संभ्रमित करणारी जनुके
मुलगी विवाहयोग्य वयाची झाली की तिच्या आईवडिलांची धावपळ सुरू होते . विवाहसंस्थेमध्ये नांव नोंदवणं , तिची कुंडली तयार करणं , तिचा आकर्षक फोटो काढून तयार ठेवणं , बायो डाटा लिहून ठेवणं , वरसंशोधनार्थ जोडे झिजवणं , आसपासच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना वरसंशोधनासाठी मदत करण्याची विनंती करणं , इ . अनेक सोपस्कार पूर्ण करेपर्यंत आईवडिलांचा जीव मेटाकुटीला येतो . मुलीनं परस्पर प्रेमविवाह जमवला असेल तर या कष्टामध्ये थोडीफार कपात होते . पण या सव्यापसव्यामधून फारशी सुटका मिळत नाही . या बाबतीत माझ्या आईवडिलांना जास्त कष्ट पडले नाहीत . माझ्या चुलत बहिणीच्या विवाहाला आम्ही सर्वजण हजर होतो . त्या विवाह समारंभात देशपांडे पितापुत्रांनी मला पाहिलं आणि लगेच पसंत केलं . दोन्ही व्याह्यांचा विचारविनिमय तिथंच पार पडला . माझ्या सासऱ्यांनी मुलाची खरीखुरी माहिती वडिलांना दिली . मुलाचं शिक्षण नुकतच पूर्ण झालं होतं , आणि काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या महिंद्रा अँण्ड महिंद्रा मध्ये प्रोबेशनवर नोकरीस सुरुवात केली होती . प्रशिक्षणवेतनाच्या स्वरूपात ( स्टायपेण्ड ) केवळ अठराशे रुपयांची म्हणजे नगण्य मासिक प्राप्ति होती . घरी परतल्यानंतर वडिलांनी बराच विचार केला . त्यांच्या विचारानुसार मुलाचं शिक्षण आणि कर्तबगारी पहाता भविष्यात त्याची प्राप्ति कित्येक पटीनं वाढण्याची शक्यता होती . त्याचं भवितव्य उज्ज्वल होतं . त्यामुळे त्यांनी मुलाच्या त्या वेळेच्या नगण्य प्राप्तीकडे दुर्लक्ष केलं , आणि विवाहाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं . भविष्यात त्यांचे विचार खरे ठरले . माझ्या नवऱ्याला भराभर पदोन्नती मिळत गेली आणि आजमितीस उच्च पदावर राहून त्याच्या प्राप्तीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे . आज या घटनेची आठवण होण्याचं कारण म्हणजे आमच्या विवाहानंतर २७ वर्षांनी काळ पुढे सरकला आहे . पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेलं आहे . आजच्या तरुण पिढीच्या अपेक्षा खूपच बदलल्या आहेत . आजच्या तरुण मुलींना मुलांच्या कर्तबगारीवर भरवसा नाही . कष्ट करून साम्राज्य उभं करण्याच्या शक्यतेवर त्यांचा विश्वास नाही , आणि त्यासाठी वाट पहाण्याची तयारी नाही . आर्थिक सुबत्ता आयती आणि तयार मिळायला हवी . सुरुवातीलाच मुलाचा गलेलठ्ठ पगार असावा , आणि तो आपल्या पगाराहून जास्त असावा , रहायला प्रशस्त बंगला किंवा फ्लॅट असावा , घरी अद्ययावत फर्निचर आणि सर्व सुखसोयी तयार असाव्या , आणि घरात डस्टबिन्स म्हणजे म्हातारी खोडं असू नयेत ही आजच्या विवाहेच्छू तरुणींची अपेक्षा . मुलांना देखील मुलगी भरपूर कमविणारी असावी , त्याचबरोबर गृहकर्तव्यदक्ष असावी , घरातील मुलांची आणि म्हाताऱ्यांची काळजी घेण्याची तिची मानसिकता हवी असं वाटतं . म्हणजे सर्व काही रेडीमेड हवं . भविष्यात किंचित देखील तडजोड करण्याची पाळी येऊ नये यासाठी हा आटापिटा . या अपेक्षा काहीशा अवास्तव वाटल्या तरी तो आजच्या तरुण पिढीचा प्रश्न आहे , आणि तो त्यानाच सोडवायचा आहे . त्यात जास्त दखल देण्याची माझी इच्छा नाही . पण त्यांना एक सावधानतेचा इशारा द्यावा असं वाटतं . तरुण तरुणींच्या आर्थिक सुबत्तेच्या जोडीला त्या दोघांच्या आरोग्याची खात्री संबंधितांनी करून घ्यावी असं मला वाटतं . काही महिन्यांपूर्वी माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याला जठराचा कर्करोग झाल्याचं समजलं . रोगनिदान करतेवेळी तो शेवटच्या स्टेजवर असल्याचं उघडकीस आलं . म्हणजे तो बरा होऊन घरी येण्याची शक्यता कमी . गप्पांच्या ओघात समजलं की त्यांच्या घराण्यात हा रोग आनुवंशिक आहे . दोन वर्षांपूर्वी त्याचा भाऊ त्याच जठराच्या कर्करोगाला बळी पडला होता . त्याच्या बहिणीला या आनुवंशिकतेची माहिती होती . पचनक्रियेमध्ये किंचित बदल झालेला समजताच तिनं सर्व तपासण्या करून घेतल्या आणि सुरुवातीच्या स्टेजवर असलेल्या कर्करोगाचं निदान झालं. त्यावर योग्य उपचार घेऊन तिनं या रोगावर नियंत्रण मिळवलं, आणि आता ती पूर्ण बरी होऊन घरी परतली आहे. त्यानंतर काही दिवसांनी याच आनुवंशिक जठराच्या कर्करोगाचं आणखी एक उदाहरण आमच्या दृष्टीस पडलं , आणि ते म्हणजे माझ्या नवऱ्याच्या जिवलग मित्राच्या कुटुंबात . त्या मित्राचे वडील याच कर्करोगानं स्वर्गवासी झाले होते. त्याच्या भावानं योग्य वेळी तपासणी करून घेऊन स्वतःच्या कर्करोगाचं निदान लवकर करून घेतलं आणि त्यातून तो आता पूर्ण बरा झाला आहे. माझ्या नवऱ्याचा मित्र रोगनिदान वेळेवर न झाल्यामुळे शेवटच्या घटका मोजत यमराजांची वाट पहात आहे. या कर्करोगाचा जनुक ( gene ) एका पिढीतून दुसऱ्या पिढीत शिरकाव करत आहे याची जाणीव होऊन मन विषण्ण झालं . उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग या आनुवंशिक रोगांच्या पंगतीला आता कर्करोग देखील येऊन बसला आहे ही बाब धक्कादायक आहे . आज वैद्यकीय क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे . पण असाध्य रोगाच्या जनुकाला पुढच्या पिढीमध्ये शिरकाव करण्यापासून रोखण्याचा शोध लावण्यात अजून यश मिळाले नाही हे कटु सत्य आहे . असा शोध लावण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत . तो शोध लागायचा तेव्हा लागेल . पण तोपर्यंत त्या जनुकाचा प्रवास असाच पुढे चालू रहाणार आहे . त्याचा वेळेवर मागोवा घेऊन त्याच्याशी सामना करणं मात्र आपल्या हातात आहे . आपल्या वंशात असाध्य रोग ठाण मांडून बसला आहे याची बातमी लागताच तरुण पिढीनं सावध व्हायला हवं , आणि आपल्या विवाहापूर्वी योग्य तपासण्या करवून घेऊन त्या रोगाचा मागोवा घेणं गरजेचं आहे . आपल्या भावी जोडीदाराला याबद्दल आगाऊ कल्पना दिली तर पुढचे कटु प्रसंग टाळता येतील . आर्थिक सुबत्तेच्या जोडीला आरोग्यसंपदा देखील महत्वाची आहे . उभयतांनी या विषयावर मनमोकळेपणानं चर्चा करून आपल्या भावी संसाराची सुखस्वप्ने रंगवावीत असा माझा आजच्या पिढीला लाख मोलाचा सल्ला आहे .
सौ . अक्षता देशपांडे मो . नं . ९९ ८७६७१७१५