चुकलं माकलं क्षमा कर
बाप्पाचं आगमन म्हणजे मनाला उभारी देणारं. शरीराला आलेली मरगळ पळवून लावणारं. काही दिवसांच्याच पाहुण्यांसाठी काय करायचं? त्याला कसं साजवायचं? आशा विचारांना दिशा देणारं होय. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत असताना येतो येतो लवकरच येतो असं बाप्पा म्हणाले असं गृहीत धरूनच त्यांचं विसर्जन केलेल्या दिवसांपासून त्यांचं पुढील वर्षीच्या आगमनाची वाट पाहत राहतं व्याकुळ मन. अंधारातून उजेडाकडे, दुर्गुणातून सदगुणांकडे अन व्यसनातून व्यसनमुक्तीकडे नेणाऱ्या बाप्पाच्या साजिऱ्या गोजिऱ्या रूपकडे पाहिल्यावर जीवन सार्थकी लागलं असं वाटतं ह्यात अतिशयोक्ती नाही.
भक्तांची सर्व दुःख, भक्तांचे पाप अन ताप आपल्या पोटात घेतो तो लंबोदर, सर्व पाप तापाचे विष त्याच्या कातिबंधनावर विळखा घातलेला नाग तर प्राशन करत नसेल ना? आपल्या सर्व दुःख, विघ्न यांचा नाश करून सुख देतो तो विघ्नहर्ता. दुष्ट बुद्धीचा नाश करून सद्बुद्धी देतो तो गणराज. असा सुखकर्ता दु:खहर्ता विघ्ननाशक गणराज आपल्या घरी येणार या भक्तांच्या विश्वासाला जागतच त्या एकदंताचं आगमन होतं. त्यांनीच निर्माण केलेल्या या जगात त्यालाच बोलावणं धाडतो आपण. त्यांनीच फुलावलेल्या शिवारातून धान्य वेचून त्याचाच नैवेद्य करून स्वतःला धान्य मानतो. त्यांनीच दिलेलं आयुष्य, त्यांनीच दिलेल्या सौभाग्याचं प्रदर्शन मांडत असतो आपण. मी गणपती बसवले. मी सजावट केली. मी एवढ्या मोदकांचा प्रसाद बनवला. मी गावाजेवण घातलं. माझ्या कष्टाच्या पैशातून घेतलेल्या गाडीतून त्याला मिरवत आणलं आणि विसर्जन केलं. आम्ही दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, आकरा दिवस बाप्पाला बसवतो. हे असं सगळं ऐकताना बाप्पाला मजा येत असेल? हसू येत असेल? वाईट वाटत असेल? की आपण हल्ली बऱ्याचदा करतो तसं इग्नोर करत असेल का आपल्या बोलण्या वागण्याचं?
आमचं पाप, दुःख पदरात घे रे मोरया म्हणत आपण हलके होतो. गणरायाची सेवा करून झालो पापमुक्त अशी कल्पना करत कालपानिक रित्या रिकामी झालेली पापाची शिदोरी त्याच्या पुढच्या आगमनापर्यंत आणखीन भरलेली असते. त्यांचं येणं आपल्याला भयमुक्त करणारं आहेच परंतु ह्यावेळेस आपल्याला पदरात घे रे बाबा. पुढच्या वेळेस अशी चूक होणार नाही असं आश्वासन देणारे आपण ते आश्वासन पाळतो का?:पापाची शिदोरी भरता भरता आपण कंटाळत नाही पण त्या बाप्पाचं काय? पाप करणं म्हणजे काय करतो आपण? पाप मनात असतं असं म्हणतात. अशुद्ध मन म्हणजे पाप. पण खरं तर मन अशुद्ध कधीच नसतं. अपले विचार अशुद्ध असतात. अन त्या विचारांच्या अनुषंगाने झालेला चुकीचा अचार अन कर्म म्हणजे पाप. घरातला कचरा काढून टाकल्यावर घर साफ होतं ह्याचा अर्थ घर घाण नसतं. फक्त घरात कचरा जमा झालेला असतो. कानाकोपऱ्यात जळमटं लागलेली असतात. ती साफ केली की घर साफ दिसतं. तसच मनातल्या चुकीच्या विचारांना काढून टाकलं की मन शुद्ध होतं.
बाप्पाला काय आवडतं ह्याचा कधी विचार केलाय का आपण? मोठे मोठे मंडप? स्पीकर्स? रोषणाई? सजावट? मोदक अन महाप्रसाद? त्याच्या नावाखाली आपण वरपासून खालपर्यंत सजलेलं? आपल्याकडच्या महाड्या वस्तूंचे सणासुदीला केलेलं प्रदर्शन? त्याच्या सम्मुख होणारे कार्यक्रम? त्याच्या मंडपात होणारी नेत्यांची भाषणबाजी? त्याच्या आगमनासाठी अन विसर्जनासाठी वाजणारे ढोल ताशे? सतत वाजणाऱ्या त्याच्या आरत्या अन गाणी? ह्यातलं काय आवडत असेल त्याला? गणरायाच्या नावाखाली सांस्कृतिक मंडळ उभारून अध्यक्ष उपाध्यक्ष होण्यासाठी मारामारी करणाऱ्या, मिठेपणासाठी मारणाऱ्या त्या अधिकाऱ्यांना काय ठाऊक की गजाननाला काय आवडतं ते!! अकरा दिवस दानपेटीत जमा झालेले पैसे खूप कमी मंडळं सत्कारणी लावतात. उरलेल्यांचं काय? गोविंदा अन बाप्पाच्या नावाने जमा झालेले पैसे दारूमध्ये उडवणाऱ्या तरुण पिढीला काय माहीत बाप्पाला काय आवडतं ते? बाप्पाला फक्त भक्तीने काठोकाठ भरलेलं शुद्ध मन आणि प्रेम हवं असतं. मनापासुन दिलेली हाक आवडते. अवडंबर नसलेली शुद्ध अंतकरणानी केलेली सादी पूजा आवडते. आधी आपली चित्तशुद्धी व्हायला हवी. देव भावानांचा भुकेला आहे. ऐश्वर्य आणि समृद्धी देणाऱ्या त्याच्यासमोर त्या समृद्धीचं प्रदर्शन मंडण्यात काय अर्थ?
मजा करायला मनमोकळे पणाने पैसे उधळणारे आपण बाप्पाची मूर्ती घेताना मात्र प्रचंड घासाघिस करतो. गरीब बँड बाजावाल्याशी पण हुज्जत घालतो. मूर्तिकार काय किंवा बँड वाला काय. पोटापाण्यासाठी कष्ट करणाऱ्या या लोकांचे कष्ट आपण पाहतच नाही. हे सगळं आवडत असेल का बाप्पाला? लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव का सुरु केला हे सर्वांनां माहित आहे. पण त्यांचा उद्देश सफल होताना आज दिसतोय का?
बाप्पा, चुकलं माकलं क्षमा कर. पुढच्या वर्षी लवकर ये पण सर्वांसाठी सद्बुद्धी घेऊन ये. जरा स्ट्रिक्ट हो रे बाप्पा. वकीती वर्ष असंच मुकपणे येणार आणि जाणार आहेस? हा असा नंगानाच सहन करणार आहेस? तू भक्तांसाठी धावून येतोस पण भक्ताना तुझा धाक राहिलेला नाहीये रे. तुझा भक्त! इथे बडेजावासाठी मारतोय. जरा आपली धाक दाखव रे बाप्पा. नको ती रोशणाई जिथे आजही अनेक गरीब लोकं अंधारात जगत आहेत. नको ते महाप्रसाद जो फक्त पैसेवाल्यांसाठी असतो. नको ती कोरडी भाषणं आणि अश्वासनं ज्याने कुणाचंच भलं होत नाही. पुढच्या वर्षी लवकर ये म्हणून गाऱ्हाणं घालणाऱ्या भक्तांना नाही येणार असं एकदा निक्षुन सांगून तर बघ. आणि खरोखर येऊच नकोस एक वर्षी. तेव्हां तरी त्यांना आपली चूक कळेल का? हे बघ नाहीतर दुसरा एखादा उपाय कर रे बाप्पा तुझ्या फक्त येऊन जाण्याने काय फायदा? काय फायदा?
©® अक्षता deshpande