मागच्या भागात आपण कलियुगाच्या कथेला सुरूवात केली आहे. आजच्या भागात आपण या कथेचा पुढचा भाग पाहणार आहोत. द्वेष ही मनुष्यभावना द्वापारयुगाच्या अंतिम टप्प्यात मोठ्या प्रमाणात वाढीला लागली होती आणि अशातच कलियुगाचं आगमन झालं. कलियुग नावाच्या कालपुरुषाला परीक्षित राजाने स्वतःच्या पुण्यकर्माच्या जोरावर थोपवला खरा, पण काहीच काळापुरता. परीक्षित राजाच्या मृत्यूनंतर कलियुगाला थोपवून धरू शकेल असा कुठलाही महापुरुष या पृथ्वीवर जिवंत राहिला नव्हता. त्यामुळे कलियुगाने त्याचं साम्राज्य पृथ्वीवर प्रस्थापित करायला सुरूवात केली. कथाकाराने या सगळ्या घटना अतिशय रंजकपणे कथेतून आपल्यासमोर मांडल्या आहेत.
पाहूया कलियुगाच्या कथेचा पुढचा भाग...
---
पूर्वसुत्रः परीक्षित राजा भ्रमंती करण्यासाठी बाहेर पडला असताना त्याने एका बैलाचं गायीशी सुरू असलेलं संभाषण ऐकलं. इतक्यात 'कलियुग' नावाचा कालपुरुष तिथे आला आणि त्याने गायीला लाथ मारली, बैलाला त्रास दिला. हे पाहून परीक्षिताने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. कलियुग घाबरला आणि त्याने परीक्षित राजाकडे दया याचना केली. परीक्षिताने त्याला जुगार, मद्यपान, वैश्यालय आणि खाटिकखाना या चार ठिकाणी बंदिस्त राहण्याची परवानगी दिली, आणि नंतर कलियुगाच्या विनंतीवरून त्याला अन्याय्य पध्दतीने मिळवलेल्या संपत्तीतही वास करण्याची परवानगी दिली. नंतर परीक्षित राजाने अविचाराने जरासंधाचा मुकुट परिधान केला आणि शिकारीला गेला असताना शमीक ऋषींचा अपमान केला. हे पाहून शमीक ऋषींच्या मुलाने, श्रुंगीने अविचाराने परीक्षित राजाला शाप दिला की आजपासून सातव्या दिवशी तक्षक सर्पाच्या वेदनादायक दंशाने त्याचा मृत्यू होईल.
आता इथून पुढे ...
---
भाग २ - परीक्षित राजाचा मृत्यू आणि जनमेजयचा सर्पयश यज्ञ
वनात भटकल्याने दमलेल्या परीक्षित राजाने विश्रांती घेण्यासाठी त्याच्या मस्तकावरचा मुकुट खाली उतरवला, आणि त्याबरोबरच त्याच्या डोक्यावर आरूढ झालेला कलियुगही बाजूला झाला. परीक्षित राजाला आपल्या हातून चूक झाल्याची जाणिव झाली. इतक्यात राजाचा सेवक तिथे आला आणि त्याने शमिक ऋषींनी सेवकाच्या हाती पाठवलेला संदेश परीक्षित राजाला ऐकवला. तो संदेश ऐकून परीक्षिताला पश्चाताप झाला. हे सारं कलियुगानेच घडवून आणलं आहे हे त्याच्या लक्षात आलं. पण एव्हाना खूप उशीर झाला होता. आता परीक्षिताचा मृत्यू अटळ होता.
राजदरबारातल्या मंत्र्यांना ही गोष्टं कळताच तेदेखील भयभीत झाले. ऋषींचा शाप तर खरा होणारच; मग परीक्षित राजानंतर राज्याचं काय होणार? तक्षक सर्पालाच विनंती केली तर? त्यांनी आपला हा प्रस्ताव परीक्षित राजासमोर ठेवला आणि त्यानुसार तक्षक सर्पाला विनंती करण्याची परवानगी मागितली. पण अतिशय सात्विक स्वभावाच्या परीक्षित राजाने मंत्र्यांना सांगितलं, "हे जे काही घडत आहे हे असंच घडणं अपेक्षित आहे. काळाने एक अमोघ अस्त्र चालवलं आहे आणि एकदा धनुष्यातून सुटलेला बाण परत माघारी येत नाही. त्याप्रमाणे, माझ्या प्रारब्धातील या घटनाक्रमातच माझं कल्याण आहे असं मी मानतो. अन्यथा भगवंताने मला असं प्रारब्ध दिलंच नसतं. कदाचित मीदेखील ऐहिकांच्या सुखाला नाकारू शकलो नाही, याचीच ही शिक्षा आहे. जे घडतंय ते घडू द्या. मला याची खंत नाही; तुम्हीही वाईट वाटून घेऊ नका."
परीक्षिताने त्याच्या मुलाचा, जनमेजयचा राज्याभिषेक केला. जनमेजयला सिंहासनावर बसवून त्याने कलियुगाबद्दल त्याला उपदेश दिला आणि पूर्ण वैराग्य पत्करून राजमहालातून बाहेर पडला. त्याने संपूर्ण सात दिवस पाणीही न पिता उपास करयाचं ठरवलं आणि तो गंगेच्या तटावर आला. तिथलं दृष्य पाहून तो चकित झाला! अत्रि, पिप्पलाद, च्यवन, गौतम, भारद्वाज, पराशर आणि असे अनेक उत्तमोत्तम ऋषीमंडळी तिथे एकत्र जमली होती. परीक्षित तिथे गेला आणि सर्वांना नमन करून म्हणाला, "आपण सगळे महानुभाव इथे एकाच वेळी एकत्र? काय प्रयोजन?"
इतक्यात तिथे महर्षी व्यासांचे पुत्र शुकदेव आले. ते येताच उपस्थित सर्वांनी त्यांचं आदरपूर्वक दर्शन घेतलं. शुकदेव मंदस्मित करत म्हणाले, "कलियुगाचा महिमा तुम्हा सर्वांना इथे एकत्र घेऊन आलेला दिसतोय! हे राजा परीक्षित, तुझ्या आयुष्याचीही सांगता होण्याची वेळ आली आहे. पण अशावेळीही तुझं मन अशांत का?"
परीक्षित म्हणाला, "हे ऋषीवर्य, मला माझ्या मृत्यूचं दुःख नाही. मात्र या सर्व महान ऋषींना इथे पाहून मला माझ्या प्रजेची काळजी वाटतीये. असे सर्व महात्मा जर एकाच वेळी पृथ्वीवरून नष्ट झाले तर पृथ्वीवरची ही माझी बिचारी प्रजा आदर्श म्हणून कुणाकडे पाहणार? आपल्या आयुष्यातल्या चूक बरोबरच्या द्वंद्वांमध्ये त्यांना आधार कुणाचा? कोण त्यांना त्यांच्या नश्वरतेच्या परीघामध्ये जगण्याची सकारात्मक ऊर्जा देणार?"
शुकदेव म्हणाले, "हे राजा, मला तुझ्या मनाची व्यथा कळत आहे; पण प्रत्येक काळ आपला स्वतःचा महिमा स्वतः निर्माण करतो. कुणीही कुणाचाही पालक असत नाही; कधीच नव्हता आणि इथून पुढेही असणार नाही. तुझी प्रजा आजही त्यांच्याच कर्माने जगत होती, तशी इथून पुढेही जगत राहिल. हे सर्व नश्वर जीव काळाच्या प्रवाहात पडलेल्या झाडाच्या पानांप्रमाणे आहेत. हा प्रवाह त्यांना त्यांच्याबरोबर वहात नेईल. प्रत्येक पानाचं आपलं स्वतःचं प्रारब्ध आहे आणि त्याप्रमाणे काही पानं दूरवर जातील तर काही लवकर बुडतील, काही दगडांना चिकटून बसतील तर काही त्यातूनही अडखळत मार्ग काढत पुढे जातील. तू किंवा मी काळजी करून यात कुठलाही बदल होणार नाही."
परीक्षित राजा म्हणाला, "हे ऋषीवर, मला तुम्ही जे म्हणताय ते कळतंय; पण जोवर मी जिवंत आहे तोवर मी त्यांचा पालनकर्ता आहेच ना? मी कुणाचा तरी पालक असताना मृत्यूची घटिका समोर येता मी कसं वागलं पाहिजे; काय विचार केला पाहिजे? कृपया मला मार्गदर्शन करा."
यावर शुकदेवांनी अतिशय सरल उपदेश केला; म्हणाले, "मी कुणाचा तरी पालक आहे ही भावना तुझा मानसिक बंध आहे. इथे 'मी' या आत्मघोषाला अर्थहिन करण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये ईश्वरभक्तीचं स्थान अधिक भक्कम कर. तोच एक आहे जो सर्वांचा पालक आहे. इतकी युगं तोच होता, आजही आहे आणि इथून पुढेही असेल. मग भय कसलं? तुझे पाल्य आणि त्यांचा तो एकमेवाद्वितीय पालक यांच्यातला तू एक निव्वळ दुवा म्हणून आपलं कर्तव्य करत होतास. तुझा कार्यकाल त्याने ठरवून दिला होता. तो किती ते त्याला माहित आहे. तू तुझं कर्म करत राहणं अपेक्षित होतं, ते तू केलं. आता या अखेरच्या टप्प्यात तू ईश्वरनामात विलिन होऊन जा. या जगाचं नियमन त्या नियंत्याच्या हातात आहे; तू किंवा मी ... आपण यात कुठलाही बदल करण्याच्या परिस्थितीत कधीच नव्हतो."
परीक्षिताला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. त्याच्या मनावरचं ओझं हलकं झालं होतं. तिथेच गंगेच्या तटावर त्याने डोळे मिटून योगसाधना सुरू केली आणि ईश्वर नामस्मरणात तो समाधी अवस्थेला पोहोचला.
तक्षक साप हा तक्षशिला प्रांतात वास्तव्य करत असे. सात दिवस पूर्ण होताच हा तक्षक साप तिथे अवतरला. डोळे मिटून साधनेत तल्लिन झालेल्या परीक्षित राजाला त्याने पाहिलं. कुठलाही आवाज न करता तक्षक त्याच्या जवळ पोहोचला; त्याच्या अंगावर चढला आणि ज्याप्रमाणे त्याने एक मेलेला साप शमिक ऋषींच्या गळ्यात टाकला होता त्याच पध्दतीने त्याने परीक्षिताच्या गळ्याला विळखा घातला. परीक्षित तेव्हा पूर्ण समाधी अवस्थेला पोहोचला होता. कदाचित त्याला तक्षक सापाचा स्पर्शही जाणवत नसावा. तक्षक सापाने त्याच्या गळ्याला दंश करताच परीक्षित राजाची श्वासांची लय हळू हळू मंदावत गेली; आणि अखेर द्वापारयुगातला अखेरचा योगी वैकुंठाला भगवंताच्या पायी विलिन झाला.
आता कलियुगाला कुणाचाही अडथळा उरला नव्हता. शिवाय परीक्षित राजाने घालून दिलेली बंधनंही त्याच्या मृत्यूबरोबरच संपली होती. त्यामुळे परीक्षित राजाचा मृत्यू होताच कलियुगाने पृथ्वीवर आपली अधिसत्ता स्थापन करायला सुरूवात केली. जनमेजयला कलियुगाचा प्रजेवरचा वाढता प्रभाव दिसत होता; पण त्याहीपेक्षा त्याच्या मनात समस्त सर्प जातीबद्दलचा द्वेष मनात धगधगत होता. खरं तर अतिशय अचुक न्यायदान करणाऱ्या जनमेजयने आपल्या मनातला राग केवळ तक्षक सापावर काढला असता तर गोष्टं वेगळी; पण कदाचित हादेखील कलियुगाचाच परिणाम की त्याने संपूर्ण सर्प जातीलाच पृथ्वीवरून नष्ट करायचा चंग बांधला आणि सर्पयश यज्ञ आरंभला!
हे समजताच सर्व सर्प घाबरले आणि आपला जीव वाचवण्यासाठी दगडाखाली, जमिनीत बिळ करून लपण्याची जागा शोधू लागले. या यज्ञाची दहशत अशी होती की सापांनी दिवसा उजेडी बाहेर पडणंच बंद केलं आणि ते केवळ रात्रीच्या अंधारात बाहेर पडू लागले. एरवी उघड्यावर ऐटित राहणारे साप आता जमिनीत बिळ करून राहू लागले. पण, जनमेजयच्या यज्ञाची क्षमता अपार होती. हा यज्ञ सापांना यज्ञकुंडात खेचून आणत असे आणि यज्ञात हे साप भस्म होत असत. तक्षक सापही घाबरला आणि त्याने इंद्राकडे आश्रय मागितला. इंद्राने त्याला आपल्या हाताने धरून ठेवला; पण, यज्ञाची तीव्रता इतकी भयावह होती की तक्षक सापासह इंद्रही त्या यज्ञामध्ये ओढला जाऊ लागला. अखेर आपले प्राण वाचवण्यासाठी इंद्राने तक्षक सापाला सोडून दिला आणि तक्षक अत्यंत तीव्र गतीने यज्ञाकडे ओढला जाऊ लागला. तरीही कसं बसं त्याने स्वतःला सावरलं आणि त्याने सूर्याच्या रथाच्या चाकाला विळखा घातला. आता मात्र जनमेजयचा यज्ञ थांबवणं आवश्यक होतं, अन्यथा तक्षक सापाबरोबर सूर्यही यज्ञात ओढला गेला असता आणि प्रचंड प्रलयकारी उष्णता निर्माण झाली असती.
देवांनी जनमेजयला विनंती केली हा यज्ञ थांबवावा; पण जनमेजय आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे व्यथित होता; त्याने देवांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं आणि यज्ञ सुरूच ठेवला. अखेर आस्तिक ऋषींनी हस्तक्षेप केला आणि आपल्या योगसाधनेने त्यांनी जनमेजयच्या मनातला राग शांत केला; आणि त्याबरोबरच जनमेजयने त्याचा हा प्रलयकारी यज्ञही थांबवला. पण, त्याने भगवान विष्णूला आवाहन केलं आणि तक्षकसारख्या सर्पांची रवानगी पाताळात करावी असं भगवान विष्णूला साकडं घातलं. त्यानुसार तक्षक सर्पाला कायमस्वरूपी पाताळात धाडण्यात आला. याबरोबरच पृथ्वीवरच्या बहुतांशी सर्पांचं विष काढून घेण्यात आलं आणि त्या सर्पांच्या प्रजाती बिनविषारी बनल्या. काही सर्पांच्या विषाची तीव्रता कमी करण्यात आली; पण काही सर्प मात्र त्यांच्या भगवान विष्णू आणि शिवशंभोप्रती असलेल्या भक्तीमुळे विषारीच राहिले. पृथ्वीवर शेष नागाचा अंश बनून हे सर्प भगवान विष्णू आणि शिवशंभोच्या योजना राबवतील असं त्यांचं प्रयोजन आणि प्रारब्ध निश्चित करण्यात आलं.
आणि, ही कलियुगाची केवळ सुरूवात होती!
===
वाचकहो, या कथेच्या आजच्या या दुसऱ्या भागात विचार करण्यासारखा संवाद आहे तो शुकदेव आणि राजा परीक्षित यांच्यातला. अनेकदा आपण बोलता बोलता सहज म्हणतो की 'माझ्या पश्चात मी माझ्या मुलांसाठी, कुटुंबासाठी खूप काही मागे ठेवून जाणार आहे' किंवा 'मीच माझ्या मुलांचं भवितव्य घडवणार'. याच मानसिकतेतून अनेकजण कधीही बाहेरच पडू शकत नाहीत आणि आयुष्यभर प्रपंचाचा गाडा ओढत झिजत राहतात. खरं तर शुकदेवांसमोर बसलेला राजा परीक्षित रिटायर झालेला होता; पण, त्याने केवळ राजपदामधून रिटायरमेण्ट घेतली होती. राजाच्या वैचारिक भूमिकेतून रिटायरमेण्ट तो अद्यापही घेऊ शकला नव्हता. नेमकं हेच हेरून शुकदेवांनी परीक्षिताला उपदेश केला की या प्रपंचाची काळजी वाहणारा 'तो' एक आहे. तू फक्त एक माध्यम होतास. यातून स्वतःला विलग कर आणि ईश्वरनामामध्ये स्वतःला समर्पित कर. आपणही आपल्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये रिटायरमेण्ट घेतो तशीच आयुष्याच्या एका क्षणी प्रापंचिक जबाबदारीमधूनही रिटायरमेण्ट घ्यायला हवी अशी शुकदेवांची शिकवण कथाकाराने आपल्याला दिली आहे. यावर आपण सर्वांनी जरूर विचार करावा.
या कथेत एका सापाचा उल्लेख आला आहे... तक्षक सर्प. खरंच असा कुठला साप अस्तित्वात होता का? की अजूनही हा तक्षक साप अस्तित्वात आहे? भारतीय पौराणिक कथांचं हेच फार मोठं वैशिष्ट्य आहे. यातले दाखले वैज्ञानिक पातळीवर इतके खरे असतात की या सगळ्या कथा म्हणजे कथाकाराचा निव्वळ कल्पनाविलास म्हणून दुर्लक्षित करणं फार चुकीचं ठरेल. तक्षक सापाचा उल्लेखही काल्पनिक नाही. तक्षक साप पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या अत्यंत जुन्या आणि दुर्मिळ विषारी सापांपैकी एक आहे आणि आजही बस्तर जिल्ह्यातील 'बैलाडीला' आणि 'कांगोर' या भागात हा साप दिसून येतो. किरंदुलच्या प्रशासकीय महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुक एच के एस गजेंद्र यांनी डिसेंबरमध्ये हा साप स्वतः पकडून त्याचं लॅबोरेटरीमध्ये अध्ययन केलं. त्यांनी या सापाची दिलेली वैज्ञानिक तथ्य आणि आपल्या पुराणांमध्ये आढळणारी या सापाची तथ्य तंतोतंत जुळतात ही गोष्टं इथे विशेषत्वाने लक्षात घेण्यासारखी आहे.
प्रो. गजेंद्र यांच्या नोंदींनुसार या तक्षक सापाचं आधुनिक वैज्ञानिक नाव 'प्राईटो पैलिया आर्नेटा' असं आहे आणि हा साप मध्यम विषारी साप म्हणून गणला जातो. पाणथळ जागी, दगडांमध्ये आढळणारा हा साप झाडावरही उत्तम चढू शकतो; इतकंच नाही तर आपलं शरीर आक्रसून घेत त्याला जोराचा झटका देऊन तो एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर लांबवर उडी मारू शकतो. म्हणूनच याला स्थानिक लोक 'उडणारा साप' असंही म्हणतात.
याच्या अंगावर लाल - पिवळे - काळे असे रंगीत पट्टे असतात. प्रोफेसर गजेंद्र यांच्या म्हणण्यानुसार तर हा सर्व विषारी सापांमध्ये सर्वात सुंदर साप आहे! यामागेही एक लोककथा आहे. या कथेनुसार, परीक्षिताला दंश केल्यानंतर तक्षक साप परीक्षिताच्या पत्नीकडे माफी मागण्यासाठी गेला. कदाचित त्याला जनमेजयाच्या रागाची भीती होती. तक्षक तिच्यासमोर गेला आणि त्याने क्षमा याचना केली; परीक्षिताची पत्नी त्याला म्हणाली, "त्या ऋषीकुमाराचा शाप होता. पण, त्यात सहभागी न होण्याचा मार्ग तू निवडू शकत होतास. तू तसं केलं नाहीस. तू तुझी विवेकबुध्दी वापरली नाहीस. माझ्या पतीने तुझं काहीही वाईट केलं नव्हतं. उलट नागवंशाचं त्यांनी कायम रक्षणच केलं होतं. तरीही तू त्यांना दंश केलास. या विधवेला हळद - कुंकवाचं आता काय मोल? मी तुला शाप देते... हे हळद कुंकू तुझ्या अंगावर उमटेल जेणेकरून तू स्वतःचं रक्षण करण्यासाठी कुठेही लपलास तरी लगेच उठून दिसशील. तू लपून स्वतःचं रक्षण कधीही करू शकणार नाहीस." आणि असं म्हणून तिने त्याच्या अंगावर हळद कुंकू टाकलं ... तेव्हापासून भुरकट काळ्या रंगाचा तक्षक साप रंगीत बनला!
तक्षक साप होता हे ठीक; पण परीक्षित राजाचा मृत्यू खरोखर तक्षक सापाच्या दंशाने झाला का? याबाबत काही पूरातत्व संशोधनांवर आधारित आणखी एक मतप्रवाह आहे. तक्षक हा साप नव्हता तर त्या काळी तक्षशिला भागात 'तक्षक' नावाची एक आदिवासी लुटारूंची जमात रहात होती. त्यांच्या जमातीचं चिन्ह 'वेटोळा घातलेला, फणा काढलेला साप' हे होतं. या मतप्रवाहानुसार या आदिवासी जमातीने परीक्षित नावाच्या राजाला जंगलात एकट्यात गाठला आणि विषारी बाणांनी त्याला जखमी केलं. परीक्षिताने तिथून आपला प्राण वाचवला; पण बाणांच्या टोकाला लावलेल्या विषाने घात केला आणि यात परीक्षित राजाचा मृत्यू झाला. त्यानंतर जनमेजयने तक्षशिला प्रांतातल्या या तक्षक जमातीवर हल्ला चढवला आणि घनघोर युध्दात त्यांचा वंशच नष्ट केला. या मतप्रवाहानुसार 'तक्षक' आदिवासी जमातीचं चिन्ह साप असल्याने कथाकारांनी याचा वापर करून सर्पदंशाची आणि त्यानंतर जनमेजयच्या सर्पयश यज्ञाची कथा रचली असावी असं मानण्यात येतं.
सर्पदंशाची कथा खरी की तक्षक आदिवासी जमातीची कथा खरी हे आज इतक्या वर्षांनी सांगता येणं अवघड आहे. पण, विविधं भारतीय पुराणांमध्ये असलेला सर्पांचा अतिशय खुलासेवार उल्लेख ही खरोखर अभ्यास करण्यासारखी गोष्टं आहे. प्राचीन भारतीय ऋषींना आणि अभ्यासकांना सर्प या प्राण्याबद्दल विशेष जिज्ञासा होती हे नक्की. केवळ तक्षकबद्दल बोलायचं तर या सर्पाचे भागवत पुराण (५.२४.२९), ब्रह्म पुराण (२.१७.३४, २०.२४), मत्स्य पुराण (६.३९, ८.७), वायु पुराण (३९.५४, ५०.२३, ५४.११, ६९) अशा विविधं पुराणांमध्ये अतिशय सखोल तपशीलासह उल्लेख आलेले आहेत. यात म्हंटलं आहे की तक्षक हा पाताळात राहणाऱ्या आठ नागांपैकी एक असून तो 'कोशवश' वर्गातला 'काद्रवेय' प्रकारचा साप आहे. याशिवाय भारतीय पुराणांमध्ये सुमारे ८० हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या सापांचे उल्लेख आहेत.
इथे 'पाताळात राहणाऱ्या आठ नागांपैकी' हा उल्लेखही विशेष आहे. आज बॉटनी किंवा झूलॉजी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राणी किंवा वनस्पतींचं वर्गीकरण हा प्रकार नक्कीच माहित असेल. भारतीय पौराणिक कालखंडात सर्पांचंही असंच गुणधर्मांनुसार वर्गीकरण केलेलं आहे. काही पुराणांनुसार विषारी सर्पांचे (ज्यांना ढोबळमानाने 'नाग' किंवा 'नागवंश' असं म्हंटलेलं आहे) एकूण पाच 'वर्ग' आहेतः अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पिंगला. मात्र त्यानंतर कदाचित यावर आणखी संशोधन होऊन नंतरच्या कालखंडात झालेल्या लिखाणात सर्प हे अष्टकुल आहेत असा उल्ल्लेख आढळतो. हे आठ कुळ, म्हणजेच वर्ग असेः वासुकी, तक्षक, कुलक, कर्कोटक, पद्म, शंख, चूड़, महापद्म, धनंजय. भारतीय पौराणिक साहित्यातले सर्प या विषयावर ग्रंथश्रुतिमध्ये पुढे एक वेगळा लेख लिहून तुमच्यासमोर नक्की प्रस्तुत करेन.
भारतीय ज्योतिषमध्येही तुम्ही 'कालसर्प दोष' किंवा 'तक्षक कालसर्प दोष' ही संज्ञा ऐकली असेल. अगदी ढोबळमानाने सांगायचं तर कुंडलीमध्ये पहिल्या घरात केतू आणि सातव्या घरात राहू, त्याचबरोबर सातव्या आणि पहिल्या स्थानामध्ये इतर सर्व ग्रह असतील तर अशा कुंडलीत 'तक्षक कालसर्प दोष' किंवा 'कालसर्प दोष' आहे असं म्हणतात. अर्थात कालसर्पदोषाचे परिणाम आणि त्याची तीव्रता इतरही अनेक घटकांवर अवलंबून असते. भारतीय ज्योतिषशास्त्रातला हा उल्लेख नमुद करून इथे मला जी गोष्टं तुम्हा सर्वांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे ती म्हणजे भारतीय शास्त्रांमध्ये असलेलं 'सर्प' या सरपटणाऱ्या प्राण्याचं अनन्यसाधारण स्थान. किती विविधं पध्दतीने हा सर्प आपल्या शास्त्रांमध्ये विराजमान आहे!
आजच्या भागाची आणि कलियुगाच्या या कथेची सांगता करण्यापूर्वी एक गोष्टं अगदी आवर्जून सांगेन की प्राणीशास्त्राचा आणि विशेषतः सर्प, सापाचं विष, त्याचे औषधी गुणधर्म यांचा अभ्यास करणाऱ्यांनी भारतीय पौराणिक साहित्याचा डोळसपणे अभ्यास करावा आणि आधुनिक विज्ञानाशी त्याची सांगड घालून भारतीय पौराणिक कथांमध्ये दडलेलं विज्ञान जगासमोर आणावं.
या भागात इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह ग्रंथश्रुतिच्या पुढच्या भागात...
ऋतुराज पतकी