**मोती**
डॉ. शिवराज ‘सायंटिस्ट ऑफ द डीकेड’ हा पुरस्कार खिशात घालून आपल्याकडं सन्मानपूर्वक पाहाणाऱ्या नजरा झेलत स्टेजवरून उतरून खाली येऊन बसल्याक्षणापासून मनात भरून राहिलेलं हळवेपण आज आपल्या गावच्या बीचवरून समोर पसरलेला अथांग समुद्र पाहाताना डोळ्यांतल्या लाटांतून बाहेर पडत होतं. ह्याच बीचवर अनुभवलेल्या त्या क्षणाच्या आठवणीनं शिवाच्या ओठांवर तेव्हांसारखंच हसूही उमललं होतं, हातात मोठी कॅडबरीही होती.... कमी होती ती फक्त खांद्यावरचा हात आणि ‘बा’च्या डोळ्यांतल्या त्या चमकत्या मोत्याची!
लहानग्या शिवाचं विश्व म्हणजे त्याचा बा, ‘बा’नं लावलेली शिस्त सांभाळणं, ‘बा’नं घेऊन दिलेली पुस्तकं, शाळा, अभ्यास, शाळा नसेल तेव्हां बा मजुरीवर काम करायचा त्या शेतात एखाद्या झाडाखाली बसून अभ्यास करणं, रोज संध्याकाळी ह्या बीचवर ‘बा’सोबत थोडासा वेळ घालवणं आणि मग घरी जाऊन ‘बा’नं रांधलेलं जेवून झोपणं. त्याचा ‘बा’सुद्धा ‘बा’च आणि मैतर पण ‘बा’च! खेळायच्या वेळेला ‘बा’ त्याच्यासोबत खूप दंगा-मस्ती करायचा, त्याच्याशी कितीकिती कायकाय गप्पा मारायचा, त्यात त्याची न पूर्ण झालेली आभाळाएवढी स्वप्नं असायची जी आता ‘माजा शिवा पूर्न करंल’ असं म्हणून तो सांगायचा, कधी शिवाच्या लवकर देवबाप्पाकडं गेलेल्या आईच्या आठवणी असायच्या, मग अभाळातून ती कशी आपल्याला बघत असणार आणि शिवाला शाळेत मोठं बक्षिस मिळालं कि तिला कसा आभाळाएवढा आनंद होत असणार ह्याचं वर्णन असायचं.
‘बा’ला स्वत:ला शाळा कशी नाईलाजानं अर्ध्यातच सोडावी लागली त्याची खंतावली कहाणीही तो सांगायचा आणि ती सांगून होताक्षणी ‘शिवा, तू आता शिकून लै मोट्टा सायब हून समद्या लहानग्यांना शिकता यावं म्हणून कायतर करायला पायजेस’ असा त्याचा उत्साही सूर असायचा.
लहानपणी शिवा ज्या-ज्या वेळी बा राबायचा त्या शेतावर जायचा तेव्हां ‘बा’भोवतीच घुटमळत असायचा. त्यावेळी बा त्याच्याशी खूप काही बोलत राहायचा. म्हणायचा, ‘शिवा, आपन चांगलं बी पेरलं, मग त्याची चांगली निगरानी केली, वेळेवारी लक्ष ठ्यून कीड झटकली की पीक जोमानं आल्याशिवाय ऱ्हात न्हाई बग!’ कधी म्हणायचा, ‘लेकरा, ह्ये बी इसरायचं न्हाई की, आपन एक दाना दिला तर काळी आई आपल्याला अक्कंच्या अक्कं कनीस द्येती. तसं आपनबी चांगलं बी पेरायचं आनि भरभरून द्यायलाबी चुकायचं न्हाई!’ ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ शिवाला हळूहळू समजायला लागला. ‘बा’च्या मन लावून प्रामाणिकपणानं काम करण्यामुळं त्याचा मालक शिवाच्या शिक्षणासाठी कधी लागलं तर ‘बा’ला कर्ज द्यायचा. ‘बा’ जास्तीच्या मजुरीनं ते फेडायचाच. तेव्हां म्हणायचा, ‘बग, आपण चांगलं काम केलं तर द्येव बुद्दी घालतोय कुनालातरी, आपल्या येळंला मदतीला हुबं ऱ्हायची’ आणि भरभरून देण्याची मोठी गोष्ट ‘बा’ करायचा म्हणजे कधीच आपली वह्या-पुस्तकं रद्दीला घालायचा नाही. चांगलं शिकायची इच्छा असणाऱ्या मजुरांच्या मुलांना ती तशीच द्यायचा. ‘आपल्याकडनं ज्यवडं जमतंय त्यवडं तरी करायला चुकायचं न्हाई’ असं म्हणायचा.
डॉ. शिवराजना आज हे सगळे क्षण डोळ्यांसमोर तरळताना वाटलं, ‘आपल्या ‘बा’ला संधी मिळाली असती तर त्यानं केवढं मोठं कर्तृत्व गाजवलं असतं देवजाणे! एका शेतात मजुरीवर राबणारा मजूर असला तरी आभाळाएवढी स्वप्नं पाहायची ताकद आणि त्यासाठी जिवाचं रान करण्याची जिद्द होती त्याच्यात! शिवाय माणूस म्हणून जगायचंही तो कधी विसरला नाही. ‘जमेल तेवढं तरी करावं’ हा विचारच केवढा उदात्त आहे. ‘बा, खूप मोठ्ठा माणूस होतास तू... खरंच तुला नशीबाची साथ मिळायला हवी होती. तुला मनासारखं शिकायला मिळायला हवं होतं, बा’ असे शब्द नकळत डॉ. शिवराजच्या तोंडून बाहेर पडले तसा त्यांच्या कानांवर ‘बा’चा आवाज पडला, ‘नशीब भारीच हाय की माजं! तुज्यासारखा गुनी ल्योक हाय माजा आनि आता थोड्याच दिसांत सायबबी हुईलच त्यो शिकून.’ आत्ता आपण कुठं आहोत ह्याचं भानच हरपून डॉ. शिवराज शेजारी बघत ‘अरे पण बा’ असं म्हणू लागले आणि एकदम भानावर आले. ते वाक्यं त्यांच्या ‘बा’चंच होतं पण पूर्वी बा जिवंत असताना त्यानं म्हटलेलं होतं. डोळ्यांतून ओघळणारा थेंब टिपताटिपता हातातल्या कॅडबरीचा गालाला स्पर्श झाला तसं डॉ. शिवराजच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि मनानं भूतकाळातल्या त्या क्षणांपाशी त्यांना खेचून नेलं.
दरवर्षी पहिला नंबर मिळवत असताना शिवाला थोडीशी शिंगं फुटू लागली होती. सातवीच्या परीक्षेत पहिला आला तर रिझल्ट धेऊन ‘बा’च्या शेतावर न जाता सरळ घरी येऊन फुरंगटून बसला. ‘बा’ जरावेळानं काळजीनं धापा टाकत घरी पोहोचला आणि आडवं झालेल्या शिवाला म्हणाला, ‘काय झालं रं ल्येकरा? जिवाला बरं न्हाई का तुज्या? वाट बगून चैन पडंना म्हनून साळंत ग्येलो, तितं दिसंनास म्हनून थ्येट घरला आलो. मार्क कमी पडल्यात काय ह्या वक्ताला?’ शिवानं मनात ठरवल्याप्रमाणं तो उठून बसत म्हणाला, ‘मला नसत्यात कमी मार्क पडत. पयलाच आलोय मी शाळेत.’ मग ‘बा’नं शिवाला घट्ट मिठीत घेतलं तर शिवा त्याला दूर करत म्हणाला, ‘पर तुज्याशी बोलनार न्हाई मी, जा तिकडं.’ ‘का रं ल्येकरा? असं का करायलास?’ ‘बा’नं काळजीनं विचारलं तर शिवा म्हणाला, ‘तू लई चिंगुस हैस. सादं येक चाकलेटबी घ्यून देत न्हाईस. ते शाळेतली पोरं चमकीच्या कागदाचं क्याडबरी म्हणून चाकलेट खात्यात, ते पायजेल मला, त्ये पन मोट्टं!’ त्यावेळी बा त्याला जवळ घ्यून म्हणाला, ‘अरं, मी यवडाबी दुस्ट न्हाय पोरा. पोटाला चिमटा घ्यून तुज्यासाटी दुदाचा रतीब लावलाय की रं... ह्या चाकलेटानं काय ताकद यायाची.’ पण शिवा मोठ्यांदा म्हणाला, ‘दुदाच्या रतीबाला चाकलेटची सर न्हाय. त्ये बंद कर हवं तर, पर मला चाकलेटच हवंय.’ मग बा म्हणाला, ‘ऐक, त्यवडं पैकं न्हाईत रं माज्याकडं. दोन येळचं जेवन कसंबसं जमवतुया, तुला म्हाईत हाय न्हवं समदं. आत्ताला तुजं असलं लाड परवडनार न्हाईत मला. रुपया-दोन रुपयाचं काय हवं तर द्येतो, त्यापेक्षा जास्त काई न्हाई मिळनार!’
शिवानं तो दिवस फुरंगटून घालवला. पण ‘बा’नं काही ऐकलं नाही. पुढं मग तो ‘बा’ला गमतीनं म्हणायचा ‘लै चिंगुस बा हाय माजा! दुद प्यायला लावतोय पर चाकलेट न्हाई म्हनजे न्हाई!’... आणि... मग तो दिवस उजाडला. शहरातून कॉलेजला पहिला आल्याचा ‘बा’च्या मालकाकडं एसटीडी बूथवरून फोन करून शिवानं निरोप दिला आणि पुढची ऍडमिशन घेऊन दोन-तीन दिवसांनी गावाकडं येतो असं सांगितलं. शिवाला खरंतर त्याचक्षणी ‘बा’ला भेटायची फार इच्छा होती, पण शहराकडं सारख्या फेऱ्या मारण्याएवढे पैसे हाताशी नव्हते. ‘बा’नंही शिक्षणासाठी खूप कर्ज केलं होतं, त्यामुळं तो ‘बा’कडंही काहीच मागायचा नाही. पार्टटाईम काम करून स्वत:पुरतं मिळवायचा. त्यामुळं एकदाच ऍडमिशनचं काम पूर्ण करूनच गावाकडं जावं असा विचार शिवानं केला. प्रवेशपरीक्षेत तो आधीच पास झाला होता. शिवाची आता फेलोशिपवर ‘सायंटिस्ट’ होण्याकडं वाटचाल सुरू होणार होती. म्हणजे काय हेही त्याच्या ‘बा’ला कळणार नव्हतं. ‘पोरगं सायब हुनार माजं’ इतकंच तो सगळ्यांना भरल्या डोळ्यांनी सांगत होता. त्याच्या डोळ्यांत आनंद मावत नव्हता.
चार दिवसांनी घाटातला रस्ता पार करून पाच-साडेपाचच्या सुमारास बसनं शिवा एकदाचा गावात पोहोचला आणि ‘बा’च्या भेटीसाठी आपल्या घराकडं धावतच निघाला. बा नुकताच शेतातनं येऊन भिंतीशी टेकला होता तेवढ्यात ‘बा... ए बा... आलो रं मी... कुटं हैस तू?’ असा लेकराचा आवाज ऐकला तसा धडपडून उठत तो दाराशी आला आणि आनंदलेल्या चेहऱ्याच्या पोराला बघताना त्यालाच अनावर रडू येऊ लागलं. शिवानं पळत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, ‘ए बा... तुजं लेकरू कालेजात पन पयलं आलंय... समदी तुजी शिकवन बा... हे समदं यश तुजंच बा... फक्त तुजं!... तू पेरलेलं बी जोमानं वाढतंय बग... कारन तूच चांगली निगरानी केलीस न्हवं त्याची... बा तुजं पोरगं सायब हुनार बग आनि थोड्या दिवसांत... आनि तूच शिकवल्याप्रमानं आनि चार जनांच्या शिक्षनाला मदतबी करनार!’ सुसाट वेगानं इतकं बोलून शिवा थांबला तेव्हा कुठं त्याच्या लक्षात आलं कि आपल्या ‘बा’चं अंग थरथरतंय आणि तो हुंदके देतोय. एकदम मऊ आवाजात शिवा म्हणाला, ‘बा, ए बा... काय झालं रं? तब्येत ठीक हाय न्हवं तुजी? आता थोड्याच दिवसांत काम बंद करायचंस बग तू! लै कष्ट पडल्यात तुज्या जिवाला, आता पोरगं सायब झाल्यावर तू पन सायबासारखं नुसतं थाटात राहायचं पोराजवळ.’ त्यावर थरथरत्या आवाजात बा म्हणाला, ‘मला कायबी झालं न्हाई! अजूनबी एकदम घट्ट हाय मी कामाला... पर लेकराच्या यशानं मन मऊ झालं रं आज... डोळं भरून यायल्यात... त्यांना सावरायला जमंना रं...’ आणि तो शिवाला आणखी घट्ट मिठी मारून रडू लागला.
शिवा काहीवेळ वाहात्या डोळ्यांनी नुसता आपल्या ‘बा’च्या पाठीवरून हात फिरवत राहिला. बा जरा सावरला तसं त्याला खाली बसवून म्हणाला, ‘हे बग, काय आनलंय मी तुज्यासाटी. दोन-तीन तास शिकवण्या घ्यायचं काम करतोय, त्यातनं पैकं साटवून आणलं बग तुला,. सदऱ्याला एक कापड आणि एक धोतर पण, आणि बा, आता म्हातारा व्हायलास तू जरासा... जराजरा थंड लागती तुला हल्ली म्हणून जाड चादरबी आनली बग!’ लेकराचं प्रेम बघून ‘बा’ला भावनांचे कढ आवरेनात. कसंबसंच डोळ्यांतलं पाणी थोपवत तो म्हणाला, ‘जीव धन्य जाला बग आज माजा! आनखी काय पायजे मानसाला आयुष्यात! बरं, धुळीनं किती मळका झालास बग. जा, अंग धुवून घे. मग आपन दोगं समुंदरावर जाऊया. लै दिस झाले मलाबी जाऊन. ‘बरं, जाऊया कि! मस्त मजा यील. दोन मिनिटांत आलो बग मी अंगावर पानी घ्यून!’ असं म्हणून शिवा तिथं खोलीतच आडोसा लावलेल्या मोरीत गेला. अंघोळ आवरून बाहेर आला तर बा कुठं दिसेना. बाहेर येऊन हाका मारल्या तरी त्याचा काही पत्ताच नाही. पंधरा-वीस मिनिटं झाल्यावर एकदाचा बा उगवला आणि ‘चल लेकरा, निघूया ना?’ म्हणाला. ‘पर तू कुटं गेलातास?’ ह्या प्रश्नाचं काहीच उत्तर न देता, ‘हितंच गेलोतो कोपऱ्यावर. तू चल तर खरा!’ असं म्हणून शिवाच्या हाताला धरून बीचकडं चालू लागला.
आज डॉ. शिवराज बसले होते तिथंच दोघं येऊन बसले. वाळूत निवांत पाय पसरून बसल्यावर ‘बा’नं एक हात शिवाच्या खांद्यावर टाकला आणि दुसऱ्या हातानं कनवटीला लावलेलं काहीतरी काढत म्हणाला, ‘शिवा, आता येकदाबी म्हनायचं न्हाई कि, बा तू चिंगूस हैस. मी चिंगूस न्हाय बरं का! तू शेवटच्या वर्षाला गेल्यापास्नं हळूहळू ह्ये पैकं जमवून येगळं ठेवलं होतं... आनि... आज तुला चमकीची क्याडबरी दिलीच बग तुज्या ‘बा’नं!’ आणि त्यानं मोठ्या आकाराची कॅडबरी शिवाच्या हातावर ठेवली. त्या चकचकीत कॅडबरीच्या गुळगुळीत कागदाचा स्पर्श त्यादिवशी ‘बा’च्या मायेच्या स्पर्शासारखा मऊशार लागत होता. शिवाचा हात ते मऊसूत तलमपण अनुभवत असताना डोळे ‘बा’च्या डोळ्यांकडं लागले होते. आनंद ओसंडून वाहाणाऱ्या ‘बा’च्या डोळ्यांतून एक टपोरा मोती खाली पडल्याचा अलगद आवाज झाला तशी शिवाची नजर खाली वळली. त्याच्या हातातल्या कॅडबरीच्या त्या चमकत्या कागदावरचा ‘बा’च्या डोळ्यांतला तो टपोरा मोती शिवा कितीतरी वेळ भान हरपून पाहात राहिला. ‘बा’चं अख्खं मन त्यात उतरलं होतं... आयुष्यभर केलेल्या काबाडकष्टांचं सार्थक, लेकराविषयीचा अभिमान, उरात न मावण्याएवढा आनंद सगळंसगळं त्यात उतरून तो मोती आणखीनच देखणा झाला होता.
गेल्या आठवड्यात ‘सायंटिस्ट ऑफ द डीकेड’ हा सन्मान प्राप्त झाल्यावर आज शिवाच्या हायस्कूलनं मुद्दाम त्याला आपल्या गावी आमंत्रित करून त्याचा सत्कार केला होता. ‘बा’च्या शिकवणुकीप्रमाणं त्यानं शाळेतल्या खरोखरीच होतकरू मुलांना मदत करण्यासाठी मोठी रक्कम देणगी म्हणून दिली होती आणि दरवर्षी त्याच्या व्याजातून त्यांची फी भरावी असा प्रस्ताव मांडला होता. त्याप्रमाणं लेखी करारही झाला. शिवाय शहरगावात मुलांना काही मदत लागली तर शाळेनं थेट आपल्याशी संपर्क करावा. आपल्याकडून जे काही शक्य असेल ती मदत आपण जरूर करू असंही सांगितलं. शिवाय ‘बा’च्या नावानं मुलांसाठी वाचनालय चालवण्याकरिता एका समाजसेवी संस्थेला देणगी दिली. दिवसभर सगळं उरकल्यावर परत निघण्यापूर्वी काय मनात आलं म्हणून एका दुकानातून कॅडबरी घेऊन तो बीचवर येऊन बसला होता. त्याचा बा पोराचं सायबपण अभिमानानं बघत, सून-नातवंडांचं सुख अनुभवत दहा वर्षं त्याच्याकडं सुखानं राहिला आणि तीन वर्षांपूर्वी निवर्तला होता. आता कशाचीच काही कमतरता नव्हती आयुष्यात... पण आज हातातली ती कॅडबरी उघडून त्याचा तुकडा जिभेवर ठेवताना डॉ. शिवराजना फार वाटत होतं कि, ‘आपला बा आत्ता सोबत हवा होता आणि आपण त्यादिवशीसारखी एकमेकांना भरवत ही कॅडबरी खायला हवी होती!’
जिभेवरचा कॅडबरीचा तुकडा अलगद विरघळला तसे डॉ. शिवराजचे भरून आलेले डोळेही अलगद क्षणभरासाठी मिटले आणि त्याचक्षणी वाऱ्याचा एक हलकासा झोत त्यांना वेढून राहिल्याची जाणीव झाली. मन म्हणालं, ‘तुझा बा तुज्याजवळच आहे लेकरा... असं भरभरून यश मिळवशील आणि भरभरून आनंद वाटशील त्या प्रत्येक क्षणी बा तुज्यासोबत असणारच असणार!’
©आसावरी केळकर-वाईकर, चेन्नई