**इतकंच**
‘इकडं माझ्या डोळ्यांत बघून सांग कि तुला नाहीये बोलायचं माझ्याशी किंवा मी इथं आलेलो आवडलं नाहीये तुला... मग एका क्षणात निघून जाईन मी...’ हे निलयचे शब्द आले तसं बिल्वानं गर्र्कन वळून त्याच्याकडं पाहिलं आणि उत्तरादाखल तिच्या पापण्यांनी बंड पुकारून त्याला पाहिल्यवर डोळ्यांत जबरदस्तीनं अडवून ठेवलेले मोती उधळून दिले. त्यावर निलयनं दिलखुलास हसत बिल्वाच्या खांद्याभोवती अलगद हात टाकत म्हटलं, ‘केवढ्या तुफान लाटा येताहेत आज बघ तरी... त्सुनामी येणार कि काय?’ त्यावर बिल्वानं डोळ्यांत लटका राग आणि ओठांवर हसू अशा आविर्भावात त्याच्याकडं पाहिलं आणि त्याच्यावर त्याचं गालातल्या गालातलं मिश्कील हसणं बघून ‘कठीण आहेस तू’ अशा अर्थी मान हलवत स्वत:चे डोळे पुसू लागली.
दोन मिनिटांनी ‘आय ऍम सॉरी’ असं तिचं वाक्य आलं. त्यावर तो ‘गुड गर्ल’ म्हणाला, तशी ती वैतागून त्याच्यावर ओरडली, ‘सरळ बोलणार आहेस का तू कधीतरी?’ पुन्हा मोठ्यांदा हसत निलय म्हणाला, ‘सरळच बोलतोय मी... तुला तुझी चूक कळून सॉरी म्हटलंस म्हणून गुड गर्ल म्हटलं मी... ह्यात काय चुकलं माझं?’ त्यावर बिल्वाचे डोळे परत भरून येतायेता ती ‘निलय, प्लीज ना...’ असं म्हणाली. तर निलय गंभीरपणाचा आव आणत पुढं म्हणाला, ‘खरंतर, मेंदूतून अनावश्यक विचारनिर्मिती करत मला सरळसरळ टाळून इथं येऊन रडत बसणाऱ्या मुलीशी मी सरळ बोलायलाच नाही पाहिजे...’ त्यावर पुन्हा एक तिच्या थेंब डोळ्यांतून ओघळल्यावर तो एका बोटावर झेलत तो म्हणाला, ‘पण बोलतोय ना मी... सरळच बोलतोय... तरी रडतेय ती मुलगी!’ ह्यावर बिल्वानं, ‘गप रे’ म्हणत डोळे अगदी निपटून काढून कोरडे केले.
ते पाहून ‘दॅट्स बेटर’ म्हणत तिच्या खांद्याभोवतीचा हात काढून घेत त्याच हातानं तिच्या दंडावर दोन हलके गुद्दे मारत तो पुढं म्हणाला, ‘ऑलराईट... आता सांग... ऑफिसच्या पार्किंगमधे तुला एवढी उत्साहानं मी हाक मारत असताना सरळ मला टाळून का निघून आलीस?’
‘अरे, पण अंजू कुठाय? तू एकटाच कसा आलास? आणि तुला कसं कळलं मी इथं बीचवर आलेय ते?’
‘मी काय विचारतोय?’
‘आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे...’
‘तू इथंच येणार हे माहीत होतं मला... तुझं हे वेड आपल्या अख्ख्या ग्रूपला माहितीये... तसंही डोळ्यांतलं पाणी जिरवायला समुद्राशिवाय उत्तम जागा दुसरी कोणती आहे?’ निलय हसत म्हणाला.
‘बरं... आणि अंजू कुठं आहे?’
‘रजेवर आहे आज... तिच्या मामेबहिणीच्या साखरपुड्याला गेली आहे... उद्या येईल परत...’
‘ओह ओके...’
‘आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे’ असं निलय म्हणाला तसं बिल्वा थेट त्याच्याकडं पाहात म्हणाली, ‘माहीत नाही, परवा मी तुमच्या डिपार्टमेंटला आले होते तेव्हा अंजूला हाय केल्यावर सहज ‘निलय कुठं आहे?’ असं विचारलं तर ती अशी का रिऍक्ट झाली... आज मला वाटलं तीही असेलच ना गाडीत तुझ्यासोबत... मग उगीच नकोच तुझ्याशी बोलणं... म्हणून तुझी हाक न ऐकल्यासारखी करून निघून आले.’
‘आर यू मॅड????’ निलयचा वैतागलेला सूर!
‘प्लीज... माझ्यामुळं तुमच्यात काही होता कामा नये... ती बायको आहे तुझी... माझं काय...’
‘होल्ड ऑन’ असं म्हणत बिल्वाला मधेच थांबवून निलय पुढं म्हणाला, ‘कोण बायको आणि कोण मैत्रीण आहे आणि त्यातलं कोण महत्वाचं वगैरे विषयावर बोलयाचंय का आता आपण?... ते सुपीक मन आणि मेंदू लेखनापुरतंच वापर तू... नको तिथं कामाला लावू नको त्याला.’
‘नको तिथं काय... गंमत नाहीये ही निलय... उगीच काही समज-गैरसमज व्हायला नकोत... ती बायको आहे तुझी’ बिल्वाचा ठाम सूर!
‘येस... यू आर राईट... ती बायको आहे माझी... त्यातही लव्ह मॅरेज आहे आमचं... म्हणून खूप चांगलं ओळखतो मी तिला...’ निलयचा तितकाच ठाम सूर!
‘म्हणजे?’
‘म्हंजे म्हंजे, वाघाचे पंजे... त्यादिवशी भांडण झालं होतं आमचं... त्यामुळं वैतागली होती ती माझ्यावर... म्हणून तिनं तुझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर न देता ‘मला नाही माहीत निलय कुठाय ते’ असं उत्तर दिलं आणि ती कशी रागात व्यक्त झाली हे तिनं मला नंतर इतर चार गोष्टींसोबत सहजपणे सांगितलंही! तिच्या मनात तसलं काहीही नाहीये.’
‘ओह....’
‘बिनडोक आहेस तू खरंच... आणि बाय द वे, आपली ओळखही तिनंच करून दिली आहे... तेही आपल्या दोघांच्या मराठीवरच्या प्रेमापोटी... तू लिहितेस ह्याचं केवढं कौतुक आहे तिला... हे सगळं माहितीये ना तुला?’ निलयनं विचारलं.
‘आय नो... शी इज व्हेरी स्वीट... तिचं शिक्षण इंग्लिश मेडियममधे झाल्यानं माझ्या लेखनाचा तेवढा आनंद नाही घेता येत, ह्याचं खूप वाईत वाटतं तिला... बोलून दाखवते बऱ्याच वेळा ती तसं!’
‘मग तिच्याविषयीचं हे स्वीट मत रोजच टिकत नाही का तुझ्या मनात?... रोज वेगवेगळी मतं निर्माण होतात का?’
‘प्लीज... ती चांगलीच आहे... पण तुझ्याविषयी जास्त पझेसिव्ह असेल तर त्यात काही चूकही नाहीच ना...’
‘हा हा हा... आता शेवटचं सांगतो, शी इज माय डार्लिंग... आम्ही दोघं एकमेकांना पोस्टग्रॅज्युएशन करत असल्यापासून ओळखतो... म्हणजे गेल्या सहा वर्षांपासूनची घट्ट मैत्री आहे आमची, नातं नंतर जोडलं गेलं... तिचं प्रचंड प्रेम आहे माझ्यावर... म्हणून मी कधीतरी बिनडोकपणे वागून भांडलो वगैरे तिच्याशी कि ती प्रचंड डिस्टर्ब्ड असते... तर, परवाची तिची रिऍक्शन ही आमच्या भांडणाचा परिणाम होता... क्लिअर नाऊ?’
‘येस क्लिअर...’
‘मग... आज कशाची पार्टी मिळणार... भेळ, रगडा पॅटिस, कणीस, आईसक्रीम... काय मिळणार आहे?’
‘कसली पार्टी?’
‘अर्ध्या तासापूर्वी ऑफिसमधली तुझी जिवलग मैत्रीण वैशूनं व्हॉट्सऍपच्या ऑफिसग्रुपवर मेसेज केला कि तुझ्या कथेला पहिलं बक्षिस मिळालं आहे. त्यावर मी अभिनंदनही केलं तुझं आणि पार्टीही मागितली तर तिथं तुझा रिप्लायच नाहीये अजून काही... मुद्दाम पार्किंगमधे तुझी वाट पाहात थांबलो होतो तुझं अभिनंदन करायला... पण मी हाक मारल्यावर आपण मला सरळ टाळून स्वत:ची स्कूटी दामटलीत’ निलयनं नाटकीपणे म्हटलं.
‘खरं सांगू निलय... बक्षिस मिळाल्याचा फोन आला तेव्हां पळत थेट तुमच्या डिपार्टमेंटला येऊन ही बातमी द्यावीशी वाटली होती, पण आवरलं स्वत:ला... परवाच्या इन्सिडन्समुळं’
निलय तिला मधेच थांबवत म्हणाला, ‘फरगेट दॅट थिंग बिल्वा, प्लीज!’
निलयचा हा सूर थट्टेखोर नाही हे जाणवल्यानं बिल्वानं एकदम गप्प होत त्याच्याकडं पाहिलं... तर तो पुढं गंभीरपणे म्हणाला, ‘डोन्ट कॉम्प्लिकेट द थिंग्ज... आयुष्य साधंसोपं ठेवलं तर मनसोक्त जगता येतं... एक साधी गोष्ट होती, तुला तुझा हा आनंद माझ्यासोबत वाटून घ्यायचा होता... त्यात इतका विचार करण्यासारखं, मन मारण्यासारखं, त्रास करून घेण्यासारखं काय आहे?’
बिल्वाचे डोळे परत भरून येऊ लागलेले पाहाताच तो मोठ्यांदा हसून ‘नॉट अगेन’ म्हणत पटकन हात पुढं करत, ‘खूप खूप खूप खूप अभिनंदन तुझं... अशीच खूप मोठी हो, खूप खूप यश मिळूदे तुला!’ असं कौतुकानं म्हणाला.
त्यानं अभिनंदनासाठी पुढं केलेल्या हातात आपला हात देत बिल्वा म्हणाली, ‘हेच आणि इतकंच हवं होतं! तू अभिनंदन केल्यावर आता खरं बक्षिस मिळाल्यासारखं वाटतंय!’
‘इतकंच हवं होतं माहितीये मला...’
‘आणि पुरतं रे तेवढं आयुष्याला...’
‘आय नो...’
‘खरं सांगू का?... आपल्याच विषयातली आवड असणारं कुणी भेटलं कि त्याच्याशी मग त्या विषयातलं मनसोक्त बोलता येतं... कारण तिथं जाणिवाही सारख्या असतात... माझ्यासाठी तसा तू आहेस... म्हणून तुझ्याकडून आलेलं कौतुक एकदम स्पेशल असतं माझ्यासाठी कारण वाचक म्हणून तुझ्या जाणिवा खूप प्रगल्भ आहेत हे माहितीये मला... म्हणून सगळं काही तुझ्याशी शेअर करायचं असतं... इतकंच’
‘तुझं सगळं `इतकंच’ माहितीये मला... ऍन्ड आय ट्रस्ट यू...’
‘इतकंच?’
‘नाही... इतकंच नाही... मला तुझं खूप खूप कौतुक आहे... खूप जास्त... मला वाचायला खूप आवडतं, पण लिहीता येत नाही... आणि तू ते किती सहजी करतेस म्हणून कौतुक वाटतं तुझं... खूप खूप खूप’
‘दॅट्स लाईक निलय... आता केवढा आनंद झालाय सांगू?’
‘तो आनंदच जपून ठेव मनात कायम... इतकंच!’ निलय तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाला.
© आसावरी केळकर–वाईकर, चेन्नई