• 19 August 2021

    रंग मनाचे

    माहेर

    5 198

    *माहेर*

    परवाच राखी पौर्णिमा झाली. आपल्या महाराष्ट्रात भाऊबीजेला जास्त महत्व असलं तरीही रक्षा बंधनच्या सणाला पण खूप महत्व प्राप्त झालंय. भावाला राखी बांधायला जायच्या निमित्ताने तिची माहेरची एक फेरी होते. आई वडील, बहिणीची भेट होते.. आई वडील असेपर्यंत कोणत्याही स्त्रीला माहेरचे आकर्षण असतं पण त्यांच्या नंतर पण भावा बहिणीचं, अन बहिणी बहिणीच्या नात्याला माहेरच्या नाजूक धाग्याने जोडून ठेवलेल असतं म्हणूनच माहेर हा प्रत्येक स्त्रीच्या दृष्टीने खूप हळवा अन जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो सदैव राहणार आहे. मग ती कुठल्याही काळातली स्त्री असो, कोणत्याही वयातली असो, माहेर हा तिच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बाकी इतर कोणत्याही विषयावर ती कमी बोलत असली तरीही आपल्या माहेराविषयी तासंतास बोलायला तिला आवडतं. माहेरची आठवण सहज जरी झाली तरी ती हळवी होते, चटकन तिच्या डोळ्यात पाणी येतं. अन मग तिचं मन अगदी पाठी पाठी फिरतं आणि तिच्या बालपणात जाऊन उभं राहतं. ज्या वयातलं आपलं बालपण आठवतं तिथून हळू हळू फेरफटका मारत ते पुढे सरकतं अन अलगद आईच्या कुशीत जाऊन शिरतं. आईची ममता, वात्सल्य, आपल्या केसावरुन, अंगावरून फिरणारा तिचा मऊ हात, लहानपणी दंगा करताना मोठे होणारे तिचे डोळे, शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्याला शाळेत सोडताना आपल्याइतकीच होणारी तिची घालमेल, नको इतकी मस्ती केल्यावर आणि भावंडांबरोबर होणारं भांडण सोडवताना सटकन पाठीवर धपाटा घालण्यासाठी पडणारा तिचा हात. आपल्यापेक्षा आपल्या मुलांनी खूप जास्त शिकावं अशी मनोमन आशा बाळगून त्यासाठी रोज देवापाशी प्रार्थना करणारी अन त्याचबरोबर स्वतः वेळ काढून मुलांचा अभ्यास पण घेणारी आई. मुलगा असो वा मुलगी ते वयात येताना त्यांच्यावर एक करडी नजर ठेवतच त्यांच्याबरोबर मैत्रीच्या नात्याने पण वागणारी आई. एकत्र कुटुंबं असो की विभक्त, घरात राहणारी माणसं चार असोत की चौदा त्या प्रत्येकाची आवड निवड लक्षात ठेऊन स्वंपाकघरात रांधणारी आई.

    मुलं चांगली शिकली, त्यांना चांगली नोकरी लागली की तिच्या डोळ्यात दिसणारा धन्यता भाव, आनंदाचे अश्रू, आणि तिच्या डोळ्यात दिसणारं एक जवाब्दारी पार पाडल्याचं समाधान. मुलीचं योग्य ठिकाणी लग्न करून देण्यासाठी लगबग करणारी आणि त्याच बरोबर तळहाताच्या फोडासारखं जपलेल्या आपल्या कळीला परक्याच्या हातात सोपवावे लागणारे दुःख मनातच जिरवणारी आई. आणि शेवटी कर्तव्य भावना श्रेष्ठ ठरून आपल्या मुलीची नवऱ्या घरी बोळवण करणारी आई. अशा प्रेमळ तरीही कर्तव्यनिष्ठ आईच्या आठवणींच्या ह्या टप्यावर प्रत्येक स्त्रीचे डोळे पाणावतातच.

    तिच्या आठवणी इथेच थांबत नाहीत. आईच्या कवेतून हळूच बाबाच्या पायापाशी येऊन थांबतात. आई इतकाच कदाचित त्याहून जास्त बाबा हळवा असतो पण त्याला पुरुष हा लेबल लावलं गेलं असल्यामुळे आई इतक्या तो आपल्या भावना दाखवत नाही. दुःख असो की आनंद, प्रेम असो की राग असो तो मनातच ठेवतो. कर्तव्याची जाण सतत जपून, सर्वांसाठी दिवसरात्र मेहनत करत असतो. मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या विदेश गमनासाठी तो पै अन पै जोडत असतो. घरच्यांसाठी पैसे गुंतवताना घरच्या सदस्यांचे आरोग्य व्यवस्थित राहील ह्याचीही जवाब्दारी तो काळजीपूर्वक वाहतो. मुलांनी आपलं सांगितलेलं ऐकलं नाही तर "माझं ऐक नाहीतर बाबांना सांगते हं. बाबांचा मारच खा मग" असं आईनी बाबाबद्दल मुलांच्या मनात भीती निर्माण केलेली असते. त्यामुळे बाबाकडे बोलायला सुद्धा मुलं कचरत असली तरीही मुलांना शिस्त लागावी ह्या हेतूने तो प्रसंगी कठोर असल्यासारखा दाखवतो.

    आपल्याला काही महागडी वास्तू पाहिजे असल्यास मुलं आपल्या वडिलांशी संपर्क न साधता आई जवळ शिफारस लावतात. आपली मुलं आपल्याशी कधी थेट संपर्क साधत नाहीत ह्याचं बाबाला वाईट वाटत असेल का? ह्याबद्दल कधी कुणी त्याला विचारलंच नसावं आजपर्यंत. कारण आपलं दुःख तो कधी दाखवतच नाही त्यामुळे बाबा गृहीत धरला जातो ह्याची जाण मुलीला खूप उशिरा होते. प्रसंगी त्याच्या मनात समुद्र खवळलेला असला तारीहो वरपांगी शांतपणे संसाराच आपलं चाक चोखपणे खेचत नेणारा बाबा तिला आठवतो आणि तिचे डोळे अधिक भरून येतात. आपल्या बाबाचा पाहिल्याहून जास्त अभिमान वाटतो तिला.

    भावाशी, बहिणीशी झालेली लुटुपुटुची भांडण, भावला राखी बांधताना, भाऊबीजेला ओवाळतांना वाटणारी धन्यता, बहिणी बरोबर घालवलेले क्षण अन क्षण ह्या आठवणी तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटवतात. आपण, आपला संसार, आपली मुलं ह्यांच्यात गुरफटताना, त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतानाच माझं माहेर सुरक्षित ठेव रे देवा अशी देवाकडे विनवणी केल्यानंतरच तिची प्रार्थना संपते. वयाची चोवीस पंचवीस वर्ष माहेरच्या अंगणात निर्भीड पणे नाचणारी बागडणारी ती पतीच्या घरी जाताना मात्र आपल्या हृदयाचा एक लहानसा तुकडा आपल्या माहेरीच ठेऊन जाते. त्या छोट्याश्या तुकडया मार्फत ती दोन्ही घरचे नाते एकसाथ सांभाळत असते. नवऱ्याच्या घरी असताना ती माहेरच्या लोकांची काळजी करत असते आणि काही काळ विसावा घेण्यासाठी माहेरी गेली असता नवऱ्याची अन मुलांची काळजी तिला सतावत असते. आईवडिलांना दीर्घायुष्य दे असं देवाकडे मागताना आपण म्हातारे होईतोपर्यंत आपलं माहेरपण टिकून राहावं हा स्वार्थच असतो तिच्या प्रार्थने पाठी. सासरी संसार करत असताना सुद्धा माहेरची काळजी उरात बाळगून जगताना हे असं जगणं तिला कधीच तारेवरची कसरत आहे असं वाटतं नाही. म्हणूनच तिला विशाल हृदयी म्हंटलं आहे. प्रत्येक स्त्रीला शेवटपर्यंत माहेरपणाचं सूख लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

    अशी ही माहेरची कहाणी, प्रत्येक मुलीच्या जुबानी, सुफळ संपूर्ण.

    ©®अक्षता देशपांडे



    akshata देशपांडे


Your Rating
blank-star-rating
ऋचा दीपक कर्पे - (10 September 2021) 5
खूप सुंदर आणि हळव्या मनातील भावना...

0 0

Seema Puranik - (20 August 2021) 3

0 0

Veena Kantute - (20 August 2021) 5

0 0