धुपछाँव
असं म्हणतात की सुख आणि दुःख एकमेकांचा पाठलाग करत असतात. सुखाच्या पाठोपाठ दुःख आणि दुःखाच्या पाठी सुख असतंच. माणूस म्हणून एकदा जन्माला आल्यानंतर ह्या दोघांपैकी एकाला जरी टाळू म्हंटलं तरी ते टळत नसतं. नशिबी सूख भरभरून येतं तेव्हां आपण त्याला निमूटपणे उपभोगतॊ. देवाचे उपकार मानतो. आणखीन थोडं असेल तर सुखच दे असं मागून घेतो पण माझ्या मित्रगणांत एखादा दुःखी असेल तर माझ्यातलं थोडं सूख त्याला दे, मला भरपूर दिलंस असं कधीही म्हणत नाही. पण दुःख आल्यावर मात्र मलाच का? असा प्रश्न पटकन जिभेवर येतोच. त्यामुळे थोरामोठ्यांनी सांगून ठेवलय की सुख आल्यावर उतू नये मातु नये आणि दुःख आलं म्हणून खचू नये.
जर एखादी गोष्ट टाळणं आपल्या हातात नाहीच आहे तर मग काय कराव? तर असं म्हणतात की दुःखाचे बोचरे काटे सुद्धा फुलासम मऊ होतात जेव्हां दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. हा दृष्टिकोन बदलला की दुःखाच्या राज्यात हडबड माजते आणि दुःख नांगी टाकतं. आता हे जे काही मी सांगितलं ते वाचून समजण्या इतकं सोप्पं नाहीये. खूप कठीण आहे. अशा गोष्टींचा अनुभव घेतल्याशिवाय त्याची खोली लक्षात येणार नाही.
आपण सुखात असताना सगळेच आपल्याशी चांगलं वागतात. पण आपल्या कठीण समयी खरं कोण आणि खोटं कोण हे समजतं. कोणत्या प्रसंगी आपण कसं वागलं पाहिजे हे नक्कीच आपल्या हाती आहे पण समोरचा आपल्याशी कसा वागेल हे मुळीच आपल्या हातात नाहीये. आपल्या कठीण प्रसंगी बहुतेक लोकं आपल्याशी खूप कठोर किंवा स्वार्थी पणाने वागतात ही सामान्य गोष्ट झाली आणि तसं वागणारी माणसं पण अती सामान्यच असतात. पण जी आपल्या दुःखात आपल्याशी असामान्यपणे वागतात, आपलं दुःख हे स्वतःच दुःख मानतात ते केवळ असामान्यच नाहीत तर खूप खूप महान लोकं आहेत. अशी असामान्य लोकं स्वतःचं दुःख बाजूला सारून समोरच्या माणसाचं दुःख नाहीस करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशी असामान्य लोकं माझ्या मित्रगणांत आहेत हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो. असाच एक प्रसंग आणि त्या प्रसंगात माणसं एकमेकांशी कशी वागली आणि माझं मन हे सगळ लिहिण्यासाठी का उत्सुक झालं ते सांगते.
मागच्या पंचवीस वर्षांपासूनची माझी व तिची मैत्री खूप गाढ अशी. तिच्या घरात माझं नावच फक्त उच्चारलं तरी हो हो हिला ओळखतो आम्ही असं तिच्या घरचे सगळे म्हणतात. माझ्या पण घरात आणि नात्यात काही वेगळी परिस्थिती नाही. तिचं नाव सगळ्यांना माहित आहे. तिला जुळी मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी. माझं आणि त्या मुलांचं नक्कीच मागच्या जन्मीचं नातं असावं. कारण ती दोघं खूपच माझ्या हृदयाच्या जवळ आहेत. खूपच शालिनी मुलं आहेत ती.
तीन महिन्यापूर्वी तिच्या मुलीचं लग्न ठरलं. खूप आनंदात तिने मला फोन केला. मुलीला नात्यातच म्हणजे नणंदेच्या मुलालाच द्यायचं ठरलं.
मला एकीकडे माझ्याच मुलीचं लग्न ठरल्यासारखा आनंद होत होता आणि दुसरीकडे माझी स्वतःची मुलगी दहावीत असल्याने तिला सोडून कुठे जाता येणार नव्हतं ह्याचं दुःख होतं. मी माझी समस्या तिला सांगितल्यावर ती म्हणाली "तुझ्याच मुलीचं लग्न आहे, त्यामुळे लग्नाला नाही आलीस तर उभी चिरून टाकेन!!. मग काय अस्मादिकांनी घाबरून पण हसत हसत लगेच रेल्वेचं तिकीट बुक करून टाकलं.
लग्नाला अजून एक आठवडा आहे म्हणताना दिवाळीच्या दोन दिवस आधी एक खूपच दुःखद, जीवाला चटका लावणारी घटना घडली. तीन वर्षांपासून घशाच्या कॅन्सरशी लढत असलेल्या माझ्या मैत्रिणीच्या भावाने शेवटी हत्यार टाकलं. खूप बाका प्रसंग. तो गेला तेव्हां त्याने वयाची 50 पण गाठली नव्हती. आठवडाभरावर लग्न, आणि भावाचा मृत्यू. सगळं घर दुःखात बुडालं. मला बातमी समजली तेव्हां काही क्षण माझी वाचाच बंद पडली. कोणी काहीच बोलायच्या परिस्थिती मध्ये नव्हतं. हॉल बुक करण्यापासून ते संगीत, हळद, लग्न, त्यानंतर आठवडाभरानी होणारे रिसेपशन सगळ्यांची पूर्ण तयारी झाली होती. अशा प्रसंगी लग्न होणार की नाही हे पण सांगणं कठीण होतं. तिसऱ्या दिवशी त्यांचं सूतक संपलं आणि घरच्या मोठ्यांनी ठरलेल्या मुहूर्तावर लग्न करायचं ठरवलं. मैत्रिणीच्या आई वडीलानी मुलगा गेल्याच दुःख बाजूला ठेवलं आणि ह्यापुढे कुणीही डोळ्यात पाणी काढायचं नाही असं निक्षून सांगितलं. लग्नघरात पोहचेपर्यंत माझं मन प्रचंड चलबिचल होतं. तिथे गेल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचं सावट पाहायला मिळणार असं मनात धरूनच मी निघाले.
पण तिथे पोचले आणि उलटंच पाहायला मिळालं. सगळ्यानी माझं खूप मनापासून आणि आनंदाने स्वागत केलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर दोन दिवसांनी होणाऱ्या लग्नाचा आनंद आणि उत्साह दिसत होता. मैत्रिणीची वाहिनी, तिची मुलं हळदीच्या कार्यक्रमात, संगीत कार्यक्रमात, दुसऱ्या दिवशीच्या लग्नात, रिसेपशन मध्ये काय घालायचं ह्या तयारीत लागलेली दिसली. मी तिथे पोचताच मैत्रिणींनी, तिच्या आईनी, वहिनींनी, भाचींनी नवरी मुलींनी मला घट्ट मिठी मारली. चेहऱ्यावर दिसत नसलं तरीही त्या मिठीत मला त्यांचं दुःख जाणवलं. सर्व दुःख मनात लपवून वरकरणी सगळे हसत, चेष्टा मस्करी करत वावरत होते.
सांगायची गोष्ट अशी की सगळ्या घरच्यानी आपल्या सुनेला (मैत्रिणीच्या वहिनीला) संपूर्ण सव्वाष्णीचा मान दिला होता. तिला हिरवा चुडा घालायला लावला होता, हळदीच्या वेळेस तिला पण हळद लावण्याचा, लावून घेण्याचा मान होता, संगीताच्या वेळेला स्टेजवर सर्व मुलांनी तिला हात धरून स्टेजवर आणलं, घरचे सगळे तिच्या भवती गाणं म्हणून नाचले, तिला हसवलं, तिचा हात धरून तिलाही नाचायला भाग पाडलं. ह्या प्रसंगी सगळ्यांनाच भरून आलं होतं मग तिला तर येणारच ना! पण तेव्हां पण तिने काय सर्वांनीच दुःख गिळलं होतं. लग्नात दोन दिवस कोणी रडलं तर माझी शपथ आहे असं मैत्रिणीच्या आईनी सर्वाना सांगून ठेवलं होतं आणि घरचे सगळे तिचा मन राखत एकमेकांना सांभाळत होते.
खरं सांगते तिथल्या सर्व लहान मोठ्यांचे पाय धरून लोटांगण घालावं असं मला त्या क्षणी वाटतं होतं. लग्न आटपून तिथून निघाले तेव्हा त्या सर्वांबद्दलच्या आदराने माझं मन भरून आलं होतं. राहून राहून एवढंच वाटतं होतं की देवा,
खरच असं घराणं प्रत्येक स्त्रीला मिळावं जिथे तिचा मान राखला जाईल, तिचा सन्मान केला जाईल. असं घर मिळालं तरच तिचं जगणं सुकर होईल, स्त्री जन्म सफल होईल.
©® अक्षता देशपांडे