भावानांचा भुकेला
वैशाख वणवा पेटतो तेव्हां सजीवसृष्टी उन्हाच्या काहीलीने बेजार होते. शेतकरी वरूण राजाच्या आगमनाची वाट पाहत असतो तर मनात सदैव भक्तीची ज्योत तेवत ठेवून विठू नामामध्ये लीन झालेले वारकरी बंधु आषाढाच्या पावसा बरोबर त्या महिन्यात येणारी एकादशी आणि त्या अनुषंगाने निघणाऱ्या वारीची आतुरतेने वाट पाहत असतो.
विठू नामाचा गजर
मनी विठूचाच जागर
भक्त लीन भक्तिमध्ये
दुमदुमले अवघे शहर
अस एकंदरीत वातावरण अख्ख्या महाराष्ट्रात असतं.
तन विठ्ठल मन विठ्ठल
मनात आस विठ्ठल
हृदयात वास विठ्ठल
प्रत्येक वारकऱ्याचं, विठूच्या भक्ताचं मन भक्तीने ओतप्रोत भरलेलं आपण पाहत असतो. आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी निघाली की वारकरी आपापली शिदोरी घेऊन कोण टाळ, कोण मृदंग, कोण चिपळी हाती घेऊन हरिनामाचा गजर करत वारीला निघतात. पाई वारी करणारे वारकरी भजनात इतके लीन असतात की चालता चालता पाय कधी थिरकायला लागतात, मन कधी ताल धरतं हे त्यांना पण कळत नाही.
लक्ष लक्ष पाऊले
करी पंढरीची वारी
नामाचा गजर ओठी
जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी असा हरिनामाच्या गजरात रंगलेला वारकरी, त्यांचबरोबर अबीर आणि गुलालाने रंगलेले असमंत. ह्या अशा आनंदात सहभागी होण्यासाठी धावून येणारा वरूण राजा. ही सगळी अनुभवण्याची गोष्ट असते. नुसतं सांगून कधीच न समजणारी. अशा वातावरणात वरुण राजाने कितीही भिजवलं तरी त्याचं भान कुठे आहे वारकऱ्याला!
आम्हा नाही कसलं भान
घेऊ विठ्ठलाचे नाम छान
माऊलीच आमुची शान
गाऊ तिचे गुणगान
अशा विठ्ठल भक्तांची वारी तन विठ्ठल मन विठ्ठल कणाकणात विठ्ठल अशी होऊन जाते. ही एवढी भक्ती येते कुठून? भक्तीची भावना ही कुणी कुणाच्या मनात भरवता येत नाही. ती अंतःस्फूर्ती असते. एवढी अफाट भक्ती आणि त्याहून अफाट पाई वारीची शक्ती येते कुठून? असे प्रश्न जेव्हाही माझ्या मनात आले तेव्हां अनुभवाच्या वाटेवर भक्ती तिथे शक्ती ह्याची प्रचिती येत गेली. भगवंतानी सांगितलंय की मी चरचारांमध्ये आहे. झाडं, पानं, फुलं, प्राणी, पक्षी, माणूस प्रत्येकात माझा वास आहे. मला प्रत्येक जीव प्यारा आहे. खरं तर आपल्याला एखादी कठीण गोष्ट साध्य करण्याचं बळ येतं कुठून? याचं उत्तर ह्यातच आहे आणि खूप सोपं आहे. एखादी कठीण गोष्ट साध्य करण्यासाठी, ते कार्य सिद्धिस नेण्यासाठी आपण परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याच्याकडे प्रार्थना करतो. देवावर विश्वास ठेवतो म्हणजेच आपण आपल्यावर विश्वास ठेवतो. देव कुठे आहे? प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हां आपल्या मनाला बळ मिळतं अन त्या अनुषंगाने आपला आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक भक्तांमध्ये ती शक्ती असते. ती त्याने आपल्या साधनेने कमवलेली असते. जेव्हा साधना वाढते तेव्हां आत्मिक शक्ती वाढते आणि मग असध्या गोष्ट साध्य करता येते. देहू आळंदीहून पाई पंढरपूरची वारी करायची असो किंवा एव्हरेस्ट शिखर सर करायचं काम असो ह्या सगळ्या कामांसाठी प्रचंड आत्मविश्वास आणि आत्मिक बळ लागतं.
प्रत्येक वारकऱ्याच्या मनात विठू माऊलीवर प्राचंड श्रद्धा असते. तीच श्रद्धा आणि भक्ती आणि आत्मविश्वास शक्ती मध्ये परिवर्तीत होते.
श्रद्धा आणि भक्ती देवाचं दर्शन घडवून आणू शकतात ह्यावर विश्वास आहे का? तर ही गोष्ट वाचा.
माझे आजोबा (आईचे वडील) दादा. उर्फ कै. सच्चीदानंद गिंडे राहणारे बेळगांव टिळकवाडी. हे वारकरी होते. त्यांची 600 एकर जमीन होती आणि त्यात मळा होता. भरपूर ताज्या भाज्या पिकायच्या. शेतात, मळ्यात आणि स्वतःच्या गोठ्यात रामणारा माणूस माझा आजोबा. दर आषाढी आणि कार्तिकीला वारीला जायचे. आपलं काम करताना सतत पांडुरंगाच नाव जपत राहायचे. हल्लीच्या मुलांना खूप लहान वयात चष्मा लागतो, आणि इतरांना चाळीशीत लागतोच लागतो. दादांना वयाच्या 84 वर्षावर पण चष्मा नव्हता. मुखात हरीनाम आणि फावल्या वेळेत बारीक lcrossstich वर भरतकाम, आणि बारीक माण्यांचे तुळशी कट्टे, बाहुल्या असं काहिबाही creativity करत राहणार. पांडुरंगावर नितांत भक्ती. मी लहान असताना एकदा ते आमच्याकडे मैसूरला राहायला आले होते तेव्हां म्हणाले होते की मरायच्या आधी एकदा मला पांडुरंगाचं साक्षात दर्शन होणार. मी फक्त त्यांच्याकडे आश्चर्याने बघितलं होतं फक्त. वयाच्या 84 वर्षी पहिल्यांदा ते गाडीने पंढरपूरला गेले. कार्तिक महिना होता. चंद्रभागेत अंघोळ केली, दर्शन घेतलं आणि त्याच गाडीने परतले. काही दिवसांतच त्यांच्या अंगात ताप भरला. औषधाने तात्पुरता उतरायचा पण गुण येत नव्हता. त्यांना निमोनिया झाला. 1984 सालातली गोष्ट. त्यांच्या देहांताच्या दोन दिवस आधी रात्री त्यांना विठोबा पाठ करून आपल्या समोर उभा असलेलं त्यांना दिसलं. ते हांतरूणाला खिळले असल्याने,
"अरे विठ्ठला, मी जन्मभर पाई चालून तुझ्या दर्शनाला आलो पण आज मी उठून तुझं दर्शन घेऊ शकत नाही. आज तूच मला दर्शन दे"
असं म्हणताच विठूची पाठमोरी मूर्ती फिरली आणि आपलं दिव्य दर्शन आजोबांना दिलं. ह्या घटनेच्या दोन दिवसांनी आजोबा गेले.
जैसा भाव तैसा पावे स्वामीराव. भावानांचा भुकेला हरी फक्त प्रेमाला, श्रद्धेलाआणि भक्तीला वश होतो. विश्वास खूप काही चमत्कार घडवून आणतो.
©®अक्षता देशपांडे