गुरू... आत्म्याचे गुप्त रूप
आपल्यातला अंधकार दूर करून ज्ञानाची दिव्य ज्योती उजळणारा गुरु. अशी गुरुची व्याख्या आहे. साधारणपणे आपण आपली विद्या, संस्कार, संस्कृती आपली सगळी संपत्ती आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवत असतो. हल्ली पैसा, बंगला, गाडी ह्या भौतिक वस्तुंना खरी संपत्ती असं संबोधलं जातं असलं तरीही ज्ञान आणि संस्कार हीच खरी संपत्ती आहे जी आपण पुढच्या पिढीला बिनदिक्कत सोपवू शकतो आणि सोपवली पाहिजे. आपली पुढची पिढी सर्व ज्ञान संपन्न, सर्व विद्या संपन्न, संस्कार संपन्न व्हावी हाच त्याच्या पाठचा हेतू असतो. आपल्या शिष्यांना ज्ञान देणे, त्यांना गुण संपन्न बनवणे आणि आपले संस्कार आणि विचार त्यांच्यामध्ये रुजावणारे गुरु होय. आपल्याकडच्या ज्ञानाचा भांडार आपल्या शिष्यांसाठी वापरणाऱ्या गुरूंना ही ज्ञान ज्योती कुठून मिळते? गुरु स्वर्गातून हे सगळं शिकून येतात का? नाही.... गुरूंनाही गुरूंची गरज असते.
*जो जायचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरूसी पडले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसें*. असं म्हणत दत्त महाराजांनी 24 गुरु केले. प्रत्येक गुरूकडून त्यांनी ज्ञान प्राप्त केलं अन ते ज्ञान जगाला दिलं. ज्यांनी चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे लिहून माणसाला संपन्न केलं आणि गुरु पौर्णिमेला ज्यांची प्रथम पूजा केली जाते आणि ज्यांना सर्वश्रेष्ठ गुरु मानलं जातं अशा व्यास गुरूंचे पण गुरु आहेत देवांचे देव महादेव. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्ण पण संदिपनीं ऋषींचे शिष्य होते.
आपण जन्माला येतो, हळू हळू मोठे होतो घरी आई आपली पाहिली गुरु असते. आई हे व्यक्तित्व अभ्यासाने, अनुभवाने इतकं संपन्न आणि परिपूर्ण असतं की ती आपल्या बाळाला घरीच सर्व काही शिकवू शकते. पण निसर्गाचे काही नियम आहेत. निसर्गाच्या राज्यात प्रत्येक कामाची विभागणी झालेली आहे आणि तसें नियोजन पण झालेलं आहे. त्यामुळे त्या त्या गुरूकडून ती ती विद्या प्राप्त केली असता शिष्याला विशेष लाभ होतो. म्हणूनच माऊली आपल्या बालकाला गुरु कडे ज्ञान प्राप्तीसाठी पाठवते. आई ही बाळाची पाहिली गुरु जरी असली तरीही त्याला विविधांगी ज्ञान मिळावं ह्या हेतूने ती त्याला शाळेत पाठवते. गुरु बिन ज्ञान नही हे तिला पक्क माहित असतं. मग शाळेत पाठवून ती घरात शांत बसते का? तर नाही. कारण तिला माहित आहे शालेय शिक्षण माझ्या बाळाला पुस्तकी ज्ञान देतय मग म्हणून ती त्याला जगात कसं वावरायचं याचं व्यवहारज्ञान देते. मग गुरुकडे गेल्यानंतर शिष्य विद्या संपन्न, शास्त्र संपन्न आणि सर्वगुण संपन्न होतो का? जगातल्या सर्वच दिग्गज गुरूंना सुलभतेने ज्ञानाची प्राप्ती झाली का?
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. त्या सागरातून शिष्याला काय घ्यायचं आहे ते सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे. सागराचे पाणी हवं असाल्यास आपल्याला वाकून, नतमस्तक होऊन त्या पाण्याला स्पर्श करावा लागतो तेव्हां कुठे ओंजळभर पाणी मिळतं. त्यातले मोती आणि सागरजीव हवे असतील तर जीवाची पर्वा न करता संपूर्ण विश्वासाने आणि समर्पणाच्या भावनेने अथांग सागरात उडी मारावी लागते. किनाऱ्यावर उभं राहून एवढा मोठा सागर जाणणार तरी कसा? किनाऱ्यावरचे शंख शिंपलेच वेचत बसण्याने त्या अथांग सागरच आकलन होतं नाही. दत्त महाराजांनी कबुतरापासून ते मधमाशी पर्यंत, एक पिंगला नामक वेश्या, एक कुमारिका, एक लहान मूल, निसर्गातून उपलब्ध अशा 24 गुरुकडून ज्ञान मिळवलं. प्रत्येक गुरूच्या ठाई त्यांचं समर्पण होतं आणि त्या त्या गुरुचा त्यांना आदर होता. आपण म्हंटलं असतं शीsss एका कबुतरांकडून काय शिकायचं? छे छे!! लहान मुलं आपल्याला काय शिकवणार आहेत? पैशांसाठी देह विकणाऱ्या वेश्येकडून आपल्याला काय हाशील? पण प्रत्येक प्राणिमात्राकडून आपण नक्कीच काही न काही शिकू शकतो हे दत्त महाराजांनी दाखवलं.
त्यामुळे पूर्ण समर्पण भावाने जो गुरूला शरण जातो तो ज्ञानरूपी सागरातून तेजस्वी होऊन बाहेर पडतो आणि सर्व विद्या संपन्न होतो.
जीवनात आपण काही तत्वे पाळल्यास यश आपल्याला मिळतच हे पक्कं ठरवावं.
1 गुरुचा संपूर्ण मान राखला पाहिजे.
2.गुरु हा शरीराने न पाहता तत्व रूपात पाहता आला पाहिजे.
3. गुरूंनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे शोधून त्यांच्या चरणी लीन होता आलं पाहिजे.
4. प्रति प्रश्न न करता गुरुचे विचार सर्वथा योग्य मानून त्याचे आचरण करता आलं पाहिजे. (हल्लीच्या परिस्थितीत हे कठीण आहे. काही अपवाद वगळता खरा गुरु ओळखता आला तर तस भाग्य नाही).
आपल्या जीवनात गुरूं एवढंच महत्व सद्गुरूंना आहे. लौकिक दृष्टीने जे मार्गदर्शन करतात ते गुरु आणि आत्मा आणि विवेक यांची सांगड घालून आपल्याला भवसागरातून पार करतात ते सद्गुरू. भारतीय संस्कृती मध्ये गुरूच स्थान खूप उंचावर आहे. गुरुंपेक्षाही सद्गुरूंना खूप महत्व आहे कारण मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवणारे, अध्यात्मिक उन्नतीकडे घेऊन जाणाऱ्या सद्गुरूंचा आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. पण हल्लीच्या कलियुगात खरे सद्गुरू कसे ओळखावे? हा मोठा प्रश्न आहे.
एक स्वप्नगुरु एक दीक्षागुरु।
एक म्हणती प्रतिमागुरु
एक म्हणती स्वयें गुरु
आपला आपण।।
असो ऐसे उदंड गुरु।
नाना मतांचा विचारु।
परी जो मोक्षदाता सद्गुरु।
तो वेगळाची असे।।
नाना सद्विद्येचे गुण।
याहीवरी कृपाळूपण।
हे सद्गुरुचे लक्षण।जाणिजे श्रोतीं।।
असं संत रामदासांनी म्हंटल आहे. साधकांनी ह्या ओळी लक्षात ठेवाव्यात.
गुरूंनी आपल्याला दिलेलं ज्ञान, बोध, शिकवण याचे आचरण करणे, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे ही खरी गुरु सेवा व गुरुपूजा होय. करणं
गुरुर्ब्रह्म गुरुर्रविष्णू गुरुर्रदेवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः