• 16 August 2021

    बीचवरल्या गोष्टी

    विथ द फ्लो

    5 358

    **विथ द फ्लो**

    ‘आज्जी, घ्या कि चक्कर... तुमी भुवनी करून आशीर्वाद दिला तर भरपूर खपतील माजी चक्करं आनि घरला खायाला काय घ्यून ग्येलो तर पोरं खुश होतील लै...’ समोर येऊन उभा राहिलेला चक्करवाला त्याची कागदी चक्रं अडकवलेली काठी वाळूत धप्पकन ठेवत म्हणाला तशा उषाताई भानावर आल्या. सावध होत त्यांनी जरा आजूबाजूला पाहिलं. शेजारची वैशाली आणि सोसायटीतलीच तिची एक मैत्रीण दोघींजणी आपापल्या मुलींसोबत जवळच पळापळी खेळत होत्या. घरात बसूनबसून अगदी कंटाळा आल्यानं आज सून ‘आई, तुम्ही पण जाऊन या’ म्हणाली तशा त्याही त्यांच्यासोबत बाहेर पडल्या होत्या. सुनेचा काहीतरी कस्टमर कॉल असल्यानं तिला यायला जमणार नाही असं ती म्हणाली होती.

    पहिला लॉकडाऊन सुरू झाला तशी त्यांच्या लेकानं भुणभुण लावलीच होती कि, ‘आता एकटी गावाकडं राहू नको. आम्हाला काळजी वाटत राहाते. काही लागलं सवरलं तर आपण एकमेक सोबत असलेलं बरं!’ त्यांचा जीव खरंतर गावाकडं स्वत:च्या वाड्यात रमायचा. इतक्या वर्षांची सवय, आजूबाजूला ओळखीपाळखीची माणसं, एकत्रपणे सोबत हिंडताफिरता यायचं, अडल्यानडल्यालाही एकमेकांची गरज सगळ्यांनी मिळून निभावून नेणं सहजी जमायचं. म्हणूनच वर्षांभरापूर्वी त्यांचे यजमान निवर्तले तरी त्या तिथंच राहिल्या होत्या. नवीनच लग्न झालेले मुलगा-सून जमेल तसे येऊनजाऊन असायचे. मात्र हे कोरोनाचं काहीतरी अकल्पित, अघटित असं काहीतरी वाट्याला आलं आणि कुणाचा कुणाला पायपोस उरला नाही. सुरवातीला लहान गांव म्हणून फार काही कडक नियम नव्हते, पण हळूहळू तिकडंही जसं लोण पसरायला लागलं तसं तिथंही चार भिंतींच्या आत राहाण्याशिवाय कुणाला पर्याय उरला नाही. त्यानंतर मात्र मुलानं काही दिवसांनी नियमांत जराशी शिथिलता आल्यावर लगेचच त्यांना आपल्याकडं आणलं होतं.

    तसं मुलाचं सगळं छान होतं. सूनही नोकरी करायची. सध्या तर दोघांची ऑफिसं लॅपटॉपवरच असायची. त्यामुळं दोघं दोन खोल्यांत आणि उषाताई हॉलमधे टीव्हीसमोर असं रुटीन असायचं त्यामुळं उषाताईंना तसा निवांतपणाही होता. पण त्यांना अजून सुनेनं घरात गुडघ्यापर्यंतच येणारी पँट आणि टीशर्ट घालणं, कपाळाला टिकली कधी आहे, कधी नाही इतका निष्काळजीपणा, दोघांनी ताटलीत वाढून घेऊन खरकटं-मरकट्याचं भान न ठेवता कुठंही बसून जेवणं, शिवाय आपल्यालाही ‘ये कि तू पण आई’ म्हणत त्यात ओढणं हे तितकंसं पचत नव्हतं. जरातरी किमान गोष्टींचं तारतम्य बाळगायला नको का? एकूण जगण्याला काही शिस्त नको का? असं त्यांचं मन आक्रंदत राहायचं. मुलांच्या वागण्यातला असा एकूणच निवांतापणा सोडला तर बाकी काढण्यासारखं काही नव्हतं. त्यांच्याशी वागण्यातही हातचं राखून असं काही नव्हतं. त्यांनी घरकाम वगैरेही केलं पाहिजे वगैरे अशीही सुनेची काही अपेक्षा नव्हती. ‘आई, तुम्हाला जमेल झेपेल तितकंच करा हं. उगीच दगदग करू नका’ असं सून पहिल्याच दिवशी म्हणाली होती.

    स्वयंपाकातही एकेकदा नवरा-बायको दोघं मिळून काहीतरी करायची. नवऱ्यानं कशाला स्वयंपाकघरात लुडबुडायला हवं. इनमिन दोन-तीन माणसं, तेवढं आपापलं बघायला नको. असं त्यांच्या पिढीच्या विचारधारेनुसार त्यांना वाटत राहायचं. मात्र असले विचार त्या दोघांच्या गावीही नसल्यानं त्यांच्यात उगीचच काही मानपानाचा बाऊ नाही हेही उषाताईंच्या लक्षात येत होतं. कधी त्यांना ‘सुनेलाही नोकरीत काम आहे, त्यामुळं आहे हे ठीक आहे’ असंही वाटायचं. तर कधी वाटायचं, ‘तरीही नवऱ्याचा आब हवाच जरा घरात!’ इथं आब वगैरे कुणाच्याच गावी नाही. दोघंही कानात घातलेल्या वायरींसोबत घरभर हिंडताना एकमेकांना बिनधास्त ऑर्डरी सोडत राहायचे. आपल्या नवऱ्यानं आपल्याकडं राहूचदे पण मुलांकडंही कधी भांडंभर पाणीसुद्धा मागितलं नाही. काय हवं असेल ते स्वत: उठून घेणार. घरकामात त्यांची काडीची मदत नसली तरी त्यांची स्वत:ची एकही गोष्ट आपल्याला बघायला लागली नाही हेही तितकंच खरं!

    इथं मात्र सूनही बिनधास्त आपल्या लेकाला सांगते, ‘गॅसवरच्या पातेल्यात करून ठेवली आहे मुगाची खिचडी/अमका-ढमका भात. आता मला कंटिन्युअस कॉल्स आहेत. उठणं जमणार नाही. तू घेशील खायला तेव्हांच मलाही दे ताटलीत’ आणि आपल्याला म्हणते, ‘आई, तुम्हाला लोणचं-चटणी काय हवं ते घ्या हं खिचडीसोबत. कोशिंबीर, ताक वगैरे मात्र जमलं नाही करायला. काल आणलेलं दही मात्र आहे फ्रीजमधे. हवं असेल तर ताक तेवढं तुम्हीच करून घ्या हं, प्लीज!’ खरंतर, स्वत:च्या पोटाला तरी नीट खायला नको का, पण तिथंही आनंदच! मग, आपणही तिच्या सांगण्याला नंदीबैलासारखी मान डोलावून खिचडीसोबत घ्यायला कोशिंबिरीसारखं काहीतरी, शेवटी प्यायला ताक वगैरे करून तिला वाढून आत नेऊन देतो. त्यावर ते काय ‘सो स्वीट, थॅन्क्यू’ असलं काहीतरी म्हणते मला. छान वाटतं ते, पण त्यावर मेलं काय बोलायचं हेच कळत नाही. आमच्या सासूनं केली का कधी आमची असली कौतुकं? आणि आम्ही तरी असलं काही म्हणायला धजलो असतो का तिला!? पण ह्या हल्लीच्या मुलींची सगळी तऱ्हाच वेगळी!

    कधीकधी तर सरळ ‘आज बाहेरूनच मागव रे जेवण’ असं म्हणतात नवऱ्याला आणि कधी तो नवराच ‘आज विश्रांती घे. आपण मागवू बाहेरून’ असं म्हणतो. आमच्या काळच्या नवऱ्यांना खपलं असतं का असलं वागणं!? परत पुढच्याच क्षणी मन म्हणायचं कि, मनानं वाईट नाहीत ह्या मुली, पण बिचाऱ्या उठल्यापासून नुसत्या गरगर फिरत असतात त्यामुळं वैतागून जात असतील. पोट मागतंच म्हणून त्यासाठी काहीतरी बडवून ठेवायचं आणि ऑफिसच्या कामांमधे बुडून जायचं. त्या ऑफिसलाही वेळ-काळाचं काही भानच नाही. कधीही मेलं ते काम येतच असतं. शेवटी नोकरी म्हटल्यावर ह्या बिचाऱ्या पोरांनी तरी काय करावं. निदान एकमेकाला समजून घेऊन मदत करून गोडीत राहातात हेही नसे थोडके! असं उषाताईंचं मन भल्या-बुऱ्या दोन्ही विचारझुल्यांवर हिंदकळत राहायचं. त्यामुळं कधी त्यांचं त्यांनाच अकारण अशांत, अस्वस्थ वाटायचं तर कधी समजुतदार विचारांनी हायसं वाटायचं. आज बीचवर एकटं बसल्याबसल्याही त्यांच्या मनात अशीच उलटसुलट विचारचक्रं फिरत होती आणि त्यात त्यांचं मन गरगरत राहिलं होतं, समोर येऊन उभ्या राहिलेल्या चक्करवाल्याच्या बोलण्यानं त्यांची ती तंद्री भंगली होती.

    त्या चक्करवाल्याच्या आर्जवामुळं उषाताईंचं मन द्रवलं. त्यांनी वैशालीच्या आणि तिच्या मैत्रिणीच्या मुलीसाठी अशी दोन चक्रं लगेच घेतली. त्याला पैसे दिल्यावर उरलेले पाच रुपये तो परत करू लागला तर त्या त्याला ‘राहूदे रे’ असं म्हणाल्यावर तो आणखीनच आनंदला. हातातले पैसे कपाळाला लावून त्यानं खिशात घातले आणि खुशीत तिथून त्यांच्यापासून पाच-सहा फुटांवर बसलेल्या एका मोठ्या घोळक्याकडं गेला. त्या घोळक्यात बरीच लहान मुलं दिसत होती. तिथं जाऊन वाळूत काठी रोवत त्यानं ‘बच्चे लोग...’ असं म्हणत चक्कर घेण्यासाठी आर्जव करायला सुरू केलं. अनेक रंगीबेरंगी चक्रं खोचलेली ती काठी आता उषाताईंपासून थोड्या अंतरावर असल्यानं खूप सुरेख दिसत होती. ते देखणे रंग न्याहाळताना उषाताईंचं मन एकदम प्रसन्न झालं. मधेच छान वारं वाहू लागल्यानं ती सगळी चक्रं एकाच दिशेनं गरगर फिरू लागली ते दृश्यही फार छान दिसत होतं. हळूहळू त्या घोळक्यातली मुलं त्या काठीभोवती जमली आणि तिथल्या मोठ्या लोकांनी सांगितलं तसं चक्करवाला प्रत्येकाच्या हातात एकेक चक्कर देऊ लागला.

    हातात घेतलेलं चक्कर वेगानं फिरताना पाहून मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद न्याहाळताना उषाताईंच्या ओठांवर आपसूक प्रसन्न हसू उमटलं होतं. तेवढ्यात पळापळीनं दमून पाच मिनिटं विश्रांतीला येऊन बसलेल्या वैशालीच्या मुलीच्या आणि तिच्या मैत्रिणीच्या हातात उषाताईंनी त्यांच्यासाठी घेतलेलं चक्कर दिलं. त्या दोन्ही लहानग्यांच्या डोळ्यांत एकदम चमक येऊन त्या आपल्या हातात चक्कर घट्ट धरून ते जसं वेगानं फिरेल तसा आनंदानं ‘हूSSSSS' म्हणून आवाज करू लागल्या. ‘अहो काकू कशाला घेतलंत?’ असं खाली बसणारी वैशाली म्हणाली. त्यावर उषातई पटकन म्हणाल्या, ‘पैसे फिटले बघ ह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून. आता चक्राची गरगर बघून आपण करणार आहे का असा हूSSS आवाज? त्यांनाच मजा गं ह्या गोष्टीची.’ हसून वैशाली म्हणाली, ‘तेही खरंच!’ तोवर तिच्या मैत्रिणीच्या मुलीनं त्या गरगर फिरत्या चक्राच्या मधे बोट घातलं आणि त्याला उलट दिशेनं फिरवायचा प्रयत्न केला तर ते काही फिरेना. तिनं बोटानं आणखी जोर देऊन ते हलवायचा प्रयत्न केला पण ते वाऱ्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला असल्यानं त्याची एक कागदाची पट्टी निसटली आणि आता ते चक्कर वाऱ्याच्याच दिशेनं पण कमी वेगानं आणि थोडंसं वाकडंतिकडं फिरू लागलं.

    चक्राची ती फाटकी अवस्था बघून ती चिमुरडी नाराज झाली. त्यावर तिची आई तिला म्हणाली, ‘बेबी, तू त्याचा फ्लो डिस्टर्ब केलास ना, म्हणून तुटली ती पट्टी! वाऱ्याच्याच दिशेनं वाहात राहिलं असतं तर कसं झूSSSम फिरत राहिलं असतं अजूनही.’ त्यावर वैशालीही काहीतरी म्हणाली आणि त्यांचा संवाद सुरू राहिला. मात्र उषाताईंच्या कानात त्यातलं काही शिरत नव्हतं. त्यांना एकदम मध्यंतरी पेपरमधे वाचलेलं ‘गोइंग विथ द फ्लो इज ब्लिस’ हे वाक्य आठवलं. मराठी लेखातच काहीतरी संदर्भानं हे वाक्य लिहिलं होतं. सगळा लेख वाचल्यावर उषाताईंना त्या वाक्याचा साधारण अर्थ कळला होता. मात्र आत्ता त्या वाक्याचा अर्थ तर पूर्णपणे कळलाच शिवाय त्यांच्या मनातली अलीकडं अधेमधे उद्भवणारी अशांतता, अस्वस्थताही एकदम दूर पळून गेली. त्यांचं मन म्हणत होतं, ‘एकून सगळं वातावरण, काळच बदललाय. त्यानुसार माणसाचं जगणं-वागणंही बदलणारच की! किंबहुना काळाच्या वेगाशी जुळवून घेताना माणसाला बदलणं भागच पडणार की! आपल्या आयुष्यात शांतता होती तशी ह्या पिढीच्या नशीबात नाहीच त्याला ती बिचारी तरी काय करणार! प्रवाहाचा इतका मोठा रेटा रोखून धरणं त्यांच्या तरी हातात आहे का!? त्यासोबतच जाणं भाग आहे त्यांना. उलट ती आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत कसला बाऊ न करता आनंदानं जगतात हेच महत्वाचं आहे. आपणही आता प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या विचारचक्राला गती देऊन अस्वास्थ्य करून घ्यायचं नाही.’

    आपसूक त्यांची नजर पुन्हा त्या चक्करवाल्याच्या काठीकडं लागली. वाहात्या वाऱ्यासोबत उत्साहानं गरगरणाऱ्या त्या रंगीबेरंगी चक्रांतून एक चैतन्यमय झोत उषाताईंच्या दिशेनं आल्यासारखं त्यांना वाटू लागलं. त्या स्वत:ला पुन्हा एकदा बजावू लागल्या, ‘गोईंग विथ द फ्लो हेच महत्वाचं! आता आपणही जरा आपल्यावेळच्या संकल्पना मागं सारून आत्ताच्या काळाशी जुळवून घेऊन मजेत राहायचं. पोरं बिचारी कामात बुडालेली असतात. त्यांच्यामागं किटकिट करण्यापेक्षा किंवा विचार करून स्वत:लाही त्रास करून घेण्यापेक्षा आपणही हल्ली ही मुलं म्हणतात तसं ते लाईफ एन्जॉय करायला शिकून घ्यायचं. एकदा त्यांच्या आणि आपल्या विचारांतलं अंतर कमी झालं की मग काही गोष्टी त्यांना रुचतील अशा पद्धतीनं समजावून सांगणं सोपं जाईल आणि त्यांना त्या पटतीलही. जसं ह्या चक्राच्या चार पट्ट्या मधल्या एका बिंदूशी घट्ट जोडल्या असल्यानं ते अगदी गरगर फिरतानाही फाटून-तुटून जात नाही. अगदी तसंच प्रवाह कितीही बदलला तरी शिस्त, तब्येतीची काळजी, पुढच्या पिढीच्या दृष्टीनं काही गोष्टी आचरणात आणण्याची आवश्यकता आणि अपरिहार्यता अशा काही गोष्टींना आपण पक्कं धरून ठेवलं पाहिजे म्हणजे स्वत:चंच जगणं जास्त अर्थपूर्ण होईल हे त्यांना नक्कीच पटेल.’ प्रवाहाच्या दिशेनं जाणाऱ्या विचारचक्राला गती दिली तसा एकदम मनात सळसळलेला उत्साह उषाताईंना जाणवू लागला.

    © आसावरी केळकर–वाईकर, चेन्नई



    आसावरी वाईकर


Your Rating
blank-star-rating
Veena Kantute - (16 August 2021) 5
नेहमी प्रमाणेच एका सुंदर विचाराचा धागा गुंफलेली प्रभावी कथा.

1 1

Dr. Vidya Velhankar - (16 August 2021) 5
फार सुंदर लिहिता तुम्ही!!👌👌👌

1 1

Seema Puranik - (16 August 2021) 5
👍"गोइंग विथ द फ्लो" ही काळाची गरजच आहे स्वतःला आंनदी ठेवण्या साठी,खूप छान

1 1

वर्षा मेंढे - (16 August 2021) 5

1 0