभागी जीव ज्या नरकयातनांतून जातात ते सगळं वनिताच्या किंबहुना सुरंगीच्या वाट्याला आलं. ती तिथं येताच मेहेरबाईनं ‘आजापासून तुझं नाव सुरंगी’ असं तिला सांगितलं आणि आपलं पहिलं नावही विसरून जावं इतकं वनिताचं जगणंही बदलून गेलं. आजवर पळून जायचा प्रयत्न केलेल्या काही मुलींच्या वाट्याला शिक्षा म्हणून नंतर कायकाय आलं होतं हे त्यांनी तिला सांगितलं आणि गप राहिलो तर डोक्यावर छप्पर आणि दोनवेळा पोटात घास पडण्याची ददात नाही हेही सांगितलं. सरतेशेवटी स्वत:चं मन वगैरे गोष्टी विसरून घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी सुरंगी त्या चक्रात अडकून फिरायला लागली.
तो दिवस मात्र वेगळं काहीतरी घेऊन आला, ज्या दिवशी विकीनं तिच्या खोलीत प्रवेश केला. तीन वर्षांच्या अनुभवानं त्याचं नवखेपण तिला क्षणार्धात जाणवलं होतं. मात्र तिच्याकडं पाहाताक्षणी त्याच्या डोळ्यांत उमटलेले भाव तिनं आजवर पाहिलेल्या नजरांपेक्षा फारफार वेगळे होते. काहीतरी खूप सुंदरसं सुरंगीच्या काळजाला स्पर्शून गेलं होतं. तिनंच त्याला हात धरून आपल्याजवळ बसवून घेतलं पण तो अवघडलेलाच होता. बराचवेळ तसाच गेल्यावर त्यानं विचारलं, ‘तुझं नाव काय?’ आणि तिनं उत्तरही द्यायच्या आत घडाघडा बोलू लागला, ‘मला माझ्या छोट्या बहिणीची आठवण झाली तुला पाहाताक्षणी! मी कधीच अशा कुठल्याजागी आजवर गेलो नाही. भरपूर श्रीमंती आहे माझ्या आईबापाकडं पण आमच्यासाठी वेळ नाही, त्यामुळं मित्रांच्या नादानं आपोआप काही शौक सुरू झाले. हा अनुभव पहिलाच... मात्र देवालाच काळजी किंवा माझ्या छोट्या बहिणीच्या प्रेमानं मला वाचवलं असावं. ती कायम सांगत राहाते, दादा चुकीच्या संगतीला नको रे लागू. चांगलं नाही होणार आपलं त्यामुळं. आत्तासुद्धा माझी वाट पाहात बसली असेल बंगल्यात एकटीच. तुला पाहिलं आणि तीच आठवली मला.’
अगदी प्रामाणिक सुरातलं त्याचं बोलणं ऐकून सुरंगीचे डोळे पाणावले होते. मग त्यानं विचारलं, ‘तू कशी आलीस इथं? तुला आवडतं हे सगळं?’ सुरंगी डोळे पुसत म्हणाली, ‘आवडीनं कोण येईल ह्या वाटेवर?’ आणि तिनं आपली रामकहाणी त्याला ऐकवली. तिचं बोलणं पूर्ण होताहोता विकीनं नकळत तिला आपल्या कुशीत घेऊन रडू दिलं. त्यावेळच्या दोघांच्या भावनांचा रंग नेमकेपणी कुणालाच सांगता आला नसता, मात्र काहीतरी वेगळ्या, निर्मळ भावनेची अनुभूती देणारे ते क्षण असल्याचं वनिताला जाणवत होतं. दारावर चार थापा ऐकू आल्या तशी भानावर येत विकीला हात जोडत सुरंगी म्हणाली, ‘तुमच्या रुपानं आज काही क्षणांसाठी तरी सुख आलं नशिबी! पण आता तुम्हाला निघायला हवं. पुढच्या गिऱ्हाईकाची वेळ झाली असणार, म्हणून अमीनचाचा दार ठोकत असणार. ‘ठीक आहे. फक्त एक सांग, मी तुला इथून बाहेर काढलं तर तुझी यायची तयारी आहे?’ खिन्न हसू ओठांवर घेत सुरंगी म्हणाली, ‘तुम्ही इथून बाहेर काढलंत तरी मी जाणार कुठं? आणि माझ्यासारखीला कोण आपल्या घरात ठेवून घेणार!?’ ‘ते बघू नंतर... मी येईन परत’ असं म्हणत विकी त्या खोलीतून बाहेर पडला.
त्यानंतर तो रोजच तिथं जाऊ लागला. तो पैसा मोजत असल्यानं अमीनचाचानं त्याला नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. मात्र विकीनं कधीही सुरंगीचं शरीर ओरबाडलं नाही. त्यांचे सूर जुळले होते, मात्र दोघांच्यात काहीतरी वेगळं शिजत होतं. संधी मिळाली तर पुढं शिकायची वनिताची इच्छा असल्याचं कळल्यावर त्यानं आपल्या वडिलांच्या इंडस्ट्रीतल्या काही लोकांना गुपचूप हाताशी धरून एका अनाथाश्रमातून कागदपत्रं तयार करून घेऊन सुरंगीची मुंबईपासून तीन तासांवरच्या एका कॉलेजमधे ऍडमिशन, हॉस्टेल अशी सगळी व्यवस्था केली. सगळं फार सोपं नव्हतं, पण भरपूर पैसा हाती असल्यानं विकीनं ते जमवलं. पैशाचा असा चांगला विनियोग झाला तर आपण लक्ष्मीदेवतेचा मान राखल्यासारखं होईल असं काहीतरी पहिल्यांदाच त्याच्या मनात येत होतं.
वरचेवर तिथं येत असल्यानं पोरगं सुरंगीसाठी वेडावलं आहे असा अमीनचाचाचा ग्रह झाला आणि त्याचाच फायदा उठवत विकीनं एक दिवस भरपूर पैसे त्याच्या हातावर ठेवत सुरंगीला एक रात्र मुकाट्यानं बाहेर घेऊन जाण्याची आणि पहाटे उजाडायच्या आत परत आणून सोडण्यासाठी परवानगी द्यायची आणि मेहेरबाईला ह्यातलं काही कळू न द्यायची गळ घातली. मी सांगेन तोच गाडीवाला घेऊन जायचा ह्या अटीवर अमीनचाचानं परवानगी दिली. पूर्वी पळून जायचा प्रयत्न केलेल्या तिथल्या मुलींचे अनुभव सुरंगीनं विकीला सांगितले होते त्यामुळं त्यानं काळजीपूर्वक सगळी योजना आखली होती. जराशी वर्दळ असणाऱ्या एका रस्त्यावर एका हॉटेलजवळ गाडी थांबवायला सांगून आम्ही काहीतरी खाऊन येतो असं सांगून दोघं बाहेर पडले. ड्रायव्हर पार्किंग लॉटमधे गाडी पार्क असतानाच हॉतेलकडं जाणारी आपली पावलं माघारी वळवत चटकन विकीनं तिथं आधीच पार्क असलेल्या आपल्या गाडीला हात केला आणि दोघं त्यात बसून निसटले.
नंतर आपल्या इंडस्ट्रीतल्या एका विश्वासू कामगाराच्या घरी विकीनं सुरंगीला मुकाट्यानं दोन-तीन दिवस ठेवलं. दुसऱ्या दिवशी ज्या मित्रामुळं तो तिथं जाऊ लागला त्याच्यासोबत अमीनचाचानं त्याला गाठलं. मात्र हॉटेलमधे असताना हात धुवून येते असं सांगून सुरंगी निसटली ती मला सापडलीच नाही आणि मग घाबरून आपण तिथून मुकाट्यानं घरी निघून आलो, हेच पालुपद विकीनं सुरू ठेवलं. अमीनचाचानं पोलिसांची वगैरे भीती घातल्यावर मात्र निर्भीडपणे विकीनं ‘काय कुणाला घेऊन यायचं ते या, बघुया तेव्हाचं तेव्हां!’ असं म्हटल्यावर विषय थांबला.
आता पाळत ठेवली जात नाही हे लक्षात आल्यावर चार दिवसांनी विकीनं त्या कामगाराकडून तिला निरोप पाठवला. ठरल्याप्रमाणं ती एकटीच त्या गल्लीच्या कोपऱ्यावर येऊन उभी राहिली आणि विकीची मोटरसायकल दिसताच पटकन त्याच्यामागे बसली. त्यानं बाईक चालवतानाच तिला सगळा प्लॅन समजावून सांगितला आणि त्यानुसार सुरक्षित जागा म्हणजे गर्दीनं फुललेला बीच असं म्हणून तिला तिथं उतरवलं. एक जर्कीन तिच्या हाती ठेवून म्हटलं, ‘बीचवर पोहोचलीस कि हे घाल म्हणजे मागावर कुणी असलंच तर ते तिथवर पोहोचेतोवर तू ओळखू येणार नाहीस आणि मी जरावेळ गाडी वेगवेगळ्या रस्त्यांवरून फिरवून मग कुठंतरी पार्क करून चालतच इथं येईन. ह्या वेगळ्या जर्कीनमुळं तुला शोधणं सोपं जाईल पण किमान दोन तास तरी तुझ्याजवळ येणार नाही. तू सावधगिरीनं राहा. कुणी जबरदस्तीनं पकडून न्यायला लागलंच तर लगेचच सरळ बोंबाबोंब करायची. म्हणजे आपोआप सुटशील तू त्यातून.’ विकी निघताना वनिताच्या काळजाचा ठोका चुकला होता. पण तिनं हसऱ्या चेहऱ्यानं विकीला निरोप दिला आणि ती लाटांजवळ येऊन बसली होती.
मन चांगल्या-वाईट वेगवेगळ्या असंख्य विचारांच्या हिंदोळ्यावर हिंदकळत होतं. स्वत:च्याच उरातली धडधड वनिताला स्पष्ट ऐकू येत होती. असा किती वेळ गेला आणि अवतीभवती पूर्ण काळोख दाटला तिला समजलही नाही. एका क्षणी विचारांच्या वावटळीतून बाहेर येत तिनं आजूबाजूला पाहिलं आणि दूरवरून विकीसारखी एक आकृती तिच्या दिशेनं तिला येताना दिसली. तिथं बसल्याबसल्या मेंदूतून निघणारे अनंत चांगलेवाईट विचार आता जास्त वेगाने चाल करून येऊ लागले. तो विकीच असेल ना? विकी येईल ना? आला तरी आपल्याला आणाभाका दिल्यात तसं शिकायलाच पाठवेल आणि नंतर आपल्याला जवळ करेल ना? कि तो येणारच नाही किंवा आला तरी दुसऱ्या कुठल्या वाटेवर ढकलून देईल?
एका क्षणी मात्र तिच्या मनानं मेंदूला निक्षून सांगितलं, ‘आजवर तरी विकीनं दिलेला शब्द मोडलेला नाही. त्याच्या डोळ्यांत दिसणाऱ्या त्या शुद्ध भावनेवर, त्याच्या स्पर्शात जाणवणाऱ्या सच्च्या प्रेमावर विश्वास ठेवल्यानंच आज मी त्या कोंडवाड्यातून सुटून इथवर पोहोचलेय. त्या भयाण विश्वापासून त्यानं माझी सुटका केलीये तशीच आता मी तुझ्या ह्या नकोशा भयावह शंकांपासूनही सुटका करून घेतेय. मुळीच दाद देणार नाही मी तुझ्या असल्या निराधार शंकांना! येईल... विकी नक्की येईल आणि पुढंही त्याचा शब्द पाळेल’ आणि तिनं त्या लांबवरच्या धूसर दिसणाऱ्या आकृतीकडं डोळे लावले. ती आकृती तिच्या दिशेनंच येत होती हे निश्चित!
© आसावरी केळकर–वाईकर, चेन्नई