*जसा विचार तसे*...
दहावी बारावीचा निकाल लागतो अन लाखो विद्यार्थ्यांमधून काहीच मुलांचे बोर्डावर नावं झळकत तेव्हां किंवा अनेक लोकांमधून एखादाच असाध्य ते साध्य करून दाखवतो तेव्हां ह्या बोटांवर मोजण्या इतक्यानाच कस काय एवढं घवघवीत यश मिळालं? असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. अनेक लोकांमध्ये एखादाच का माऊंट एव्हरेस्ट किंवा त्यापेक्षाही कठीण पर्वत रांग सर करु शकतो? असंही वाटतच. कधी कधी असं ही होतं की भरपूर प्रयत्न अन मेहनत करून एखादा आपली स्वतःची empire उभा करतो, करोडो कमावतो. पण दुसरीकडे तेवढीच मेहनत घेणारा माणूस फक्त दोन वेळच कमी पडू नये इतकंच यश मिळवतो. असं का होतं? मेहनत अन प्रयत्न तर दोघेही करत आहेत. मग एकाला उत्तुंग यश आणि दुसऱ्याला तेवढ्यापुरतंच थोडंसं मिळतं iअसं का? तुम्ही म्हणाल नशीब हो दुसरं काय? पण नाही, तसं नसतं. खूप वेगळं आणि उत्तुंग यश मिळवणाऱ्या ह्या माणसांना आपल्याला पाहिजे ते कसं मिळावायचं हे माहित असतं. अशा लोकांची विचार करण्याची पद्धतच वेगळी असते. प्रयत्नांबरोबर हवं ते मिळवण्याची त्यांची तीव्र इच्छाच त्यांच्या उत्तुंग यशाची गुरुकिल्ली असतें. मग फक्त तीव्र इच्छा असून चालते का? तर प्रयत्न, तीव्र इच्छा अन त्याबरोबर तेवढ्याच तीव्रतेने सकारात्मक असणं पण गरजेचे आहे. तुमच्यापौकी कुणाला आठवतं का की लहान असताना आपले आई वडील किंवा आजी आजोबा काय म्हणायचे? चांगलं बोल, चांगला विचार कर, आकाशातून शिव पार्वती तथास्तु म्हणतात किंवा चांगलं बोलावं वास्तू तथास्तु म्हणते. आता वास्तू तथास्तु कसं म्हणेल? आणि आपण चांगला किंवा वाईट विचार करतानाच शिव पर्वती बरोब्बर आपल्या वरून आकाशातून जात असतात का? ते फक्त आकाशातून फिरतच असतात का? असे फाजील प्रश्न मनात डोकावायचे. जसे जसे मोठे होतं गेलो, विज्ञानाचा अभ्यास केला आणि वेगवेगळ्या विषयांवरची भरपूर पुस्तकं वाचली तेव्हां ह्या शिव पार्वतीच्या किंवा वास्तूच्या तथास्तु म्हणण्याच्या अर्थाचा उलगडा झाला. आता काय असतं की मुलांना जे समजत त्याच भाषेत मोठी लोकं त्यांना समजावतात. आता मी पण तुम्हाला एका भारी भरकम डायलॉग द्वारे हे समजावते. ओम शांती ओम सिनेमा आठवतो का? मग त्यातला शाहरुख खान आठवतच असेल. बरं *किसी चीज को शिद्दत से चाहो तो सारी कायनात तुम्हे उसे मिलाने की कोशिश मे लग जाती है* हा डायलॉग तर सगळ्यांना तोंड पाठ असणारच. ही जी कायनात म्हणजे मराठी मध्ये ज्याला ब्रह्माण्ड म्हणतो ही सगळी किमया ह्याची आहे बरं का. आता ते कसं? असा प्रश्न पडला ना? तर एक कथा ऐका. एकदा नववर्षाच्या निमित्ताने एका गुरूने आपल्या काही शिष्याना विचारलं की येत्या वर्षा मध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय बदल घडावे किंवा कसले बदल होणार आहेत असं वाटतं?
एक म्हणाला "कसलं काय? रोजची तीच तीच कटकट, मला नाही वाटत की मी ह्या कटकटीतून बाहेर पडू शकेन.
दुसरा म्हणाला पुढच्या वर्षी हयाच दिवशी मी एक करोड रुपये कमावलेले असणार. तिसरा चेष्टेच्या सूरात म्हणाला कदाचित मी जगणार नही पुढल्या वर्षीपर्यंत. चौथा म्हणाला मला जे काही शारीरिक त्रास आहेत त्यातून मी मुक्त होणार. त्यांच बोलणं ऐकून झाल्यावर पुढयावर्षी ह्याच दिवशी भेटूया असं सांगून गुरु निघून गेले.
पुढल्या नववर्षाच्या दिवशी त्यातले तिघे हजर होते. पहिला त्याच्या नेहमीच्या कटकटींनी त्रासलेला होता. दुसरा शिष्य एका वर्षात श्रीमंत झाला होता. तिसरा खरोखर हे जग सोडून गेला होता त्यामुळे तो हजर राहणं शक्य नव्हतं, अन चौथा पहिल्यापेक्षा तंदुरुस्त आणि उत्साही वाटत होता. त्या चौघांनी जसा विचार केला होता त्यांना फळही त्याच स्वरूपाचं मिळालं होतं. त्यामुळे जसा विचार तसे फळ. आपण ज्या प्रकारे विचार करतो ह्या ब्रह्माण्डातून आपल्याला त्याच प्रकारची स्पंदनं मिळतात. सकारात्मक विचार कराल तर सकारात्मक विचारांची स्पंदनं आपल्याशी जोडली जातात आणि आपल्याला यश मिळत जातं. यश प्राप्तीचं समिकरण काय आहे तर प्रयत्न सकारात्मक विचार = यश. यशासाठी प्रयत्न करताना माझं नशीबच खराब, माझ्या नशिबात यश नाहीच आहे, मी यशस्वी होणारच नही, मला जमणारच नाही असे नकारात्मक विचार ब्रह्माण्डातून तशीच स्पंदने गोळा करतात आणि मग माणूस नकारात्मकच राहतो. *प्रयत्न हे रत्न देवापेक्षा महान आहे कारण देवा सकट सर्व काही मिळवुन देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे. वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्न वादाची कास धरून विकासवादावर झेप घेण म्हणजे जीवन होय*.
माझंच उदहारण द्यायच झालं तर नवर्याच्या आजारपणात मी काही वर्ष खूप कठीण परिस्थितून गेले आहे. तेव्हांही "सगळं ठीक होईल, सगळं चांगलंच होणार आहे. काही न काही मार्ग सापडेल " असं सतत म्हणतं राहायची. जसं की घाबरू नकोस मना all is well all is well. आणि खरोखर बिघडलेली परिस्थिती सावरली. व्यवस्थित मार्ग सापडला. मला असे अनेक अनुभव आहेत की तीव्रतेने एखादी गोष्ट व्हावी अशी मनातून इच्छा होतं असते आणि चारच दिवसात ती घडून येते. एकदा तर मला तीव्र इच्छा झाली की अक्कलकोटला जायचय स्वामींच्या दर्शनाला. पण नुकतीच शेगावला जाऊन आले होते त्यामुळे परत अक्कलकोटला जायचंय असं म्हण्टलं असतं तर घरातून विरोध झालाk असता म्हणून गप्पच बसले. पण मनातली इच्छा मात्र तीव्र होतं गेली. चारच दिवसांनी अक्कलकोटच्या आदर्श कन्नड बळगा ह्या संस्थेच्या अध्यक्षांचा फोन आला की "मॅडम, ह्या वर्षी पहिल्यांदा आम्ही महिला दिवसाचे औचित्य साधून दोन दिवसांचा कर्यक्रम ठेवलाय त्यात काही महिलांना पुरस्कृत करतोय तर तुम्हला तुमच्या अनुवाद क्षेत्रातल्या कामगिरीसाठी आदर्श महिला रत्न हा पुरस्कार देतोय तुम्ही या. हे ऐकल्यावर माझा आनंद गगनात मावेना. पुरस्काराच्या निमित्ताने स्वामींनी मला बोलवून घेतलं. असे अनेक अनुभव आहेते.
मित्रानो अन मैत्रिणींनो यशाची इच्छा मनात तीव्र असुदे त्याबरोबर प्रयत्नांची जोड ही असूदेत. पण इच्छा मात्र इतकी तीव्र की यश तुमच्या पदरात पडलंच पाहिजे. काम कठीण असलं, अशक्य वाटत असलं तरीही सकारात्मक रहा, प्रयत्न सोडू नका यश मिळणारच ह्याची खात्री असुदे.
©®अक्षता देशपांडे