डस्टबिन!!
'काय गं? दिसली नाहीस खूप दिवसांपासून!बरं नव्हतं का? की लग्नाच्या तयारीत गुंतलीयेस?" बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या तिला मी विचारलं.
"बिझी वगैरे काही नाही हो काकू. लग्नाचं म्हणत असाल तर महिन्या पूर्वी माझा ब्रेकअप झालाय. त्यामुळे लग्नाचं सध्या टेन्शन नाही" असं म्हणून ती हसली.
तिचं हसणं पाहून मी बुचकळ्यात पडले. हिचा ब्रेकअप झालाय आणि ही खुशाल हसतेय? हिच्या चेहऱ्यावर त्याबद्दल कसलंच सोयर सुतक नाही? मग मला राहवेना,
"का ब्रेकअप झाला गं?"
असं मी तिला विचारलं पण उगाचच विचारलं असं वाटलं.
"मीच त्याला डिच केलं काकू, बावळट होता. एका सुंदर गर्ल फ्रेंडशी कसं वागावं हे कळतंच नव्हतं त्याला. म्हणून मीच सांगितलं त्याला की जा बाबा तुझ्या मार्गाने, तुझं माझं जमणार नाही, खूप अपसेट झालं बावळट बिचारं.
"असं नको करुस, तुला हवं तसं वागेन, पण ब्रेकअप करू नकोस' म्हणाला.
पण एकदा ठरवल्यावर मी माघार घेत नाही. मला बावळट मुलगे नकोच मुळी. अन मी सरळ निघूनच आले".
तिची मुक्ताफळं ऐकताना मला आवंढा गिळणे मुश्किल झालं. खूप प्रयत्न करूनही मला माझ्या हृदयाची धडधड कमी करता आली नाही. मी आणखीन थोडी आगाऊगिरी केली,
"बावळट म्हणजे कसा होता गं? हुशार नव्हता का? चांगली नोकरी नव्हती का त्याच्याकडे?" असं विचारलं.
ती क्षणभर माझ्या तोंडाकडे बघत राहिली मग पटकन भानावर येत म्हणाली.
"अहो काकू, कोणत्या जमान्यात राहत आहात? अहो बावळट म्हणजे त्या दृष्टीने नाही काहीsss. बावळट म्हणजे प्रेम करण्याच्या दृष्टीने बावळट म्हणायचं होतं मला"
"म्हणजे गं?" मी माझा तोल सावरत आपला तोच निरागस प्रश्न विचारला. तीचं माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहणं संगत होतं की बहुतेक तिने मनातच कपाळावर हात मारून घेतला असावा.
"अहो काकू, मी एवढी सुंदर मुलगी त्याला गर्लफ्रेंड म्हणून मिळाले होते. दुसरा एखादा ह्याच्या जागेवर असता तर आत्ता पर्यंत दहा वेळा मला किस करून मोकळा झाला असता. ह्याच्यात हिम्मतच नाहीये". एवढं सांगून तिने माझा निरोप घेतला.
तिचे विचार माझ्या पचनी पडणं कठीणच होतं. . नशीब थोर की मी झीट येऊन पडले नाही. माझ्या घशाला चक्क कोरड पडली होती.
जग इतकं बदललं? आणि आपल्याला त्याची जाणीवच नाही? लग्नाच्या आधी मुलानी जवळीक साधली नाही म्हणून मुलींनी लग्न मोडलं? मुली इतक्या बदलल्या कधी? ह्यांना मॉडर्न मुली म्हणायच्या का? मला पण एक लग्नाच्या वयाची मुलगी आहे. माझ्या मैत्रिणीच्या पण ह्याच वयाच्या मुली आहेत पण त्या अशा विचारांच्या नाही आहेत. असो.. कालाय तस्मै नमः तरी कसं म्हणू अशा विचारात असतानाच एके दुपारी माझी एक मैत्रिण घरी आली. तिचा चेहरा जरा उतरला होता. वरकरणी दमली असेल असं वाटलं.
तिचा मुलगा विजय अत्यंत गुणी. वय वर्ष 28. त्याच्यासाठी मुलगी पाहायला लागून दोन वर्ष झाली होती तरीही अजून लग्न ठरत नव्हतं. मागच्या आठवड्यात पण मुलगी बघायचा एक कार्यक्रम झाला होता. त्याचं पुढे काय झालं कळलंच नव्हतं. त्यामुळेच बेचैन आहे का? पण कसं विचारू? असं वाटलं.
"कसं व्हायचं आमच्या मुलांचं?" अशी तिनेच सुरुवात केली. "अगं मागच्या महिन्यात एक मुलगी पाहायला गेलो होतो घराणं चांगलंच होतं. मुलगी चांगली शिकलेली आहे. पण आमची निराशाच झाली. मुलीने सरळ सरळ विचारलं की घरी डस्टबिन्स किती आहेत? आधी मला तिचा प्रश्नच समजला नाही. थोड्यावेळाने त्याचा अर्थ उमगल्यावर मात्र कानकोंडं व्हायला झालं. तिच्या अर्थी घरातली जेष्ठ माणसं म्हणजे डस्टबिन. आमचा विजय खूप बेचैन झाला हे ऐकून. हे काहीच नाही, मागच्या आठवड्यात एकीकडे मुलगी पाहायला गेलो होतो. श्रीमंत माणसं होती. विजयला आणि तिला एकांतात बोलायला पाठवलं तर तिने विजयला विचारलं की 'काही अनुभव आहे का?' तिच्या प्रश्नाने विजयचा संताप संताप झाला होता पण अशा ठिकाणी काही न बोललेलंच बरं असं त्याला वाटलं. 'मला चांगला अनुभव आहे' तिने हसत त्याला बिनधास्तपणे सांगितलं. हे सगळं पाहून विजय मनाने खूप विस्कटला. म्हणे आई मला आता लग्न करायची भीती वाटतेय ग. ह्या मुलीच्या बोलण्याला काही ताळतंत्र आहे का नाही? मुलगा असून मला लाज वाटतं होती पण तिच्या डोळ्यात मला तसं काहीच दिसलं नाही. इतक्या बिघडल्या नवीन पिढीच्या मुली?'
"मी फक्त त्याच्या पाठीवरून हात फिरवला, आपल्या हातात दुसरं काय आहे गं? पण माझ्या मुलाची काळजी वाटते इतकंच".
आपलं दुःख बोलून ती निघून गेली आणि मी सुन्न झाले. माझ्या डोक्यात उलटसुलट विचार फेर धरू लागले.
खरच हा नवीन पिढीचा दोष आहे का? इतकी बिघडतं चाललीये का ही पिढी? मला माझ्या इतर मैत्रिणींच्या मुली, सुना आठवल्या. त्या सगळ्याच खूप सोज्वळ आणि घरच्या सगळ्या सदस्यांना मान देऊन राहत होत्या. त्यांच्या तोंडून कधीच असे विचार मला ऐकायला मिळाले नाहीत. ह्याचा अर्थ हा पिढीचा दोष नाहीये. ही फक्त विचारसरणी आहे जी ह्याच पिढीच्या काहीच मुलींमध्ये दिसत आहे. त्याला जबाबदार एक संबंध पिढी होऊ शकत नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे. कोण कसा विचार करतो त्यावरून त्याचं व्यक्तिमत्व ठरतं.
प्रत्येक पुढीनुसार विचार बदलत असतात पण बदलेले विचार समाज सुधारक आहेत की घातक आहेत हे त्या पिढीने समजून ते आत्मसात करावेत. *समाजात राहताना समाजाच्या पण काही धारणा असतात त्याला अशा वातावरणाने तडा जाण्याची शक्यता असते*
*सिरीयल, मिडिया यामुळे अशा काही गैरसमजुती वाढत जातात*
*खरं प्रेम म्हणजे काय? संसार म्हणजे काय हेच माहीत नसणं म्हणून यातुन अशा गोष्टी घडतात*. *सर्वात मुख्य म्हणजे घरात पालक आणि पाल्यांमध्ये कमी होत चाललेल्या संवादामुळे मुलांमध्ये आयुष्याबद्दल वाढत चालेल्या गैरसमजुतीचं निराकरण न होणे हा मोठा विरोधाभास आहे. पालक म्हणजे मुलांना पैसा पुरवणारे यंत्र असं एकूण पालकांचं व्यक्तिचित्रण समाजमानसात रुजतंय. ही धारणा फक्त पालकच बदलू शकतात. येणारी पिढी ही उद्याच्या समाजाचा आधार स्तंभ असायला हवेत तर त्यांचा पाया मजबूत कारण हे पालकच करू शकतात*
©®अक्षता देशपांडे